ॲमेझॉनचा इको 

वैभव पुराणिक
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

ॲमेझॉनने अलीकडेच आपली इको स्पीकर्सची मालिका भारतात उपलब्ध करून दिली आहे. ‘अलेक्‍सा’ नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार करण्यात आलेली सेवा या उपकरणाद्वारे भारतीय लोकांना उपलब्ध होईल. ही उपकरणे वापरून लोकांना आवाजी आज्ञा देऊन आपली कामे करून घेता येतील. ही घोषणा करण्यापूर्वी काही आठवडे आधीच ॲमेझॉनने या मालिकेतील अनेक नवीन उत्पादने अमेरिकन बाजारपेठेत जाहीर केली. इको मालिकेतील या सर्व उपकरणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. 

ॲमेझॉनने अलीकडेच आपली इको स्पीकर्सची मालिका भारतात उपलब्ध करून दिली आहे. ‘अलेक्‍सा’ नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार करण्यात आलेली सेवा या उपकरणाद्वारे भारतीय लोकांना उपलब्ध होईल. ही उपकरणे वापरून लोकांना आवाजी आज्ञा देऊन आपली कामे करून घेता येतील. ही घोषणा करण्यापूर्वी काही आठवडे आधीच ॲमेझॉनने या मालिकेतील अनेक नवीन उत्पादने अमेरिकन बाजारपेठेत जाहीर केली. इको मालिकेतील या सर्व उपकरणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. 

ॲमेझॉनने आपला इको ब्लूटूथ स्पीकर २०१४ मध्ये बाजारात आणला. इको हा नुसता ब्लूटूथ स्पीकर नव्हता तर तो एक स्मार्ट स्पीकर होता. ‘अलेक्‍सा’ असे म्हटले की हा स्पीकर जागा होई. मग तो तुमचा आवाज ऐकू लागे. त्याला दिलेल्या आवाजी आज्ञा मग तो पाळत असे. उदाहरणार्थ ‘अलेक्‍सा, मायकल जॅक्‍सनची गाणी लाव’ असे इंग्रजीत सांगितले की तो मायकल जॅक्‍सनची गाणी सुरू करत असे. ‘अलेक्‍सा स्टॉप’ असे म्हणून ही गाणी थांबवता येत असत. पण हळूहळू ॲमेझॉनने अनेक वेगवेगळ्या सुविधा इकोमध्ये घालायला सुरवात केली. इको अधिकाधिक ‘इंटेलिजंट’ होऊ लागला. ‘अलेक्‍सा, आजचे हवामान काय आहे?’ असे विचारल्यावर इको त्या भागातला हवामानाचा अंदाज सांगायला लागला. ‘अलेक्‍सा, मला दहा मिनिटांनी ओव्हन चेक करायची आठवण कर’ असे म्हटल्यावर तो स्पीकर दहा मिनिटांनी ‘कृपया ओव्हन चेक करा’ असे म्हणायला लागला. एवढेच नव्हे, तर ॲमेझॉनने आपली ‘अलेक्‍सा सेवा’ इतर कंपन्यांसाठी खुली करून दिली. ज्या प्रमाणे लोक आयफोन आणि अँड्रॉइडसाठी ॲप बनवतात त्याप्रमाणे लोक अलेक्‍सासाठीही ॲप बनवायला लागले. फिलिप्स कंपनी ह्यू नावाचा स्मार्ट बल्ब बनवते. या स्मार्ट बल्बचे इंटरनेटद्वारे नियंत्रण करता येते. म्हणजे तुम्ही आपला स्मार्टफोन वापरून हा बल्ब सुरू अथवा बंद करू शकता. या बल्बचा प्रकाश फोन वापरून मंद करता येतो. तुम्ही घरी नसलात तरी ठराविक वेळेला बल्ब चालू करून तुम्ही घरी असल्याचा भास निर्माण करू शकता. फिलिप्स ह्यूने या बल्बच्या सर्व सुविधा अलेक्‍साकरवी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे इको स्पीकर असेल, त्यांना ‘अलेक्‍सा, दिवा बंद कर’ असे इंग्रजीत म्हणून दिवे बंद करता येऊ लागले. ‘अलेक्‍सा, आजच्या बातम्या सांग’ असे म्हटल्यावर इको तुम्हाला आजच्या ठळक बातम्या वाचून दाखवू लागला. एवढेच नाही, तर ज्या लोकांना ऑफिसमध्ये अनेक मीटिंग्ज असतात, त्यांना ‘अलेक्‍सा, माझे आजचे शेड्यूल काय आहे?’ असे इंग्रजीत म्हटल्यावर इको स्पीकर त्यांना त्यांच्या ऑफिस कॅलेंडरमधील सर्व मीटिंग्ज वाचून दाखवू लागला. बरे एवढ्यावरच ॲमेझॉन आणि इतर कंपन्या थांबल्या नाहीत. आता तर इकोला तुम्ही ‘अलेक्‍सा मला एक विनोद सांग’ किंवा ‘अलेक्‍सा, माझ्या मुलाला थ्री लिटील पिग्ज ही स्टोरी वाचून दाखव’ अशाही आज्ञा देऊ शकता. अलीकडेच जाहीर झालेल्या सुविधेनुसार आता इको वापरून तुम्हाला फोनही करता येतो. म्हणजेच किचनमध्ये काम करता करता तुम्हाला आता आपल्या आवडत्या मैत्रिणीबरोबर अथवा मित्राबरोबर, फोनला हातही न लावता गप्पा मारता येऊ शकतात. ज्यांना उबर मागवून बाहेर जायचे आहे, त्यांना आवाजी आज्ञा देऊन उबरही मागवता येऊ लागली. अशा अनेक उपयुक्त सोयींमुळे लवकरच इको आणि इको मालिकेतील उत्पादने अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली. 

या स्पीकरविषयी बोलताना अनेक वेळा लोक ‘इको’ आणि ‘अलेक्‍सा’ ही दोन नावे वापरतात. इको हे प्रत्यक्ष स्पीकरवजा दिसणाऱ्या उपकरणाचे नाव आहे, तर ‘अलेक्‍सा’ हे या स्पीकरमधून उपलब्ध करून दिलेल्या सेवेचे नाव आहे. उदाहरणार्थ आयफोन हे उपकरण आहे व सिरी हे या उपकरणातून वापरता येणाऱ्या सेवेचे नाव आहे. अलेक्‍सा ही सेवा आता नुसत्या इकोमधून उपलब्ध नाही, ॲमेझॉनने आता हीच सेवा अनेक वेगवेगळ्या उपकरणांतून उपलब्ध करून दिली आहे. परंतु अलेक्‍सा लोकप्रिय होण्यासाठी इकोच जबाबदार आहे. हा लेख लिहीतेवेळी अलेक्‍साला फक्त इंग्रजी व जर्मन या दोनच भाषा बोलता येतात. इतर कुठल्याही भाषेत तुम्ही अलेक्‍साशी संवाद साधू शकत नाही. त्यामुळे वरील परिच्छेदातील आज्ञा मराठीत असल्या, तरी त्या केवळ लेख मराठीत असल्याने तशा दिल्या आहेत. 

हा लेख लिहीतेवेळी ॲमेझॉन इकोच्या तब्बल सहा वेगवेगळ्या आवृत्त्या अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यातील इको डॉट हे सर्वांत स्वस्त उपकरण आहे. अमेरिकेत ५० डॉलर्सना उपलब्ध असलेले हे उपकरण भारतात फक्त ३१५० रुपयांत उपलब्ध आहे. या उपकरणात इतर इकोत उपलब्ध असणारे पॉवरफुल स्पीकर नाहीत. यातील स्पीकर कामचलाऊ असून अलेक्‍साने दिलेली उत्तरे नीट ऐकू येतील एवढीच याची क्षमता आहे. या उपकरणाचा मुख्य वापर आवाजी आज्ञा देऊन काम करवून घेण्यापुरता आहे. यावर तुम्ही गाणी लावलीत तर ती चांगली ऐकू येत नाहीत. इको हे या मालिकेतील दुसरे उपकरण. याला नुसते ‘इको’ असेच म्हणतात. यात मात्र चांगल्या क्षमतेचा स्पीकरही आहे. त्यामुळे या उपकरणाचा वापर तुम्ही घरी मोठ्या आवाजात गाणी लावण्यासाठीही करू शकता. हे उपकरण अमेरिकेत १०० डॉलर्सना उपलब्ध असून लवकरच भारतात ते सात हजार रुपयांना उपलब्ध आहे. अमेरिकेत हे उपकरण सहा वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. परंतु भारतात मात्र हे उपकरण तीनच रंगांत उपलब्ध आहे. याची वरची आवृत्ती म्हणजे ‘इको प्लस.’ यात अतिशय उत्तम दर्जाचा ब्लूटूथ स्पीकर आहेच पण त्याशिवाय ॲमेझॉनने यात स्मार्ट हब सॉफ्टेवअरही घातले आहे. अमेरिकेत हळू हळू स्मार्ट हब लोकप्रिय होत आहेत. स्मार्ट हबद्वारे घरातील अनेक स्मार्ट उपकरणांचे नियंत्रण करता येते. फिलिप्स ह्यू बल्बसाठी आतापर्यंत वेगळा हब लागत असे. हा हब इंटरनेटला जोडलेला असे. या हबमुळेच बल्बचे नियंत्रण करता येई. परंतु, ज्यांच्याकडे इको प्लस आहे त्यांना आता हा हब वेगळा विकत घ्यावा लागणार नाही. इको प्लसच या हबचे काम करेल. त्यामुळे अनेक वेगवेगळी स्मार्ट उपकरणे आता इको प्लसमुळे हबशिवाय चालू शकतील. इको प्लस अमेरिकेत १५० डॉलर्सना तर भारतात १०,५०० रुपयांना उपलब्ध आहे. 

या पुढील तीन नवीन इको मात्र फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहेत. इको ‘शो’ नावाच्या या इकोच्या आवृत्तीमधील मोठी सुविधा म्हणजे हा इको इतर इकोप्रमाणे गोलाकार नसून चौकोनी आहे व त्याला चक्क एक ७ इंची पडदा आहे. इको मालिकेतील सर्वांत महाग इको हे असून ते अमेरिकेत २०० डॉलर्सना उपलब्ध आहे. या वर व्हिडिओही पाहता येतात. तसेच याचा सिक्‍युरिटी कॅमेऱ्याचा पडदा अथवा बेबी मॉनिटर म्हणूनही वापर करता येतो. रिंग व आर्लो या दोन प्रसिद्ध सिक्‍युरिटी कॅमेरा उत्पादनांनी इको शो बरोबर आपली उत्पादने वापरता येतील असे म्हटले आहे. या इकोला एक फ्रंट फेसिंग कॅमेराही असल्याने त्याचा व्हिडिओ कॉलिंगसाठीही वापर करता येतो. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने याला एक नवीन पद्धतीचा घरगुती संगणक असे म्हटले आहे. इको स्पॉट याही इकोच्या आवृत्तीला पडदा आहे, परंतु याचा आकार गोलाकार असून हे एका घड्याळाप्रमाणे दिसते. किंबहुना ॲमेझॉन त्याची जाहिरातच तुमच्या गजराच्या घड्याळाच्या बदली इको स्पॉट वापरा अशी करत आहे. याला २.५ इंची व्यासाचा पडदा आहे व फ्रंट फेसिंग कॅमेराही आहे. या इकोचा वापरही सिक्‍युरिटी कॅमेऱ्याचा फीड पाहण्यासाठी व बेबी मॉनिटर म्हणून करता येतो. या मध्ये इको शो प्रमाणे पॉवरफुल स्पीकर नाहीत हा एक मुख्य फरक आहे. इको स्पॉट डिसेंबरपासून अमेरिकेत मिळणार आहे. त्याची किंमत १३० डॉलर्स एवढी ठरवण्यात आली आहे. या मालिकेतील शेवटचे उत्पादन इतरांपेक्षा थोडेसे वेगळे आहे. ‘इको लुक’ असे नाव असलेला हा एक चक्क कॅमेरा आहे. इतर इकोप्रमाणे हा कॅमेरा तुम्हा घरात टेबलावर ठेवायचा. त्याला आवाजी आज्ञा देऊन तुम्ही फोटो व व्हिडिओ काढू शकता. ॲमेझॉनने याची जाहिरात ‘स्टाइल असिस्टंट’ अशी केली आहे. या कॅमेऱ्याचा वापर करून तुम्ही काढलेल्या फोटोमधील कुठला ‘लुक’ तुम्हाला चांगला दिसतो हे मशिन लर्निंग वापरून तुम्हाला हा कॅमेरा सांगू शकतो. यात चार एलईडी लाइटचा फ्लॅश असून यातील स्पीकर तेवढे पॉवरफुल नाहीत. याची किंमत ॲमेझॉनने २०० डॉलर्स ठरवलेली आहे. 

इको स्पीकरचा अजूनही एक महत्त्वाचा फायदा आहे, तो म्हणजे इकोचा वापर करून तुम्ही ॲमेझॉन डॉट कॉम वरून अनेक गोष्टी विकत घेऊ शकता. अर्थात भारतात राहणाऱ्यांना कदाचित हा तेवढा मोठा फायदा वाटणार नाही, परंतु जवळजवळ प्रत्येक अमेरिकन मध्यमवर्गीय व्यक्ती दर आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी ॲमेझॉन डॉट कॉम वरून खरेदी करतेच. त्यामुळे घरातील डिटर्जंट संपला असेल तर इकोला ‘टाइड डिटर्जंट खरेदी कर’ असे म्हटले की तो मागे तुम्ही ऑर्डर केलेला टाइड डिटर्जंट पुन्हा एकदा मागवतो. अर्थात ही सुविधा तुम्ही बंदही करून ठेवू शकता. नाहीतर तुमची मुले तुमच्या नकळत काय वाट्टेल ते खरेदी करू शकतील! 

स्मार्टफोनची बाजारपेठेची वाढ आता मंदावली आहे. त्यामुळे ॲमेझॉन, गुगल या कंपन्या नवनवीन तंत्रज्ञान वापरून नवीन उत्पादनांची बाजारपेठ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. ॲमेझॉनच्या फायर फोनच्या अपयशानंतर ॲमेझॉनला एखाद्या नवीन यशस्वी उत्पादनाची गरज होती. इकोच्या निमित्ताने ॲमेझॉनला हवी असलेली सोन्याची खाण सापडली आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

फोटो फीचर

संबंधित बातम्या