वॉलमार्टचे युद्ध

वैभव पुराणिक
गुरुवार, 3 मे 2018

टेक्नोसॅव्ही
वॉलमार्ट या सुप्रसिद्ध अमेरिकन कंपनीने भारतीय ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टमध्ये मोठी गुंतवणूक करायचे ठरवले आहे. यामुळे भारतीय ई-कॉमर्सच्या क्षेत्रात वॉलमार्ट विरुद्ध ॲमेझॉन या अमेरिकन युद्धाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

वॉलमार्ट कंपनी, भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक करण्याच्या बातम्या अनेक अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. वॉलमार्टने फ्लिपकार्टची किंमत तब्बल २० अब्ज डॉलर्स इतकी ठरवली आहे. त्यातील अंदाजे कमीतकमी ६० टक्के मालकी हक्क वॉलमार्ट विकत घेईल असे न्यूयॉर्क टाइम्स व ब्लूमबर्गने म्हटले आहे. म्हणजेच वॉलमार्ट फ्लिपकार्टमध्ये तब्बल १२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल ! फ्लिपकार्ट कंपनीचे मालकी हक्क सध्या अनेक वेगवेगळ्या कंपन्यांकडे आहेत. अमेरिकन कंपनी टायगर ग्लोबल, अमेरिकन कंपनी ॲक्‍सेल व्हेंचर्स, जपानी कंपनी सॉफ्टबॅंक आणि फ्लिपकार्ट संस्थापक बिनी बन्सल व सचिन बन्सल यांच्याकडे हे समभाग आहेत. त्यातील सॉफ्टबॅंक सोडून बाकी सर्वांनी आपले मालकी हक्क वॉलमार्टला विकायची तयारी दर्शवली आहे असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. हा करार जर खरोखरीच अस्तित्वात आला तर वॉलमार्टने केलेल्या गुंतवणुकीपैकी इ-कॉमर्समधील ही सर्वांत मोठी गुंतवणूक ठरेल. एवढेच नव्हे तर वॉलमार्टने एकूणच सर्व क्षेत्रात केलेल्या खरेदीपैकी हा करार तब्बल दुसऱ्या क्रमांकावर येईल. या आधी ब्रिटनमधील ‘असदा’ नावाच्या स्टोअरची मालिका वॉलमार्टने १९९९ मध्ये विकत घेतली होती. त्याची व्यवहाराची किंमत आजच्या भावात तब्बल १६ अब्ज डॉलर्स इतकी होईल. त्यानंतर एवढी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची ही वॉलमार्टची अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे.  

भारतीयांना एव्हाना ॲमेझॉन पक्की माहीत झाली आहे. अनेक लोक ॲमेझॉन डॉट इन या वेबसाइटवरून वेगवेगळ्या वस्तू विकत घेतात. ॲमेझॉनने भारतात २०१२ मध्ये पदार्पण केले. त्यानंतर फक्त ६ वर्षाच्या कालावधीत ॲमेझॉन भारतातील दुसऱ्या क्रमांकाची ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट बनली आहे. भारतीय बाजारपेठेत ॲमेझॉनने ऑनलाइन शॉपिंगच्या बरोबरीने व्हिडिओ स्ट्रीमिंग, किंडल, इको इत्यादी उत्पादनेही आणली आहेत. १९९४ मध्ये अमेरिकेत जेफ बेझोसने सुरु केलेल्या, इंटरनेटवरून फक्त पुस्तके विकणाऱ्या या छोट्याशा कंपनीचा आता जगभरात महावृक्ष झाला आहे. अमेरिकेत ॲमेझॉन टूथब्रशपासून क्‍लाऊड कंप्युटींगपर्यंत अक्षरशः कोट्यवधी गोष्टी विकते. अमेरिकेच्या नासडाक स्टॉक एक्‍स्चेंजवरील ॲमेझॉनच्या सर्व शेअरची एकत्रित किंमत तब्बल ७३५ अब्ज डॉलर्स इतकी आहे! हा लेख लिहीतेवेळी ॲमेझॉनच्या एका शेअरची किंमत तब्बल १५०० डॉलर्सपेक्षाही जास्त आहे! 

ॲमेझॉनविषयी भारतात सर्वांना माहीत असले तरी वॉलमार्टविषयी मात्र भारतीयांना तेवढी माहिती नाही. अमेरिकेत मात्र वॉलमार्ट हे घरोघरी माहीत असणारे नाव आहे. १९५० मध्ये सॅम वॉल्टनने अमेरिकेच्या आरकान्सा राज्यात या स्टोअरची स्थापना केली. पहिल्या दुकानाचे नाव ‘वॉल्टन्स ५ अँड १०’  असे होते. पुढे १९६२ मध्ये त्याचे नाव बदलून ‘वॉलमार्ट’ असे करण्यात आले. या स्टोअरची पुढे झपाट्याने वाढ होऊन आजमितीला तब्बल २८ देशामध्ये ११,००० हूनही अधिक स्टोअर वॉलमार्टने उघडली आहेत. वॉलमार्ट आपल्या दुकानात टूथब्रश आणि इलेक्‍ट्रॉनिक उपकरणापासून बंदुकांपर्यंत काहीही विकते. वॉलमार्टमधून एकही गोष्ट विकत घेतली नाही अशी एकही अमेरिकन व्यक्ती अस्तित्वातच नसेल! अमेरिकेत वॉलमार्ट अतिशय स्वस्त किमतीसाठी प्रसिद्ध आहे. एखादी गोष्ट वॉलमार्ट एवढ्या स्वस्तात कुठल्याच ठिकाणी मिळत नाही अशी एकेकाळी वॉलमार्टची ख्याती होती. आजही ती बऱ्यापैकी वस्तुस्थिती असली तरी ऑनलाइन शॉपिंगने मात्र परिस्थितीत मोठा बदल घडवून आणला आहे. वॉलमार्टची दगडमातीने बनलेल्या दुकानांमध्ये सरशी असली तरीही इंटरनेटवरून वस्तू विकण्यात मात्र वॉलमार्टला हवे तसे यश आलेले नाही. वॉलमार्ट डॉट कॉम ही वेबसाइट ॲमेझॉन डॉट कॉमच्या तुलनेत खूपच कमी लोकप्रिय आहे. 

जगभरात सर्वत्रच ऑनलाइन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांनी स्टोअरमध्ये जाणे कमी केले असून अनेक गोष्टी ते आपल्या स्मार्टफोनवरून खरेदी करणे पसंत करतात. अमेरिकेत ॲमेझॉन आपल्या प्राइम सभासदांना दोन दिवसात हवी ती गोष्ट घरपोच देते. एवढेच नव्हे तर एक दिवसात व काही गोष्टी जादा पैसे देऊन ज्या दिवशी घ्याल त्या दिवशीसुद्धा घरपोच मिळतात ! अनेक वेळा तुम्ही स्टोअरमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला नक्की हवी असेल ती गोष्ट तिथे नसते. ऑनलाइन शॉपिंगने ही समस्याही सोडवली आहे. एका वेबसाइटच्या मागे अक्षरशः हजारो गोडाऊनचे जाळे असते. त्यामुळे ती वस्तू एका जागेवर नसली तरी दुसऱ्या जागेवरून तुम्हाला कुरिअरने पाठवता येते. म्हणूनच जवळजवळ सर्वच स्टोअरनी आपापल्या वेबसाइटवरून ऑनलाइन शॉपिंग सुविधा सुरु केली आहे. वॉलमार्टच्या स्टोअरना ॲमेझॉन व इतर ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचा बाजारपेठेतील हिस्सा दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणूनच वॉलमार्टही गेली कित्येक वर्षे ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसायात जम बसविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनीही वॉलमार्ट डॉट कॉम वेबसाइटवरून ऑनलाइन शॉपिंग सुरु केले. एवढेच नव्हे तर २०१६ च्या ऑगस्टमध्ये वॉलमार्टने तब्बल ३.३ अब्ज डॉलर्स खर्च करून जेट डॉट कॉम ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट विकत घेतली.  या कंपनीचा प्रमुख मार्क लोर याला वॉलमार्टने आपल्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटचेही काम दिले. त्याच्या हाताखाली तब्बल १५ हजार कर्मचारी काम करायला लागले !  मार्क लोरला एकच महत्त्वाचे उद्दिष्ट देण्यात आले, ॲमेझॉनपेक्षाही मोठा ऑनलाइन शॉपिंग व्यवसाय उभा करणे ! हा व्यवसाय उभा करताना वॉलमार्टने ॲमेझॉनच्या अनेक गोष्टींची नक्कलही करून पाहिली. ॲमेझॉनच्या प्राइम सभासदांना सदस्यत्वाचे शुल्क आकारून दोन दिवसात वस्तू घरपोच मिळू शकतात. या वस्तू विकत घेताना त्यांना एकही पैसे पोस्टेज द्यावे लागत नाही. वॉलमार्टनेही अशा प्रकारचा उपक्रम सुरु केला व त्याला ‘शिपिंग पास’ असे नाव दिले. या शिपिंग पासची किंमत ॲमेझॉनच्या प्राइम सदस्यत्वाच्या अर्धी ठेवण्यात आली. परंतु फारशा लोकांनी शिपींग पास न घेतल्याने तो २०१७ मध्ये बंद करण्यात आला. त्याऐवजी वॉलमार्टने ३५ डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी केल्यावर दोन दिवसात विनाशुल्क घरपोच सुविधा सुरु केली. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून आणि ग्राहकांना खेचण्यासाठीचे विविध उपक्रम हाती घेऊनही, वॉलमार्ट ऑनलाइन शॉपिंगमध्ये ॲमेझॉनच्या जवळही जाऊ शकलेले नाही. ऑफलाइन शॉपिंग व ऑनलाइन शॉपिंग एकत्र केले तर मात्र वॉलमार्टची विक्री ॲमेझॉनपेक्षा जास्त आहे, पण नुसत्या ऑनलाइन शॉपिंगमध्ये वॉलमार्ट ॲमेझॉनपेक्षा बरेच मागे आहे. २०१७ च्या शेवटच्या तिमाहीचे आकडे या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात वॉलमार्टने जाहीर केले. त्यानुसार वॉलमार्ट डॉट कॉमची विक्री त्या तिमाहीत फक्त २३ टक्‍क्‍यांनी वाढली. वॉल स्ट्रीटची अपेक्षा पूर्ण न झाल्याने हे आकडे जाहीर झाल्यावर वॉलमार्टच्या शेअरची किंमत तब्बल १० टक्‍क्‍यांनी घसरली! आणि त्यामुळेच भारतामधील क्रमांक एकची ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट खरेदी करून भारतात तरी वॉलमार्टला ॲमेझॉनला हरवायची संधी हवी आहे. 

इंटरनेट कंपन्यात आणि विशेषतः ऑनलाइन शॉपिंगच्या क्षेत्रात भारताकडे संपूर्ण जगाचे डोळे लागून आहेत. आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतामधील इंटरनेट वापरणारा मध्यमवर्ग.

स्टॅटिस्टा डॉट कॉमनुसार आजमितीला भारतामध्ये ४६ कोटी लोक इंटरनेट वापरतात. ही संख्या संपूर्ण अमेरिकेच्या लोकासंख्यापेक्षा १६ कोटीने जास्त आहे! भारताचा क्रमांक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये जगात दुसरा लागतो. भारतापेक्षा फक्त चीनमध्येच जास्त इंटरनेटधारक आहेत. आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संख्या भारताच्या लोकसंख्येच्या फक्त ३५ टक्के एवढीच आहे. प्यू रिसर्चच्या एका अहवालानुसार २०१४ मध्ये तब्बल २८ कोटी अमेरिकन लोक इंटरनेटचा वापर करत होते. ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या ८७ टक्के आहे. म्हणजेच भारतीय बाजारपेठ भविष्यात दुपटीपेक्षाही जास्त वाढणार आहे. स्टॅटिस्टा डॉट कॉमनुसार २०२१ मध्ये भारतामधील इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या जवळजवळ ६१ कोटीच्या आसपास जाऊन पोचेल, म्हणजे अमेरिकेच्या इंटरनेट धारकांपेक्षा दुपटीहूनही जास्त! आणि हा मध्यमवर्ग अधिकाधिक प्रमाणात ऑनलाइन शॉपिंगचा वापर करू लागला आहे. अधिकाधिक पैसे ऑनलाइन खर्च करू लागला आहे. त्यामुळे ॲमेझॉन आणि वॉलमार्टसारख्या प्रचंड मोठ्या कंपन्यांच्या दृष्टीने भारतात गुंतवणूक करणे अतिशय आवश्‍यक ठरले आहे. अजून एक मुख्य कारण म्हणजे भारतातील वातावरण. भारतामध्ये चीनप्रमाणे एकाधिकारशाही नाही. येथील न्याय व्यवस्था राजकीय व्यवस्थेपासून स्वतंत्र आहे व लोकशाही असल्याने लोकांचे मत विचारात घेऊनच राज्य कारभार चालतो. ॲमेझॉन आणि वॉलमार्ट या दोन्हीही कंपन्यांना चीनमध्ये अजिबात यश मिळालेले नाही. आणि त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या बाजारपेठेत अपयश आल्याने या दोन्हीही कंपन्यांनी आता भारतात यशस्वी व्हायचेच असा चंग बांधला आहे. 

वॉलमार्टच्या या गुंतवणुकीचा भारतीय ऑनलाइन शॉपिंग क्षेत्राला प्रचंड मोठा फायदा होणार आहे. वॉलमार्टने गेल्या ६० वर्षात अमेरिकेत आणि जगभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभारली आहे. या व्यवस्थेचे मुख्य उद्दीष्ट कमीत कमी पैशात ग्राहकांपर्यंत उत्तमोत्तम माल कसा पोचवता येईल हे आहे. त्यात तंत्रज्ञानाचाही मोठा भाग आहे. ही संपूर्ण व्यवस्था वॉलमार्ट भारतात उभी करेल आणि त्यामुळे भारतीय उत्पादकांना आणि ग्राहकांना त्याचा फायदा उठवता येईल. त्याव्यतिरिक्त या व्यवहारामुळे फ्लिपकार्टमधील अनेक लोकांना प्रचंड मोठा आर्थिक फायदा होईल. यातून मिळालेली रक्कम ते भारतीय अर्थव्यवस्थेत पुन्हा गुंतवतील, नवीन स्टार्टअप काढल्या जातील, नवीन नोकऱ्या तयार होतील. वॉलमार्टच्या गुंतवणुकीमुळे ॲमेझॉनही भारतात अधिक पैसे ओतेल आणि त्यामुळे अधिक नोकऱ्या व अधिक कंपन्या तयार होतील. एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

संबंधित बातम्या