लॉस एंजलिसमधील जलसंधारण

वैभव पुराणिक, लॉस एंजलिस
गुरुवार, 5 जुलै 2018

टेक्नोसॅव्ही
 

पाण्याचे दुर्भिक्ष जगात अनेक शहरांना भेडसावत आहे. लॉस एंजलिस हे त्यातीलच एक शहर. या शहराने पाण्यासाठी आता नवनवीन उपाय योजायला सुरवात केली आहे.

दक्षिण कॅलिफोर्नियात फारसा पाऊस पडत नाही. कोकणात सर्वसाधारणतः:  दरवर्षी  ७० ते १२० इंच पाऊस पडतो. पण लॉस एंजलिस शहरात फक्त १५ इंच पाऊस पडतो! लॉस एंजलिसला पाणीपुरवठा करणारी दुसरी कोणतीही सोय आजूबाजूला नाही. त्यामुळे लॉस एंजलिससाठीचे पाणी लांबून कोलोरॅडो नदीतून आणावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा अपव्यय होतो. आणि म्हणूनच पावसाचे पाणी साठवण्यासाठी लॉस एंजलिसने विविध उपाय योजले आहेत. मोठमोठे तलाव बांधून पाणी साठवणे शक्‍य आहे. पण या साठलेल्या पाण्याचे कडक उन्हामुळे बाष्पीभवन होते व त्यात ३० ते ५० टक्के पाण्याची वाफ होऊन ते पाणी उडून जाते. त्यामुळे जमिनीवर पाणी साठवण्याऐवजी जमिनीखाली पाणी साठवणे जास्त चांगले. सुदैवाने निसर्गाने अशा प्रकारे जमिनीखाली पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था करून ठेवल्या आहेत. त्यातील एक म्हणजे अक्वाफर (acquifer). जमिनीखाली अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दगडमातीचे थर असतात. काही विशिष्ट प्रकारच्या खडकातून पाणी झिरपत नाही आणि त्यामुळे अशा खडकांच्या पृष्ठभागावरती पाणी साचून राहते. आजूबाजूला अशा प्रकारचे पाणी न झिरपणारे खडक असतील व या खडकांमध्ये पोकळी असेल तर तिथे पाणी साठून राहते. हे पाणी मग विहीर खणल्यावर आपल्याला दिसू शकते. अनेक वेळा अशा प्रकारचे पाणी एखाद्या झऱ्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागावरही येते. भूगर्भाचा अभ्यास करून असे अक्वाफर नक्की कुठे कुठे आहेत ते शोधून काढता येते. एकदा अक्वाफर सापडले की त्यात पावसाचे अधिकाधिक पाणी कसे साठवून ठेवता येईल याचा विचार करता येतो. एखाद्या भागात जास्त अक्वाफर असतील तर या अक्वाफरवरील कुठल्या भागातून पाणी जास्त आत झिरपून अक्वाफरमध्ये जाईल त्या भागाला ओळखावे लागते. हा भाग ओळखल्यानंतर आजूबाजूच्या भागातून पावसाचे पाणी या भागात कसे वाहून येईल याचा विचार करावा लागतो. तशी योजना केल्यास जास्तीत जास्त पाऊस भूगर्भात सुरक्षितपणे साठू शकतो. पाऊस नसेल व पाण्याची जास्त गरज असेल तेव्हा अशा प्रकारचे पाणी हॅंडपंपातून अथवा बोरींगद्वारे जमिनीवर आणून वापरता येते. ग्रामीण भागातील बहुतेक भाग उघडा असल्याने तिथे अशा प्रकारे पाणी साठवणे तुलनेने सोपे जाते. परंतु मुंबई शहर म्हणजे काँक्रिटचे जंगल आहे. तिथे पाणी आत झिरपू शकेल अशी माती आपल्याला कुठे दिसतच नाही. आणि त्यामुळे पावसाचे पाणी आत झिरपण्यासाठी पुरेशी बांधकाम न केलेली जमीनच शिल्लक नाही. लॉस एंजलिसमध्ये अशी जमीन मुंबईच्या तुलनेने जास्त असली तरीही ती आवश्‍यक पाणी साठवण्यासाठी पुरेशी नाही. पण लॉस एंजलिस एका बाबतीत मात्र सुदैवी आहे. लॉस एंजलिस व आजूबाजूच्या शहरांच्या खाली तब्बल १७५ चौरस मैल आकाराचा प्रचंड मोठा अक्वाफर आहे. म्हणजे भूगर्भात अब्जावधी लिटर पाणी साठू शकेल अशी जागा आहे. या अक्वाफरमध्ये पावसाचे जास्तीत जास्त पाणी कसे साठवता येईल याची योजना करण्यात लॉस एंजलिस शहर प्रशासन गुंतले आहे. लॉस एंजलिसजवळ शहर प्रशासनाने १५० एकर रिकामी जागा यासाठी खास राखून ठेवली आहे. टुजूंगा स्प्रेडिंग ग्राउंडस असे नाव असलेल्या या जागेत २०१५ पासून मोठ्या प्रमाणावर अनेक तलाव बांधण्याचे काम सुरू आहे. हे तलाव पाणी साठवून ते जमिनीत झिरपावे म्हणून बांधले गेले आहेत. या तलावांचे बांधकाम अलीकडेच पूर्ण झाले आहे. या १५० एकर जागेतील तलावांमुळे तब्बल १२,२०० एकर-फिट अक्वाफर ‘रिचार्ज’ होऊ शकेल. म्हणजेच तब्बल १६ अब्ज लिटर पाणी एका वर्षात अक्वाफरमध्ये साठवता येऊ शकेल. अक्वाफरमध्ये पाणी झिरपण्याच्या प्रक्रियेला अक्वाफर रिचार्ज असे म्हटले जाते. शहर प्रशासनाने टुजूंगा स्प्रेडिंग ग्राउंडवर तब्बल २.७ कोटी डॉलर्स (१.८ अब्ज रुपये) इतका खर्च केला आहे!  या तलावांचा उपयोग लोकांना फिरण्यासाठीचे एक स्थान म्हणूनही करायचे प्रशासनाने ठरवले आहे. इथे लोकांनी यावे म्हणून या तलावामधून चालायचे रस्ते बनवण्यात येणार आहेत. जागोजागी हे तलाव सुशोभित करण्यात येणार आहेत. तसेच लोकांचे भूगर्भातील पाण्याविषयी अधिक माहिती देणारे फलकही लावण्यात येणार आहेत. 

टुजूंगा स्प्रेडिंग ग्राउंड लॉस एंजलिस शहराच्या उत्तरेला शहर मध्यभागापासून २५ मैल दूर आहे. मुख्य शहरात फारशी मोकळी जागा नाही. त्यामुळे शहराच्या महानगरपालिकेने काही रस्त्यांच्या मध्यभागी हिरवळीचे डिव्हायडर बनवले आहेत. त्यामुळे हे डिव्हायडर दिसायला छान दिसतातच व काँक्रिट नसल्याने या जागेवरून पाणीही मातीत मुरते. हे डिव्हायडर भारतात रस्त्यांमध्ये डिव्हायडर असतात त्याच्यापेक्षा रुंदीला बरेच मोठे आहेत. त्याव्यतिरिक्त अजूनही काही उपाय शहर प्रशासनाने हाती घेतले आहेत. शहरामधील बहुतेक सर्व रस्त्यांमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेन बसवलेले आहेत. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेण्याची व्यवस्था. कचरा वाहून नेण्याच्या गटारांपासून ही व्यवस्था वेगळी आहे. कचरा यात मिसळू नये म्हणून मुद्दामूनच या व्यवस्था वेगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु आता यातील काही ड्रेन समुद्रात पाणी वाहून नेण्याऐवजी त्याचा वापर अक्वाफर रिचार्जींगसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी समुद्रात जाऊन फुकट जाणार नाही. एकदा पाणी समुद्रात गेले ,की त्यात समुद्रातील क्षार मिसळले जातात आणि मग त्या पाण्यापासून पिण्याचे पाणी बनवण्यासाठी ‘डीसॅलिनेशन’ प्रक्रियेचा वापर करावा लागतो. डीसॅलिनेशन ही अतिशय खर्चिक प्रक्रिया आहे. त्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते आणि त्यामुळेच अमेरिकेसारख्या श्रीमंत देशालाही जागोजागी अशा डिसॅलिनेशन प्लांट बांधणे परवडत नाही. लॉस एंजलिस शहर सध्या आपल्या एकूण पाण्याच्या मागणी पैकी ११ टक्के मागणी भूगर्भातील पाण्यावरून भागवत आहे.  त्यामुळे अशा वेगवेगळ्या योजना करून या अक्वाफरमधील पाणी कमी न होऊ देणे शहर प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. 

अक्वाफर रिचार्ज करण्याव्यतिरिक्त पाणी वाचवण्यासाठी लॉस एंजलिस शहराने अजून एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. आणि तो म्हणजे सांडपाण्यापासून पिण्याचे पाणी बनवण्याचा! काही लोकांनी याला ‘टॉयलेट टू. टॅप’ असे नाव दिले आहे. आणि त्यामुळेच अनेक लोक असे पाणी शास्त्रीयदृष्ट्या पिण्यालायक असले तरीही पिण्यास नकार देत आहेत. किंबहुना कॅलिफोर्निया राज्याच्या कायद्यानुसार अशा प्रकारे शुद्ध केलेले पाणी थेट नळाद्वारे लोकांच्या घरी पाठवता येत नाही. आणि म्हणूनच लॉस एंजलिस शहर प्रशासनाने अशा प्रकारचे शुद्ध केलेले पाणी अक्वाफर रिचार्ज करण्यासाठी वापरायला सुरवात केली आहे. त्यामुळे हे पाणी नळावाटे पाठवण्याआधी अजून एक शुद्धीकरण प्रक्रियेतून जाईल. लॉस एंजलिस शहराचे मलमूत्र माझ्या घरापासून केवळ ७ मैल दूर असलेल्या हायपेरीयन वॉटर रिक्‍लमेशन प्लांटमध्ये पाठवले जाते. या प्लांटचे काम ते पाणी समुद्रात सोडण्याएवढे शुद्ध करणे हे आहे. तेवढे शुद्ध करून ते समुद्रात किनाऱ्यापासून ५ मैल लांबीवर सोडले जाते. मात्र त्यातील ४ कोटी गॅलन पाणी - म्हणजे अंदाजे १५ कोटी लिटर पाणी मात्र एका दुसऱ्या प्लांटमध्ये वाहून नेले जाते. एडवर्ड सी लिट्ल वॉटर रिसायकलिंग असे नाव असलेल्या या प्लांटमध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रक्रियेचा वापर करून या पाण्याला शुद्ध केले जाते. हे पाणी काही विशिष्ट पडद्यामधून दाबाखाली वाहून नेले जाते. पाण्यामधील केमिकल व जंतू त्यामुळे वेगळे होतात. त्यानंतर या पाण्यावर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा केला जातो. त्यामुळे या पाण्यातील उरलेले जीवजंतूही नष्ट होतात. या प्रक्रियेतून अतिशय शुद्ध पाणी तयार होते. हे शुद्ध पाणी इतके शुद्ध असते, की सर्वसाधारण पाण्यात आढळणारी अनेक खनिजे त्यात नसतात. असे पाणी जर आपण प्यायले तर आपल्या शरीरातील खनिजे त्यात विरघळली जातील व त्यामुळे मोठी समस्या निर्माण होईल. असे पाणी आपल्या हाडातून कॅल्शिअम शोषून घेईल व ज्या पाइपमधून ते वाहेल त्या पाइपचा अंतर्भाग शोषून घेईल. आणि म्हणूनच या पाण्यामध्ये खनिजे थोड्या प्रमाणात मुद्दाम मिसळले जातात. ते टाकल्यानंतर हे पाणी आपल्या इतर पिण्याच्या पाण्याइतकेच शास्त्रीयदृष्ट्या शुद्ध होते. परंतु हे पाणी थेट पाणीसाठ्यात न सोडता ते अक्वाफरमध्ये सोडले जाते. लॉस एंजलिस शहर समुद्राच्या काठावर वसलेले आहे. समुद्राचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळू नये म्हणून समुद्राजवळील अक्वाफरमध्ये हे पाणी सोडले जाते. त्यामुळे समुद्राच्या खारे पाणी या पिण्याच्या पाण्यामध्ये एकप्रकारे या पाण्याची भिंत उभी केली जाते. परंतु भविष्यात हे पाणी थेट पाणीसाठ्यात सोडायचा शहर प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी कायद्यात बदल होणे आवश्‍यक आहे व लोकांच्या अशा प्रकारच्या पाण्याकडे पाहायच्या दृष्टिकोनातही बदल होणे आवश्‍यक आहे. 

अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे की वरील सर्व प्रकल्प प्रचंड खर्चिक आहेत. लॉस एंजलिस शहराकडे प्रचंड प्रमाणात पैसा उपलब्ध असल्याने ते शक्‍य झाले आहेत. भारतामध्येही अशा प्रकारचे उपाय सुरू आहेत. जलयुक्त शिवार ही भूगर्भातील पाण्याचा साठा रिचार्ज करण्यासाठीच आखलेली योजना आहे. दिल्लीमध्येही टॉयलेट टू. टॅप योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. या प्रायोगिक योजनांची लॉस एंजलिसप्रमाणे मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या