गुहेतील थरारनाट्य...

वैभव पुराणिक
गुरुवार, 19 जुलै 2018

अठरा दिवस संपूर्ण जगाची उत्कंठा वाढवणारे थायलंडमधील थरारनाट्य अखेर दहा जुलैला संपले. अकरा ते सोळा वयोगटातील बारा मुले व त्यांचे फुटबॉल प्रशिक्षक एका 
प्रचंड मोठ्या डोंगराखालील गुहेत अडकले होते. ते तिथे कसे पोचले आणि त्यांना तिथून कसे सोडवले गेले याची कहाणी...

थायलंडच्या उत्तरेला म्यानमार (ब्रम्हदेश) व लाओस हे देश आहेत. म्यानमार व लाओस यांची सीमा ज्या भागात थायलंडच्या सीमेला मिळते तिथे थायलंडचे जे राज्य आहे त्याचे नाव ‘चियांग राय’ असे आहे. या सीमेजवळील थायलंडमधील शेवटचे शहर म्हणजे मासाई. या शहरामधील मा-पू (वाइल्ड बोअर) नावाचा फुटबॉल क्‍लब आहे. या फुटबॉल क्‍लबची एक सीनियर टीम आहे व ज्युनिअर टीमही आहे. ज्युनिअर टीममध्ये अकरा ते सोळा वयोगटातील मुले आहेत. तेवीस जूनला एका फुटबॉल मॅचनंतर या टीमचा सहाय्यक प्रशिक्षक एक्कापोल चॅंटावाँग याने  मुलांना शहराजवळील डोंगरावर घेऊन जायचे ठरवले. या डोंगराच्या खाली थाम लुआंग गुहा आहेत. या गुहेत खोलवर जाऊन गुहेच्या भिंतीवर आपली नावे लिहून परत यायचं असा त्यांचा बेत होता. गुहेच्या प्रवेशद्वारापर्यंत मुले सायकलने जाणार होती. गुहेच्या प्रवेशद्वाराशी आपल्या पिशव्या व सामान ठेवून गुहेत सामानाशिवाय जाणार होती. गुहेतील काही भाग अतिशय अरुंद असल्याने सामान घेऊन जाणे शक्‍य झाले नसते. या फुटबॉल क्‍लबचा तसा शिरस्ताच होता. यापूर्वी अनेक मुलांना घेऊन पंचवीस वर्षीय एक्कापोल या गुहेत गेला होता. एक्कापोल व मुलांनी ठरल्याप्रमाणे आपले सामान गुहेच्या प्रवेशद्वाराशी ठेवले व गुहेत ते खोलवर गेले. इथपर्यंत सर्वकाही ठीक होते. वेळ दुपारची होती. 

थायलंडमध्ये भारताप्रमाणे मॉन्सून ऋतू असतो. मुले आत गेल्यावर बाहेर प्रचंड पावसाला सुरवात झाली. पाऊस इतका धोधो पडत होता, की गुहेच्या प्रवेशद्वारातून पाणी आत जाऊ लागले. मोठ्या प्रमाणावर पाणी आत गेल्याने हळूहळू गुहेच्या सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली. आणि त्यामुळेच मुलांचा बाहेर यायचा रस्ता बंद झाला ! 

इथे परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी या गुहेची रचना समजून घेतली पाहिजे. ही गुहा बरीच लांबलचक आहे. काही वृत्तानुसार ती चार किलोमीटर लांब तर काही वृत्तानुसार ती तब्बल सहा किलोमीटर लांबीची आहे. ही गुहा म्हणजे एक प्रचंड लांब भुयार आहे असे म्हटले तरी हरकत नाही. पण या भुयाराचा व्यास कधी खूप मोठा तर कधी फक्त दीड फूट एवढा लहान! आणि परत त्यात ती समुद्रसपाटीपासून डोंगर दऱ्याप्रमाणे वर खाली होणारी. म्हणजे या भुयारात कधी मोठी चढण तर कधी मोठा उतार! आणि तेही वेड्या वाकड्या स्वरूपात! आणि म्हणूनच ही गुहा ओलांडणे कठीण समजले जाते. उन्हाळ्यात कदाचित एका प्रवेशद्वारात आत शिरून सहा किलोमीटर लांबीवरच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून बाहेर येणे शक्‍यही झाले असते. पण पावसाळ्यात जागोजागी पाणी भरल्याने ते अशक्‍य! या भुयाराचा बहुतेक सर्व भाग हा डोंगराच्या वरील पृष्ठभागापासून तब्बल १००० मीटर (३००० फूट) खाली आहे ! 

बरं पृष्ठभागापासून ३००० फूट खाली असल्याने गुहेत २४ तास काळाकुट्ट अंधार. या गुहेची रचनाच अशी ,की मधूनच कुठूनतरी बाहेर यायचा प्रश्नच उद्भवत नाही ! म्हणजे मुलांपुढील एकमेव मार्ग म्हणजे पुढे सरकत राहणे. पुढे पाणी नसेल तर कदाचित एक दोन दिवसात पुढच्या बाजूच्या प्रवेशद्वाराने बाहेर येता येण्याची शक्‍यता होती.

इकडे संध्याकाळी सात वाजता मा-पू फुटबॉल क्‍लबचे मुख्य प्रशिक्षक नोप्पारट कथावाँग यांनी आपला मोबाईल फोन सुरू केला. त्यांनी काही कारणास्तव तो बंद करून ठेवला होता. फोन सुरू करतात त्यांच्या फोनवर जवळजवळ २० मेसेजेस दिसले. आपली फुटबॉल मॅचला गेलेली मुले परत आलेली नाहीत अशा आशयाचे हे मेसेजेस होते. नोप्पारट यांना एक्कापोल मुलांना घेऊन गुहेत गेला असणार हे माहीत होते. त्यांनी ताबडतोब गुहेकडे धाव घेतली. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना मुलांचे सामान दिसले. पावसामुळे गुहेत सर्वत्र पाणी भरले होते व चिखल झाला होता. नोप्पारट यांना काय घडले असावे याचा अंदाज आला आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी ताबडतोब चिंयांग राय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. थाय नौदलाच्या पाण्याखाली सुटका करणाऱ्या विभागाला पाचारण करण्यात आले. परंतु या विभागाला सर्वसाधारण समुद्रात अथवा नदीत डायव्हिंग करण्याचा अनुभव होता. परंतु एखाद्या गुहेत डायव्हिंग कसे करावे, त्यासाठी कुठली उपकरणे लागतील याचा अंदाज नव्हता. आणि त्यापेक्षाही कठीण गोष्ट म्हणजे सहा किलोमीटर लांब गुहेत ही मुले नक्की कुठे आहेत हे कळायचा काहीच पत्ता नव्हता! असे कुठले उपकरणच अस्तित्वात नाही की ज्यामुळे तीन हजार फूट पृष्ठभागाखालील भुयारात शोध घेता येईल. त्यांनी बराच विचार करून पाहिला. वरून तीन चार ठिकाणी ड्रिल करून भुयारात मध्ये उतरणे तीन हजार फूट उंचीमुळे व पावसामुळे जवळजवळ अशक्‍य होते. पण काही न करता बसणेही तेवढेच अशक्‍य होते. नौदलाची एक तुकडी जेथपर्यंत आत जाता येईल तिथपर्यंत पाठवायची ठरले. ही तुकडी परत येणे सुरक्षित आहे अशा अंतरापर्यंतच जाणार होती. त्यांना थोडे अंतर गेल्यावर मुलांच्या पायाचे ठसे मिळाले. म्हणजे ते मुलांच्या दिशेने जात होते एवढे नक्की. परंतु पुढे खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरले असल्याने पुढे जाणे अशक्‍य होते. मग मोठ्या क्षमतेचे पंप आणून हे पाणी काढून टाकायचे ठरले. परंतु दुर्दैवाने एक संपूर्ण दिवस अनेक पंप चालू करूनही पाण्याची पातळी फक्त दोन सेंटिमीटरनेच कमी करण्यात नौदलाला यश मिळाले! बाहेर पाऊस पडतच असल्याने हे काम अतिशय कठीण झाले होते. आता एकच शक्‍यता उरली होती. ज्यांना केव्ह डायव्हिंग (Cave Diving) - म्हणजे अशा प्रकारच्या गुहेत डायव्हिंग करण्याचा अनुभव आहे अशा लोकांना पाचरण करणे व त्यांची मदत घेऊन प्रवेशद्वारातून आत मुले मिळेपर्यंत जात राहणे! 

हा निर्णय झाल्यावर कैक हजार मैल दूरवर इंग्लंडमधील डर्बीशायर भागातील बिल व्हाइटहाउस यांच्या घरामधील फोन खणखणला. बिल पूर्वी ‘केव्ह डायव्हिंग’ करत असत. ते ब्रिटिश केव्ह रेस्क्‍यू कौन्सिलचे उपाध्यक्षही होते. त्यांना थायलंडमधील या घटनेविषयी बातम्यांतून कळले होते. सुदैवाने थायलंडमध्ये वर्नन अनस्वर्थ नावाचा एक अनुभवी केव्ह डायव्हर रहात होता. त्याने त्याच्या ब्रिटनमधील केव्ह डायव्हिंग करणाऱ्या मित्रांना कळवले. त्यामुळेच बिल व त्यांच्या केव्ह डायव्हिंग करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी पाचारण करण्याचे ठरले. लंडनमधील थाय वकिलातीने ताबडतोब थाय एअरवेजच्या पुढील विमानांमध्ये तीन जागा बुक केल्या. जॉन वोलांथन, रिक स्टॅंटन आणि रॉबर्ट हार्पर या तीन जणांना ताबडतोब थायलंडमध्ये घेऊन येण्यात आले. दरम्यान अमेरिकन नौदलाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतीसाठी काय करता येईल याची विचारणा सुरू केली होती. ऑस्ट्रेलियातूनही काही डायव्हर मासेईला येऊन पोचले होते. त्यांनी पाण्यात जाऊन चाचपणी करायला सुरवात केली होती. दुर्दैवाने पाण्यात प्रचंड चिखल असल्याने पुढचे काहीच दिसत नव्हते. तुम्ही कितीही मोठ्या क्षमतेचा दिवा वापरलात तरी पाण्यातील चिखलामुळे पुढे जाणे कठीण होऊन बसले होते. धुक्‍यात तुमचे हेडलाईट चालू असले तरीही कधी कधी अजिबात पुढचे दिसत नाही, तशीच ही परिस्थिती होती. पण पुढच्या दोन तीन दिवसात परिस्थिती बदलली. पाऊस कमी झाला, पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे पाण्यातील चिखल कमी झाल्याने पाण्यात पुढचे दिसू लागले. वोलांथन आणि त्याचे सहकारी प्रयत्न करतच होते. अखेर दोन जुलैला - म्हणजे तब्बल दहा दिवसांनी वोलांथन आणि स्टॅंटन यांनी गुहेत खोलवर जाण्यात यश मिळवले. एका प्रचंड पाण्याच्या साठ्यातून थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून ते गुहेत वर आले - तर त्यांना समोर चक्क १२ मुले व एक्कापोल दिसला! गुहेच्या प्रचंड भागात ही मुले बसून होती. वोलांथन यांनी पहिला प्रश्न विचारला - तुम्ही किती लोक आहात? तेरा उत्तर मिळाल्यावर त्यांना हायसे वाटले. सर्वच मुले व त्यांचे प्रशिक्षक सुरक्षित असल्याचे त्यामुळे त्याला कळले.

पण ती सापडली असली तरी त्यापेक्षाही कठीण भाग अजून बाकी होता. तो म्हणजे या मुलांना व त्यांच्या प्रशिक्षकांना सुखरूप बाहेर काढणे. ही मुले गुहेत तब्बल चार किलोमीटर आतमध्ये सापडली होती. इथून गुहेच्या प्रवेशद्वारापाशी जाण्यासाठी डायव्हिंग व पोहता येणे आवश्‍यक होते. या मुलांना डायव्हिंग सोडून द्या, पण त्यांना पोहताही येत नव्हते. ही मुले एका छोट्याशा कडेवर चिखलात बसून होती व जिथे ही मुले होती तेथील प्राणवायूचे प्रमाण १३ लोकांमुळे झपाट्याने कमी होत होते. त्यामुळे पाणी ओसरेपर्यंत थांबण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. आणि त्याआधीही या मुलांना खाणे पिणे देणे आवश्‍यक होते. या मुलांनी तब्बल दहा दिवसात काहीही खाल्ले नव्हते! सर्वप्रथम थाय नौदलाच्या डायव्हरनी या मुलांसाठी खाणे पिणे आणण्याची व्यवस्था केली. त्यांना हळू हळू खाणे देणे आवश्‍यक होते. त्यांच्या शरीराची खाण्याची सवयच सुटली होती. त्यांना पुन्हा खाणे सुरू करण्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घेण्यात आला. मुलांसाठी प्राणवायूचे टॅंकही वाहून नेण्यात आले. दरम्यान ऑक्‍सीझन टॅंक वाहून नेताना थाय नौदलाच्या समन कुनान नावाच्या डायव्हरचा मृत्यू झाला. त्यामुळे या गुहेतील डायव्हिंग किती धोकादायक आहे हे सर्वांना पुन्हा एकदा कळले. पण तरीही थांबून चालणार नव्हते. बिल व्हाइटहाउस यांनी अजून दोन केव्ह डायव्हरची व्यवस्था केली. त्यांनी थायलंडमध्ये नवीन उपकरणे आणली. फ्रान्समधून मुलांसाठीचे लहान डायव्हिंग मास्क मागवण्यात आले. थायलंडमध्ये डायव्हरनी स्वीमिंग पूलमध्ये लहान मुलांकडून डायव्हिंग कसे करवता येईल याची चाचपणी सुरू केली. मुलांसाठी खास पाच मिलिमीटर जाडीचे वेट सूट (काळा डायव्हिंग सूट) मागवण्यात आले. आठ जुलैला तेरा परदेशी डायव्हर्स (पाणबुडे) व पाच थाय नौदलाच्या डायव्हरनी पहिला सुटकेचा प्रयत्न केला. या तेरा परदेशी डायव्हरपैकी एक डायव्हर डॉक्‍टर होता. मुलांची चार मुलांच्या तुकडीत विभागणी करण्यात आली. मुलांना मास्क, वेटसूट घालून, दोन डायव्हरनी एका मुलाला असे हळूहळू घेऊन जाण्यास सुरवात केली. सुटका करतानाचा पहिला किलोमीटर सर्वांत कठीण होता. त्यात अतिशय अरुंद भागातून पाण्याखालून जायचे होते. या भागातून डायव्हरनी मुलांना नेले. त्यानंतर मुलांना इतर सुटका करणाऱ्या सैनिकांकडे देण्यात आले. काही वृत्तानुसार मुलांना भीती वाटू नये म्हणून विशेष औषधेही देण्यात आली होती. सर्व मुलांना बाहेर काढायला तब्बल तीन दिवस लागले. दहा जुलैपर्यंत (मंगळवारी) बारा मुले व त्याचे प्रशिक्षक एक्कापोल यांना बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णवाहिकेत घालून इस्पितळात नेण्यात आले. तिथे त्यांना एका विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. इतर लोकांना त्यांना भेटायला मनाई केली आहे. त्यांच्या पालकांनाही त्यांना सहा फूट अंतरावरूनच भेटता येत आहे. मुलांना इतके दिवस गुहेत राहिल्यामुळे एखादा विचित्र व्हायरस अथवा बॅक्‍टेरीयाची लागण झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणूनच ही काळजी घेण्यात येत आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे मुले सुरक्षित आहेत व ती फुटबॉलच्या वर्ल्ड कपची फायनल मॅचही पाहणार आहेत! 

मानवाने आजपर्यंत प्रचंड प्रगती केली 
आहे. परंतु जेव्हा निसर्ग आपले रुद्र रूप दाखवतो तेव्हा मानवाची प्रगती फोल ठरते. तेव्हा मानवाची जिद्द कामी येते. जगण्याची प्रचंड इच्छा कामी येते. आणि अशा गरजेच्या वेळी मानवाच्या हृदयातील मानवता जागते. खर्चाचा विचार न करता, अनेक देशांच्या नागरिकांनी आणि सैन्य दलांनी एकत्र येऊन या मुलांना वाचवले. माझ्या मते जर जगातील कुठल्या एका घटनेला चमत्कार म्हणायचेच असेल तर या सुटकेचा चमत्कार म्हणता येईल.  
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या