स्मार्ट गुगल

वैभव पुराणिक
गुरुवार, 10 जानेवारी 2019

टेक्नोसॅव्ही
 

ॲमेझॉनने पहिला स्मार्ट स्पीकर बाजारात आणला. या स्मार्ट स्पीकरची मालिका ‘इको’ या नावाने प्रसिद्ध आहे. याला बाजारपेठेत मोठे यश मिळाले. परंतु आता गुगल आणि ॲपलनेही आपापले स्मार्ट स्पीकर बाजारात आणले आहेत. इकोनंतर जर कुठला स्मार्ट स्पीकर अमेरिकेत लोकप्रिय असेल, तर तो गुगलचा गुगल होम आहे यात अजिबात शंका नाही. ज्याप्रमाणे इको वेगवेगळ्या आवृत्तीत मिळतो, त्याचप्रमाणे गुगल होमही तब्बल चार वेगवेगळ्या आवृत्तीत मिळतो. गुगल होम, गुगल होम मिनी, गुगल मॅक्‍स आणि होम हब अशी त्याच्या विविध आवृत्तींची नावे आहेत. त्यापैकी होम हब हा याच वर्षी काही महिन्यापूर्वी नवीन काढलेला पडदा असलेला स्पीकर आहे. त्याविषयी मी यापूर्वी या सदरातून लिहिले असल्याने आज गुगल होमच्या इतर तीन आवृत्त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

गुगल होमची घोषणा गुगलने २०१६ च्या मे महिन्यात केली. २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात तो अमेरिकेत सर्वत्र उपलब्ध झाला. ॲमेझॉन इकोप्रमाणे हाही एक स्मार्ट स्पीकर आहे. ज्याप्रमाणे इकोमध्ये ‘अलेक्‍सा’ आहे, त्याचप्रमाणे गुगल होम मध्ये ‘गुगल’ आहे. अलेक्‍सा म्हटले, की इको जागा होतो आणि आपल्या आवाजी आज्ञा ऐकू लागतो. त्याचप्रमाणे गुगलच्या स्मार्ट स्पीकरशी ‘हे गुगल’ किंवा ‘ओके गुगल’ असे म्हणून बोलता येते. हा स्मार्ट स्पीकर दिसायला इकोपेक्षा बराच वेगळा आहे. एखाद्या निमुळत्या दंडगोलाला वर तिरके कापले असतो तो कसा दिसेल तसा हा स्पीकर दिसतो. याच्या खालच्या बाजूला स्पीकर असून  त्यावर कापडी झाकण लावलेला आहे. हे झाकण दिसायला चांगले असून ते बदलताही येते.  गुगलने विविध रंगाची झाकणे एव्हाना उपलब्ध केली आहेत. याच्या वरच्या बाजूला वरून न दिसणारी एक एलइडी दिव्यांची गोलाकार मांडणी केलेली आहे. ज्याप्रमाणे इको तुम्हाला प्रतिसाद द्यायला लागला, की त्याचा एलइडी रिंग दिवा लागतो त्याचप्रमाणे गुगल होम तुम्हाला प्रतिसाद देताना हे एलइडी दिवे लागतात. ते गुगलच्या निळ्या पिवळ्या आणि लाल रंगाचे आहेत. ॲमेझॉन इकोच्या वरील पृष्ठभागावर मात्र व्यवस्थित बटनांसारखी दिसणारी बटने आहेत. परंतु गुगल होमच्या वरच्या बाजूला तुम्हाला सपाट पृष्ठभागच दिसतो, परंतु तो पृष्ठभाग अनेक वेगवेगळ्या बटनांचे काम करतो. दिव्याच्या रिंगवर बोट फिरवून तुम्हाला आवाज कमी अधिक करता येतो. एकंदरीतच गुगल होम हा एखाद्या उपकरणासारखे न वाटता ते जणू काही टेबलावर एखादी फुलदाणी (फुलांशिवाय) अथवा एअर फ्रेशनर ठेवला आहे असे वाटते. गुगल होममध्ये तुमच्या आवाजी आज्ञा ऐकण्यासाठी दोन मायक्रोफोन लावण्यात आले आहेत. गुगल होमच्या मागच्या बाजूला असलेल्या बटणाचा वापर करून हे मायक्रोफोन बंद करता येतात. म्हणजे तुम्हाला काही कारणाने स्पीकरने तुम्ही बोललेले ऐकू नये असे वाटत असेल, तर त्याची सुविधा आहे. गुगल होममध्ये दोन इंची ड्रायव्हर स्पीकर आहे व दोन पॅसिव्ह रेडीएटरचे काम करणारे स्पीकर आहेत. ॲमेझॉन इकोमध्ये मात्र चक्क सात मायक्रोफोन आहेत. हे स्मार्ट स्पीकर रिव्ह्यू करणाऱ्या जवळजवळ सगळ्यांनीच आवाजी आज्ञा दुरून ऐकण्यामध्ये ॲमेझॉन इकोला विजयी ठरवले आहे. ॲमेझॉन इकोमधील स्पीकरही गुगल होमच्या तुलनेने अधिक मोठे व पॉवरफुल आहेत. परंतु गुगल होमच्या स्पीकरचा आवाज कमी असला तरीही आवाजाची प्रत मात्र ॲमेझॉनएवढीच चांगली आहे.

गुगल होम किंवा ॲमेझॉन इकोची तुलना करताना त्याच्या हार्डवेअरची तुलना करण्यापेक्षा त्याच्या सॉफ्टवेअरची तुलना करणे जास्त सयुक्तिक ठरेल. अखेर बहुतेक सुविधा या त्यातील सॉफ्टवेअरमुळे आहेत, हार्डवेअरमुळे नाहीत. गुगलची एक महत्त्वाची सुविधा म्हणजे संभाषण करताना त्याचा संदर्भ लावण्याची त्याची क्षमता. उदाहरणार्थ तुम्ही गुगलला अमिताभ बच्चन यांचे वय काय असे विचारले, आणि ते त्याने सांगितल्यानंतर नुसतं ‘ते कुठे राहतात’ (इंग्रजीत) असे विचारले तरीही गुगल होमला तुम्ही अमिताभविषयी विचारत आहात हे कळते. परंतु अलेक्‍साला मात्र प्रत्येक प्रश्नाचा संदर्भ स्पष्ट करूनच प्रश्न विचारावा लागतो. म्हणजेच दुसरा प्रश्न ‘ते कुठे राहतात’ असा विचारला, तर अलेक्‍साला ‘ते’ कोण हे कळणार नाही. ॲमेझॉन यात सुधारणा करणार असल्याचे मी ऐकले आहे, परंतु ती नक्की कधी होईल ते सांगता येत नाही. गुगल होममधील अजून एक छान सुविधा म्हणजे; याचा वापर करून तुम्हाला तुमचा फोन शोधता येतो! एवढेच नव्हे तर त्याला घरातील किती फोन सापडले त्याची यादी गुगल होम वाचून दाखवते आणि त्यातील कुठला फोन रिंग करू हे ही विचारते. अलेक्‍सात मात्र अशी सुविधा नाही. भारतीय ग्राहकांसाठी मात्र अलेक्‍सात चांगल्या सुविधा आहेत. ॲमेझॉनने भारतासाठी अलेक्‍साची खास आवृत्ती बनवली असून त्यातील आवाजही भारतीय आहे व भारतीय सांस्कृतिक प्रश्न अलेक्‍साला अधिक चांगले कळतात व त्याची उत्तरेही देता येतात. गुगलने भारतासाठी गुगल होमची खास आवृत्ती बनवलेली नाही हेच त्यामागचे कारण असावे. इकोमध्ये असलेल्या अनेक इतर सुविधा गुगल होममध्येही आहेत. तुम्हाला गुगल होम तुमचे हवामान सांगू शकते, तुमच्या कॅलेंडरमधील मीटिंग वाचून दाखवू शकते, तुम्हाला आजच्या ताज्या बातम्याही सांगू शकते ! ॲमेझॉन इकोमध्ये स्किलची संकल्पना असल्याने आणि इको दोन वर्ष आधी बाजारात आल्याने गुगल होमच्या तुलनेने इकोमध्ये जास्त स्किल (सुविधा) उपलब्ध आहेत. गुगल होममध्ये व्हॉइस मॅच नावाची एक छान सुविधा आहे. तुम्ही व्हॉइस मॅचचा वापर करून गुगलचे एखादे अकाउंट एखाद्या आवाजाला जोडू शकता. म्हणजेच तुम्ही माझ्या मीटींग्ज वाचून दाखवल्या असे म्हटले, की गुगल आपोआप तुमच्या गुगल अकाउंटमधील कॅलेंडर तपासून पाहील आणि तुमच्या जोडीदाराने मीटींग्स वाचून दाखव असे म्हटले, की त्या आवाजाशी निगडित गुगल अकाउंटमधील मीटिंग वाचून दाखवेल. अजून एक सोय म्हणजे गुगल होम गुगलच्या क्रोमकास्टबरोबर चांगले काम करते. क्रोमकास्ट तुमच्या टीव्हीला जोडून त्यावर तुम्ही युट्यूब आणि नेटफ्लिक्‍स पाहू शकता. क्रोमकास्ट तुमच्या टीव्हीला जोडलेले असेल, तर तुम्ही गुगल होमला आवाजी आज्ञा देऊन नेटफ्लिस्कवरील अथवा युट्यूबरील कार्यक्रम चालू करू शकता. तसेच गुगल सर्चही गुगल होमबरोबर उत्तम काम करते. ॲमेझॉन इकोची शोध घेण्याची क्षमता गुगल होम एवढी चांगली नाही. गुगलमध्ये घेतला जाणारा कुठलाही शोध तुम्ही गुगल होममध्ये आवाजी आज्ञा देऊन करू शकता. अजून एक महत्त्वाची सुविधा म्हणजे गुगल होमला आता एकाच वेळी दोन भाषा समजू शकतात. अनेक वेळा आपण मराठी बोलताना एखादे इंग्रजी वाक्‍य वापरतो. सर्वसाधारण इतर व्हॉइस असिस्टंटना अशी भाषा कळत नाही. परंतु गुगल होमला मात्र आता इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन आणि जपानी भाषांपैकी कुठल्याही दोन भाषांत तुमच्याशी संभाषण करू शकतो! त्या भाषा ॲपमध्ये जाऊन आधी निवडाव्या लागतात.  गुगल होम भारतात ॲमेझॉन इको एवढ्याच म्हणजे - ९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. 

‘गुगल होम मिनी’ ही गुगल होमची छोटी आवृत्ती. यात गुगल होमप्रमाणे तीन स्पीकर नसून फक्त एकच स्पीकर आहे. या स्पीकरची क्षमता गुगल होमपेक्षा अर्थातच कमी आहे. एका छोट्या तबकडीप्रमाणे याचा आकार आहे. या तबकडीवर वरच्या बाजूला चार दिवे लावण्यात आलेले आहेत. याचा आराखडा हा गाणी ऐकण्यासाठीचा स्पीकर म्हणून न केला गेला नसून, तो गुगल होम व्हॉइस असिस्टंटचा वापर करण्यासाठी केला गेला आहे.  ॲमेझॉनच्या इकोच्या लहान आवृत्तीचा- इको डॉटचा हा स्पर्धक आहे. इको डॉटमध्ये मात्र ३.५ मिमीचा जॅक असल्याने इको डॉट इतर मोठ्या स्पीकरला सहज जोडता येतो. गुगल होम मिनी जेव्हा प्रथम बाजारात आला, तेव्हा त्याला ३.५ मिमीचा जॅकही नव्हता आणि ब्लूटूथचा वापर करून इतर स्पीकरला जोडायची सुविधाही नव्हती. गुगल होम मिनीच्या नवीन आवृत्तीत गुगलने ब्लूटूथ पेअरींगची सुविधा घातली आहे. गुगल मिनी भारतीय बाजारपेठेत लवकरच ४,४९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. गुगलने २०१७ मध्ये ‘गुगल होम मॅक्‍स’ म्हणून गुगल होमची मोठी आवृत्तीही बाजारात आणली. हा स्पीकर होमपेक्षा बराच मोठा आहे. हा अमेरिकेत ४०० डॉलर्सना (अंदाजे २८,००० रुपये) उपलब्ध असून तो भारतात कधी उपलब्ध होईल हे गुगलने जाहीर केलेले नाही. हा स्पीकर चक्क १३.२ इंच लांब असून तब्बल ७ इंच रुंद आहे. यात दोन ४.५ इंची वूफर स्पीकर बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या स्पीकरमधून बेस चांगला ऐकू येतो. त्याबरोबर त्यात दोन लहान ०.७ इंची ट्‌विटर्सही घालण्यात आले आहेत. या स्पीकरमध्ये गुगलने ३.५ मिमीचा जॅक घातला आहे. यालाही कापडी झाकण असून ते इतर गुगल होम स्पीकरप्रमाणे आवाज न अडवणाऱ्या खास कापडापासून बनवलेले आहे. याचा आवाज बाजारात मिळत असलेल्या इतर स्पोर्ट स्पीकरच्या मानाने बराच मोठा आहे. यातील सॉफ्टवेअर तेच असल्याने गुगल होम व मिनीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वच सुविधा यात उपलब्ध आहेत. 

गुगलने गेल्या काही वर्षात आपल्या उत्पादनात लक्षणीय प्रगती घडवून आणली आहे. गुगलचा पिक्‍सेल फोनचा कॅमेरा आज सर्व स्मार्टफोनमधील सर्वांत उत्तम कॅमेरा समजला जातो. गुगल वायफाय हा मेश वायफाय तंत्रज्ञान वापरणारा राउटरही अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे. त्यानंतर गुगल होमही आता ॲमेझॉन इकोच्या मागे लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे गुगलकडून लोकांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. 

संबंधित बातम्या