अमेरिकेतील स्कूटर समस्या

वैभव पुराणिक
गुरुवार, 26 एप्रिल 2018

टेक्नोसॅव्ही

अमेरिकेच्या काही शहरांमध्ये सध्या एक नवीन समस्या उभी राहिली आहे! ती म्हणजे इलेक्‍ट्रीक स्कूटरची! लॉस अँजलिस, सॅन फ्रान्सिस्को, सॅन दिएगो या कॅलिफोर्नियातील मुख्य शहरांमधील फुटपाथवर आता बर्ड कंपनीच्या इलेक्‍ट्रीक स्कूटर अस्ताव्यस्त पार्क केलेल्या आढळतात. शहरातील अनेक लोकांनी टॅक्‍सी आणि सायकलचा त्याग करून इलेक्‍ट्रीक स्कूटर वापरायला सुरवात केली आहे. आणि त्याला बर्ड कंपनी जबाबदार आहे.

या वाहनाला मी इलेक्‍ट्रीक स्कूटर असे म्हटले असले तरी ज्याला भारतात स्कूटर म्हणतात (बजाज स्कूटी किंवा कायनेटिक) सारख्या या स्कूटर नाहीत. त्याऐवजी लहान मुले खेळण्यासाठी स्कूटर वापरतात तशी उभी राहायची ही स्कूटर आहे. याला दोन लहान चाके एका पट्टीने जोडलेली असतात. पुढे एक उंच हॅंडल असते. या पट्टीवर उभे राहायचे व हॅंडल हातात धरायचे. हॅंडलवरील कंट्रोल वापरून स्कूटर चालू करता येते. हॅंडलवरच ब्रेकही असतात. या स्कूटरला एक इलेक्‍ट्रीक बॅटरी जोडलेली असते. त्या बॅटरीच्या साहाय्याने ही स्कूटर ताशी १५  मैल वेगाने म्हणजेच ताशी २४ किलोमीटर वेगाने जाऊ शकते. या बर्ड स्कूटर सुरू करण्यासाठी तुम्हाला एका स्मार्टफोन ॲपची आवश्‍यकता असते. या ॲपच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या फुटपाथवर पार्क केलेल्या बर्डला सुरू करू शकता. स्कूटरवरील बारकोड स्कॅन केला कि. स्कूटर अनलॉक होते. मग त्या स्कूटरला हॅंडलवरील ॲक्‍सीलरेटर दाबून पायाच्या साहाय्याने थोडेसे पुढे घेऊन गेले की ती वेग पकडते. तुम्ही तुमच्या ठिकाणी पोचलात, कि तिथल्या फुटपाथवर कुठेही ती सोडून द्यायची. ती स्कूटर आपोआपच लॉक होते. या स्कूटरमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली असल्याने ॲपवरून तुमच्या जवळची स्कूटर तुम्हाला सहज शोधता येते. स्कूटर जिथे पार्क केली असेल त्या आसपासचे लोक मग ती स्कूटर पुन्हा याच पद्धतीने वापरू शकतात. ही स्कूटर वापरण्यासाठी फक्त १ डॉलर शुल्क द्यावे लागते. त्याव्यतिरिक्त प्रत्येक मिनिटाला कंपनी १५ सेंट शुल्क आकारते. म्हणजेच तुम्हाला ६ मिनिटे बर्ड स्कूटर चालवायला फक्त ३ डॉलर व २५ सेंट (अंदाजे २०० रुपये) पडतात! आणि याच  मिनिटात तुम्हाला चक्क ६ किलोमीटर अंतर जाता येते! तसेच ॲपमध्ये तुमचे क्रेडिट कार्ड साठवलेले असल्याने तुम्हाला पैसे देण्यासाठीही काहीही करावे लागत नाही. कंपनी आपोआपच शुल्क तुमच्या कार्डवर चार्ज करते. ही स्कूटर फुटपाथवर अथवा रस्त्याच्या कडेने चालवता येत असल्याने तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागत नाही. अमेरिकेतील अनेक शहरात आजकाल सायकलसाठी खास लेन राखून ठेवलेल्या असतात. त्या लेनमध्येही ही स्कूटर चालवता येते. या स्कूटरमुळे अनेक लोकांची ‘लास्ट माईल कनेक्‍टिव्हिटी’ समस्या सोडवली गेली आहे. ‘लास्ट माईल कनेक्‍टिव्हिटी’ म्हणजे तुम्ही बस अथवा ट्रेनमधून उतरल्यावर तुम्हाला जे थोडेसे अंतर जायचे असते त्याला आवश्‍यक लागणारे साधन. सर्वसाधारण भारतीय शहरात रिक्षांनी ही समस्या सोडवली आहे. परंतु अमेरिकन शहरात रिक्षा ही संकल्पना नसल्याने त्यांना हे अंतर कापण्यासाठी पुन्हा टॅक्‍सी अथवा उबरला पाचारण करावे लागते. टॅक्‍सी आणि उबर तुलनेने महाग असतात. वर उल्लेखिलेले १५ मिनिटाचे अंतर कापण्यासाठी उबरला ६ ते ७ डॉलर खर्च येऊ शकतो तर टॅक्‍सीला १० डॉलर खर्च येऊ शकतो.

बॅटरीवर चालत असल्याने अर्थातच या स्कूटरना दररोज चार्ज करण्याची गरज भासते. त्यावरही बर्ड कंपनीने अतिशय अभिनव उपाय शोधून काढला आहे. या स्कूटर चार्ज करण्यासाठी कंपनी काहीही करत नाही! त्याऐवजी सर्वसाधारण लोक एक ॲप डाऊनलोड करतात. या ॲपवरून तुम्हाला तुमच्या जवळच्या बर्ड स्कूटरचे स्थान कळते. ही स्कूटर रात्री तुमच्या घरी घेऊन जाऊन तुमची वीज वापरून तुम्ही चार्ज करू शकता! एक स्कूटर चार्ज करण्यासाठी तुम्हाला कंपनी ६ डॉलर्स देते! अशा तुम्ही कितीही स्कूटर आपल्या गाडीच्या डिकीत टाकून घेऊन जाऊन चार्ज करू शकता. कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देत असल्याने अनेक तरुणांनी हा जोडधंदा म्हणून स्वीकारला आहे! दर रात्री ते आपली गाडी घेऊन या शहराच्या रस्त्यावरून फिरतात व स्कूटर गोळा करतात. त्या रात्रभर चार्ज करून सकाळी जिथे होत्या तिथे ठेवून देतात! 

एवढे फायदे असूनही ज्या शहरांमध्ये या स्कूटर वापरल्या जात आहेत त्याच्या प्रशासनांनी मात्र या स्कूटरविरुद्ध मोहीम उघडली आहे! लॉस अँजलिस शहराजवळील छोटे शहर सॅंटा मोनिका व सॅन फ्रान्सिको या मोहिमेत आघाडीवर आहे. या स्कूटरमुळे अनेक नवीन समस्या उभ्या राहिल्या असून त्यामुळेच शहर प्रशासन नाराज आहे. एक मुख्य कारण म्हणजे लोक या स्कूटर फुटपाथवर आणि रस्त्यावर कुठेही उभ्या ठेवत आहेत. त्यामुळे अनेक वेळा अनेक दुकानामध्ये जायच्या रस्त्यात अडथळे येत आहेत किंवा शहर प्रशासनाच्या सायकल रॅकमधून सायकल काढायला अथवा घालायला अडथळे येत आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या स्कूटरमुळे आता अपघात घडायला लागले आहेत. फुटपाथ हे लोकांना चालायला असतात. त्यावर ताशी २४ किलोमीटर वेगाने चालणारे वाहन वापरले असता अपघात हे होणारच. अर्थात इथे वाचकांना मुंबईचे फुटपाथ आणि सॅंटा मोनिकाच्या फुटपाथमधील फरक समजून घेणे आवश्‍यक आहे. मुंबईतील फुटपाथवर जेवढे लोक असतात त्याच्या दहा पट कमी लोक सॅंटा मोनिकाच्या फुटपाथवर असतात. मुंबईच्या फुटपाथपेक्षा सॅंटा मोनिकाचे फुटपाथ मोठेही असतात. परंतु असे असूनही अपघात घडले आहेत. तसेच स्कूटर व इतर वाहनांची टक्कर होण्याच्याही घटना घडल्या आहेत. सॅंटा मोनिकामध्ये अशा एका अपघातात एक व्यक्ती गंभीरपणे जखमी झाली. त्यानंतर सॅंटा मोनिका शहर प्रशासनाने या स्कूटरवरून जाण्याऱ्यांना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. सॅंटा मोनिका शहरात अशा प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी व स्कूटर फुटपाथवर पार्क करण्यासाठी बर्ड कंपनीने शहर प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतली नाही. शहर प्रशासनाने कंपनीला पत्र पाठवून त्यांना रीतसर परवानगी घेण्याचे आवाहन केले. परंतु कंपनीने या पत्रांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शहर प्रशासन कंपनीविरुद्ध कोर्टात गेले. सर्वसाधारणपणे शहर प्रशासन याला गुन्हा मानत नाही, परंतु बर्ड प्रकरणात मात्र शहर प्रशासनाने २०१७ च्या डिसेंबर महिन्यात क्रिमिनल कोर्टात कंपनीविरुद्ध दावा ठोकला. या दाव्यानंतर मात्र कंपनी सरळ आली. त्यांनी शहर प्रशासनाला तब्बल ३ लाख डॉलर्सचा दंड भरला तसेच पादचाऱ्यांच्या व स्कूटर वापरणाऱ्या सुरक्षिततेसाठी मोहीम उघडण्याचे मान्य केले. या दाव्यानंतरच कंपनीने आपल्या स्कूटरचा वेग ताशी ३५ किमीवरून २४ किमीवरही आणला आहे.  कंपनीने दाव्यानंतर सॅंटा मोनिकात ई-स्कूटर वापरणे सोपे जावे म्हणून प्रत्येक स्कूटर वापरणाऱ्याला मुफ्त हेल्मेट देऊ केले आहे. परंतु हे हेल्मेट घेऊन फिरणार कोण? त्यामुळे लोक तसेच हेल्मेट शिवाय अजूनही ई-स्कूटर वापरत आहेत.  सॅंटा मोनिका शहरात आता पोलिसांनी हेल्मेट न वापरता ई-स्कूटर चालवणाऱ्या लोकांना पकडणे सुरू केले आहे. पोलिसांनी २०१८ मध्ये सॅंटा मोनिकात आतापर्यंत ६९४ लोकांना थांबवले असून त्यातील ३२८ लोकांना दंड आकारला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्येही शहराच्या म्युनिसिपल ट्रान्स्पोर्टेशन एजन्सीने बर्ड व इतर कंपन्यांना अशाच प्रकारची पत्रे पाठवली आहेत. एवढेच नव्हे तर या वर्षीच्या मे महिन्यात ही एजन्सी ई-स्कूटरसाठी नवीन निर्बंध घालणार आहे. ते निर्बंध नक्की काय असतील ते अजून जाहीर झालेले नाही. 

या सर्व प्रकरणास जबाबदार व्यक्ती म्हणजे ट्रॅव्हिस व्हॅंडरझॅंडन. ट्रॅव्हिस व्हॅंडरझॅंडनने बर्ड राइडस्‌ कंपनी सुरू केली. या कंपनीने तब्बल १२ कोटी डॉलर्सची गुंतवणूक अतिशय थोड्या वेळात उभी केली आहे. ट्रॅव्हिसची ही पहिलीच कंपनी नव्हे. ट्रव्हिसने ॲपवरून कार वॉश करून देणारी ‘चेरी’ नावाची कंपनी यापूर्वी स्थापन केली होती. ही कंपनी सॅन फ्रान्सिकोस्थित लिफ्ट नावाच्या उबर प्रमाणेच वाहतुकीची सेवा देणाऱ्या कंपनीने २०१३ मध्ये विकत घेतली. त्यानंतर ट्रॅव्हिस ‘लिफ्ट’ कंपनीचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर बनला. लगेचच पुढच्या वर्षी तो लिफ्ट सोडून उबरमध्ये काम करू लागला. तिथे काही वर्षे काम करून आता त्याने ‘बर्ड राइडस’ ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. आपल्याला लहानपणापासूनच वाहतुकीच्या साधनांमध्ये रस आहे असे त्याने सी-नेटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. इलेक्‍ट्रीक स्कूटरमुळे वातावरणाची हानी न करता आपण लास्ट माईल कनेक्‍टीव्हीटीची समस्या स्वस्तात सोडवू शकतो असेही त्याने म्हटले आहे. वास्तविक अनेक अमेरिकन शहरात गेल्या काही वर्षात सायकलने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक लोक सायकलीच वापर करायला लागले आहेत. स्मार्टफोन ॲप वापरून या सायकली भाड्याने घेता येतात. या सायकली रस्त्यावरील सायकल स्टॅंडवर पार्क केलेल्या असतात. स्मार्टफोन ॲप वापरून त्या अनलॉक करता येतात. क्रेडिट कार्डाच्या साहाय्याने त्याचे पैसेही आपोआपच वळते होतात. परंतु सायकल चालवण्यास अंगमेहनत आवश्‍यक असून त्यामुळे घाम येतो. लोकांना असे घामाळलेले कपडे घालून ऑफिसला जायला आवडत नाही आणि म्हणूनच ई-स्कूटर लोकप्रिय झाल्या आहेत असे ट्रॅव्हिसचे मत आहे.

बर्ड राइडस्‌प्रमाणे इतरही काही कंपन्यांनी इलेक्‍ट्रीक स्कूटर सुविधा आता अमेरिकन शहरात सुरू केली आहे. ‘स्पिन’ व ‘लाइमबाइक’ या दोन कंपन्यांनी सॅन फ्रान्सिस्कोत या सुविधा चालू केल्या आहेत. या दोन्हीही कंपन्यांचे दर बर्ड स्कूटरएवढेच आहेत व या दोन्हीही कंपन्या आपल्या स्कूटर चार्ज करण्यासाठी लोकांना पैसे देतात. सॅन फ्रान्सिस्को प्रशासनाने या कंपन्यांविरुद्धही मोहीम उघडली आहे. 

हवामान बदल - क्‍लायमेट चेंजचा सामना करण्यासाठी अनेक लोक नवनवीन कल्पना काढत आहेत. मार्च २०१५ मध्ये भारतीय संसदेने कायद्यात बदल करून ई-रिक्षांना भारतीय रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करायची परवानगी दिली. बॅटरीवर चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या हेच वाहतुकीच्या साधनांचे भविष्य आहे यात मला काहीही शंका नाही. परंतु अशा प्रकारच्या नवीन कल्पना अमलात आणताना पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे भान ठेवणे आवश्‍यक आहे हेच आपल्याला अमेरिकन उदाहरणावरून दिसून येते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या