विजेवर चालणारा हेवी ट्रक 

वैभव पुराणिक, लॉस एंजलिस
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

टेक्‍नोसॅव्ही
लॉस एंजलिसजवळच्या हॉथॉर्न शहरात झालेल्या एका समारंभात इलान मस्कच्या टेस्ला कंपनीने बनवलेला विजेवर चालणारा ट्रक जगाला दाखवला. बॅटरी तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा हा एक मोठा पुरावा आहे. अमेरिकेत अशा प्रकारचे ट्रक मालवाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, त्याविषयी...

विजेवर चालणाऱ्या गाड्या एव्हाना अमेरिकेत बऱ्यापैकी लोकप्रिय झाल्या आहेत. जवळजवळ सर्वच प्रमुख कार कंपन्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणल्या आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक इलेक्‍ट्रिक कार घेताना दिसतात. माझ्या अनेक मित्रांकडेही इलेक्‍ट्रिक कार आहेत. परंतु या सर्वच गाड्या बऱ्यापैकी लहान आहेत. विजेवर चालणाऱ्या मोठ्या गाड्या - एस यु व्ही मात्र रस्त्यावर क्वचितच दिसतात. विजेवर चालणारे ट्रकतर अस्तित्वात नव्हतेच! परंतु १६ नोव्हेंबर २०१७ रोजी इलान मस्कच्या टेस्ला कंपनीने ही परिस्थिती बदलली. त्यांनी विजेवर चालणारा ट्रकही बनवणे शक्‍य असल्याचे जगाला दाखवून दिले. १६ नोव्हेंबरला लॉस एंजलिसजवळच्या हॉथॉर्न शहरात झालेल्या एका समारंभात इलान मस्कच्या टेस्ला कंपनीने बनवलेला विजेवर चालणारा ट्रक जगाला दाखवला. बॅटरी तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा हा एक मोठा पुरावाच आहे. 

टेस्लाचा हा ट्रक म्हणजे मोठा कंटेनर वाहून नेणारा ट्रक आहे. अमेरिकेत त्याला १८ व्हीलर, सेमाय ट्रेलर ट्रक किंवा नुसते सेमाय असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या ट्रकना मागच्या बाजूला सामान ठेवायची जागा बऱ्याच वेळेला नसतेच. जहाजावर माल वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे कंटेनरच त्याला मागे जोडले जातात. अमेरिकेत अशा प्रकारचे ट्रक मालवाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. टेस्लाने जाहीर केलेला हा ट्रक संपूर्णपणे विजेवर चालणारा आहे. तो हायब्रीड नाही - म्हणजेच तो डिझेल अजिबात वापरत नाही. म्हणूनच तो एमिशन्स मुक्त म्हणजे उत्सर्जन मुक्त आहे. या मॉडेलचे नाव टेल्साने ‘सेमाय’ (Semi) असेच ठेवले आहे. टेस्लाच्या मते हा जगातील सर्वांत जलद ट्रक आहे. तो ८० हजार पौंड (३६ मेट्रिक टन) माल वाहून नेऊ शकतो आणि एवढे वजन लादलेले असतानाही त्याला ० मैलापासून ६० मैल वेग पकडण्याकरता फक्त २० सेकंदच लागतात. इतर डिझेल ट्रकना जवळजवळ तिपटीहूनही अधिक वेळ लागतो. सर्वसाधारण डिझेल ट्रक ५ अंशाच्या चढावर फक्त ताशी ४५ मैलाच्या वेगानेच जाऊ शकतो. परंतु टेस्लाचा सेमाय मात्र ५ अंशाचा चढ ताशी तब्बल ६५ मैल वेगाने चढू शकतो. तसेच एकदा बॅटरी चार्ज केल्यावर हा ट्रक ५०० मैल अंतर पुन्हा चार्ज केल्याशिवाय कापू शकतो. टेस्लाच्या संशोधनाप्रमाणे, अमेरिकेतील ८० टक्के ट्रकच्या फेऱ्या २५० मैल किंवा कमी अंतराच्या असतात. याचाच अर्थ हा ट्रक एखादा माल घेऊन मुक्कामाच्या जागी उतरवून चार्ज न करता परत येऊ शकतो. अर्थात ५०० मैल जाऊ शकणारे मॉडेल महाग असून ३०० मैल जाऊ शकणारे स्वस्तातील मॉडेलही उपलब्ध आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, ४०० मैल जाण्याइतकी बॅटरी चार्ज करण्यासाठी फक्त ३० मिनिटेच लागतील असे टेस्लाने म्हटले आहे. म्हणजेच ५ ते ६ तास ड्राईव्ह केल्यानंतर ड्रायव्हर जेव्हा जेवायसाठी थांबेल तेव्हा त्याचे जेवण संपेपर्यंत ट्रक पुन्हा ४०० मैल जाण्यासाठी तयार झालेला असेल. यासाठी लागणारे सौर ऊर्जेवर चालणारे मेगा चार्जर सर्वत्र उपलब्ध करून देण्याचे टेस्लाने आश्‍वासन दिले आहे. हे चार्जर सौर ऊर्जा वापरत असल्याने हा ट्रक खऱ्या अर्थाने प्रदूषणरहित ठरेल. एखाद्या इलेक्‍ट्रिक कारचे मायलेज मोजायची अजून एक पद्धत म्हणजे एक मैल अंतर कापण्यासाठी या गाडीला किती विद्युत ऊर्जेची गरज लागते हे होय. टेस्लाचा सेमाय एक मैल अंतर २ किलोवॅट अवरपेक्षाही कमी ऊर्जेत कापू शकतो. 

टेस्लाने आपल्या ट्रकचे डिझाईन एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे (बुलेट) केले आहे. ट्रक किंवा कार रस्त्यावरून जात असताना त्याला हवेच्या विरोधाचा सामना करावा लागतो. त्याचे मोजमाप भौतिकशास्त्रात ड्रॅग कोइफिशीयंटने केले जाते. हा ड्रॅग कोईफिशियंट जितका कमी, तेवढा हवेचा विरोध कमी. सर्वसाधारण डिझेल ट्रकचा ड्रॅग कोईफिशीयंट ०.६५ ते ०.७० च्या आसपास असतो. बुगाटी कंपनीची शायरॉन म्हणून एक प्रसिद्ध स्पोर्टस कार आहे. या कारची किंमत तब्बल २० दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. ही कार वेगासाठी जगात प्रसिद्ध आहे. तिचा ड्रॅक कोईफिशीयंट फक्त ०.३८ एवढा आहे. परंतु टेस्ला सेमायचा ड्रॅक कोइफिशियंट हा बुगाटीपेक्षाही कमी म्हणजे ०.३६ एवढा आहे. हवेचा विरोध कमी केल्याने या ट्रकला एका चार्जमध्ये जास्त अंतर कापता येते असे एलान मस्कने म्हटले आहे.  अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे, हा ट्रक चालवणे इतर डिझेलवरील ट्रक चालवण्यापेक्षा बरेच सोपे आहे. इलेक्‍ट्रिक कारमध्ये गिअर नसतात. त्यामुळे गिअर बदलत राहायचा प्रश्‍नच येत नाही. तसेच या ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या जागी एकच सीट असून ती ट्रक कॅबिनच्या बरोबर मधोमध ठेवण्यात आली आहे. सर्वसाधारण ट्रकमध्ये स्टिअरिंग व्हील उजव्या किंवा डाव्या बाजूला असते. अमेरिकेत ते डाव्या बाजूला (लेफ्ट हॅंड साइड ड्रायव्हिंग) व भारतात ते उजव्या बाजूला (राइट हॅंड साइड ड्रायव्हिंग) असते. परंतु टेस्लाच्या सेमायमध्ये स्टिअरिंग व्हील ट्रक कॅबिनच्या बरोबर मध्ये आहे. त्यामुळे ट्रक चालवणे अधिक सोपे होते. स्टिअरिंग व्हीलच्या पुढे एकच सीट असली, मागच्या बाजूला इतरही लोकांना बसायला सीटची व्यवस्था आहे. स्टिअरिंग व्हीलच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत. या स्क्रीनवर जीपीएस व इतर अमेरिकन ड्रक ड्रायव्हर सर्वसाधारणपणे वापरतात त्या सर्व यंत्रणा बसवलेल्या आहेत. ड्रायव्हरचे सामान ठेवण्यासाठी पुढच्या बाजूला छोटी डिकीही ठेवण्यात आली आहे. 

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्लाच्या इतर गाड्यांमध्ये उपलब्ध असणारी ऑटोपायलट - स्वयंचलन यंत्रणा या ट्रकमध्येही उपलब्ध आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही यात अनेक सुविधा घालण्यात आलेल्या आहेत. हा ट्रक समोर अडथळा आल्यास आपोआपच ब्रेक मारतो. एवढेच नव्हे, तर तो स्वतःला लेनमध्येही (वाहतूक नियमनासाठी आखलेल्या रेषा) ठेवतो. ड्रायव्हर अचानक प्रतिसाद देईनासा झाला तर हा ट्रक आपोआपच आपल्या लेनमध्ये थांबतो व ड्रायव्हरने ठराविक वेळात उत्तर न दिल्यास हा ट्रक आपोआपच रुग्णवाहिकेला बोलावतो. मोठ्या ट्रेलर ट्रकमध्ये जॅक नाइफिंग होण्याची शक्‍यता असते. जॅक नाइफिंग म्हणजे ट्रकचा पुढचा भाग वळतो पण मागचा कंटेनर मात्र वळत नाही. वेगामुळे कंटेनर या पुढील इंजिनाच्या भागाला अजूनच वळवतो व तो भाग मागे वळून आपल्याच कंटेनरवर आदळतो. एखाद्या पॉकेट चाकूचे पाते जसे आपल्या कव्हरमध्ये फोल्ड होऊन आत जाते तसेच या ट्रकचे होऊ शकते. टेस्लाने आपल्या ट्रकमध्ये जॅक नाइफिंग होणारच नाही, अशा यंत्रणा बसवल्या आहेत. तसेच या ट्रकची पुढची काच थर्मोन्यूक्‍लिअर स्फोटातही टिकू शकेल असे टेस्लाने म्हटले आहे. अमेरिकेत ट्रकच्या विंडशिल्डला तडा गेला असेल, तर असा ट्रक चालवता येत नाही. त्यामुळे पुढील काच (विंडशिंल्ड) जास्त टिकाऊ असेल तर ट्रक मालकाचे नुकसान टळू शकते. टेस्लाने ट्रकमध्ये चार वेगवेगळ्या इलेक्‍ट्रिक मोटर बसवलेल्या आहेत. प्रत्येक चाकांच्या जोडीला वेगळी इलेक्‍ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. त्यामुळेच टेस्लाने हा ट्रक १० लाख मैल चालवल्याशिवाय बंद पडणार नाही अशी खात्री दिली आहे. चार मोटरपैकी दोन मोटर बंद पडल्या तरीही हा ट्रक डिझेल ट्रकपेक्षा फास्ट जाऊ शकेल असेही इलान मस्कने म्हटले आहे. या ट्रकचे ब्रेक इतर इलेक्‍ट्रिक कारप्रमाणे  बॅटरी चार्जिंगला मदत करतात. त्यामुळे त्याला इतर ट्रकप्रमाणे ब्रेक पॅड नाहीत. त्यामुळेच सारखे सारखे ब्रेक पॅड बदलायचीही गरज नाही. तसेच टेस्लाच्या इतर इलेक्‍ट्रिक कारप्रमाणे या ट्रकचेही स्मार्टफोन ॲप आहे. या स्मार्टफोन ॲपद्वारे ट्रकच्या मेंटेनन्सवर चालकाला नजर ठेवता येईल. ट्रकचे नक्की स्थान सांगता येईल आणि टेस्लाच्या सर्व्हिस सेंटरशी संपर्कही साधता येईल. 

या ट्रकच्या ३०० मैल मॉडेलची किंमत १ लाख ५० हजार डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. तर ५०० मैल मॉडेलची किंमत १ लाख ८० हजार डॉलर्स ठेवण्यात आली आहे. सर्वसाधारण डिझेल ट्रकची किंमत अमेरिकन बाजारपेठेत १ लाख वीस हजार डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच टेस्लाचे ट्रक महाग असले तरीही वीज डिझेलपेक्षा स्वस्त असल्याने व टेस्लाच्या ट्रकला कमी मेंटेनन्स लागत असल्याने टेस्ला ट्रक चालवण्याचा एकूण प्रतिमैल खर्च हा डिझेल ट्रकपेक्षा कमी आहे. टेस्लाच्या आकड्यानुसार डिझेल ट्रक चालवण्याचा प्रतिमैल खर्च १ डॉलर ५१ सेंट असून टेस्ला ट्रक चालवण्याचा खर्च मात्र फक्त १ डॉलर व २६ सेंट आहे. अर्थात हे आकडे कितपत खरे आहेत ते पाहण्यासाठी मात्र आपल्याला २०१९ पर्यंत थांबणे आवश्‍यक आहे. या ट्रकचे उत्पादन २०१९ मध्ये सुरू होणार आहे. 

हवामान बदल (क्‍लायमेट चेंज) ही माझ्या मते मानवाला भेडसावणारी सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. ती समस्या सोडवायची असेल, तर आपल्याला खनिज तेलावर चालणारे आपले सर्वच व्यवहार कमी करावे लागतील. विजेवर चालणाऱ्या गाड्या व ट्रक त्या दृष्टीने फारच महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षांच्या बॅटरी तंत्रज्ञानातील संशोधनानंतर आता बॅटरीवर ३६ मेट्रिक टन सामान वाहून नेणारा ट्रक चालवणेही शक्‍य होणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या विमानांवरही प्रयोग सुरू असून पुढील दहा वर्षात बॅटरीवर चालणारी विमाने बाजारात आल्यास मला अजिबात आश्‍चर्य वाटणार नाही.

फोटो फीचर

संबंधित बातम्या