‘ॲपल’चे नवीन फोन

वैभव पुराणिक
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

टेक्नोसॅव्ही
‘ॲपल‘ने १२ सप्टेंबर रोजी आयफोनच्या तीन नवीन आवृत्त्या जगापुढे जाहीर केल्या. ‘ॲपल‘चे फोन जाहीर होणे, ही अमेरिकेतील एक महत्त्वाची वार्षिक सांस्कृतिक घटना झाली आहे.  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार मानला गेलेल्या आयफोनविषयी...

आयफोनच्या दहाव्या आवृत्तीनंतर ॲपल नक्की काय करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. १२ सप्टेंबरच्या समारंभात ॲपलने दोन महागडे फोन व एक स्वस्तातला फोन जाहीर केला आहे. ‘XS’ आणि ‘XS Max’ हे दोन फोन महागडे आहेत. त्यात अधिक सुविधा आहेत, पण XR मात्र तुलनेने स्वस्त आहे. XS च्या स्क्रीनचे मोजमाप X प्रमाणे ५.८ इंचाचेच राहिले आहे. परंतु XS Max मात्र चक्क ६.५ इंची बनवण्यात आला आहे. आणि मुख्य म्हणजे ॲपलचा आधीचा फोन ८ प्लसपेक्षा तो प्रत्यक्षात फार मोठा नाही. परंतु वरचा संपूर्ण भाग स्क्रिनने व्यापल्याने कमी जागेत मोठी स्क्रीन बसवण्यात ॲपलला यश आले आहे. XR चा पडदा ६.१ इंची ठेवण्यात आला आहे. ‘XS’ आणि ‘XS Max’ चे पडदे OLED तंत्रज्ञानाने बनवले असून XR चा पडदा मात्र जुन्या एलसीडी तंत्रज्ञानाने बनवण्यात आला आहे. दोन्ही XS चे पडदे सुपर रेटीना असून त्यात एका इंचामध्ये तब्बल ४५८ चित्रबिंदू (पिक्‍सेल) मावतात. XR च्या पडद्याला ॲपलने ‘लिक्विड रेटीना’ असे नाव दिले असून; त्यात एका इंचामध्ये ३२६ चित्रबिंदू मावतात. सर्वसाधारणतः एका इंचातील चित्रबिंदू जेवढे जास्त तेवढे रिझोल्यूशन जास्त आणि म्हणूनच तो पडदा डोळ्यांना जास्त चांगला दिसतो. तसेच XS आणि XS Max हे स्टेनलेस स्टीलने बनवले असून XR अल्युमिनीयमपासून बनवण्यात आला आहे. परंतु तीनही फोनमध्ये ॲपलने आपला सर्वांत आधुनिक प्रोसेसर - ए १२ - बायॉनिक वापरला आहे. XS आणि XS Max यांना आयपी ६८ प्रमाणपत्र मिळाले आहे. याचाच अर्थ हे फोन २ मीटर पाण्यात अर्धा तास ठेवले तरीही ते चालूच राहतील, ते बिघडणार नाहीत. XR ला मात्र आयपी ६७ प्रमाणपत्र मिळाले आहे. म्हणजेच हा फोन एक मीटर पाण्यात अर्धा तास राहू शकतो. तसेच या फोनची चहा, कॉफी व संत्राच्या रसाबरोबरही चाचणी घेण्यात आली आहे. यातील काहीही या तीनही फोनवर सांडले तर त्याचा या फोनवर परिणाम होणार नाही. XS आणि XS Max सोनेरी, चंदेरी व स्पेस ग्रे या रंगात उपलब्ध होणार असून  XR मात्र लाल, पिवळा, काळा, पांढरा, कोरल व निळा अशा तब्बल ६ रंगात उपलब्ध होणार आहे. आय-ओएस - ॲपलच्या फोन ऑपरेटिंग सिस्टीमची १२ वी आवृत्ती या तीनही फोनवर असेल. 

भारतीयांसाठी नवीन आयफोनमधील सर्वांत चांगली सुविधा म्हणजे डबल सिमकार्ड सुविधा. आतापर्यंत आयफोनमध्ये ही सुविधा नव्हती. परंतु नवीन आयफोनमध्ये एक नेहमीचे सिमकार्ड व एक इ.-सिमकार्ड असे दोन सिमकार्ड आता वापरता येणार आहे. ही ड्युएल सिमकार्ड सेवा भारतात मिळणाऱ्या इतर फोनपेक्षा जरा वेगळी आहे. भारतात सर्वत्र मिळणाऱ्या ड्युएल सिमकार्ड फोनमध्ये दोन सिमकार्डचे स्लॉट असतात. प्रत्यक्ष दोन सिमकार्ड त्यात टाकावी लागतात. परंतु आता अमेरिकेत आयफोन मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्या तंत्रज्ञानानुसार ज्या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी इ.-सिमकार्ड सुविधा सुरू केली आहे त्यांची सेवा सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष धातूचे सिमकार्ड वापरावे लागत नाही. त्याऐवजी एक क्‍यू आर कोड स्कॅन करून नुसता सिमकार्डचा नंबर आत टाकला, की सेवा सुरू होऊ शकते. बहुतेक सर्व प्रमुख अमेरिकन कॅरीयरनी ही सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तुम्ही अमेरिकेत कुठलेही सिमकार्ड न वापरता आयफोनवर मोबाईल सेवा सुरू करू शकता. आणि त्यात असलेल्या सिमकार्डच्या स्लॉटचा वापर करून तुम्ही अजून एक मोबाईल सेवाही वापरू शकता. भारतामध्ये एअरटेल ही सुविधा सुरू करणार आहे. त्यामुळे तुम्ही एअरटेलच्या सेवेबरोबर आयफोन वापरलात तर तुम्हाला सिमकार्डची आवश्‍यकताच नाही. उरलेला सिमकार्डचा स्लॉट मग तुम्ही इतर कॅरीयरची सेवा सुरू करण्यासाठी वापरू शकता. चीनमध्ये कुठलाच कॅरिअर ही सुविधा देत नसल्याने ॲपलने चीनसाठी खास आयफोन तयार केला आहे. त्यात प्रत्यक्ष दोन सिमकार्ड घालायची सुविधा आहे. एकाच सिमकार्ड स्लॉटच्या दोन्ही बाजूला दोन वेगवेगळी सिमकार्ड बसवता येतात. 

या फोनच्या ए-१२ बायॉनिक प्रोसेसर हा आजमितीला उपलब्ध असलेल्या सर्व स्मार्टफोनपैकी सर्वांत जास्त अत्याधुनिक आहे असे ॲपलचे म्हणणे आहे. सर्वसाधारणतः अँड्रॉइड फोन विकणाऱ्या बहुतेक सर्व कंपन्या क्वालकॉम कंपनीचे प्रोसेसर वापरतात. परंतु ॲपल मात्र आपला प्रोसेसर स्वतः डिझाईन करते व इतरांकडून बनवून घेते. ए- बायॉनिक १२ प्रोसेसरमध्ये ६ कोअर असून त्यातील २ कोअर या जलद कामाकरिता राखून ठेवलेल्या आहेत व ४ कोअर इतर कामाकरिता वापरल्या जातील. हा प्रोसेसर ॲपलच्या ए- पेक्षा  टक्के अधिक जलद काम करू शकतो. तसेच या प्रोससरमध्ये ग्राफिक प्रोसेसर युनिट किंवा जीपीयुही बसवलेला आहे. त्या ग्राफिक्‍स प्रोसेसर युनिटला स्वतःच्या अशा ४ कोअर आहेत. आणि त्याव्यतिरिक्त या प्रोसेसरमध्ये ॲपलचे न्यूरल इंजिनही बसवलेले आहे. हे इंजिन आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित कामाला उपयोगी येते. कॅमेराने फोटो काढताना याचा उपयोग होतो. ऑगमेंटेड रिॲलिटी वापरणारे अनेक गेम या इंजिनचा वापर करून अतिशय रंजक गेम बनू शकतात. ॲपलने १२ सप्टेंबरच्या समारंभात ऑगमेंटेड रिॲलिटी वापरणारा असाच एक गेम दाखवला. त्या गेममध्ये गेम खेळणारे लोक तुम्हाला फोनच्या स्क्रिनमध्ये दिसतात व त्यांच्या आजूबाजूला विमाने, प्राणी आणि त्यांच्यामधील मारामारी दिसू शकते. तुमच्या समोर उभी असणारी व्यक्ती तुमच्या गेमच्या जगात आहे असा भास त्यामुळे होतो. व्हर्चुअल आणि खऱ्या जगातील गोष्टींच्या अशा सरमिसळीलाच ऑगमेंटेड रिॲलिटी असे म्हटले जाते.

या फोनच्या कॅमेराही आतापर्यंत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन कॅमेरात सर्वांत उत्तम आहे असे ॲपलचे मत आहे. XS व XS Max मध्ये एकाच प्रकारचा कॅमेरा आहे. पुढील बाजूला ७ मेगापिक्‍सेलचा कॅमेरा तर मागील बाजूला १२ मेगापिक्‍सेलचे दोन कॅमेरे बसवलेले आहेत. XR मध्ये मात्र खर्च वाचवण्यासाठी म्हणून मागील बाजूला एकच कॅमेरा बसवलेला आहे. या तीनही फोनमध्ये ॲपलने डेप्थ कंट्रोल सुविधा घातली आहे. या सुविधेमुळे फोटो काढल्यानंतर तुम्हाला फोटोतील पार्श्वभूमी कधी-अधिक धूसर करता येते. त्यामुळे फोटोतील मुख्य वस्तू अथवा व्यक्ती अधिक उठून दिसते. या मागील आयफोनमध्ये धूसरपणा कमी-अधिक करता येत नसे. फोटो काढला गेल्यावर फोटोचे सॉफ्टवेअर धूसरपणा त्यात घालत असे. परंतु आता फोटो काढल्यानंतर त्याचा धूसरपणा कमी अधिक करता आल्याने अधिक चांगले फोटो येऊ शकतात. ॲपलने आपल्या नवीन कॅमेरात कमी प्रकाशातही बारीक गोष्टीही टिपल्या जातील असे म्हटले आहे. स्मार्ट एचडीआर सुविधा घातल्यानेही फोटोत अनेक बारीक गोष्टी व जलद वेगाने हलणाऱ्या गोष्टीही चांगल्या येतील असेही ॲपलने म्हटले आहे. 

अमेरिकेत XR - ७४९ डॉलर्स, XS - ९९९ डॉलर्स तर XS-Max-१०९९ डॉलर्सला उपलब्ध होणार आहे. भारतामध्ये XR-७६,९०० रुपये, XS ९९,९०० रुपये तर XS-Max-१,०९,००० रुपयांना उपलब्ध होणार आहे. या सर्व किमती ६४ गिगाबाइटच्या आहेत. XS व XS-Max ६४,२५६ आणि ५१२ गिगाबाइटमध्ये उपलब्ध होणार आहेत तर XR ६४, १२८ आणि २५६  गिगाबाइटमध्ये उपलब्ध होणार आहे. XS व XS-Max सप्टेंबरच्या अखेरीस उपलब्ध होणार असून XR ऑक्‍टोबरच्या अखेरीस उपलब्ध होणार आहे.

ॲपल वॉच - चौथी आवृत्ती
ॲपलने याच समारंभात आपल्या घड्याळाची चौथी आवृत्तीही जाहीर केली. हे घड्याळ संपूर्णतः नव्याने तयार केले असून त्याचा पडदाही तब्बल ३० टक्के मोठा करण्यात ॲपलने यश मिळवले आहे. आणि तसे करताना या घड्याळाची जाडीही कमी करण्यात आली आहे.  ॲपलने या घड्याळात काही विशेष सुविधा घातल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ‘ईसीजी - इलेक्‍ट्रोकार्डीयोग्राम’ काढायची सुविधा! होय, या घड्याळाचा वापर करून तुमच्याकडे आयफोन असेल तर त्यातील ॲपवर चक्क ईसीजी निघतो. या घड्याळात ॲपलने इतर घड्याळांमध्ये असलेल्या ऑप्टिकल हार्ट सेन्सरव्यतिरीक्त इलेक्‍ट्रिकल हार्ट सेन्सरही बसवला आहे. त्यामुळे ईसीजी घेणे शक्‍य झाले आहे. हा ईसीजी तुम्ही तुमच्या कार्डियॉलॉजिस्टला दाखवू शकता. तुमच्या हृदयाचे ठोके अनियमित असतील किंवा खूपच कमी अथवा जास्त असतील तर हे घड्याळ ते ओळखते व तसे तुम्हाला सांगते. त्यामुळे ज्यांना हृदयविकार आहे अशा लोकांचा या घड्याळामुळे जीवही वाचू शकतो. या घड्याळातील ॲक्‍सलरॉमीटर, जायरोस्कोप आणि अल्टीमीटरमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे काही नवीन प्रकारचे व्यायाम या घड्याळाला आता ओळखता येतात. अजून एक विशेष सुविधा म्हणजे फॉल डिटेक्‍शन. तुम्ही हे घड्याळ घालून चालताना खाली पडलात, तर हे घड्याळ ते आपोआप ओळखते व तुम्हाला इमर्जन्सी कॉन्टॅक्‍टला फोन करायचा पर्याय उपलब्ध करून देते. आणि पुढच्या एक मिनिटात तुमची काही हालचाल झाली नाही, तर हे घड्याळ आपोआपच त्या इमर्जन्सी कॉन्टॅक्‍टला फोन करून तुम्ही पडल्याचे सांगते! या घड्याळामुळे खरोखरच एखाद्याचा जीव वाचू शकतो. 

ॲपलच्या या नवीन उत्पादनांबद्दल अमेरिकेत मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शेअर बाजारात १२ सप्टेंबरला ॲपलच्या शेअरची किंमत २२५ डॉलर्सवरून २२० डॉलर्सवर घसरली. हा लेख लिहीतेवेळी ती २२३ वर स्थिरावली आहे. त्यामुळे शेअर बाजाराने या उत्पादनांचे स्वागत केल्यासारखे वाटत नाही. लोकांनी ॲपल वॉचचे मात्र स्वागत केले आहे. अनेक लोकांनी ट्‌विटरवरून आयफोनची किंमत महाग असल्याची तक्रार केली आहे. परंतु XR ॲपलचा खप वाढेल असेही काही तज्ज्ञ सांगत आहेत. प्रत्यक्षात हा फोन जगात कसा स्वीकारला जाईल ते कळण्यासाठी सहा महिने तरी थांबणे आवश्‍यक आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या