ॲपलचे बॅटरीगेट

वैभव पुराणिक, लॉस एंजलिस
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

टेक्‍नोसॅव्ही
लोकांना ॲपलचे नवीन फोन घेणे भाग पडावे म्हणून कंपनी असे करत असल्याचा आरोप काही जणांनी कंपनीवर ठेवला आहे. काही लोक तर नुसते आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी कोर्टात ॲपलविरुद्ध दावेही दाखल केले आहेत. कंपनीला त्यामुळे या प्रश्नाची दखल घेणे भाग पडले आहे.

ॲपल कंपनीला २०१७ चे वर्ष संपताना एका नवीन समस्येला सामोरे जावे लागले आहे. ॲपल कंपनी आपल्या जुन्या फोनचा परफॉर्मन्स जाणून बुजून हळू करत असल्याच्या बातम्यांनी अमेरिकन तंत्रज्ञान वेबसाइटवरील रकाने भरून गेले आहेत. लोकांना ॲपलचे नवीन फोन घेणे भाग पडावे म्हणून कंपनी असे करत असल्याचा आरोप काही जणांनी कंपनीवर ठेवला आहे. काही लोक तर नुसते आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी कोर्टात ॲपलविरुद्ध दावेही दाखल केले आहेत. कंपनीला त्यामुळे या प्रश्नाची दखल घेणे भाग पडले आहे. 

ॲपलने, २०१७ च्या जानेवारी महिन्यात, आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमची आवृत्ती (अपडेट) क्रमांक १०.२.१ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. प्रत्येक नवीन अपडेटप्रमाणे यातही अनेक सुधारणा होत्या. आणि त्यातील एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे आयफोन ६, ६ प्लस, ६ एस, ६ एस प्लस आणि आयफोन एस ई हे फोन अचानक बंद होण्याची समस्या यात सोडवली गेली होती. अनेक ग्राहकांनी ॲपलकडे तक्रार केली होती की आयफोन जुना झाल्यावर तो अचानक कधीही बंद होऊ शकतो. ॲपलला त्याचे कारण शोधण्यात यश मिळाले होते. त्याचे कारण होते फोनची बॅटरी. जसजशी फोनची बॅटरी जुनी होते, तसतशी तिचा इंपिडन्स वाढत जातो. ’इंपिडन्स’ ही भौतिकशास्त्रीय संज्ञा आहे. अगदीच सोप्या शब्दात सांगायचे झाले तर इंपिडन्सची तुलना रेझिस्टन्सशी करता येईल. प्रत्यक्षात बॅटरीचा इंपिडन्स हा ’रेझिस्टन्स’ आणि ’रिएक्‍टन्स’ अशा दोन गोष्टींनी बनलेला असतो. रेझिस्टन्स त्यातील महत्त्वाचा भाग असल्याने बॅटरीचा रेझिस्टन्स वाढला की इंपिडन्सही वाढतो. जितका रेझिस्टन्स अथवा इंपिडन्स जास्त तेवढी बॅटरीची क्षमता कमी. जेव्हा बॅटरी नवीन असते तेव्हा तिचा इंपिडन्स कमी असतो आणि म्हणूनच बॅटरीतून व्होल्टेज बरोबर मिळू शकते. जसजसा बॅटरीचे आयुष्य वाढत जाते तसतसे व्होल्टेज कमी आणि इंपिडन्स वाढत जातो. थोड्याफार फरकाने हीच गोष्ट कुठल्याही बॅटरीत किंवा सेलमध्ये होते. आजकाल बाजारात मिळणाऱ्या मोबाईल फोनमधील बॅटऱ्या या लिथियम आयॉनच्या बनवलेल्या असतात. त्यांच्या बाबतीतही ही गोष्ट तितकीच खरी आहे. जुन्या बॅटरीकडून पुरेसे व्होल्टेज (अथवा करंट) मिळाले नाही तर आयफोन अचानक बंद होऊ शकतो. फोनच्या इलेक्‍ट्रॉनिक पार्टची सुरक्षा करण्यासाठी आयफोन आपोआप हे पाऊल उचलतो. परंतु जो व्यक्ती फोनवर इमेल चेक करत असतो अथवा एखादा महत्त्वाचा एस एम एस करत असतो त्याला मात्र आत अचानक फोन बंद झाल्याचा त्रास सोसावा लागतो. फोनचा सीपीयु - सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जोमाने काम करत असेल तर त्याला जास्त करंटची आवश्‍यकता असते. हाच सीपीयु जर हळू काम करत असेल तर त्याला कमी करंटची आवश्‍यकता असते. जुन्या झालेल्या बॅटरीकडून पुरेसा करंट मिळत नसल्याने सीपीयु हळू चालवून हळू करंटवर काम करून घेण्याची नवीन सुविधा ॲपलने आपल्या जुन्या फोनमध्ये घातली. त्यामुळे फोन अचानक बंद होण्याचे प्रमाण कमी झाले अथवा काही वेळा संपूर्णपणे टाळता येऊ लागले. त्यामुळे लोकांची एक समस्या मिटली पण त्यांच्या पुढे आता नवीन समस्या उभी राहिली. त्यांचा आयफोन आता त्याच्या क्षमतेपेक्षा हळू काम करू लागला! जुन्या बॅटऱ्या असलेला फोन बहुतेक वेळी हळू चालत असल्याने अनेक लोकांना तो फोन टाकून देऊन नवीन फोन घेणे भाग पडले. 

दरम्यान बहुतेक ग्राहकांना नक्की काय होत आहे याची कल्पना नव्हती. त्यांना जर माहीत असते की जुने फोन बॅटरीची क्षमता कमी झाल्याने हळू होत आहेत, तर त्यांनी बॅटरी बदलली असती. ॲपल कंपनी त्यावेळेस आयफोनच्या नवीन बॅटऱ्या ७९ डॉलर्सला (अंदाजे ५००० रुपये) विकत होती. जुना फोन फेकून देऊन त्याऐवजी नवीन फोन घेण्यापेक्षा हा नक्कीच स्वस्त उपाय होता. अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील माउंट ज्युलिएट या छोट्याशा शहरातील टायलर बार्नी या १७ वर्षाच्या तरुणाचा जुना आयफोन अतिशय हळू काम करायला लागला होता. तो फोन कधी कधी इतका हळू होई की एक अक्षर टाइप केल्यानंतर त्याला थांबावे लागत असे. अशा परिस्थितीत फोन वापरणे अशक्‍य झाले होते. त्यामुळे तो चिडला व त्याने वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केले. प्रयोगाअंती त्याला असे आढळून आले की बॅटरी बदलल्यावर फोन पुन्हा जलद काम करु लागतो. अधिक शोधाशोध केल्यावर त्याला ॲपलची फोन हळू करण्याची पद्धत कळली व त्याने रेडीट नावाच्या प्रसिद्ध वेबसाइटवर आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले. ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने इंटरनेटवर पसरली. ॲपल मुद्दाम फोन हळू करत असल्याचे आता लाखो लोकांना कळले. त्यातील काही लोकांनी कोर्टाकडे धाव घेतली. ॲपलने आपल्याला फोन बदलायला भाग पाडले असून त्यामुळे आम्हाला मनस्ताप भोगायला लागला असल्याने लोकांनी नुकसान भरपाईची मागणी केली. त्यातील काही अशिलांनी या दाव्यांना ‘क्‍लास ॲक्‍शन‘ दर्जा देण्याची कोर्टाला विनंती केली आहे. क्‍लास ॲक्‍शन दावा म्हणजेच जेव्हा एका आरोपीमुळे अनेकांचे - ४० वा अधिक लोकांचे - नुकसान झाले असेल तर अशा लोकांनी वेगवेगळे दावे घालण्याऐवजी एकाच केसमध्ये सर्वांचे गाऱ्हाणे ऐकून कोर्ट निर्णय देते. भारतामध्येही अशा प्रकारची कायदेशीर सुविधा उपलब्ध आहे. २०१३ च्या कंपनी ॲक्‍टमधील सेक्‍शन २४५ मध्ये क्‍लास ॲक्‍शन संकल्पना मांडलेली आहे. सत्यम या सॉफ्टवेअर कंपनीत झालेल्या घोटाळ्यात भारतीय समभाग धारकांना अमेरिकेतील समभागधारकांप्रमाणे अधिकार नसल्याचे भारत सरकारला कळून चुकले व त्यामुळे भारतातही क्‍लास ॲक्‍शनची संकल्पना आणली गेली. नक्की किती लोकांनी दावे घातले हे माहीत नसले तरी गार्डियन वृत्तपत्राच्या अंदाजानुसार कमीत कमी ८ लोकांनी ॲपलवर दावे घातले आहेत. हे दावे न्यूयॉर्क व कॅलिफोर्निया राज्यातील लोकांनी घातले आहेत. त्यामुळे ॲपलला या प्रश्नाची गंभीर दखल घेणे भाग पडले. २८ डिसेंबरला आपल्या वेबसाइटवर ॲपलने आपण जुने फोन हळू करत असल्याचे मान्य केले व त्यामागची वर उल्लेखलेली कारणे स्पष्ट केली. फोन हळू करण्यामागे लोकांना नवीन फोन घेणे भाग पाडणे नसून, फोन बंद होणे टाळणे हे कारण आहे असे त्यांनी जाहीर केले. एव्हढेच नव्हे तर ॲपलमुळे लोकांची निराशा झाली असून त्याबद्दल ॲपलने लोकांची जाहीर माफीही मागितली. एव्हढेच नव्हेत तर नवीन बॅटरीची किंमत आपण ७९ डॉलर्सवरून तब्बल २९ डॉलर्सवर आणणार असल्याचेही ॲपलने जाहीर केले. २०१८ या एक वर्षासाठी ही सवलत ॲपलने जाहीर केली. ५० डॉलर्स किंमत कमी केल्याने ज्यांचे फोन जुने झाले आहेत त्यांना माफक किमतीत नवीन बॅटरी घातला येईल. नवीन बॅटरी घातली की फोनचा परफॉर्मन्स पूर्ववत होईल. एव्हढेच नव्हे तर या पुढील सॉफ्टवेअर अपडेटमध्ये बॅटरीच्या स्थितीविषयी अधिक माहिती देणाऱ्या सुविधा घालू असेही ॲपलने जाहीर केले आहे. 

ॲपलने आपल्या वेबसाइटवरील पोस्टमध्ये फोनच्या बॅटरीचे आयुष्य व दोन चार्जींगमधील अंतर वाढवण्यासाठी काय काळजी घ्याव्यात हे दिले आहे. जरी ही पोस्ट आयफोनसाठी असली तरीही माझ्या मते यातील बहुतेक सूचना लिथियम आयॉन बॅटरी वापरणाऱ्या सर्व स्मार्टफोनना - म्हणजे बहुतेक सर्वच स्मार्टफोनना लागू पडतात. 

  • आपले मोबाईल फोन अतिशय गरम अथवा थंड तापमानात ठेवू नयेत. ॲपलचे फोन १६ ते २२ अंश सेल्सिअसमध्ये काम करण्यासाठी बनवलेले असतात. ३५ अंशांपेक्षा जास्त तापमानात फोन ठेवल्यास फोनची बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे फोन जिथे दुपारचे ऊन पडते अशा टेबलावर ठेवू नयेत. १५ मिनिटे जरी फोन कडक उन्हात ठेवला तर त्याचे तापमान नक्कीच ३५ अंशांपेक्षा जास्त होऊ शकते. तसेच फोन उन्हात चार्जही करु नयेत. अनेक लोक फोनचा जी पी. एस म्हणून वापर करतात. परंतु त्यावेळी ते एक गोष्ट विसरतात की हे फोन डॅशबोर्डवर गरम उन्हात तापत असताना चार्ज केले जातात. त्यामुळे फोन पूर्ण चार्ज होत नाहीतच पण बॅटरीची क्षमता कायमची निघून जाण्याचीही शक्‍यता असते. 
  • काही फोन केसेसमुळे चार्ज करताना फोन जास्त गरम होऊ शकतो. जर तुम्हाला असे आढळले तर अशा केसेस काढून फोन चार्ज करावा किंवा केस बदलावी. 
  • तुम्हाला एखादा जुना फोन मोठ्या काळाकरिता कपाटात ठेवून द्यायचा असेल तर तो ५० टक्के चार्ज करावा, बंद करावा आणि मगच ठेवून द्यावा. तो पूर्ण चार्ज करु नये अथवा पूर्ण रिकाम्या बॅटरीनेही ठेवू नये. तो सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा असल्यास तो दर सहा महिन्यांनी अर्धा चार्ज करावा.
  • सॉफ्टवेअर अपडेटला कधीही टाळू नये. मोबाईल फोन कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट जारी केली असेल तर ती लवकरात लवकर घालून घ्यावी. 
  • वायफाय कनेक्‍शन सेल्युलर कनेक्‍शनपेक्षा कमी बॅटरी खर्च करते. त्यामुळे जेव्हा शक्‍य असेल तेव्हा वायफाय वापरावे, सेल्युलर डेटाचा कमी वापर करावा.
  • ॲपलने आय ओएस ९ मध्ये ‘लो पावर मोड‘ नावाची सुविधा घातली आहे. हा मोड सुरू केल्याने बॅटरी कमी खर्च होते. अँड्रॉइडमध्येही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे, गुगल केल्यास तुम्हाला तुमच्या फोनमधील अशा प्रकारची सुविधा कळू शकेल.

माझ्या मते ॲपलने अशा प्रकारे फोन हळू करण्याआधी त्याचे कारण लोकांना जाहीरपणे सांगणे आवश्‍यक होते. लोकांना जर बॅटरी बदलणे आवश्‍यक आहे हे कळले असते तर अनेक लोकांनी नवीन फोन घेण्याऐवजी नुसती बॅटरी बदलली असती. परंतु ते लपवून ठेवल्याने ॲपलची जाहीर नाचक्की झाली आहे. बॅटरीची किंमत कमी करणे जरी स्तुत्य असले तरीही ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती‘ हे एव्हाना ॲपलला कळून चुकले असेल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या