रोबोव्हॅक

 वैभव पुराणिक  
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

टेक्नोसॅव्ही     

रोबॉटीक व्हॅक्‍यूम क्‍लिनर्स किंवा रोबोव्हॅक आता जागतिक बाजारपेठेत येऊन तब्बल २२ वर्षे झाली आहेत. अमेरिकेत हे रोबोव्हॅक आता मध्यमवर्गीयांच्या घरची आवश्‍यकता बनले आहेत. त्याच्या जोडीला आता रोबो मॉपर - ओल्या कपड्याने लादी पुसणाऱ्या रोबोचीही भर पडली आहे. अमेरिकेत उपलब्ध असणारे हे सर्व रोबो गेल्या काही वर्षापासून भारतातही उपलब्ध झाले आहेत. 

गेल्या एक महिन्यापासून मी इकोव्हॅक कंपनीचा डिबॉट नावाचा रोबोव्हॅक वापरत आहे. ज्यांच्याकडे मोठी घरे आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचे रोबोव्हॅक ही गरज आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अमेरिकेत दररोज साफसफाई करायला गडी माणसे सहज उपलब्ध नसतात. घरातील कचरा काढणे आणि लादी पुसणे ही सर्व कामे आपली आपणच करावी लागतात. लॉस अँजलिसमधील उच्च मध्यमवर्गीयांकडे आठवड्यातून एकदा साफसफाई करायला कामगार येतात. परंतु घर मोठे असेल तर त्यांना त्यांच्या ठरलेल्या ३ ते ४ तासात संपूर्ण घराची सफाई करणे जमत नाही. घरातील अथवा बाथरुमची सफाई करूनच त्यांची वेळ संपते. ते अधिक वेळ काम करायला तयार असतात, पण त्यासाठी लागणारे पैसेही तसेच असतात. त्यामुळे ही साफसफाई व्हॅक्‍यूम क्‍लीनर घेऊन स्वतः करणे हाच एक उपाय उरतो. परंतु नेहमीचा व्हॅक्‍यूम क्‍लीनर वापरणे वेळखाऊ असते. त्याला घेऊन तुम्हाला सर्वत्र फिरावे लागते. परंतु रोबोव्हॅक मात्र तुमच्या मदतीशिवाय स्वतःच तुमच्या घरभर साफसफाई करत फिरत राहतात. एवढंच नव्हे, तर तुम्ही घरी नसतानाही ते साफसफाई करू शकतात. इकोव्हॅकच्या डिबॉटमध्ये तुम्ही वेळ घालून ठेवू शकता. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेवर हे रोबोव्हॅक स्वतः आपोआप सुरू होतात, बॅटरी संपेपर्यंत साफसफाई करतात बॅटरी संपल्यावर आपल्या चार्जरवर पुन्हा जाऊन आपोआपच थांबतात! 

बाजारपेठेत वीस ते तीस वेगवेगळ्या कंपन्यांचे रोबोव्हॅक उपलब्ध आहेत. त्यातील बहुतेक रोबोव्हॅकमधील सुविधा या थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. बाजारात मिळणाऱ्या रोबोव्हॅकची विभागणी दोन भागात करता येईल. पहिल्या प्रकारचे रोबोव्हॅक रॅंडम पॅटर्नमध्ये सफाई करतात. याचाच अर्थ त्यांना तुमच्या घराचा आराखडा माहीत नसतो, ते एखादा अडथळा येईपर्यंत जात राहतात. अडथळा आला की आपली दिशा बदलतात. आराखडा नक्की माहीत नसला तरीही वारंवार दिशा बदलत राहिल्याने अखेरीस तुमचे अख्खे घर साफ होते. दुसऱ्या प्रकारचा रोबोव्हॅकमध्ये खास दिशादर्शक यंत्रणा असते. या यंत्रणेच्या साहाय्याने हा रोबोव्हॅक तुमच्या घराचा आराखडा लक्षात ठेवतो. हे रोबोव्हॅक पहिल्या प्रकारच्या रोबोव्हॅकपेक्षा महाग असतात. परंतु तुमच्याकडे दोन मजली घर असेल, तर मात्र हे रोबोव्हॅक तुम्हाला उपयोगी नाहीत. दोन आराखडे साठवणारे रोबोव्हॅक मला अजून सापडलेले नाहीत. हे बहुतेक सर्वच रोबोव्हॅक एखाद्या तबकडीप्रमाणे दिसतात. या तबकडीला खाली दोन चाके आणि एक रोलर बसवलेला असतो. तसेच धूळ जमिनीवरून उचलण्यासाठी याला एक किंवा दोन फिरते ब्रश लावलेले असतात. हे ब्रश गोलाकार फिरून धुळीला जमिनीपासून वेगळे करतात. तबकडीच्या खाली असलेला व्हॅक्‍यूम क्‍लीनर मग ही धूळ अथवा कचरा शोषून घेतो. या रोबोव्हॅकमध्ये एक छोटासा कचरा साठवणारा डबा असतो. हा डबा कचऱ्याने भरला की तो काढून साफ करता येतो. काही रोबोव्हॅकबरोबर रिमोट कंट्रोलही मिळतो. परंतु अनेक वेळा या रिमोट कंट्रोलची आवश्‍यकताच नसते. सर्वसाधारण सर्वच रोबोव्हॅकमध्ये ऑटोमॅटिक मोड असतो. ऑटोमॅटिक मोडमध्ये रोबोव्हॅक स्वतःच दिशा शोधून साफसफाई करत राहतो. त्याला भिंत आली आहे हे कळते. माझ्याकडे असलेल्या डिबॉट एन ७९  एस या रोबोमध्ये खास भिंतीच्या आसपास साफ करण्याचा मोड आहे. तो सुरू केला, की हा रोबो एक भिंत पकडतो व भिंतीला लागून पुढे पुढे जात संपूर्ण घराची कडा साफ करतो! त्याव्यतिरिक्त आय रोबॉट कंपनीच्या ‘रुंबा’ या अतिशय प्रसिद्ध रोबोत व डिबॉटमध्ये गोलाकार साफसफाई करणाराही एक मोड आहे. जिथे जास्त कचरा असेल अशा भागात या रोबोना ठेवून गोलाकार सफाई मोड सुरू केला, की हे रोबो वर्तुळाकार आकारात फिरत राहतात. प्रत्येक फेरीला ते आपला व्यास वाढवत राहतात आणि त्यामुळे बराच मोठ्या आकाराचा गोलाकार भाग साफ होतो. डिबॉट रोबोमध्ये व्हॅक्‍यूम क्‍लिनरची सक्‍शन पॉवर बदलण्याचीही सुविधा आहे. शोषून घेण्याची क्षमता वाढविल्याने भिंतीजवळची सफाई चांगली होते. सर्वसाधारण: या रोबोव्हॅकना  तुमच्या लादीवर पडलेल्या वस्तूंना टाळता येते. पण वेगवेगळ्या रोबोव्हॅकची या वस्तू टाळण्याची क्षमता वेगवेगळी असते. सर्वसाधारणतः महाग रोबोव्हॅकमध्ये ही सुविधा अधिक प्रगत असते. डीबॉट एन ७९ एसला तुमच्या घरी गडद रंगाचे कारपेट असेल तर ते नीट कळत नाही. कधी कधी हे रोबो एखाद्या फर्निचरखाली किंवा अडगळीत अडकूनही पडतात, पण बहुतेक वेळा त्यांच्यात आपली सुटका करून घेण्याचीही क्षमता असते. तसेच बहुतेक रोबोव्हॅकमध्ये पायऱ्या ओळखण्याचीही क्षमता असते. तुमच्या घरात पायऱ्या असतील तर पायरीवरून रोबोव्हॅक गडगडत जाणार नाही यासाठी पायरी दिसली, की भिंतीप्रमाणे मागे वळण्याची क्षमता डिबॉटमध्ये आहे. या सुविधेव्यतिरीक्त आय रोबॉट कंपनीच्या रुंबामध्ये व्हर्च्युअल वॉल सुविधाही आहे. तुम्ही कुठेही एक छोटेसे यंत्र ठेवून खोटी भिंत उभी करू शकता. अशा खोट्या भिंतीला रुंबा ओलांडत नाही. म्हणजेच तुम्हाला रुंबाला फक्त घराच्या एखाद्या भागापर्यंतच मर्यादित ठेवायचे असेल आणि त्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवायचा असेल तर अशा व्हर्चुअल वॉलचा उपयोग होतो. सर्वसाधारणतः या रोबोची क्षमता एक ते दोन तास साफसफाई करण्याइतपत असते. त्यानंतर त्यांची बॅटरी संपते व त्यांना चार्जिंग स्टेशनवर ठेवावे लागते. बाजारात मिळणाऱ्या अनेक रोबोव्हॅकना आपले चार्जिंग स्टेशन स्वतःच शोधताही येते! आजकाल बहुतेक रोबोव्हॅकबरोबर स्मार्टफोन ॲप येते. हे रोबोव्हॅक तुमच्या वायफायला जोडता येतात. स्मार्टफोन ॲपचा वापर करून हे रोबोव्हॅक तुम्हाला कधीही (ऑफिसमधूनही) सुरू करता येतात. स्मार्टफोन ॲपचा वापर करून तुम्हाला या रोबोव्हॅकचा टायमरही चालू करता येतो. डिबॉटच्या स्मार्टफोन ॲपचा वापर रिमोट कंट्रोलसारखाही करता येतो. त्याचा वापर करून रोबोव्हॅकला तुम्हाला डाव्या उजव्या बाजूला अथवा मागे वळवता येतो. 

वास्तविक बाजारात पहिला रोबोव्हॅक आणण्याचे श्रेय इलेक्‍ट्रोलक्‍स या स्वीडिश कंपनीला जाते. १९९६ मध्ये त्यांनी पहिला रोबॉटीक व्हॅक्‍यूम क्‍लीनर बाजारात आणला. परंतु त्यावेळी तंत्रज्ञानाची प्रगती तेवढी झाली नसल्याने या रोबोव्हॅकची अडथळे ओळखण्याची क्षमता चांगली नव्हती. आणि त्यामुळे या रोबोव्हॅकचा फारसा प्रसार झाला नाही. परंतु २००२ मध्ये आय रोबॉट नावाच्या कंपनीने रुंबा नावाचा रोबोव्हॅक प्रथम बाजारात आणला. आय रोबॉट कंपनीची स्थापना कॉलिन एंजल, हेलन ग्रेनर आणि रॉडनी ब्रुक्‍स या तीन रोबोसिस्नी (रोबॉट शास्त्रज्ञ) केली होती. इलेक्‍ट्रोलक्‍सने बनवलेल्या रोबोव्हॅकपेक्षा रुंबा खूपच चांगला होता. त्याला अडथळा ओळखता येत असत आणि पायऱ्याही टाळता येत असत. हे रोबोव्हॅक इतके लोकप्रिय झाले, की २००४ मध्ये पहिल्यांदाच १० लाखाहून अधिक रुंबा विकण्यात आय रोबॉट कंपनीला यश आले. आणि त्यानंतर कंपनीने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व रोबोव्हॅक जागतिक बाजारपेठेत उतरवले आहेत. भारतातही रुंबा रोबोव्हॅक २० हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. आता ही बाजारपेठ इतकी मोठी झाली आहे, की इतरही अनेक कंपन्या या बाजारपेठेत यशस्वी ठरल्या आहेत. चीनची इकोव्हॅक, अमेरिकेच्या अँकर इनोव्हेशनचा भाग असलेला युफी रोबोव्हॅकही बाजारपेठेत बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. 

गेल्या काही वर्षापासून मॉपिंग रोबोही बाजारात आले आहेत. मॉपिंग रोबो हे ओल्या कपड्याने लादी पुसायचे काम करतात. रोबोव्हॅकची ही पुढची आवृत्ती आहे असे म्हणता येईल. यात एका कप्प्यात पाणी भरता येते. या कप्प्याच्या पुढे एक विशेष कापड लावून हा रोबो चालू केला, की तो संपूर्ण घराची लादी साफ करतो. माझ्या घरी आय रोबॉट कंपनीचा ३८० टी. मॉपिंग रोबॉट आहे. त्यात ओल्या व सुक्‍या कपड्याने लादी पुसायची सुविधा आहे. या रोबोबरोबर एक दिशादर्शक यंत्रणाही येते. ती एखाद्या टेबलावर ठेवली, की त्याच्या साहाय्याने या रोबोला नक्की कुठे साफसफाई करायची ते कळू शकते. हा रोबो इतका शांत आहे, की तो बाजूच्या खोलीत आपले काम करत असेल तर ते कळतच नाही. त्यामुळे याला आम्ही रात्री चालू करून ठेवतो. काही कंपन्यांनी रोबोव्हॅक व मॉपिंग सुविधा एकाच रोबॉटमध्ये असलेले रोबॉटही बाजारात आणले आहेत. 

रोबोव्हॅक वापरण्यासाठी अगदीच तयारी करावी लागत नाही असे नाही. तुमच्या घरात जर खूपच वस्तू जमिनीवर ठेवल्या असतील - फर्निचर, बेड, कपाटे, चपला तर तुमची फरशी नीट साफ होणार नाही. फर्निचर उंच असेल तर रोबोव्हॅक त्याच्या खाली जाऊ शकतो. सर्वसाधारण रोबोव्हॅक जमिनीपासून चार इंच जागा असेल तर नीट साफसफाई करू शकतात. पण तुमचा सोफा जमिनीला अगदीच लागून असेल तर मात्र त्याच्या खाली रोबोव्हॅकला जाता येणार नाही. आमच्या घराचे डायनिंग टेबल बऱ्यापैकी उंच आहे, पण त्याच्या भोवती खुर्च्या असल्याने अनेक वेळा रोबोव्हॅक या टेबलाखाली गेल्यावर अडकून बसतो. म्हणूनच जेव्हा रोबोव्हॅकने कचरा काढायचा असेल तर काही गोष्टी हलविणे आवश्‍यक आहे. पण तुम्ही झाडू घेऊन अथवा जुन्या प्रकारचा व्हॅक्‍यूम क्‍लीनर घेऊन कचरा काढलात तरीही तुम्हाला तेच करावे लागेल. चार इंचापेक्षा जास्त उंच फर्निचर असेल तर मात्र रोबोव्हक हा साध्या व्हॅक्‍यूम क्‍लिनरच्या तुलनेने खूपच सोपा ठरतो. नोव्हेंबर २०१७ च्या कंझ्युमर रिपोर्ट वेबसाइटवरील एका लेखानुसार अजूनही रोबोव्हॅकची कचरा शोषून घेण्याची क्षमता ही नेहमीच्या व्हॅक्‍यूम क्‍लिनरपेक्षा कमी आहे. त्यांनी केलेल्या एका चाचणीत नेहमीच्या व्हॅक्‍यूम क्‍लिनरच्या तुलनेत सॅमसंगच्या महागड्या रोबोव्हॅकने फक्त २० टक्केच कचरा साफ केला. 

पुढील दहा वर्षात रोबोव्हॅकची क्षमता नेहमीच्या व्हॅक्‍यूम क्‍लिनरइतकीच चांगली होईल यात मला अजिबात शंका नाही. ज्याप्रमाणे सीडीमुळे कॅसेट बाजारातून नाहीशा झाल्या त्याप्रमाणेच पुढील काही वर्षात जुन्या प्रकारचे व्हॅक्‍यूम क्‍लीनर बाजारातून नाहीसे होतील अशी मला खात्री आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या