जगातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती

वैभव पुराणिक
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

ॲ मेझॉनचे शेअर अमेरिकेतील नासडॅक शेअर बाजारात या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल ७० टक्‍क्‍याने वर गेला आहे! आणि त्यामुळेच ॲमेझॉनने तब्बल एक हजार अब्ज डॉलर्स मार्केट कॅप पार केली आहे. ॲमेझॉनपेक्षा मार्केट कॅप जास्त असणारी केवळ एकच कंपनी अस्तित्वात आहे - ॲपल! ॲमेझॉनच्या शेअरचा भाव एवढा वाढल्यामुळेच बिल गेटसला मागे सारून ॲमेझॉनचा संस्थापक अध्यक्ष जेफ बेझोस हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाला आहे!

ॲ मेझॉनचे शेअर अमेरिकेतील नासडॅक शेअर बाजारात या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल ७० टक्‍क्‍याने वर गेला आहे! आणि त्यामुळेच ॲमेझॉनने तब्बल एक हजार अब्ज डॉलर्स मार्केट कॅप पार केली आहे. ॲमेझॉनपेक्षा मार्केट कॅप जास्त असणारी केवळ एकच कंपनी अस्तित्वात आहे - ॲपल! ॲमेझॉनच्या शेअरचा भाव एवढा वाढल्यामुळेच बिल गेटसला मागे सारून ॲमेझॉनचा संस्थापक अध्यक्ष जेफ बेझोस हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाला आहे!

ॲमेझॉनची वाढ खरोखरच तोंडात बोट घालण्याजोगी आहे. १ फेब्रुवारी २०१८ ला प्रसिद्ध झालेल्या गीकवायरमधील वृत्तानुसार त्यावेळी ॲमेझॉनमध्ये संपूर्ण जगात मिळून तब्बल ५,६६,००० लोक काम करत होते! आज टूथब्रशपासून इलेक्‍ट्रॉनिक्‍सपर्यंत जवळजवळ सर्वच गोष्टी ॲमेझॉनवर विकत मिळतात. ॲमेझॉनलचा लोगो तुम्ही पाहिला असेल तर त्यातील ए आणि झेड यांच्यामध्ये एक बाण आहे. ए पासून झेडपर्यंतच्या सर्व वस्तू ॲमेझॉनवर विकल्या जातात असा त्याचा अर्थ आहे. पण आता ॲमेझॉन फक्त ऑनलाइन रिटेल व्यवसायातीलच कंपनी राहिलेली नाही. त्यांनी अलीकडेच अमेरिकेत प्रसिद्ध असलेली ‘होल फूडस’ नावाची किराणा मालाच्या दुकांनाची साखळी विकत घेतली. म्हणजे ऑनलाइन जगतातून त्यांनी आता प्रत्यक्ष दगडमातीच्या दुकानांच्या स्पर्धेतही उडी मारली आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी आता ॲमेझॉन फ्रेश अंतर्गत दूध, भाज्या अशा नाशवंत उत्पादनांचीही डिलीवरी सुरू केली आहे. अमेरिकेतील जवळजवळ सर्व मोठ्या शहरात ही सुविधा आता उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त आता ॲमेझॉनवरून तुम्ही एखादा नळ विकत घेतला तर त्याबरोबरच तुम्हाला प्लंबरलाही बोलावता येते! म्हणजे तुम्हाला प्लंबर वेगळा शोधायला नको. एवढेच नव्हे तर तो प्लंबर किती वाजता येईल हे निवडता येते! ॲमेझॉनने स्वतः:ची इलेक्‍ट्रॉनिक उपकरणेही विकायला सुरुवात केली आहे हे तुम्हाला माहीत आहेच. त्याची सुरुवात किंडल पासून झाली. किंडलमध्ये तुम्हाला पुस्तके वाचता येतात. या किंडलचा पडदा विशेष तंत्रज्ञानाने बनवलेला असून, त्यामध्ये लॅपटॉप अथवा स्मार्टफोनप्रमाणे बॅकलाइट नसतो. या तंत्रज्ञानाला ‘ई-इंक’ असेही म्हटले जाते. आनंदाची गोष्ट अशी, की गेल्या दोन वर्षापासून मराठी पुस्तकेही किंडलवर वाचण्यास उपलब्ध आहेत. किंडल उपकरण नसेल तरी किंडल ॲप तुम्ही आपल्या स्मार्टफोनवर विनामूल्य डाऊनलोड करून तुम्ही त्यात मराठी पुस्तके विकत घेऊन वाचू शकता. ॲमेझॉनचा ‘इको’ नावाचा ब्लूटूथ स्पीकर अमेरिकेत आता घराघरांत आढळून येतो. या स्पीकरला आवाजी आज्ञा देऊन अनेक कामे करायला सांगू शकता. तुमचे वेळापत्रक वाचून दाखवणे, टायमर लावणे, गाणी लावणे, वर्तमानपत्र वाचून दाखवणे इत्यादी गोष्टी हा स्पीकर करू शकतो. अलीकडेच ॲमेझॉनने रिंग नावाची सिक्‍युरिटी कॅमेरा बनविणारी कंपनीही विकत घेतली. त्यासाठी ॲमेझॉनने तब्बल १ अब्ज डॉलर्स मोजले. त्यामुळे आता ॲमेझॉन सिक्‍युरिटी कॅमेरेही बनवते असे म्हणायला हरकत नाही. बरं या सर्वांपेक्षा वेगळे म्हणजे ॲमेझॉनने जवळजवळ १२ वर्षापूर्वी आपली क्‍लाऊड कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली. हा विभाग सध्या प्रचंड प्रमाणात नफा कमवत आहे. क्‍लाऊड कॉम्प्युटिंग सुविधेअंतर्गत विविध कंपन्यांना ॲमेझॉन आपले सर्व्हर (शक्तिशाली संगणक) भाड्याने देते. त्यावर चालणारे सॉफ्टेवअरही भाड्याने देते. त्यामुळे नवीन कंपन्या आपल्या सेवा अधिक जलदपणे व कमी खर्चात लोकांना उपलब्ध करून देऊ शकतात. ॲमेझॉनचे पाहून गुगल व मायक्रोसॉफ्टनेही क्‍लाऊड कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केल्या आहेत. पण ॲमेझॉन या दोन्ही कंपन्यांपेक्षा कैक वर्षांनी पुढे आहे.

जेफचा जन्म १२ जानेवारी १९६४ रोजी अमेरिकेच्या न्यू मेक्‍सिको राज्यातील आल्बुकर्की शहरात झाला. त्याचा जन्माच्या वेळी जेफच्या आईचे वय फक्त १७ होते! त्यामुळे त्याच्या आईला हायस्कूलमध्ये लोकांच्या नजरांना तोंड द्यावे लागले. इतकेच नव्हे तर तिला हायस्कूलमधून काढून टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंतु तिने तिच्या आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे या सर्वाला तोंड दिले. जेफचे जैविक पिता टेड जॉर्जसन यांना घटस्फोट दिल्यानंतर जेफच्या आईने मिगेल बेझोस यांच्याशी लग्न केले आणि मिगेल बेझोस यांच्याबरोबरच जेफ लहानाचा मोठा झाला. जेफ शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता. पुढे जेफ मोठा झाल्यावर जेफचे आई-वडील फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात रहायला गेले. मायामी पालमेटो हायस्कूलमध्ये जेफ ‘व्हॅलिडीक्‍टोरीयन’ होता. हायस्कूलमधील सर्वांत हुशार विद्यार्थ्याला अमेरिकेत ‘व्हॅलिडीक्‍टोरीयन’ म्हटले जाते. अशा व्हॅलिडीक्‍टोरीयन मुलाला (अथवा मुलीला) त्यावर्षीच्या समाप्ती समारंभात भाषण करण्याचा मान मिळतो.  जेफला हायस्कूलमध्ये नॅशनल मेरिट स्कॉलरशिपही मिळालेली होती. पुढे जेफ न्यू-जर्सीच्या प्रसिद्ध प्रिन्सटन विद्यापीठात शिकायला गेला व १९८६ मध्ये त्याने इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग व कॉप्युटर सायन्स विभागात बॅचलर पदवी मिळवली. पुढे १९८७ नंतर जेफने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या. परंतु तो अभियांत्रिकी काम न करता व्यवसायासंबंधित काम करत राहिला. १९९० मध्ये त्याने डी. ई. शॉ अँड कंपनी या हेज फंडमध्ये नोकरी पत्करली. हेज फंड म्हणजे श्रीमंत लोकांचे पैसे अतिशय धोकादायक गुंतवणुकीत घालून प्रचंड पैसा मिळवणारी कंपनी. अशा कंपन्यांच्या अनेक गुंतवणुका फसतात, पण एखादी गुंतवणूक त्यांना इतका पैसा मिळवून जाते, की त्या सर्वांचा तोटा भरून निघतो. या कंपनीत जेफ १९९४ पर्यंत काम करत होता. जेफ डी. ई. शॉ यांच्याकडून अनेक व्यावसायिक गोष्टी शिकला. अलीकडेच ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याची कबुली दिली आहे. पुढे १९९३ मध्ये त्याला ऑनलाइन पुस्तके विकणारी कंपनी काढायची कल्पना सुचली. त्यावेळी त्याचे आईवडील सिॲटल शहरात रहात होते. जेफ न्यूयॉर्क मध्ये काम करत असे. न्यूयॉर्कवरून सिएटलला जाताना विमानात जेफने कंपनीचा बिझनेस प्लॅन लिहिला. आपल्या आईवडिलांकडून अंदाजे ३ लाख डॉलर्स मिळवून त्याने ५ जुलै १९९४ ला ॲमेझॉनची स्थापना केली. पुढे इतरही गुंतवणूकदारांना जमवून त्यांनी १० कोटी डॉलर्सचा एकंदरीत निधी उभा केला. पुस्तकाशिवाय इतरही गोष्टी ॲमेझॉनवर हळूहळू उपलब्ध होऊ लागल्या. स्थापना झाल्यानंतर जवळजवळ तीन वर्षांनी ॲमेझॉनची नोंदणी शेअर बाजारात केली गेली. आणि त्यानंतर जे काही झाले तो इतिहास सर्वांना माहीतच आहे. 

बरं जेफ बेझोस फक्त ॲमेझॉनची स्थापना करून थांबला आहे असे नाही. वर्ष २००० मध्ये त्याने ‘ब्लू ओरिजिनल’ नावाची अंतराळ संशोधन करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीतर्फे तो नवीन रॉकेट विकसित करायचा प्रयत्न करत आहे. इलान मस्कच्या स्पेस एक्‍सप्रमाणे ब्लू ओरिजिनलही स्पेस टुरिझम करून पैसे मिळवायचे आहेत. त्याव्यतिरिक्त सरकारी उपग्रह अवकाशात सोडणे, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला रसद पुरवठा करण्याची कंत्राटेही या कंपनीला मग मिळू शकतील. या कंपनीमध्ये जेफ बेझोसने आपले स्वतः:चे अब्जावधी डॉलर्स घातले आहेत. या वर्षी एक अब्ज डॉलर्स खर्च करून, पुढील वर्षीही एक अब्जाहून अधिक पैसे खर्च करायचा त्याचा विचार आहे. जेफला लहानपणापासूनचे अवकाशाचे आकर्षण आहे. त्याने व्हॅलिडीक्‍टोरीयन झाल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत लाखो लोकांना अवकाशात राहता येतील अशी स्पेस कॉलनीच बांधायचे स्वप्न बोलून दाखवले होते. बरं अंतराळ संशोधन पुरेसे नाही, की काय म्हणून २०१३ मध्ये बेझोसने अमेरिकेतील सुप्रसिद्ध वर्तमानपत्र द वॉशिंग्टन पोस्ट तब्बल २५ कोटी डॉलर्स खर्च करून विकत घेतले. वॉशिंग्टन पोस्ट हे ऐतिहासिक महत्त्व असलेले वर्तमानपत्र आर्थिक अडचणीत सापडले होते. परंतु जेफ बेझोसने त्याला नुसतेच अडचणीतून सोडवले नाही तर चक्क पुन्हा फायदेशीरही बनवले आहे. लोकशाहीतील एक महत्त्वाची संस्था बंद होऊ नये म्हणून आपण वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतले असे त्याने ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

जगातील अनेक प्रमुख श्रीमंत माणसांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या धर्मादाय संस्था किंवा सुरू केलेली लोक कल्याणाची कामे. या सर्वांत अग्रेसर म्हणजे जेफ बेझोसच्या आधीचा जगातील सर्वांत श्रीमंत माणूस - बिल गेट्‌स. बिलच्या पावलावर पाऊल टाकून जेफ बेझोसनेही एक नवीन धर्मादाय संस्था उघडली आहे. या संस्थेचे नाव त्यानी ‘बेझोस डे १ फाउंडेशन’ असे ठेवले आहे. या संस्थेला तो तब्बल २ अब्ज डॉलर्सची देणगी देणार आहे. या संस्थेचे पैसे नक्की कुठल्या कामावर खर्च करावेत यासाठी त्याने गेल्या वर्षभर ट्विटरवरून लोकांचे विचार मागवले होते. त्यातून त्याने होमलेसनेस - म्हणजे घरे नसणारी लोक आणि शाळा सुरू व्हायच्या आधीचे शिक्षण या दोन गोष्टीवर भर द्यायचा ठरवला आहे. अमेरिकेत गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी हळूहळू वाढत आहे. अमेरिकन शहरांमध्ये जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक लोकांना रस्त्यावर राहायची पाळी येत आहे. लॉस अँजलिस शहरात रस्त्यावर अथवा जुन्या गाड्यांत राहणाऱ्या लोकांची संख्या हळू हळू वाढत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचे काम हे फाउंडेशन करेल. अमेरिकेत सरकारी शाळा सर्वत्र विनामूल्य आहेत. किंडरगार्डनपासून बारावीपर्यंत संपूर्ण अमेरिकन जनतेला मोफत शिक्षण मिळते. आणि या शाळांमधील शिक्षणाचा दर्जाही बऱ्यापैकी चांगला असतो. अमेरिकेतील बहुतेक मध्यमवर्गीयांची (माझीही) मुले सरकारी शाळेतच जातात. परंतु शाळा ५ वर्षापासून सुरू होते. त्याआधी माँटेसरी वगैरे असतात पण त्याचे पैसे मात्र आपल्यालाच भरावे लागतात. अनेक गरीब लोकांना ते पैसे परवडत नसल्याने अशा लोकांच्या मुलांना शाळेसाठी जी पायाभरणी आवश्‍यक आहे ती मिळतच नाही. म्हणून बेझोसचा गरीब लोकांसाठी माँटेसरीप्रमाणे शाळा सुरू करायचा बेत आहे. 

अमेरिकेच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील उत्तरेला वॉशिंग्टन राज्य आहे. या राज्यातील मुख्य शहर म्हणजे सिॲटल. या शहराच्या बाहेर मेडीना नावाचे एक उपनगर आहे. या उपनगरात जेफ बेझोस राहतो. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे याच उपनगरात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस - बिल गेट्‌स ही राहतो! बहुधा तिथल्या पाण्यातच काहीतरी गुण असावा!

फोटो फीचर

संबंधित बातम्या