स्ट्रीमिंग सेवांना मागणी

वैभव पुराणिक
गुरुवार, 31 जानेवारी 2019

टेक्नोसॅव्ही
 

निल्सन कंपनीच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पाहणीनुसार गेल्या आठ वर्षांत अमेरिकेमध्ये कॉर्ड कटरच्या - म्हणजेच केबल काढून टाकणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ४८ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात लोक केबलशिवायच टीव्ही बघतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बहुतेक सगळ्याच प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या आपले नवीन तंत्रज्ञानही याच आधारावर पुढे नेत आहेत. 

अमेरिकेत टीव्ही वेळेवर बघण्याची संकल्पना खूप आधीच नाहीशी झाली होती. म्हणजे समजा एखादी मालिका दररोज रात्री ८ वाजता झी मराठीवर लागते. तर ती मालिका पाहण्यासाठी बरोब्बर ८ वाजता टीव्हीपुढे बसणे लोकांना जमत नसे. म्हणूनच १९९९ मध्ये डीव्हीआर - डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर बाजारात आले. त्यामुळे लोक आपल्याला आवडणारे कार्यक्रम रेकॉर्ड करू लागले. याची सुरुवात एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करण्यापासून झाली, पण नंतर नंतर लोकांना रेकॉर्ड करण्यातील एक मुख्य फायदा लक्षात आला - तो म्हणजे, जाहिराती फास्ट फॉरवर्ड करण्याचा! रेकॉर्ड केलेली मालिका पाहताना जाहिराती फास्ट फॉरवर्ड करता येत असत. त्यामुळे लोकांनी अधिकाधिक कार्यक्रम रेकॉर्ड करूनच पाहायला सुरुवात केली. २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात टीव्हो (Tivo) कंपनीचा डीव्हीआर अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय झाला. लोकांनी त्याचा वापर आपले आवडते सामने रेकॉर्ड करण्यासाठीही केली. त्यामुळे खेळामध्ये रुची असणाऱ्यांमध्येही डीव्हीआरचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. डीव्हीआरची लोकप्रियता पाहून केबल कंपन्यांनी आपल्या सेवेबरोबर डीव्हीआरही फुकट द्यायला सुरुवात केली. डीव्हीआरचे भाडे म्हणून केबल कंपन्या महिन्याला ५ डॉलर्स आकारू लागल्या. ते लोकांना परवडत असल्याने डीव्हीआरचा अधिकच प्रसार झाला. या डीव्हीआरमुळेच लोकांची एखाद्या ठराविक वेळी टीव्हीपुढे बसायची सवय गेली. 

याच सुमारास नेटफ्लिक्‍सने आपली स्ट्रीमिंग सेवा सुरू केली. ब्रॉडबॅंड इंटरनेटचा अमेरिकेत या काळात मोठा प्रसार होत होता. त्यामुळेच नेटफ्लिक्‍सचा प्रसार शक्‍य झाला. प्रथम इंटरनेटवरून चित्रपट आणि मालिका पाहता येतील, अशी नेटफ्लिक्‍स ही एकच सेवा अमेरिकेत उपलब्ध होती. पण नंतर हळूहळू हुलू आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओही या स्पर्धेत उतरल्या. प्रथम या कंपन्या इतरांनी तयार केलेले चित्रपट आणि नेहमीच्याच वाहिन्यांवरील मालिका आपल्या स्ट्रीमिंग सेवेतून उपलब्ध करून देत होत्या. पण नंतर नंतर नेटफ्लिक्‍स, हुलू आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओंनी आपल्या स्वतःच्या मालिका व चित्रपटही तयार करायला सुरुवात केली. या मालिका व चित्रपट फक्त त्यांच्या स्ट्रीमिंग सेवेतूनच उपलब्ध होत असत. त्यामुळे नेहमीच्याच वाहिन्यांपेक्षा काही वेगळे देत असल्याने त्यांच्या सभासदत्वात वाढ होऊ लागली. दरम्यान, लोकांना स्ट्रीमिंग सेवेचा अजून एक फायदा लक्षात येऊ लागला. समजा तुमच्याकडे एकच टीव्ही असेल आणि आईला एखादी मराठी मालिका बघायची आहे, पण तुम्हाला एखादा इंग्रजी अथवा हिंदी चित्रपट पाहायचा आहे तर तुम्ही काय कराल? आई टीव्हीवर मालिका पाहात असताना तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट तुमच्या फोनवर अथवा टॅब्लेटवर अथवा लॅपटॉपवर पाहता आला तर? आणि तोही हेडफोन वापरून, म्हणजे मग आवाज किती मोठा पाहिजे यावरून भांडणेच नकोत! फोनच्या वाढत्या आकारांनी फोनवर व्हिडिओ पाहणे अधिकाधिक सुकर होऊ लागले होते. त्याचाही स्ट्रीमिंग सेवांच्या प्रसाराला मोठा फायदा झाला. नेटफ्लिक्‍सने याच दरम्यान तरुण पिढीला आवडेल अशी अजून एक गोष्ट केली. ती म्हणजे त्यांच्या मालिकांचे एका सीझनमधील सर्वच एपिसोड एकावेळी उपलब्ध होऊ लागले. म्हणजे एखादी मालिका फारच उत्कंठावर्धक आहे आणि तुम्हाला पुढे काय होईल अशी उत्सुकता लागून आहे, तर अशा परिस्थितीत पुढच्या आठवड्यापर्यंत थांबायची गरज संपली. पुढचा भाग लगेचच बटन दाबून पाहता येऊ लागला. लाइव्ह टीव्हीला बसलेला तो अजून एक मोठा दणका होता. 

नेटफ्लिक्‍ससारख्या स्ट्रीमिंग सेवांचा अजून एक फायदा म्हणजे या बहुतेक सेवा केबलपेक्षा बऱ्याच स्वस्त होत्या. सर्वसाधारण केबलसाठी अमेरिकन माणसाला तब्बल ६० ते १०० डॉलर्स दर महिन्याला मोजावे लागतात. त्यातही तुम्हाला हवे ते चॅनेल पाहण्यासाठी जास्त पैसे मोजून, नको असलेले चॅनेलही घ्यावे लागतात. त्या तुलनेत नेटफ्लिक्‍स फक्त ११ डॉलर्समध्ये उपलब्ध आहे. हुलूही १२ डॉलर्सला उपलब्ध आहे. ॲमेझॉनच्या प्राइम मधील व्हिडिओ सेवा तर फुकटच आहे असे म्हणता येईल. कारण प्राइमचे इतर अनेक फायदे आहेत आणि व्हिडिओ सेवा हा त्यातील एक फायदा आहे. ही संपूर्ण सेवा महिन्याला १५ डॉलर्समध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही या तीनही सेवा जरी घेतल्यात तरी तुम्हाला महिन्याला ३८ डॉलर्स खर्च होतात. पण अर्थातच त्यात न्यूज चॅनेल व स्पोर्टस चॅनेलचा समावेश नाही. पण याला तोडगा म्हणून अनेक केबल कंपन्यांनी स्वस्त दरातील स्ट्रीमिंग सेवा सुरू केली. केबलमध्ये जे चॅनेल तुम्हाला पाहायला मिळत होते तेच चॅनेल आता तुम्हाला इंटरनेटद्वारे तुमच्या फोनवर (किंवा वायफाय असलेल्या टीव्हीवर) पाहता येऊ लागले. परंतु, त्यांचे नियम मात्र सारखेच होते. तुम्हाला काही विशिष्ट चॅनेल्स हवी असतील तर जास्त पैसे द्यायला लागतात. गुगलनेही यात उडी मारली व स्वतःची स्ट्रीमिंग सेवा सुरू केली. महिना ३५ डॉलर्स शुल्क असलेल्या या सेवेमधून केबलमधल्या वाहिन्या दिसू लागल्या. पण या सेवांमध्ये आणि केबलमधील फरक एवढाच होता, की त्या थोड्याशा स्वस्त होत्या व त्या इंटरनेटद्वारे दिसत असत. अमेरिकेत मिळणारे बहुतेक टीव्हीमध्ये वायफाय सुविधा असतेच. बहुतेक सगळ्याच मध्यमवर्गीय अमेरिकन घरात वायफाय असते. त्यामुळे केबलच्या सेट टॉप बॉक्‍सची गरजच उरली नाही. त्यामुळे आता बाजारपेठेत दोन प्रकारच्या स्ट्रीमिंग सेवा उपलब्ध झाल्या - नेटफ्लिक्‍सप्रमाणे नुसते कार्यक्रम असणाऱ्या सेवा आणि केबलमधील चॅनेल दाखवणाऱ्या स्ट्रीमिंग सेवा. हुलूने यातला मध्यममार्ग चोखाळून दोन्ही प्रकारच्या सेवा (अधिक शुल्क आकारून) आपल्या सेवेत उपलब्ध करून दिल्या. यात अजून एक भर म्हणजे यातील पहिल्या प्रकारच्या सेवांनी - नेटफ्लिक्‍स व ॲमेझॉन प्राइम व्हिडीओंनी गेल्या काही वर्षांपासून व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे वायफाय उपलब्ध असेल तिथून चित्रपट अथवा मालिकांचे भाग तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करून ठेवता येतात. हे भाग मग तुम्ही इंटरनेट उपलब्ध नसेल तिथेही पाहू शकता. मी या सुविधेचा वापर विमानप्रवासात करतो. 

अमेरिकेत थेट प्रक्षेपित होणाऱ्या चॅनेल्सचे दोन गट आहेत. एक म्हणजे ओव्हर द एअर दिसणारे विनाशुल्क चॅनेल आणि दुसरे म्हणजे फक्त केबलमधूनच उपलब्ध होणारे सीएनएनसारखे चॅनेल. ओव्हर द एअर चॅनेल कुणीही अँटेना लावून पाहू शकतो. त्यासाठी कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. भारतामध्ये त्याची तुलना दूरदर्शनच्या वाहिन्यांशी करता येईल. अमेरिकेत मात्र सरकारी चॅनेल उपलब्धच नसल्याने इतर काही खासगी चॅनेल्स ओव्हर द एअर दिसतात. त्यावर अनेक खेळांचे थेट प्रक्षेपण होत असल्याने अनेक लोकांनी अँटेना लावून हे चॅनेल पाहायला सुरुवात केली आहे. हे लोक केबल काढून टाकतात, नेटफ्लिक्‍ससाठी ११ डॉलर्स भरतात व अँटेना लावून ओव्हर द एअर चॅनेल फुकट पाहतात. यात फक्त खोट अशी, की त्यांना ओव्हर द एअर वाहिन्यांसाठी डीव्हीआर सुविधा मात्र मिळत नाही. त्यावरही तंत्रज्ञानाने तोडगा शोधून काढला आहे. अलीकडेच ॲमेझॉनने फायर टीव्ही रिकास्ट नावाचा आपला डीव्हीआर बाजारात आणला आहे. हा डीव्हीआर खास ओव्हर द एअर चॅनेलसाठी चालतो. म्हणजेच याला केबलची गरज लागत नाही. हा डीव्हीआर बाजारात २३० डॉलर्सना उपलब्ध आहे. हा डीव्हीआर विकत घेतला, की कुठल्याही प्रकारचे इतर शुल्क न भरता तुम्हाला डीव्हीआर सुविधेचा वापर करता येईल. एवढेच नव्हे, तर हे रेकॉर्ड केलेले कार्यक्रम तुम्हाला इतर उपकरणांवरही पाहता येतील. म्हणजे स्ट्रीमिंग सेवेतून मिळणारे सर्व लाभ ओव्हर द एअर चॅनेलसाठी तुम्हाला हा डीव्हीआर घेऊन मिळवता येतात. नुसत्या ॲमेझॉननेच नव्हे तर टीव्हो, टॅबलो, प्लेक्‍स अशा अनेक कंपन्यांनी आपले ओव्हर द एअर डीव्हीआर बाजारात आणले आहेत. 

भारतातही अशा प्रकारचे बदल दिसू लागले आहेत, पण अजूनही ते अमेरिकेच्या मानाने बाल्यावस्थेत आहेत. भारतामध्ये नेटफ्लिक्‍स व ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या स्ट्रिमिंग सेवा उपलब्ध आहेतच; पण आता त्यात हॉटस्टार, जिओ सिनेमा, इरॉस नाऊ सारख्या भारतीय कंपन्यांचीही भर पडत आहे. सोनीनेही सोनी लिव्ह नावाची आपली स्ट्रिमिंग सेवा सुरू केली आहे. त्यावर तुम्हाला अनेक खेळांचे सामने, सोनीवरील मालिका आणि अनेक चित्रपट पाहायला मिळतात. आनंदाची गोष्ट म्हणजे, नेटफ्लिक्‍स व हॉटस्टारवर मराठी सिनेमे व मराठी मालिकाही उपलब्ध आहेत. जिओची स्ट्रीमिंग सेवा जिओ मोबाइलधारकांना विनाशुल्क उपलब्ध आहे, तर हॉटस्टार भारतात विनाशुल्क उपलब्ध आहे. हॉटस्टारच्या प्रीमियम आवृत्तीसाठी महिना २०० रुपये भरावे लागतात व एक वर्षाचे पैसे एकदम देणार असाल तर फक्त १२०० रुपयात पूर्ण वर्षाचे सदस्यत्व मिळते. नेटफ्लिक्‍ससाठी मात्र भारतीयांना दरमहिना ५०० ते ८०० रुपये भरावे लागतात. भारतामध्ये ४ G चा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने स्ट्रीमिंग सेवांनाही चांगले दिवस येतील. लोकांच्या घरी केबल इंटरनेट आणि वायफाय राउटर नसला, तरी ४ G सेवा असल्याने ते स्ट्रीमिंग वापरून मालिका अथवा चित्रपट पाहू शकतात. भारतामध्ये मोबाईल डेटा अमेरिकेपेक्षाही स्वस्त उपलब्ध आहे. केवळ महिना ५०० रुपयात (किंवा त्यापेक्षाही कमी) तुम्हाला दर दिवशी ३ गिगाबाईटचा डेटा मिळू शकतो. एवढा डेटा अमेरिकेत कुठल्याच कंपन्या देत नाहीत. दिलाच तर त्याला ५० डॉलर्सपेक्षा (३,५०० रुपये) जास्त पैसे मोजावे लागतात आणि त्यामुळेच स्ट्रीमिंग सेवेचा प्रसार अमेरिकेत केबल इंटरनेटकरवी झाला, तो भारतामध्ये मात्र मोबाइलकरवी होईल, असा माझा अंदाज आहे.   

संबंधित बातम्या