घरगुती शीतपेये

उमाशशी भालेराव 
सोमवार, 1 एप्रिल 2019

उन्हाळा विशेष
उन्हाळा तीव्र होऊ लागला, की आपल्याला सतत तहान लागते. काहीतरी थंडगार प्यावे असे वाटते. बाजारात अनेक प्रकारची कोल्ड्रिंक्‍स, सरबते, फळांचे रस विकत मिळतात. पण हे सर्व बराच काळ टिकविण्यासाठी त्यात सोडिअम-बेंझाइट अथवा पोटॅशिअम, मेटाबाय सल्फाईड ही रासायनिक द्रव्ये मिसळलेली असतात. ही रासायनिक्रि प्रीझर्व्हेटिव्ह अधिक प्रमाणात शरीरात जाणे नक्कीच इष्ट नाही. म्हणून घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण घरीच अशी अनेक शीतपेये तयार करू शकतो. प्रीझर्व्हेटिव्ह न घालताही घरगुती शीतपेये फ्रीजमध्ये काही दिवस टिकू शकतात.

लिंबाचे सरबत  
या दिवसांत झटपट होणारे, थंडावा देणारे व अत्यंत आल्हाददायक व सर्वांना प्रिय असणारे पेय म्हणजे ताज्या लिंबाचे सरबत. लिंबाचा रस काढून त्यात आवडीप्रमाणे साखर (पिठीसाखर असल्यास अधिक झटपट होईल) व चवीपुरते मीठ, वेलदोड्याची पूड व थंडगार पाणी वा बर्फ घालून हे सरबत करावे.

आमसुलाचे सरबत
आपल्याला जितके सरबत करायचे आहे, त्यामानाने आमसुले घेऊन गरम पाण्यात भिजत ठेवावीत. थोड्या वेळाने कोळून ते पाणी गाळून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे चिमूटभर मीठ, आवडीप्रमाणे साखर व गरजेप्रमाणे थंड पाणी घालून सरबत करावे. या सरबतात थोडी जिरेपूड घालावी, म्हणजे स्वाद छान येतो.

पिकलेल्या कवठाचे सरबत
कवठ फोडून आतील गर काढून घ्यावा. हा गर पाण्यात कोळून ते पाणी गाळून घ्यावे. त्यात आवडीप्रमाणे साखर, चवीपुरते मीठ, वेलदोडे पूड व गरजेप्रमाणे थंड पाणी घालून सरबत करावे. साखरेऐवजी गूळ घालूनही हे सरबत फार छान लागते.

कैरीचे पन्हे 
उन्हाळ्यातील खास घरगुती पेय म्हणजे पन्हे! कैरीचे पन्हे तीन प्रकारांनी करता येते. 
१)     कच्ची कैरी किसून घ्यावी व पाण्यात कोळून पाणी गाळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, आवडीप्रमाणे साखर वा गूळ घालावा. नंतर वेलदोड्याची पूड घालावी. 
२)    दुसरा प्रकार म्हणजे कैरी कुकरमध्ये उकडून घ्यावी. थंड झाल्यावर त्यातील गर काढून घ्यावा. हा गर थंड पाण्यात मिसळून त्यात आवडीप्रमाणे साखर वा गूळ घालावा. चवीपुरते मीठ व वेलदोडा पूड घालावी. हवे तर गाळून घेऊन बर्फ घालून सर्व्ह करावे. 
३)    तिसरा प्रकार म्हणजे कैरी उकडण्याएेवजी भाजून घ्यावी व वरीलप्रमाणेच कृती करावी. याचा स्वाद वेगळा लागतो.

अननसाचे सरबत 
अननस चांगला सोलून त्याच्या फोडी कराव्यात. फोडींच्या तिप्पट त्यात पाणी घालून उकळी आणावी. म्हणजे फोडी थोड्या मऊ पडतील. थंड झाल्यावर मिक्‍सरमधून फिरवून घ्यावे. नंतर गाळून घ्यावे. त्यात चवीनुसार थोडी साखर व किंचित मीठ घालून सरबत बनवावे आणि बर्फ घालून सर्व्ह करावे.

द्राक्षाचे सरबत 
या दिवसांत हिरवी व काळी अशी दोन्ही रंगाची द्राक्षे मिळतात. आपल्या आवडीची बिनबियांची द्राक्षे थोडे पाणी घालून मिक्‍सरमधून एकजीव करावे. नंतर ते गाळून त्यातील रस घ्यावा. जरुरीप्रमाणे पाणी घालावे. द्राक्षांच्या गोडीप्रमाणे थोडी साखर व चवीपुरते मीठ घालावे. द्राक्षे फार गोड असल्यास थोडासा लिंबाचा रस मिसळावा. म्हणजे सरबताची रुची वाढेल. इतर फळांपासूनही याप्रकारे सरबत करता येईल.

आइस्ड टी (थंड चहा)
साखर अगर दूध न घालता कोरा चहा करून घ्यावा. चहा कडकच करावा. सर्व्ह करताना एका मोठ्या ग्लासमध्ये एक तृतीयांश ग्लास भरेल इतका बर्फ घालून त्यावर कपभर चहा घालून आपल्या आवडीप्रमाणे हवी तेवढी पिठीसाखर घालावी. लिंबाच्या एका फोडीचा रस त्यावर पिळावा. सर्व्ह करण्यापूर्वी ग्लासाच्या काठांवर एक लिंबाची चकती खोचावी. हे एक उत्तेजक पेय आहे.

टोमॅटोचे सरबत 
पिकलेले टोमॅटो घेऊन अर्धा मिनीट गरम पाण्यात ठेवून काढावेत. म्हणजे वरची साल सहजपणे काढून टाकता येईल. आतील गर मिक्‍सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्यावा. त्यात नंतर पुरेसे पाणी घालून ३-४ मिनिटे उकळून घ्यावे. त्यानंतर थंड झाल्यावर गाळून, चवीप्रमाणे साखर, चिमूटभर मीठ व थोडी मिरपूड घालावी. बर्फ घालून सर्व्ह करावे. हे पेय चविष्ट व पौष्टिक आहे.

बनाना मिल्क शेक 
एक ग्लास दूध, एका केळीच्या फोडी व चवीपुरती साखर घालून मिक्‍सरमधून घुसळून घ्यावे. घुसळतानाच बर्फ घालावा, म्हणजे थंडगार मिल्कशेक झटपट तयार होईल. आवडल्यास दुधात थोडे क्रीम मिसळावे म्हणजे अधिक फेसाळ होईल. याचप्रमाणे आपल्या आवडीच्या कोणत्याही फळाचे मिल्कशेक करता येईल. एकापेक्षा अधिक फळे एकत्र करून मिक्‍स फ्रूट शेकही करता येईल.

मॅंगो फालुदा 
आंब्याचे दिवस आहेत, तेव्हा हा मॅंगो फालुदा करून पहाच.
साहित्य : एक चमचा सब्जाचे बी (चार तास पाण्यात भिजवून ठेवलेले), १ ग्लास गार दूध, २ चमचे साखर, ४ चमचे मॅंगो पल्प, अर्धी वाटी शिजवलेल्या जाड शेवया, व्हॅनिला आइस्क्रीम व सजावटीसाठी आंब्याच्या फोडी.
कृती : मॅंगो पल्प, साखर व दूध मिक्‍सरमधून फिरवून घ्यावे. एका मोठ्या ग्लासमध्ये भिजवलेले सब्जा बी घालावेत. त्यावर शिजवलेल्या शेवया घालाव्यात व त्यावर आंबा दूध साखरेचे मिश्रण घालावे. त्यावर छोटे गोल व्हॅनिला आइस्क्रीम घालावे व वरती सजावटीसाठी आंब्यांच्या फोडी (तीन-चार) ठेवून सर्व्ह करावे.

मसाला ताक व गोड लस्सी 
उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्याही प्रहरी थंडगार ताक प्यायल्याने पोटात शांत वाटते. ताजे दही घुसळून त्यात मीठ, हिंगपूड, जिरेपूड, मिरपूड घालून त्यात बर्फ व आवश्‍यकतेनुसार पाणी घालून मसाला ताक पिण्यास द्यावे. थोड्या कोथिंबिरीने सजवावे. दह्यामध्ये पाणी, आवडीप्रमाणे साखर, चिमूटभर मीठ व क्रीम घालून मिक्‍सरमधून घुसळून घ्यावे. छान फेसाळ लस्सी सर्व्ह करावी. सर्व्ह करताना पुन्हा वरती साय घालावी व गुलाबजल शिंपडावे. 

जलजिरा
जलजिरा हे क्षुधावर्धक पेय म्हणजेच ॲपिटायझर आहे. ॲपिटायझर म्हणजे जिभेला चव आणून जठराग्नी प्रदीप्त करणारे पेय असून जेवणापूर्वी थंडगार ॲपिटायझर सर्व्ह केल्याने जेवणाचा आस्वाद अधिक छान घेता येतो. 
साहित्य : दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड, १ चमचा आमचूर पावडर, १२-१५ पुदिन्याची पाने व थोडी कोथिंबीर, २ चमचे लिंबूरस व चवीनुसार शेंदेलोण, पादेलोण 
कृती : पुदिन्याची पाने व कोथिंबीर थोडे पाणी घालून मिक्‍सरमधून गुळगुळीत पेस्ट करून घ्यावी. त्यात इतर सर्व साहित्य, आवश्‍यकतेप्रमाणे पाणी व बर्फ घालून सर्व्ह करावे. सर्व्ह करताना ग्लासवर लिंबाची गोल चकती लावून सजवावे. आमचूरऐवजी ताजी कैरी घातल्यास अधिक स्वाद येईल. 
 

संबंधित बातम्या