हायपरलूपचे तंत्रज्ञान

वैभव पुराणिक
बुधवार, 21 मार्च 2018

टेक्नोसॅव्ही 

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेच्या निमित्ताने अलीकडेच ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या कंपनीबरोबर महाराष्ट्र सरकारने करार केला. या करारानुसार व्हर्जिन हायपरलूप वन कंपनी मुंबई व पुणे दरम्यान हायपरलूप सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी करेल. या सेवेमुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत कापता येईल! एका तासात दहा हजार प्रवाशांना मुंबई ते पुणे प्रवास करता येईल! अशा या क्रांतिकारी हायपरलूपची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. 

सुप्रसिद्ध अमेरिकन उद्योजक इलान मस्क याने १२ ऑगस्ट २०१३ या दिवशी एक श्वेतपत्रिका इंटरनेटवर प्रसिद्ध केली. या श्वेतपत्रिकेत त्याने हायपरलूपची संकल्पना प्रथम मांडली. त्या पत्रिकेत त्याने या विषयाची पार्श्वभूमी सांगितली आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या दोन टोकांना जगातील दोन महत्त्वाची शहरे आहेत - सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस अँजलिस. या शहरांची तुलना आपल्या मुंबई आणि पुण्याशी करता येईल. लाखो लोक दर आठवड्याला या दोन शहरांमध्ये ये जा करत असतात. परंतु या दोन शहरांतील अंतर मात्र मुंबई-पुण्यापेक्षा बरेच जास्त म्हणजे तब्बल ६२५ किलोमीटर एवढे आहे. सर्वसाधारणतः गाडीने हे अंतर कापायला साडेपाच ते सहा तास लागतात. म्हणूनच कॅलिफोर्निया राज्याने या दोन शहरांदरम्यान बुलेट ट्रेन बांधायचे ठरवले. परंतु या प्रकल्पाला अनेक लोकांनी विरोध केला. त्यासाठी आवश्‍यक त्या जमिनी संपादन करायला जास्त वेळ लागला. अनेक अडचणींचा सामना करून हा प्रकल्प मार्गी लागला तेव्हा त्याला तब्बल ६४ अब्ज डॉलर्स इतका खर्च येईल असे लोकांच्या लक्षात आले. त्यावरून अनेक वाद झाले आणि एवढा खर्च करून अशा प्रकारची रेल्वे बांधल्याने नक्की काय साधणार आहे असे सवालही विचारले गेले. या प्रकल्पामुळे साडे पाच ते सहा तासाचे अंतर अडीच ते तीन तासांवर येणार होते. तसे होऊनही लोकांना दररोज ये-जा करणे शक्‍य होणार नव्हते. मग लोकांच्या टॅक्‍समधून जमा केलेला पैसा असा खर्च का करावा? सर्वसामान्य लोक अशा वादात नुसती बघ्याची भूमिका घेतात. फारफार तर आपली मते इंटरनेटवर प्रकट करतात. परंतु इलान मस्कसारखी जगावेगळी माणसे मात्र हा प्रश्न कसा सोडवता येईल याचा विचार करतात. या वादातूनच त्याला दळणवळणाचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडविण्याची संकल्पना सुचली. त्याने आपल्या कंपनीतील काही शास्त्रज्ञांना यावर काम करण्यास सांगितले आणि त्यातूनच हायपरलूप संकल्पनेचा जन्म झाला. 

हायपरलूप ही रेल्वे नसली तरी ती रेल्वेच्या बरीच जवळ जाणारी संकल्पना आहे. रेल्वे आणि हायपरलूपमधील एक साम्य म्हणजे दोन्हींसाठी रुळांची आवश्‍यकता असते. रेल्वेचे रूळ उघड्यावर टाकणे शक्‍य असले, तरी हायपरलूपचे रूळ मात्र एका ट्यूबमध्ये लावलेले असतील. आणि या ट्यूबमधील हवा, हवेचा विरोध कमी करण्याकरिता विरळ केलेली असेल. हायपरलूपची चाके या रुळावरून चालणार नाहीत तर रुळांच्या वरून तरंगत जातील. या वाहनाला पुढे एक मोठा पंखा लावलेला असेल. ट्यूबमधून जात असताना या पंख्यामुळे ट्यूबमधील हवा जोराने वाहनाच्या मागच्या बाजूला टाकली जाईल. त्यामुळे पुढे जाणाऱ्या वाहनाला हवेचा होणारा विरोध कमी होईल व हवा वाहनाच्या खालून मागे जाण्याच्या प्रक्रियेमुळे वाहन थोडे वर उचलले जाईल. वाहन वर उचलले जाण्यामुळे वाहनाच्या चाकांना रुळावर होणाऱ्या घर्षणाचा सामना करावा लागणार नाही. तसेच याचे रूळ म्हणजे साधेसुधे रूळ नसून त्यावर लिनियर इलेक्‍ट्रीक मोटर बसवलेली असेल. मुंबईत चालणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सर्वसाधारण इलेक्‍ट्रीक मोटर असते. ही गोलाकार असून त्यात चाकांना गोलाकार फिरवण्याची क्षमता असते. या गोलाकार मोटरला एखादी सुरळी जशी उलगडतो तशी उलगडली तर त्यातून लिनीयर मोटर तयार होते. लिनीयर मोटरमुळे हे वाहन पुढे ढकलता येऊ शकेल. इलान मस्कच्या श्वेत पत्रिकेनुसार ही मोटर रुळाच्या संपूर्ण लांबीवर बसवायची गरज नाही. फक्त १ टक्का लांबीवर लिनीयर मोटरची गरज भासेल आणि त्यामुळे असे वाहन चालवण्याचा खर्च आटोक्‍यात येईल. घर्षण नसल्याने या वाहनाचा वेग ताशी तब्बल १००० किमीपर्यंत जाऊ शकेल! सर्वसाधारण प्रवासी विमानाचा वेग ताशी १००० किमी एवढा असतो. म्हणजेच हायपरलूपने विमानाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने जाणे शक्‍य आहे. हायपरलूपमुळे लॉस अँजलिस ते सॅन फ्रान्सिस्को हे अंतर फक्त ३० मिनिटात पार करता येऊ शकेल!  

ही श्वेतपत्रिका प्रकाशित करून इलान मस्कने हे तंत्रज्ञान मुक्तपणे लोकांना उपलब्ध करून दिले. ज्यांना या संकल्पनेचा वापर करून हायपरलूप बनवायची आहे त्यांना त्याकरता इलान मस्कला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत. आपल्याला वेळ नसल्याने इतर लोकांनी अशा प्रकारचे वाहन बनवावे म्हणून त्याने प्रोत्साहन देण्याचेही ठरवले.  श्वेतपत्रिकेला शास्त्रज्ञांकडून आणि अभियंत्याकडून खूपच जोरदार प्रतिसाद मिळाला. हायपरलूपला प्रोत्साहन म्हणून इलान मस्कने हायपरलूप वाहनाचा आराखडा बनवण्याची स्पर्धाही २०१६ च्या सुरवातीला आयोजित केली. या स्पर्धेतून निवडलेल्या काही चमूंना पुढे इलान मस्कच्या स्पेस एक्‍स कंपनीने वाहन प्रत्यक्ष बनवण्यास सांगितले. दरम्यान इलान मस्कने लॉस अँजलिसजवळील हॉथॉर्न शहरात एक मैल लांबीची, ७२ इंची व्यास असलेली ट्यूबही बनवली. या ट्यूबचा वापर बनवलेल्या वाहनांची चाचणी घेण्यासाठी केला जाईल असे त्याने जाहीर केले. २०१७ मध्ये झालेल्या या स्पर्धेत नेदरलॅंडस्च्या डेलेफ्ट विद्यापीठाच्या चमूने विजय मिळवला. जर्मनीमधील म्युनिच तांत्रिक विद्यापीठाच्या चमूनेही अनेक बक्षिसे मिळवली. त्यामुळे प्रोत्साहित होऊन जगातील अनेक धाडसी गुंतवणूकदारांनी हायपरलूप विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करायला सुरवात केली. जगातील वेगवेगळ्या भागातील अनेक कंपन्या आता हायपरलूप बनवण्यासाठी धडपडू लागल्या. हायपरलूप ही फक्त संकल्पना उरली नाही, ती प्रत्यक्षात साकार व्हायला सुरवात झाली. 

हायपरलूप प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अनेक कंपन्या धडपड करत असल्या तरी त्यातील व्हर्जिन हायपरलूप वन ही कंपनी सर्वांत आघाडीवर आहे. याच कंपनीबरोबर महाराष्ट्र सरकारने मुंबई आणि पुणे दरम्यान हायपरलूप बनवण्यासाठीचा करार केला आहे. उद्योजक शर्विन पिशेवार आणि इलान मस्क जानेवारी २०१२ मध्ये एकाच विमानाने क्‍युबाला जात होते. त्यावेळी इलान मस्कने पिशवार यांना आपली हायपरलूपची संकल्पना सांगितली. पिशेवार यांनी ती आवडली व त्यांनीच इलान मस्क यांचा संकल्पनेवरील श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यासाठी पाठपुरावा केला. ऑगस्ट २०१३ मध्ये श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाल्यावर पिशेवार यांनी ‘हायपरलूप टेक्‍नॉलॉजीज’ या कंपनीची स्थापना केली. पिशेवार यांनी आपल्याबरोबर ब्रोगन बॅमब्रोगन या स्पेसएक्‍स मधील एका अभियंत्यालाही सामील करून घेतले. नोव्हेंबर २०१४ मध्ये बॅमब्रोगन यांच्या लॉस अँजलिसमधील घराच्या गॅरेजमध्ये कंपनीने कामाला सुरवात केली.  २०१५च्या जानेवारी महिन्यामध्ये हायपरलूप टेक्‍नॉलॉजीने ९० लाख डॉलर्सची गुंतवणूक मिळवली. त्यांनी आपल्या कंपनीला गॅरेजमधून ऑफिसमध्ये हलवले व पुढे २०१५ च्या जून महिन्यामध्ये सुप्रसिद्ध सिस्को कंपनीचे माजी अध्यक्ष रॉब लॉईड यांच्याकडून अधिक गुंतवणूक मिळवली. सध्या रॉब लॉईड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये कंपनीचे नाव बदलून हायपरलूप वन असे ठेवण्यात आले. तसेच कंपनीने आपल्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी अमेरिकेच्या नेवाडा राज्यातील लास व्हेगासजवळील वाळवंटात एक चाचणी ट्यूब बनविणार असल्याचे जाहीर केले. या ट्रॅकला त्यांनी डेव्ह लूप असे नावही दिले. दरम्यान कंपनीने इतरही काही गुंतवणूकदारांकडून अधिक निधी उभा केला. ९ मे २०१६ ला केलेल्या चाचणीत हायपरलूप वनला आपल्या चाचणी वाहनाचा वेग केवळ २.३ सेकंदात ताशी २१६ किमीपर्यंत नेण्यात यश मिळाले. हे चाचणी वाहन म्हणजे फक्त एक सांगाडा होता. पुढे २०१७ जुलैपर्यंत कंपनीने प्रत्यक्ष वाहनही बनवले. या वाहनाला त्यांनी एक्‍स-पी -१ असे नाव दिले. २ ऑगस्ट २०१७ रोजी केलेल्या चाचणीत एक्‍स पी-१ ने ताशी ३०९ किलोमीटरचा वेग गाठला. यापेक्षा अधिक वेगाने चाचणी घेण्यासाठी हायपरलूप वनला मोठे डेव्ह लूप बनवावे लागेल. सध्या उपलब्ध असलेले डेव्ह लूप फक्त ५०० मीटर लांबीचे आहे. दरम्यान सुप्रसिद्ध ब्रिटिश उद्योगपती व व्हर्जिन ग्रुपचे मालक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांचे लक्ष हायपरलूप वनने वेधून घेतले. १२ ऑक्‍टोबर २०१७ ला केलेल्या घोषणेत सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन ग्रुपने हायपरलूप वन मध्ये भागीदारी जाहीर केली. पुढे हायपरलूप वन कंपनीचे नावच बदलून व्हर्जिन हायपरलूप वन असे ठेवण्यात आले व रिचर्ड ब्रॅन्सन यांची या नवीन कंपनीच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली.  कंपनीने जगातील अनेक सरकारांबरोबर करार केले असून २०२१ पर्यंत हायपरलूप प्रत्यक्षात आणण्याचे जाहीर केले आहे. मुंबई आणि पुण्याप्रमाणेच दुबई आणि अबुधाबी यांनाही हायपरलूपने जोडण्याचा कंपनीचा मानस आहे. 

दरम्यान इथे इलान मस्कही स्वस्थ बसलेला नाही. इलान मस्कने या वर्षाच्या हायपरलूप स्पर्धेचा दिवस जाहीर केला आहे - २२, जुलै २०१८.  त्याने आपल्या अटींमध्ये जाहीर केले आहे की या वेळी विजेता निवडण्यासाठी फक्त एकच निकष लावण्यात येईल - तो म्हणजे वेग! ज्या स्पर्धकांचे हायपरलूप वाहन सर्वांत अधिक वेग गाठेल त्यांना विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. आतापर्यंत हायपरलूपचा वेग ताशी ३०० किमीच्या आसपास आलेला आहे. तो प्रत्यक्षात हजार किलोमीटरच्या घरात घेऊन जाण्यासाठी त्याने हे प्रोत्साहन जाहीर केले आहे. दरम्यान हायरलूपचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी त्याने अजून एका कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे नाव ‘द बोरींग कंपनी’ असे ठेवले आहे. यातील बोरींग म्हणजे जमिनीत भुयार खोदणे. अनेक शहरातून हायपरलूप जमिनीखालून - भुयारातून नेण्याची संकल्पना मांडली जात आहे. परंतु भुयार खोदणे ही प्रचंड खर्चिक बाब आहे. काही भुयारे खोदण्यासाठी एका मैलाला एक अब्ज डॉलर्स इतका खर्च येतो! इलान मस्कच्या मते हा खर्च १० पटीने कमी केल्याशिवाय अशी भुयारे बनवणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. म्हणूनच ही कंपनी स्वस्तात भुयारे खोदण्यावर संशोधन करेल.  

हायपरलूप ही पाच वर्षापूर्वी फक्त संकल्पना होती. परंतु पुढील एका दशकात ती प्रत्यक्षात येईल यात मला आता शंका उरलेली नाही. हायपरलूप वनने सांगितल्याप्रमाणे २०२१ पर्यंत ती प्रत्यक्षात येईल असे मात्र मला वाटत नाही. अजून बऱ्याच गोष्टीवर संशोधन होणे आवश्‍यक आहे. हायपरलूपचा वेग ताशी १०००  किलोमीटरच्या आसपासही अजून गेलेला नाही. तसेच या वेगाने जाणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार सर्व अंगाने होणे आवश्‍यक आहे. तसेच ट्यूब बांधायचा खर्च नक्की किती होईल याचाही नक्की अजून अंदाज आलेला नाही. हायरपरलूप वन हा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण जेव्हा ही संकल्पना प्रत्यक्षात येईल तेव्हा मात्र क्रांती होईल. मुंबई पुणे हे अंतर २५ मिनिटांत कापता येईल! लोक पुण्याला राहून दररोज मुंबईच्या ऑफिसात येजा करू शकतील. लोकांना आपल्या ऑफिसपासून प्रचंड अंतरावर ३०० किलोमीटरवरही राहता येईल!  शहरांमध्ये दाटीवाटी करून राहण्याची गरज उरणार नाही. शहरांबाहेरच्या ज्या ठिकाणी लोक रहायला जातील तिथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास होईल. लांबलांबच्या अंतरावरील लोक एकमेकात सहज मिसळतील. शहरांमधील, राज्यामधील आणि कदाचित देशांमधील सीमाच पुसट बनतील.

फोटो फीचर

संबंधित बातम्या