सॅमसंग फॅमिली हब फ्रिज

वैभव पुराणिक
शुक्रवार, 27 जुलै 2018

टेक्नोसॅव्ही
 

तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने संपूर्ण जग एकमेकाशी जोडलं जात आहे. आणि त्यातून स्वयंपाकघरात नेहमी वापरायच्या वस्तूही सुटलेल्या नाहीत. आणि अशीच एक महत्त्वाची, आपल्याला दररोज लागणारी वस्तू म्हणजे फ्रिज. तंत्रज्ञानामुळे फ्रिजचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. आणि त्यात आघाडीवर आहे सॅमसंग. सॅमगंने या वर्षी आपल्या फॅमिली हब फ्रिजची तिसरी आवृत्ती अमेरिकन बाजारपेठेत आणली आहे. त्यातील सुविधा ऐकून तुम्हाला तोंडात बोटे घातल्यावाचून राहणार नाही. 

सॅमसंगच्या फॅमिली हब मालिकेतील फ्रिज उठून दिसतो तो या फ्रिजच्या उजव्या दरवाजावरील २१ इंची पडद्यामुळे (स्क्रीन). या पडद्यामुळे तुम्हाला साध्या फ्रीजमध्ये न करता येणाऱ्या विविध गोष्टी करता येतात. मुख्य म्हणजे फ्रिज न उघडता फ्रीजमध्ये काय आहे किंवा नाही ते पाहता येते! 

या फ्रीजमध्ये दरवाजाच्या आतल्या बाजूला तीन कॅमेरे लावलेले आहेत. त्यामुळे फ्रीजमध्ये एखादी गोष्ट संपली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला दरवाजा उघडायची गरज नाही. तसेच या पडद्याचा वापर करून तुम्हाला या फ्रीजमधील अनेक ॲप वापरता येतात. हा स्मार्ट फ्रिज असल्याने यात एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे अनेक ॲप उपलब्ध आहेत. पडदा टचस्क्रीन असल्याने तुमच्या बोटांचा वापर करून ही ॲप तुम्हाला वापरता येतात. इतर कुठल्याही स्मार्टफोनप्रमाणे तुम्हाला गाणी लावता येतात, ब्राउझर उघडून वेबसाइट पाहता येतात एवढंच नव्हे तर बाहेर टीव्हीवर एखादा कार्यक्रम सुरू असेल तर तोही पाहता येतो! यात असलेल्या टीव्ही मिररींग सुविधेमुळे तुम्हाला बाहेरच्या टीव्हीवर सुरू असलेला कार्यक्रम फ्रिजच्या पडद्यावर दिसू शकतो! त्यामुळे तुम्ही स्वयंपाकघरात गेल्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या मालिकेतील प्रसंग चुकायला नको. २०१८ मध्ये बाजारात आलेल्या आवृत्तीत सॅमसंगने एकेजी कंपनीचा साउंडबारही घातला आहे. त्यामुळे या फ्रिजमधून चांगल्या दर्जाचा आवाजही तुम्हाला ऐकायला मिळतो. तसेच तुम्ही स्वयंपाकघरात असाल आणि तुमची बेल वाजली तर दरवाजाबाहेर कोण उभे आहे हे ही तुम्हाला या पडद्यामधून दिसू शकते. अर्थात त्यासाठी तुमच्याकडे रिंग कंपनीची डोअरबेल अथवा सॅमसंगची सिक्‍युरिटी सिस्टिम असणे आवश्‍यक आहे. तुमच्याकडे सॅमसंगचे स्मार्ट थिंग सुविधा असणारे वॉशिंग मशिन असेल तर ते या फ्रिजच्या टचस्क्रीमधून सुरूही करता येते ! स्मार्ट थिंग सुविधा असणारा बेबी मॉनिटर असेल तर तुमचे झोपलेले बाळही या फ्रिजच्या पडद्यावर तुम्हाला पाहता येते ! स्मार्ट थिंग सुविधा असणारा एसी असेल तर त्याच्या रिमोट कंट्रोलचे कामही हा फ्रिज करतो एकंदरीत हा फ्रिज स्मार्ट होमधील स्मार्ट हबचे काम करू शकतो. या फ्रीजमधील अजून एक महत्त्वाची सुविधा म्हणजे बिग्सबी. सॅमसंगने २०१८ च्या आवृत्तीत आपल्या फोनवर उपलब्ध असलेला व्हॉइस असिस्टंट बिग्सबीही या फ्रीजमध्ये टाकला आहे. या बिग्सबीला तुम्ही आवाजी आज्ञा देऊ शकता. त्यामुळे तुमचे हात खराब असतील आणि तुम्हाला टचस्क्रीनला हात लावायला जमणार नसेल तर बिग्सबीचा वापर करून तुम्ही या फ्रीजमधील अनेक ॲप सुरू करू शकता. एवढेच नव्हे तर बिग्सबीमध्ये सहा वेगवेगळ्या लोकांचे आवाज ओळखण्याचीही सुविधा आहे. उदाहरणार्थ या फ्रिजच्या पडद्यावर तुम्हाला तुमचे कॅलेंडर दिसू शकते, तुमचे फोटो दिसू शकतात. जेव्हा तुम्ही बिग्सबीला माझे कॅलेंडर दाखव अशी आज्ञा देता तेव्हा तुम्ही नक्की कोण आहात ते ओळखून बिग्सबी बरोब्बर तुम्हाला तुमचेच कॅलेंडर दाखवते. तुमच्या नवऱ्याचे अथवा पत्नीचे कॅलेंडर आणि तुमचे कॅलेंडर यात ती गल्लत करत नाही. तसेच तुम्ही घरातल्या इतर लोकांना या फ्रिजच्या पडद्याचा वापर करून चिठ्ठीही ठेवू शकता. समजा तुम्ही सकाळी भेंडीची भाजी बनवली आहे आणि ही भाजी तुमच्या मुलाने दुपारी आल्यावर खावी असे तुम्हाला मुलाला सांगायचे आहे. हा मेसेज तुम्ही या फ्रिजच्या पडद्यावर लिहून ठेवू शकता आणि तो बोटाने लिहायचा असल्याने तुम्ही तो कुठल्याही भाषेत लिहू शकता. म्हणजे मुलगा दुपारी आल्यावर पाणी पिण्यासाठी जेव्हा फ्रिजजवळ जाईल तेव्हा त्याला हा संदेश दिसू शकेल.

या फ्रीजमध्ये स्वयंपाक करताना मदत होईल अशीही अनेक ॲप आहेत. या फ्रिजचे स्मार्टफोन ॲपही आहे. हे स्मार्टफोन ॲप या फ्रिजच्या इतर ॲपबरोबर जोडल्यावर आपल्याला अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध होतात. उदाहरणार्थ, या फ्रिजवर तुम्हाला वेगवेगळ्या पाककृती (रेसिपी) पाहता येतात. एवढेच नव्हे तर तो पदार्थ तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचा आहे ते निवडून त्याप्रमाणे त्यात घालायच्या पदार्थांचे प्रमाणही हे ॲप आपोआपच बदलते. त्यातील कुठल्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत हे ही तुम्ही टचस्क्रीनचा वापर करून फ्रिजला सांगू शकता. तुमच्याकडे नसलेल्या पदार्थांची शॉपिंग लिस्ट बनवून हा फ्रिज ती शॉपिंग लिस्ट तुमच्या स्मार्टफोनमधील फॅमिली हब ॲपला पाठवतो! त्यामुळे दुकानात गेल्यावर तुम्हाला नक्की काय घ्यायचे आहे त्याचा विचार करावा लागत नाही ! नुसते स्मार्टफोन ॲप उघडून तुम्ही यादी पाहू शकता. या स्मार्टफोन ॲपमधील अजून एक सुविधा म्हणजे तुमच्या फ्रीजमध्ये काय आहे आणि काय नाही हे ही तुम्ही या स्मार्टफोन ॲपमधून पाहू शकता! म्हणजे दुकानात गेल्यावर एखादी वस्तू संपली आहे की नाही हे आठवत नसेल तर फ्रीजमधील कॅमेराच्या साहाय्याने फोनवर तुम्हाला ते पाहता येते! या फ्रीजमधील अजून एक सुविधा म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट कधी खराब होणार आहे याच्या तारखाही या फ्रिजला सांगू शकता. उदाहरणार्थ, तुमचे दूध दोन दिवसांनी खराब होणार असेल तर तसे तुम्ही या फ्रिजला टचस्क्रीनच्या साहाय्याने सांगितलेत, की तुम्हाला ते खराब होण्याच्या आधी ते खराब होणार आहे याचे नोटिफिकेशन मिळते! त्यामुळे नवीन दूध आणायची आठवण हा फ्रिज तुम्हाला करून देतो. एवढेच नव्हे तर फ्रीजमधील कुठल्या गोष्टी खराब होणार आहेत हे लक्षात घेऊन त्या गोष्टीचा वापर करणाऱ्या पाककृतीही हा फ्रिज तुम्हाला सुचवितो. म्हणजे त्या गोष्टी फुकट जायला नकोत! या फ्रिजचे कुठलेही दार तुम्ही जास्त वेळ उघडे ठेवलेत तर अलार्म वाजवून हा फ्रिज तुम्हाला आठवण करून देतो. तसेच पदार्थ थंड करण्याची याची यंत्रणाही अद्ययावत आहे. याच्या फ्रिझरमध्ये ठेवलेल्या पदार्थांची चव बदलत नाही. अनेक फ्रीजमध्ये दीर्घकाळ फ्रिझरमध्ये ठेवलेल्या पदार्थांची चव बदलते. तसेच यात ट्रिपल कुलिंग सुविधा आहे. साध्या फ्रीजमध्ये मागच्या बाजूला एकच इव्हपरेटर यंत्रणा असते. त्यामुळे फ्रिज आणि फ्रिझरमध्ये एकच हवा खेळत राहते. त्यामुळे फ्रिजरमधे व फ्रीजमध्ये वेगळी आर्द्रता कायम ठेवता येत नाही. ट्रिपल कुलिंग यंत्रणेत वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळे इव्हपरेटर असतात. त्यामुळे या विभागातील हवा एकमेकात मिसळत नाही. पण ही सुविधा फॅमिली हबपुरती मर्यादित नाही. सॅमसंगच्या अनेक फ्रीजमध्ये ही सुविधा असते. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या फ्रीजमधील आतले सर्व दिवे एलइडी दिवे आहेत. त्यामुळे कमी उर्जेत भरपूर प्रकाश मिळतो. यातील शेल्फ वेगवेगळ्या आकाराच्या असून त्या दुमडून जास्त उंचीच्या बाटल्या अथवा भांडी यात सहज ठेवता येतात. हा फ्रिज ३ किंवा ४ दरवाजाच्या आवृत्तीमध्ये विकत मिळतो. ४ दरवाजाच्या आवृत्तीत, एका विभागाला फ्रिजरमध्ये बदलता येते. त्यामुळे तुम्ही फ्रिजर जास्त वापरत असाल तर तुम्हाला मोठा फ्रिजर मिळू शकतो. एकंदरीतच चारही विभागातील तापमान कमी जास्त करायची सुविधा सॅमसंगने या फ्रिजरमध्ये घातली आहे. या फ्रिजला थंड पाण्याचा एक नळही आहे. त्यातून तुम्हाला फ्रिज न उघडता थंड पाणी पेल्यात ओतता येते. त्याव्यतिरिक्त याच नळातून बर्फाचे तुकडेही तुम्हाला फ्रिज न उघडता मिळू शकतात. त्याशिवाय गोळ्यासाठी वापरणारा बर्फाचा चुरा मिळण्याचीही सोय या फ्रीजमध्ये आहे. परंतु या फ्रिजच्या काही रिव्ह्यूमध्ये बर्फाचा चुरा म्हणजे बर्फाचे लहान तुकडे असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. या फ्रिजच्या मागच्या आवृत्तीतील काही समस्या सॅमसंगने तिसऱ्या आवृत्तीत सोडवल्या आहेत. दुसऱ्या आवृत्तीतील एक मुख्य समस्या म्हणजे बिग्सबी बरोबर काम करत नसे. तुम्ही बिग्सबी म्हटले, की तिला ते कळून ती तुम्हाला उत्तर द्यायला फार वेळ लागत असे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सॅमसंग आपली जुनी एस व्हॉइस यंत्रणा यात वापरत होती. त्याचे नाव फक्त सॅमसंगने बदलले होते. परंतु तिसऱ्या आवृत्तीत मात्र सॅमसंगने आपली नवीन बिग्सबी यंत्रणा वापरली आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सॅमसंगची बिग्सबी ॲमेझॉनच्या अलेक्‍सा किंवा ॲपलच्या सिरीइतकी चांगली नाही. त्यामुळे नवीन बिग्सबीकडूनही खूप मोठ्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. परंतु सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या फ्रिजचा अजून एक फायदा म्हणजे काही नवीन सुविधा तुम्हाला केवळ सॉफ्टवेअर अपडेट करून मिळू शकतात. त्यामुळे ज्या लोकांनी सॅमसंगचा फॅमिली हब फ्रिज २०१७ च्या मध्यानंतर घेतला आहे अशा सर्व लोकांना नवीन बिग्सबी सुविधा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या आवृत्तीतील कॅमेराची समस्या मात्र सॅमसंगने सोडवलेली नाही. हे कॅमेरे दरवाजात असल्याने दरवाजात ठेवलेल्या वस्तू कॅमरात दिसत नसत. तिसऱ्या आवृत्तीतही ही समस्या कायम आहे.

या फ्रिजची किंमत अमेरिकन बाजारपेठेत साधारणतः ४ हजार ते ६ हजार डॉलर्सच्या दरम्यान म्हणजेच सुमारे अडीच लाख ते चार लाख रुपयांच्या दरम्यान आहे. हा फ्रिज अजूनही भारतामध्ये उपलब्ध नाही. भारतामध्ये अजूनही एवढ्या किंमतीच्या फ्रिजला मागणी येईल असे सॅमसंगला वाटत नसावे. पण भविष्यात या फ्रिजच्या किंमती उतरतील व तो भारतातही उपलब्ध होईल यात मला अजिबात शंका नाही. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या