कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स शो 

वैभव पुराणिक
मंगळवार, 29 जानेवारी 2019

टेक्नोसॅव्ही
 

दरवर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेतील लास व्हेगास शहरात कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादनांचे प्रचंड मोठे प्रदर्शन भरते. अनेक प्रसिद्ध कंपन्या आपली नवीन उत्पादने या प्रदर्शनात प्रदर्शित करतात. इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांच्या क्षेत्रातील भविष्याची झलकच आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळते. यावर्षीच्या प्रदर्शनातील लोकांचे लक्ष वेधून घेतलेल्या काही उत्पादनांचा आढावा या लेखात घेतला आहे. 

टीव्ही 
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही एलजी कंपनीने आपला रोल-अप टीव्ही या प्रदर्शनात मांडला होता. रोल-अप टीव्ही म्हणजे अतिशय पातळ - सुरळी करता येणारा टीव्ही! तो बंद असताना एखाद्या छोट्या चपट्या बॉक्‍समध्ये मावतो. जेव्हा तो सुरू करायचा असेल तेव्हा बटण दाबायचे. बटण दाबल्यावर त्याची सुरळी बॉक्‍समधून उलगडते आणि टीव्ही उभा राहतो. या टीव्हीची तुलना प्रेझेंटेशन करण्याच्या पडद्याशी करता येईल. अनेक कंपन्यांमध्ये प्रोजेक्‍टरवरून चित्र दाखवण्यासाठी पांढरे पडदे असतात. हे पांढरे पडदे बटण दाबले की उलगडतात आणि काम झाल्यावर पुन्हा सुरळी होऊन आपल्या जागेवर जाऊन बसतात. त्याचा फायदा असा, की मोठी जागा त्यामुळे चोवीस तास व्यापून राहात नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच हा टीव्ही उलगडून बाहेर काढता येतो. एलजी कंपनीने असा टीव्ही मागच्या वर्षीच्या प्रदर्शनातच ठेवला होता. परंतु यावर्षाच्या मध्यावर एलजी कंपनी हा टीव्ही प्रत्यक्ष बाजारपेठेत आणणार आहे. म्हणजेच लोकांना तो विकतही घेता येईल. एलजीने या टीव्हीचे नाव ‘वसिग्नेचर सिरीज ओएलइडी टीव्ही आरश’ असे लांबलचक ठेवले असून तो प्रथम  फक्त ६५ इंचातच उपलब्ध होणार आहे. या टीव्हीची किंमत अजून ठरवण्यात आलेली नसली, तरी सिनेट या प्रसिद्ध वेबसाइटनुसार या टीव्हीसाठी लोकांना तब्बल १० हजार डॉलर्स (७ लाख रुपये) तरी मोजावे लागतील. 

रोल-अप टीव्हीव्यतिरिक्त या वर्षी तब्बल ४ वेगवेगळ्या उत्पादकांनी आपले ८ के टीव्ही जाहीर केले आहेत. १०८० पी रिझोल्यूशनला १ के किंवा हाय डेफिनिशन समजले जाते. त्याच्या चार पट रिझोल्यूशन असणारे टीव्ही आता अमेरिकेत सर्वत्र लोकप्रिय आहेत. मी दोन वर्षांपूर्वी घेतलेला सॅमसंगचा टीव्ही ४ के रिझोल्यूशनचा होता. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील काही चॅनेल ४ के रिझोल्यूशनमध्ये दिसायला सुरुवातही झाली आहे. नेटफ्लिक्‍सची ४ के सेवा जास्त पैसे देऊन अमेरिकेत घेता येते. ४ के वरील चित्र १०८० पी च्या पडद्यापेक्षा जास्त स्पष्ट आणि छान दिसते. ८ के वरील चित्र त्यापेक्षाही जास्त चांगले दिसते, यात मला काही शंकाच नाही. ८ के टीव्हीचा पडदा ७६८० x ४३२० इतक्‍या चित्रबिंदूंचा बनलेला असतो. या वर्षीच्या प्रदर्शनात सॅमसंगने ६५ इंची, ७५ इंची आणि ९८ इंची ८ के टीव्ही जाहीर केले. सोनीने ८५ आणि ९८ इंची आणि एलजीने ८८ आणि ७५ इंची टीव्ही जाहीर केले आहेत. टीसीएल कंपनीनेही आपला ८ के टीव्ही जाहीर केला आहे. पण त्यांनी अजून टीव्ही किती मोठा आहे ते सांगितलेले नाही. ८ के टीव्ही बाजारपेठेत यायला लागले असले, तरीही अमेरिकेतदेखील अजून कुणीही ८ के रिझोल्यूशनमध्ये प्रक्षेपण करत नाही. त्यामुळे हा टीव्ही घेऊन त्यावर ४ के मध्ये प्रक्षेपित झालेलेच चित्र पाहावे लागेल. भारतामध्ये अजूनही ४ केचाही प्रसार झालेला नाही. त्यामुळे भारतीयांनादेखील ८ के टीव्हीचा फारसा उपयोग होणार नाही. 
सॅमसंगने ८ के टीव्ही व्यतिरिक्त आपला ७५ इंची मायक्रोएलइडी टीव्हीही प्रदर्शनात ठेवला होता. टीव्ही तंत्रज्ञानाचा हा पुढला टप्पा आहे. बाजारपेठेत काही वर्षांपूर्वी एल ई डी टीव्ही होते. त्यांची जागा आता ओएलइडी - ऑरगॅनिक लाइट एलमिटींग डायोड तंत्रज्ञानाने घेतली आहे. मायक्रोएलइडी टीव्हीचे आयुष्य हे ओएलइडीपेक्षा जास्त असते व ते चित्र दाखवण्यासाठी कमी ऊर्जेचा वापर करतात. म्हणूनच पुढील काही वर्षांत ओएलइडी जाऊन मायक्रोएलइडी टीव्ही येतील. 

स्मार्ट डिस्प्ले 
स्मार्ट डिस्प्लेविषयी मी यापूर्वी या सदरातून अनेक वेळा लिहिले आहे. गुगलने काही महिन्यांपूर्वीच आपला नवीन स्मार्ट डिस्प्ले जाहीर केला होता. तो स्वयंपाकघरात वापरण्यासाठी आहे असेही म्हटले आहे. परंतु हा डिस्प्ले वॉटर प्रूफ नाही. यावर पाणी पडले तर तो खराब होऊ शकतो. समजा तुम्ही तो सिंकच्या जवळ ठेवला असेल आणि त्यातील पाण्याचा फवारा या डिस्प्लेवर उडाला तर? या डिस्प्लेवर चहा अथवा सूप पडले तर? गुगल आणि ॲमेझॉनचे स्मार्ट डिस्प्ले अशा परिस्थितीत खराब होऊ शकतात. पण किचन एड ने काढलेला नवीन डिस्प्ले मात्र नुसताच वॉटरप्रूफ नाही, तर वॉटर जेट रेझिस्टंट आहे. म्हणजेच यावर पाणी जास्त दाबाने पडले तरीही हा खराब होणार नाही. याचाच अर्थ या डिस्प्लेवर सूप पडले तर तुम्ही चक्क या डिस्प्लेला नळाखाली धरून धुऊ शकता. या डिस्प्लेमधील व्हॉइस असिस्टंट हा गुगलचाच आहे. त्यामुळे गुगलच्या डिस्प्लेमधून जे काही करता येते ते बहुधा सर्वच या डिस्प्लेमधूनही करता येते. गुगलच्याच डिस्प्लेप्रमाणे याचाही स्मार्ट होम हब म्हणून वापर करता येतो. म्हणजेच याचा वापर करून तुम्ही घरातील दिवे चालू अथवा बंद करू शकता, दरवाजात कोण आले आहे ते स्मार्ट बेलमधील कॅमेऱ्यातून पाहू शकता. किचन एड हा व्हर्लपूल कंपनीचा ब्रॅंड आहे. व्हर्लपूल कंपनीची यमली (yummly) नावाची रेसिपीची वेबसाइट आहे. त्या वेबसाइटवरील रेसिपी तुम्ही यात सहजपणे पाहू शकता. या डिस्प्लेची किंमत २०० ते ३०० डॉलर्सच्या दरम्यान असण्याची शक्‍यता असून तो पुढील सहा महिन्यांत अमेरिकेत उपलब्ध होईल.

कार 
कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स शो हा प्रामुख्याने इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा शो असला तरी गेल्या काही वर्षांपासून तो कारचाही शो बनला आहे. अनेक कार कंपन्या आपल्या नवीन कार या प्रदर्शनात मांडतात. गेल्या काही वर्षांपासून इलेक्‍ट्रिक कार आणि स्वयंचलित कार या शोमधील प्रमुख आकर्षणे बनली आहेत. निसान कंपनीने आपल्या लोकप्रिय लीफ गाडीची नवीन आवृत्ती - २०१९ लिफ इ+ या प्रदर्शनात जाहीर केली. लीफच्या मागील आवृत्तीची एका चार्जमध्ये २४० किलोमीटर जाण्याची क्षमता होती. ती या नवीन आवृत्तीत तब्बल ३६३ किलोमीटर एवढी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच एकदा चार्ज केल्यावर ही गाडी मुंबईवरून पुण्याला जाऊन परतही येऊ शकते. अमेरिकेत ही गाडी एप्रिल ते जूनच्या दरम्यान उपलब्ध होईल. बाइक बनवणारी प्रसिद्ध कंपनी हार्ले डेव्हिडसन यांनीही आपली पहिलीवहिली इलेक्‍ट्रिक बाइक या प्रदर्शनात जाहीर केली. एका चार्जमध्ये ही बाइक १७७ किलोमीटर जाऊ शकते. या बाइकमध्ये हार्लेने बिल्ट इन जीपीएस व ४ जी कनेक्‍टिव्हिटी घातली आहे. त्याला ४.३ इंची एलसीडी डिस्प्लेही बसवला आहे. या डिस्प्लेवर तुम्हाला नॅव्हिगेशन दिसते व याचाच वापर करून तुम्हाला गाणीही लावता येतात. कुठल्याही इंजिनाची पिकअपची क्षमता ते इंजिन ० मैलापासून ६० मैलांचा स्पीड किती वेळात पकडते यावरून मोजली जाते. ही बाइक ६० मैलाचा (९६ किमी) स्पीड फक्त ३.५ सेकंदात पकडू शकते. ऑडी कंपनीनेही आपली नवीन इलेक्‍ट्रिक कार एआयकॉन लोकांना दाखवण्यासाठी पुन्हा एकदा ठेवली होती. ही कार एका चार्जमध्ये तब्बल ७२५ किमी जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर ही कार केवळ ३० मिनिटात त्याच्या बॅटरीच्या ८० टक्के क्षमतेपर्यंत चार्ज केली जाऊ शकते आणि तीही वायरलेस तंत्रज्ञानाने! अर्थातच ही कार स्वयंचलित आहे हे सांगायची गरजच नाही. या कारमध्ये कंपनीने स्टिअरिंग व्हील, पेडल इत्यादी ठेवलेलेच नाहीत. ही कार २०२१ पर्यंत बाजारपेठेत आणण्याचा ऑडी कंपनीचा मनोदय आहे. बेटन कंपनी अमेरिकेत टेस्ला कंपनीला स्पर्धा करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आपली एम-बाइट कार या प्रदर्शनात लोकांना दाखवायला ठेवली होती. ४५ हजार डॉलर्स किंमत असलेल्या या कारचे उत्पादन या वर्षअखेरीस सुरुवात होईल, असे कंपनीने म्हटले आहे. या गाडीत तब्बल ४८ इंचाचा पडदा आहे. संपूर्ण डॅशबोर्ड हा पडदा व्यापून टाकतो. त्यांनी के-बाइट नावाची आपली प्रीमियम सेडानही या प्रदर्शनात लोकांसाठी ठेवली होती. ही संपूर्णपणे स्वयंचलित कार असून ती २०२१ पर्यंत बाजारात येईल. एम बाइट व के बाइट या दोन्ही गाड्यांमध्ये ॲमेझॉन अलेक्‍सा सुविधा कंपनीने घातली आहे. त्यामुळे या कारशी तुम्हाला बोलता येईल. 

या व्यतिरिक्त बेल नेक्‍सस कंपनीने आपली नवीन फ्लाइंग टॅक्‍सीही या प्रदर्शनात ठेवली होती. चार लोकांना बसता येईल असे हे एक हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर सध्या कॉन्सेप्ट टप्प्यात असून ते हायब्रीड पद्धतीने डिझाईन केलेले आहे. अमेरिकेत उबर कंपनी फ्लाइंग टॅक्‍सी सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. बेल नेक्‍सस कंपनी ही उबर ज्या कंपन्यांबरोबर बोलणी करत आहे त्यातील एक कंपनी आहे. 

या प्रदर्शनात जगातील ४,५०० कंपन्या आपली उत्पादने तब्बल २५ लाख चौरस फुटाच्या जागेत मांडून ठेवतात. दोन लाखाहूनही अधिक लोक या प्रदर्शनाला भेट देतात. दीडशे देशांतून हे लोक आलेले असतात. अनेक प्रमुख कंपन्यांचे सीईओ व महत्त्वाचे अधिकारी या प्रदर्शनात हजर असतात. अशा या प्रदर्शनातील सर्व गोष्टी पाहणेही एखाद्याला शक्‍य होणार नाही. मग त्याचा आढावा एका लेखातून घेण्याची शक्‍यता तर अगदीच कमी! त्यातल्या त्यात मला जे आवडले ते मी सांगण्याचा इथे मी प्रयत्न केला आहे.
 

संबंधित बातम्या