उडती कार

वैभव पुराणिक
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

टेक्नोसॅव्ही
 

अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील मॅनसास गावी २३ जानेवारीला बोइंग कंपनीच्या उडत्या स्वयंचलित कारने हवेत झेप घेतली. ही झेप फक्त एक चाचणी होती व ती फक्त १ मिनीटभरच टिकली. ही झेप ही येणाऱ्या भविष्याची नांदी आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

बोइंग कंपनी जेट विमाने बनवते हे सर्वांना माहीत आहेच. परंतु, छोट्या अंतरावर जाऊ शकणारी व २ ते ४ प्रवाशांनाच नेऊ शकणारी वाहने बनवण्याचा प्रयत्न बोइंग गेल्या काही वर्षांपासून करत आहे. सर्वसाधारण वाहतुकीसाठी विमाने वापरण्यातील एक मोठा अडथळा म्हणजे त्यांना उड्डाण करण्यासाठी लागणारा रनवे. अशा रनवेची गरजच लागणार नाही असे ड्रोन व हेलिकॉप्टरमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान - म्हणजेच रोटर वापरून बोइंग आणि इतरही अनेक कंपन्या उडती वाहने बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वाहनांना VOTL - व्हर्टिकल टेकऑफ अँड लॅंडिंग वाहन अशी संज्ञा वापरली जाते. सोप्या भाषेत लोक त्याला फ्लाइंग कार असेही म्हणत आहेत. या सर्वांचे उद्दिष्ट सारखेच आहे - वाहतुकीने गजबजलेल्या मोठ्या शहरांमधील प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅफिकचा सामना न करता लवकरात लवकर पोचवणे. त्याचबरोबर या बहुतेक सर्वच कंपन्या हे वाहन स्वयंचलित बनवण्याचाही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या वाहनांसाठी पायलटची गरज लागणार नाही. एवढेच नव्हे, तर क्‍लायमेट चेंजकडे (हवामान बदल) लक्ष ठेवून हे वाहन तेलावर न चालवता विजेच्या बॅटरीवर चालवण्याचाही या कंपन्या प्रयत्न करत आहेत. यासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे असे म्हणता येईल. बॅटरी तंत्रज्ञानातील प्रगती दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फ्लाइंग कार बॅटरीवर उडवणे आता तेवढे कठीण राहिलेले नाही. 

बोईंगने या कारला ऑटोनॉमस पॅसेंजर एअर वेहिकल (PAV) असे नाव दिले आहे. ३० फूट लांब व २८ फूट रुंद असलेले हे वाहन हेलिकॉप्टर, ड्रोन आणि विमानाचे मिश्रण वाटते. सर्वसाधारणतः ड्रोन किंवा हेलिकॉप्टरला विमानाप्रमाणे पंख नसतात. फक्त वरती रोटर असतात. परंतु या वाहनाला पंखही आहेत आणि वर अनेक रोटरही आहेत. या वाहनाच्या दोन आवृत्त्या बनवण्याचा बोइंगचा विचार आहे. एक २ प्रवासी व दुसरे ४ प्रवासी घेऊन जाऊ शकणारी. हे वाहन एका उड्डाणात ५० मैल अंतर (८० किमी) जाऊ शकेल. याच वाहनाची सामान घेऊन जाणारी आवृत्तीही बोइंग बनवणार आहे. अंदाजे २२५ किलो सामान वाहून नेण्याची त्याची क्षमता असेल. २३ जूनला झालेल्या चाचणीत हे विमान जमिनीपासून फक्त काही फूट वर काही सेकंदच उडवण्यात आले व नंतर त्याने सॉफ्ट लॅंडिंग केले. यापुढील चाचणी मात्र पुढे जाण्याची चाचणी असेल. हे वाहन अरोरा फ्लाइट सायन्सेस या बोईंगच्या एका विभागाने केलेले आहे. 

अरोरा फ्लाइट सायन्सेस ही दीड वर्षापूर्वी एक स्वतंत्र कंपनी होती. बोइंगने २०१७ मध्ये ही कंपनी विकत घेतली. बोइंगने विकत घेण्यापूर्वी ही कंपनी उबरबरोबर त्यांच्यासाठी स्वयंचलित उडती टॅक्‍सी बनवण्यासाठी काम करत होती. हेच वाहन उबरसाठी वापरण्यात येणार आहे की त्यासाठी दुसऱ्या वाहनाचा आराखडा बनवणे चालू आहे हे मात्र बोइंगने अजून जाहीर केलेले नाही. उबरचा २०२३ मध्ये लॉस एंजलिस व डॅलास शहरात स्वयंचलित फ्लाइंग टॅक्‍सी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. 

उडती कार बनवण्याची संकल्पना काही नवीन नाही. अशी कार बनवण्याचा प्रयत्न करणारी बोइंग ही पहिली कंपनी नक्कीच नाही. बोइंगचा स्पर्धक एअरबसही गेल्या कित्येक वर्षांपासून उडत्या कारवर काम करत आहे. एअरबरसने त्याकरता अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत ‘ए क्‍यूब’ नावाचा विभाग  उघडला असून त्यांनी मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात आपल्या वाहनाची पहिली चाचणी पूर्ण केली. या चाचणीमध्ये हे विमान ५३ सेकंद वर नेण्यात आले. या वाहनाचे नाव वहाना (अथवा वाहन) असेच ठेवण्यात आले आहे. परंतु, ते संस्कृत ‘वाहन’ या शब्दावरून ठेवण्यात आले आहे की नाही याची मात्र नक्की खात्री करता येत नाही. त्याचा इतर कुठल्या भाषेत अर्थ वेगळा होऊ शकत असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हे वाहनही स्वयंचलित व संपूर्णपणे विजेवर चालणारे आहे. प्रोसेसर बनवणारी इंटेल कंपनीही इ-हॅंग कंपनीबरोबर उडते वाहन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. किटीहॉक नावाची कंपनीही फ्लायर व कोरा नावाच्या दोन फ्लाइंग कार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जर्मन कंपनी वोलोकॉप्टरनेही १८ रोटर असलेले हेलिकॉप्टरवजा वाहन तयार करत आहे. स्लोवाकियास्थित एरोमोबिल कंपनी ‘एरोमोबिल ५.० व्हर्टिकल टेकऑफ अँड लॅंडिंग’ नावाचे वाहन बनवत आहे. या वाहनालाही रोटरबरोबर पंख आहेत. हे वाहन चार प्रवाशांकरता बनवण्यात येत असून ते बाजारात यायला अजून ६ ते ९ वर्षे लागतील असे कंपनीने म्हटले आहे. जपानमध्येही कार्टिव्हेटर नावाची कंपनी दोन प्रवाशांना वाहून नेणारी उडती कार बनवण्याच्या प्रयत्नात आहे. कार्टिव्हेटर मात्र इतर स्टार्टअपप्रमाणे स्टार्टअप नसून त्यात काम करणारे १०० लोक त्याचे मानधन घेत नाहीत. त्यांना टोयोटा, पॅनासोनिक आणि एन ई सी कंपनीकडून थोडेफार भांडवल मिळाले असले तरी ते १०० लोकांना पैसे देऊन कार बनवण्याइतके नाही. या कंपनीचे संस्थापक नाकामुरा यांनी स्कायड्राइव्ह नावाची अजून एक कंपनी स्थापन केली असून त्याकरवीही त्यांनी भांडवल उभे केले आहे. टोकियोत २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकची ज्योत आपल्या वाहनात बसून प्रज्वलित करण्यात यावी असे नाकामुरा यांचे स्वप्न आहे. फ्लाइंग कार बनवणाऱ्या सर्व कंपन्यांची यादी करायची झाली तर हा लेख नक्कीच अपुरा पडेल. 

फ्लाइंग कार प्रत्यक्षात येण्यामध्ये तंत्रज्ञानाव्यतिरिक्तही बरेच अडथळे आहेत. परंतु, अजून एक तांत्रिक अडथळा म्हणजे हजारो फ्लाइंग कारचे रहदारी नियंत्रण करणारी यंत्रणा अजून अस्तित्वात नाही. विमानांच्या वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा अस्तित्वात आहे. म्हणूनच बोइंगने स्पार्क कॉग्निशन कंपनीबरोबर संयुक्तरीत्या ‘स्कायग्रिड’ नावाची नवीन कंपनी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये सुरू केली आहे. ही कंपनी हवेत उडणाऱ्या स्वयंचलित कारचे नियंत्रण करणारे सॉफ्टवेअर बनवणार आहे. अमेरिकन विमानतळांचे नियंत्रण करणारी सरकारी संस्था फेडरल एव्हिएशन एजन्सीबरोबर ही कंपनी काम करत आहे. 
रस्त्यावरील कारची आणि उडत्या कारची तुलना करायची झाली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की रस्त्यावरील कार अलीकडेच म्हणजे त्यांचा शोध लागल्यापासून १०० वर्षांनंतर स्वयंचलनाच्या दिशेने जात आहेत. परंतु उडती कार मात्र बाजारपेठेत येण्याआधीच स्वयंचलनाच्या दिशेने जाताना दिसते. याची अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानात एव्हाना पुरेशी प्रगती झालेली आहे. तसेच कारला एखाद्या रस्त्यावरून जात असताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अडथळ्यांबरोबरच दिशादर्शनही करावे लागते. म्हणजेच या रस्त्यावर उजवीकडे वळ इत्यादी. परंतु हवेतून जात असताना तुलनेने अडथळे अगदी कमी असतात. त्यामुळेच उडत्या कारची स्वयंचलन यंत्रणा बनवणे हे रस्त्यावरील कारच्या स्वयंचलनापेक्षा तांत्रिकदृष्ट्या सोपे आहे. हवेतून उडत असतानाचे दिशादर्शनही तुलनेने सोपेच असते. तसेच रस्त्यावरील कारच्या मानवी चुकाचा परिणाम बऱ्याचवेळा तेवढा गंभीर नसतो. परंतु मानवी चुकीचा उडत्या कारवर होणारा परिणाम मात्र अधिक गंभीर असेल. हवेत असताना कार कोसळली तर त्यातील प्रवासी वाचण्याची शक्‍यता खूपच कमी असते. त्यामुळे हवेतून उडणारी कार स्वयंचलित असेल तर एखाद्या माणसाने दारू पिऊन अशी कार चालवली तर काय होईल हा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. तुम्ही आतील सॉफ्टवेअरच्या कडक चाचण्या घेतलेल्या असतील तर सॉफ्टवेअर स्वतःहून कधीच कुठला नियम तोडणार नाही. म्हणूनच थेट स्वयंचलनाकडे जाणे हे अधिक संयुक्तिक ठरते. 

फ्लाइंग कारवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असले तरीही फ्लाइंग कार प्रत्यक्षात बाजारपेठेत उपलब्ध व्हायला अजून एक दशक तरी लागेल असे माझे मत आहे. त्या प्रचलित व्हायला त्यापुढे अजून एक दशक जावे लागेल. त्या प्रचलित होण्यासाठी त्याला बनवायला लागणारा खर्च आटोक्‍यात यावा लागेल. सध्या संशोधन सुरू असलेल्या फ्लाइंग कारची किंमत ही अंदाजे १० लाख डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. एवढ्या महाग कार लोकांना परवडणे शक्‍यच नाही. म्हणूनच या कार टॅक्‍सी म्हणून प्रथम प्रचलित होतील व किंमत पुरेशी खाली आल्यावर त्याचा वैयक्तिक वाहन म्हणून उपयोग सुरू होईल.   
(ही लेखमाला समाप्त होत आहे.)

संबंधित बातम्या