गुगलची नवीन उत्पादने

वैभव पुराणिक
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

टेक्नोसॅव्ही
 

गुगलने न्यूयॉर्कमधील एका समारंभात आपल्या लोकप्रिय पिक्‍सेल फोनची नवीन आवृत्ती पिक्‍सेल-३ नुकतीच जाहीर केली. एवढेच नव्हे तर त्याबरोबर दोन नवीन उत्पादनेही जगापुढे आणली. 

गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पिक्‍सेलच्या दोन नवीन आवृत्त्या गुगलने जाहीर केल्या आहेत. लहान पिक्‍सेल आणि मोठा पिक्‍सेल. लहान पिक्‍सेल-३ मोबाईलला ५.५ इंची पडदा आहे, तर मोठ्या पिक्‍सेल-३ मोबाईलला म्हणजेच पिक्‍सेल एक्‍स एलला ६.३ इंची पडदा आहे. गेल्या वर्षीच्या आवृत्तीपेक्षा हे दोन्हीही फोन थोडेसे मोठे आहेत. या फोनमधील मुख्य बदल म्हणजे या दोन्हीही आवृत्तीमध्ये पुढच्या बाजूला एक ऐवजी दोन कॅमेरे आहेत! मागच्या बाजूला मात्र अजूनही एकच कॅमेरा कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी हेडफोन जॅक फोनमधून गायबच आहे. हेडफोन जॅक नसला, तरी गुगलने या फोनबरोबर ‘युएसबी सी’ प्रकारचा वायर असलेला हेडफोन बॉक्‍समध्ये टाकला आहे. त्यामुळे तुमच्याकडे वायरलेस हेडफोन नसेल, तरी या हेडफोनचा वापर करता येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी गुगलने आपल्या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग घातले आहे. वायरलेस चार्जिंग सोपे जावे म्हणून या फोनची मागची बाजूही काचेची करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन दिसायला अधिक चांगला झाला आहे. मागच्या बाजूच्या काचेचे मॅट फिनिश असल्यामुळे तो हातातून सटकत नाही. वायरलेस चार्जिंगसाठी गुगलने नवीन चार्जरही जाहीर केला आहे. हा चार्जर १० वॅटचे चार्जिंग (फास्ट चार्जिंग) करू शकतो. या चार्जरवर फोन ठेवल्यावर काही खास सुविधाही फोनमध्ये उपलब्ध होणार आहेत. हा फोन तीन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होणार आहे. ‘जस्ट ब्लॅक’, ‘व्हेरी व्हाइट’ आणि ‘नॉट पिंक’ अशी या रंगाची नावे ठेवण्यात आली आहेत. पिक्‍सेल-३ च्या लहान आवृत्तीचा पुढचा भाग मागील वर्षीसारखाच असून यात पडद्याच्या वर व खाली बेझल (मोकळी जागा) आहे. मोठ्या आवृत्तीमध्ये मात्र वरच्या बाजूला  गुगलने बेझल संपूर्णपणे काढून टाकून त्याऐवजी आयफोनप्रमाणे नॉच टाकली आहे. पुढच्या बाजूला दोन कॅमेरे असल्याने ही नॉच इतर कुठल्याही फोनपेक्षा मोठी दिसते. हा फोन हाताळलेल्या अनेकांच्या मते तिसऱ्या आवृत्तीची स्क्रीन ही दुसऱ्या आवृत्तीपेक्षा नक्कीच जास्त चांगली आहे. दुसऱ्या आवृत्तीच्या मानाने लहान फोनमध्ये बॅटरीच्या क्षमतेतही गुगलने सुधारणा केली आहे. पिक्‍सेल-३ च्या लहान आवृत्तीमध्ये २९१५ mAh  क्षमतेची बॅटरी असून ती मागील वर्षाच्या  २७०० mAh बॅटरीपेक्षा थोडीशी मोठी आहे. या नवीन आवृत्तीने गुगलने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमची सर्वांत नवीन आवृत्ती - ‘अँड्रॉइड पाय’ घातली आहे. पिक्‍सेल-३ मध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर ८४५ घालण्यात आला असून त्यात ४ गिगाबाइटची रॅम गुगलने घातली आहे.

गेल्या काही वर्षापासून गुगलने बाजारपेठेतील सर्वोत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन बनवायचा चंगच बांधला आहे. पिक्‍सेल-२ चा कॅमेरा अतिशय लोकप्रिय झाला होता. मागच्या बाजूला एकच कॅमेरा ठेवूनही इतर दोन कॅमेराने काढलेल्या फोटोंनाही लाजवेल असे फोटो पिक्‍सेल-२ ने काढता येतात. आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एका कॅमेराने काढलेले फोटो अधिक चांगले बनवते. म्हणजेच गुगल फोटो चांगले काढण्यासाठी हार्डवेअरऐवजी सॉफ्टवेअरचा वापर जास्त करते. पिक्‍सेल-३ चा कॅमेराही हीच परंपरा सुरू ठेवतो. हा कॅमेरा आज उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमधील सर्वोत्तम कॅमेरा ठरला, तर त्यात मला अजिबात आश्‍चर्य वाटणार नाही. गुगलने यावेळी एका बाजूला दोन कॅमेरे घातले आहेत, पण ते मागच्या ऐवजी पुढच्या बाजूला ! या दोन लेन्सपैकी एक लेन्स वाइड अँगल लेन्स आहे. त्यामुळे तुम्ही अनेक जणांबरोबर सेल्फी घेत असाल, तर जास्त लोक कॅमेरात सामावू शकतात. त्यामुळेच पुढच्या बाजूला ऑप्टिकल झूमही उपलब्ध आहे. मागील बाजूला १२.२ मेगापिक्‍सेलचा एकच कॅमेरा उपलब्ध आहे. मागील बाजूला ऑप्टिकल झूम उपलब्ध नसून डिजिटल झूम उपलब्ध आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून इथेही गुगलने डिजिटल झूम उत्तम करण्यात यश मिळवले आहे. त्यासाठी अंतराळातील फोटो घेण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात येते त्याचा वापर करण्यात आला आहे. गुगलने ‘टॉपशॉट’ नावाची एक नवीन सुविधा आपल्या कॅमेरात टाकली आहे. या सुविधेनुसार तुम्ही फोटो काढण्याच्या आधी व नंतर कॅमेरा अनेक फ्रेम शूट करतो व त्यातील सर्वांत उत्तम फ्रेम निवडून तो तुम्हाला दाखवतो! त्यामुळे एखाद्या फोटोत तुमचे डोळे बंद आले असतील, तरी ते बंद होण्याआधीचा शॉटही पिक्‍सेल-३चा कॅमेरा बरोबर पकडून तुम्हाला दाखवतो. त्याव्यतिरिक्त गुगलने ‘नाइट साइट’ नावाची सुविधा घातली असून, त्यामुळे अंधारातही स्वच्छ फोटो येऊ शकतात. नैसर्गिक प्रकाश जास्त नसतानाही प्रकाशाचा आभास होऊ शकतो. ही सुविधा एक महिन्याभरात पिक्‍सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. गुगलने पिक्‍सेल-३ मध्ये आपली खास टायटन सिक्‍युरिटी चीप लावली आहे. टायटन सिक्‍युरिटी चीप गुगलने प्रथम आपल्या सर्व्हरसाठी बनवली. ॲमेझॉनप्रमाणे गुगलही क्‍लाऊड कॉम्प्युटिंग सेवा विकते. म्हणजेच वेगवेगळ्या कंपन्या गुगलचे सर्व्हर भाड्याने घेतात व आपले सॉफ्टवेअर त्यावरून चालवतात. या सर्व्हरना हॅकींगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गुगलने टायटन चीप बनवली आहे. सर्व्हरवरील ऑपरेटिंग सिस्टिममध्ये कुणी बदल केलेला नाही हे चीप तपासून पाहते. त्यामुळे हॅकरना आपले सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीमच्या आत घालणे अजून कठीण झाले आहे. गुगलच्या डेटा सेंटरमध्ये ही चीप असली, तरी ज्या लॅपटॉप अथवा फोनमधून तुम्ही या डेटा सेंटरवरील सॉफ्टवेअर वापरत असाल त्यात ही चीप नसेल तर तुमची माहिती सुरक्षित नाही. म्हणूनच गुगलने आता ही चीप आपल्या मोबाईल उपकरणातही घालायचे ठरवले आहे. टायटन-एम (मोबाईल) ही या चिपची मोबाईल आवृत्ती असून ती मोबाईल उपकरणांसाठी म्हणजेच - स्मार्टफोन, टॅबलेटसाठी बनवली आहे.  

गुगलच्या एका सुविधेने अनेक लोकांचे लक्ष वेधून घातले आहे. अनेक वेळा आपल्याला माहीत नसलेल्या नंबराकडून कॉल येतो. हा कॉल एखाद्या टेलिमार्केटरचा असू शकतो, अथवा एखाद्या आपल्याला आवश्‍यक असलेला कॉलही असू शकतो. कॉल स्क्रिनींग सुविधेअंतर्गत गुगल तुमचा कॉल उचलते आणि समोरच्या माणसाने बोललेले शब्द तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लिहून दाखवते. त्यामुळे तो माणूस कोण आहे हे तुम्हाला कळू शकते. तो आवश्‍यक असलेली व्यक्ती असेल, तर तुम्ही तो कॉल घ्यायचा अथवा बंद करायचा. ज्यांना टेलिमार्केटरचे अनेक फोन येतात, त्यांच्यासाठी ही सुविधा उत्तम आहे; पण बहुधा ही सुविधा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध नसावी. 

भारतामध्ये नवीन पिक्‍सल एक नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. ११ ऑक्‍टोबरनंतर तो प्री-ऑर्डर करता येईल. ६४ गिगाबाइटच्या लहान आवृत्तीसाठी तुम्हाला ७१ हजार रुपये मोजावे लागतील. एक्‍स एल. आवृत्तीसाठी तब्बल ८३ हजार रुपये मोजावे लागतील. हा फोन तुम्हाला फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल. 

गुगलने या समारंभात आपली अजून दोन उत्पादनेही जाहीर केली. ‘पिक्‍सेल स्लेट’ नावाचा नवीन टॅब्लेट हा त्यातील एक होय. १२.३ इंची पडदा असलेला हा टॅब्लेट बाजारपेठेतील मायक्रोसॉफ्टच्या सरफेस प्रो आणि ॲपलच्या आयपॅड प्रोबरोबर स्पर्धा करतो. गुगलने प्रथमच आपल्या टॅब्लेटवर अँड्रॉइडऐवजी क्रोम ओएस घातली आहे. क्रोम ओएस ही गुगलची क्रोम लॅपटॉपवर घातली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम आहे. गेल्या काही वर्षापासून गुगल क्रोम ओएसमध्ये टॅब्लेटवर वापरण्यासाठी आवश्‍यक असलेले बदल करीत आहे. आयपॅड प्रो व सरफेस प्रो प्रमाणेच या टॅब्लेटबरोबरही (जादा पैसे देऊन) किबोर्ड विकत घेता येतो. या किबोर्डचा टॅबलेटसाठी संरक्षक कव्हर म्हणूनही वापर करता येतो. त्याशिवाय अधिक पैसे देऊन पिक्‍सेल पेन (स्टायलस) ही घेता येतो. तसेच या टॅबलेटला यूएस बी सी पोर्टही आहेत व त्याचा वापर करून तुम्हाला याला मॉनिटरलाही जोडता येते. या टॅब्लेटवर पुढे आणि मागे कॅमेरेही जोडलेले आहेत. ज्यांना लॅपटॉप जड वाटत असेल त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हा टॅब्लेट अनेक आवृत्तीत येत असून त्याची प्राथमिक आवृत्ती अमेरिकेत ६०० डॉलर्सना मिळणार असून; किबोर्डसाठी २०० डॉलर्स जादा द्यावे लागणार आहेत. भारतामध्ये हा टॅबलेट कधी उपलब्ध होईल व त्याची किंमत काय असेल हे गुगलने अजून जाहीर केलेले नाही. 

अजून एक उत्पादन म्हणजे गुगलचा नवीन होम हब. हा होम हब ॲमेझॉनच्या ‘इको शो’बरोबर स्पर्धा करतो. होम हब एखाद्या टॅबलेटप्रमाणे दिसतो, पण त्याला स्वतः:चा असा स्टॅंड आहे. ज्याप्रमाणे ‘इको शो’ हा ‘इको’ या स्मार्ट स्पीकरची पडदा असलेली आवृत्ती आहे त्याचप्रमाणे ‘होम हब’ ही ‘गुगल होम’ या स्मार्ट स्पीकरची पडदा असलेली आवृत्ती आहे. होम हबला आवाजी आज्ञा देऊन तुम्ही अनेक कामे करवून घेऊ शकता. होम हबला तुम्ही गाणी लावायला सांगू शकता आज पाऊस पडणार आहे की नाही ते विचारू शकता अथवा एखाद्या पदार्थाची रेसिपीही दाखवायला सांगू शकता. ही रेसिपी तो युट्यूबवरील व्हिडीओमध्ये शोधून त्याचा व्हिडिओही दाखवू शकतो. तसेच गुगलचा होम हब वापरून तुम्ही इतर इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचे नियंत्रणही करू शकता. ‘इको शो’ आणि ‘गुगल होम हब’ मधील मुख्य फरक म्हणजे इको शोला कॅमेरा आहे, तर होम हबला गुगलने मुद्दामूनच कॅमेरा ठेवण्यात आलेला नाही. लोकांना आपल्या घरातील गोष्टींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्याचा संशय येऊ नये म्हणून गुगलने हे पाऊल उचलले आहे. एवढेच नव्हे तर होम हबवर खास एक मायक्रोफोन बंद करण्याचे बटनही गुगलने ठेवले आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीविषयी बोलत असाल, तर मायक्रोफोन बंद करू शकता. ‘इको शो’ची दुसरी आवृत्ती अमेरिकेत २३० डॉलर्सला (अंदाजे १७ हजार रुपयांना) मिळते. त्यामानाने गुगलची १४९ डॉलर्स किंमत (अंदाजे ११ हजार रुपये) कमीच आहे. होम हबही भारतामध्ये कधी व काय किंमतीला उपलब्ध होणार आहे हे गुगलने अद्याप जाहीर केलेले नाही. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या