फिटबिटचे नवीन स्मार्टवॉच

वैभव पुराणिक
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

टेक्नोसॅव्ही

फिटबिटने आतापर्यंत स्मार्टवॉच काढण्याचे दोन प्रयत्न केले. ब्लेझ आणि आयॉनिक ही दोन्हीही स्मार्टवॉच बाजारपेठेच्या चाचणीत नापास झाली. परंतु फिटबिटच्या नवीन स्मार्टवॉचने - वर्साने मात्र अनेक लोकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. पहिल्यांदाच फिटबिटने खिशाला परवडेल अशा किमतीत ॲपल वॉचला उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 

वर्सा आयॉनिकच्या मानाने दिसायला अधिक ॲपल वॉचसारखे आहे. आयॉनिक चौकानाकृती आहे व त्याच्या कडा चौकोनी आहेत. वर्सा मात्र चौकोनाकृती असले तरी त्याच्या कडा मात्र गोलाकार आहेत. फिटबिटने याला स्क्वर्कल (स्क्वेअर + सर्कल) डिझाईन असे म्हटले आहे. गोलाकार कडांमुळे आयॉनिकच्या तुलनेने हे वॉच दिसायला जास्त चांगले आहे. तसेच हे वजनालाही कमी आहे. इतर कुठल्याही स्मार्टवॉचप्रमाणे या स्मार्टवॉचवरही हजारो वॉचफेसेस उपलब्ध आहेत. वॉचफेस म्हणजे घड्याळ दाखवणारे चित्र - तुम्हाला जुन्या पद्धतीचे घड्याळ हवे असेल तर या वॉचमध्ये तो फेस घालता येतो, तुम्हाला घड्याळाच्या मधोमध मिकी माऊस हवा असेल तर तो घालता येतो, किंवा तुम्हाला डिजिटल वॉचप्रमाणे आकडे हवे असतील तर तसा फेसही घालता येतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे - चामड्याचे, स्टीलचे, प्लॅस्टिकचे पट्टे वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत. या घड्याळाचा पडद्याचा ब्राइटनेसही चांगला आहे त्यामुळे उन्हात किंवा पाण्याखाली वेळ पहात असताना आकडे सहज दिसून येतात. तसेच याचा पडदा टचस्क्रीनही आहे. हा एखाद्या स्मार्टफोनच्या पडद्याप्रमाणेच काम करतो. त्यावर तुम्हाला घड्याळ आणि फिटनेस आकड्याशिवाय तुमचे एसएमएस व मोबाईल नोटिफिकेशनही पाहता येतात. 

फिटबिटने या वॉचमध्ये आयॉनिकमधील जवळजवळ सर्वच सुविधा घातल्या आहेत. हे वॉच तुम्ही किती पावले चाललात ते ओळखते, तुम्ही धावलात, सायकलिंग केलेत किंवा वजन उचलले तर त्याचीही हे वॉच नोंद ठेवते. तसेच या वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरही आहे. व्यायाम संपल्यावर तुम्हाला हे वॉच तुमच्या व्यायामाची माहिती देते. तो व्यायाम तुम्ही किती वेळ केलात आणि त्यामुळे किती कॅलरी खर्च केल्या हे तुम्हाला सांगते. हे वॉच वॉटरप्रूफ आहे आणि त्यामुळेच तुम्ही ते घालून पोहायला जाऊ शकता. हे वॉच तुमच्या पोहण्याच्या व्यायामाचीही नोंद ठेवते. तसेच हे वॉच तुमच्या झोपेचीही नोंद ठेवते. तुमचा हात जर हलत नसेल व तुमचा हृदयाचे ठोके मंदावले असतील तर तुम्ही झोपला आहात हे त्याला कळते. त्यामुळे तुम्ही नक्की किती तास झोपला होतात हे ते ओळखते. फिटबिटच्या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या झोपेविषयी अधिक माहिती मिळू शकते. एकूण झोपेपैकी किती झोप ही पक्की झोप होती आणि किती झोप ही वरवरची झोप होती, हे सुद्धा हे वॉच ओळखते. एवढेच नव्हे तर या वॉचमध्ये रक्तातील प्राणवायू मोजणारा सेन्सरही आहे. हा सेन्सर सध्या काम करत नाही, पण भविष्यात सॉफ्टवेअर अपडेटद्वारे तो काम करणार आहे. याचा वापर करून तुम्हाला ‘स्लीप ॲप्नीया’ नावाचा आजार आहे की नाही हे कळू शकेल! ज्यांना झोप व्यवस्थित लागत नाही अशा लोकांसाठी हे वॉच माझ्या मते आवश्‍यक आहे. वेगवेगळ्या उपायांनी झोप नक्की वाढली की कमी झाली याचा पडताळा हे वॉच वापरून केला जाऊ शकतो. तसेच या वॉचमध्ये तुम्हाला व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देणारे अनेक मेसेजही आहेत. फिटबिटचे ॲप वापरून तुम्ही तुमच्या मित्रांशी अथवा मैत्रिणींशी स्पर्धाही करू शकता. कोण अधिक व्यायाम करतो याची नोंद फिटबिट ठेवते व दर आठवड्याला तुमच्या मित्रांशी तुलना केलेला रिपोर्ट तुम्हाला पाठवते. ही सुविधा फिटबिटच्या सर्वच उपकरणांबरोबर उपलब्ध आहे. या वॉचबरोबर एक कोच ॲपही उपलब्ध आहे. त्यात वेगवेगळ्या गोष्टीसाठी करायचे व्यायाम सांगितलेले आहेत. तसेच हे व्यायाम चलतचित्रांच्या (ॲनिमेशन) साहाय्याने दाखवलेही आहेत. महिलांसाठी या वॉचमध्ये काही विशेष सुविधा घालण्यात आलेल्या आहेत. या वॉचच्या मदतीने महिला आपल्या मासिक पाळीविषयी माहितीची नोंद करू शकतात. पाळी कधी सुरू झाली, कधी संपली आणि पाळीच्या दरम्यान कुठला त्रास झाला याची नोंद वॉचवर करता येते. दर महिन्याला अशी नोंद केल्याने एखाद्या महिन्यात वेगळा त्रास झाल्याचे तुम्हाला लक्षात येऊ शकते. मग अशावेळी डॉक्‍टरशी बोलताना वॉचमधील माहिती तुम्हाला डॉक्‍टरला दाखवता येते. आयॉनिक आणि या वॉचमधील एक मुख्य फरक म्हणजे आयॉनिकमध्ये जीपीएस यंत्रणा आहे. आणि त्यामुळे तुम्ही तुमचा फोन न घेताही धावायला जाऊ शकता. तुम्ही नक्की किती अंतर धावलात याची नोंद आयॉनिक जीपीएसच्या मदतीने ठेवते. परंतु या वॉचमध्ये त्याची स्वतः:ची जीपीएस यंत्रणा नाही. फोनची जीपीएस यंत्रणा वापरून हे वॉच अंतर मोजू शकते.

हे वॉच चार्ज करायला फक्त दोनच तास लागतात व एकदा चार्ज केले की बॅटरी चक्क चार दिवस टिकते! त्यामुळे दररोज रात्री हे वॉच चार्ज करण्याची गरज नाही. मात्र या वॉचला चार्ज करण्यासाठी फिटबिटचा विशेष चार्जरच लागतो. तुमच्या स्मार्टफोनचा मायक्रो युएसबी चार्जर या स्मार्टवॉचबरोबर चालत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचे असेल तर हा चार्जर घेऊन जाणेही लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. तसे टेक राडार व इतर अनेक वेबसाइटवरील लेखकांनी या चार्जरविषयी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. हा चार्जर एक चौकोनी खोक्‍याप्रमाणे आहे व त्यात हे वॉच टाकावे लागते. परंतु हा खोका अतिशय हलका असल्याने जेव्हा तुम्ही घड्याळ त्यात ठेवता तेव्हा पट्ट्यांमुळे हे घड्याळ त्या खोक्‍यासकट वर उचलले जाते. त्यामुळे अनेक लोकांनी हा चार्जर जड करण्याचा सल्ला फिटबिटला दिला आहे. 

या घड्याळात फिटनेसव्यतिरीक्त इतरही अनेक सुविधा घालण्यात आलेल्या आहेत. या घड्याळावर अनेक फिटनेसशी संबंधित नसलेली अनेक ॲपही उपलब्ध आहेत. एक मुख्य सुविधा म्हणजे या घड्याळात तुम्हाला  गाणी साठवता येतात. आणि त्यामुळे तुमचा फोन जवळ नसला तरी ब्लूटूथ हेडफोनच्या साहाय्याने तुम्हाला गाणी ऐकता येऊ शकतात. फोनवर एखादा कॉल येत असेल तर तुम्हाला तो कॉल या घड्याळात दिसतो, फोनच्या ॲपमधील नोटिफिकेशन तुम्हाला या घड्याळाच्या पडद्यावर पाहता येतात. तसेच या घड्याळाची स्पेशल आवृत्ती (जास्त पैसे देऊन) घेतली असेल तर तुम्हाला या फोनचा वापर पैसे देण्यासाठीही करता येतो. स्पेशल आवृत्तीमध्ये पैसे देण्यासाठी आवश्‍यक असलेले ‘एनएफसी’ तंत्रज्ञान आहे. अमेरिकन बाजारपेठेत या घड्याळावर बातम्या देणारी (न्यूयॉर्क टाइम्स), स्टारबक्‍स (कॉफी चेन), पॅंडोरा (गाणी), ह्यू लाइटस्‌ (फिलिप्सचे दिवे उघडबंद करू शकणारे ॲप) तसेच टॅक्‍सी मागवण्यासाठी उबर अशी इतरही अनेक ॲप उपलब्ध आहेत. हे वॉच लोकप्रिय झाल्यास इतरही अनेक ॲप यावर उपलब्ध होतील यात मला शंका नाही. 

फिटबिट वर्सा अमेरिकन बाजारपेठेत १६ एप्रिल रोजी येत आहे. भारतातही ते पुढील दोन महिन्यात ते येणार असल्याचे फिटबिटने आश्वासन दिले आहे. अमेरिकन बाजारपेठेत वर्साची किंमत २०० डॉलर्स तर स्पेशल आवृत्तीची किंमत २३० डॉलर्स ठरवण्यात आली आहे. भारतात वर्साची किंमत २० हजार रुपये तर स्पेशल आवृत्तीची किंमत २२ हजार रुपये ठरवण्यात आली आहे. ही किंमत ॲपल वॉच (सिरीज ) च्या ३४,५०० रुपयाच्या तुलनेने खूपच स्वस्त आहे असे म्हणावे लागेल. तसेच ॲपल वॉच फक्त आयफोनबरोबरच चालते. अँड्रॉइड फोनबरोबर ते पेअर करता येत नाही. आणि आयफोन दहाची किंमत ८० हजार रुपयांपेक्षाही जास्त आहे. फिटबिट वर्सा आयफोन व अँड्रॉइडबरोबर चालतेच पण त्याव्यतिरिक्त विंडोज फोनबरोबरही चालू शकते! त्यामुळे ज्यांच्याकडे आयफोन नाही त्यांच्यासाठी आता वर्साच्या निमित्ताने उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.

गेल्या दोन वर्षात अमेरिकेत स्मार्टवॉच मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहेत. अलाइड मार्केट रिसर्च कंपनीच्या एका अहवालानुसार स्मार्टवॉच उद्योगातील उलाढाल २०२० पर्यंत तब्बल ३२.९ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोचेल. तसेच २०१४ ते २०२० या कालावधीत दरवर्षी स्मार्टवॉच उद्योग तब्बल ६७ टक्‍क्‍याने वाढत आहे. माझ्या कंपनीत काम करणाऱ्यांपैकी जवळजवळ ३० टक्के लोकांकडे स्मार्टवॉच आहेत. त्यातही ॲपलचे स्मार्टवॉच अधिकच लोकप्रिय आहे. प्रचंड किंमत असूनही लोक ती मोजत आहेत याचा अर्थ त्याचा त्यांना वापर होत असावा असे म्हणता येईल. स्मार्टफोन आल्यानंतर माझ्यासारख्या अनेक लोकांना घड्याळाचा त्याग केला. घड्याळाचा नुसता उपयोग वेळ पाहण्यासाठी होत असेल तर ते अजून एक उपकरण जवळ बाळगण्याएवढे ते गरजेचे नाही हे अनेक लोकांना कळले. वेळ पाहण्यासाठी ते स्मार्टफोनचा वापर करू लागले. पण पुढे फिटनेस ट्रॅकरचा उदय झाल्यानंतर अजून एक उपकरण बाळगणे आवश्‍यक झाले. मग ते उपकरण मनगटावर लावणे सर्वांत जास्त सोयीचे पडू लागले. ज्या लोकांनी घड्याळाचा त्याग केला नव्हता त्यांनी आपल्या घड्याळांऐवजी स्मार्टवॉच वापरायला सुरवात केली. माझ्यासारख्यांनी फिटनेस ट्रॅकरचा त्याग करून स्मार्टवॉच वापरायचे ठरवले. त्यामुळे आता प्रत्येक वेळा वेळ पाहण्यासाठी अथवा एसएमएस पाहण्यासाठी खिशातून अथवा पर्समधून फोन बाहेर काढण्याची गरज उरली नाही. म्हणूनच स्मार्टवॉच हळूहळू एक आवश्‍यक गोष्ट बनण्याच्या मार्गावर आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या