रोल मॉडेल 

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.

‘आजकालच्या मुलांसमोर काही आदर्शच राहिले नाहीत. जिकडं पाहावं तिकडं नाचगाणी करणारी अपुऱ्या कपड्यातली माणसं, नाहीतर निरर्थक बडबड करणारे तथाकथित तज्ज्ञ. आमच्या लहानपणी अवती भवती काय उत्तुंग व्यक्तिमत्त्वं होती!’ बसमधे माझ्या बाजूला बसलेले आजोबा मान हलवत म्हणाले. तिथं असलेल्या काही कॉलेजमधल्या मुलामुलींच्या भाषेकडं आणि केश-वेश-भूषेकडं पाहून असं म्हणावसं वाटलं बहुधा त्यांना. आजोबांचा हेतू नुसता दोषारोप करण्याचा नव्हता, त्यांच्या  डोळ्यांत  अगदी मनापासून वाटणारी काळजी आणि खरीखुरी वेदना दिसत होती.  ‘आजची पिढी काही फारशा योग्य मार्गावरून चाललेली नाही. मागची पिढी आपल्या कर्तव्याला चुकली आणि त्या पिढीला घडवण्यात आम्ही, म्हणजे आमची पिढी कमी पडली.’ अशी काहीशी थोडी पश्चात्तापाची आणि अपराधाची भावनाही होती. 

वरवर पाहता आजोबांनी रंगवलेलं निराशाजनक चित्र पटणारं होतं. पण मानवी इतिहासाचा मागोवा घेतला, तर दिसतं की आपल्या पुढची पिढी योग्य वाटचाल करतेय असं कुठल्याच मागच्या पिढीला वाटत नाही; परिस्थितीमुळं असेल किंवा बदललेल्या दृष्टिकोनामुळं असेल किंवा जीवनशैली न पटल्यामुळं असेल! कोणत्याही देशाच्या भविष्याचं चित्र त्या देशातले बहुसंख्य किशोर आणि तरुण जी दिशा पकडतील त्यावरून ठरतं. किशोरवयीन मुलं पटकन नव्या कल्पनांनी, टोकाच्या व्यक्तिमत्त्वांनी भारून जातात. एकांगी विचार आणि बेफिकिरी ही त्यांची वैशिष्ट्यं त्यांना वाहवत जायला पूरक ठरतात. याची कल्पना असल्यामुळं आजोबांना वाटणारी काळजी अनाठायी नव्हती. त्यामुळं एकूणच ‘रोल मॉडेल’ आणि त्यांचं किशोरवयीन मुलांच्या जीवनातलं स्थान यावर गांभीर्यानं विचार करायला हवा असं वाटायला लागलं. 

सर्वसाधारणपणे ज्या व्यक्ती ‘रोल मॉडेल’ म्हणून गणल्या जातात, त्यांच्यामध्ये काही समान धागे असतात. त्यातल्या बहुतेक व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात पारंगत, प्रसिद्ध आणि यशस्वी असतात. उत्कट,  बांधिलकी जपणारी,  नि:स्वार्थी,  आत्मविश्वासानं परिपूर्ण,  वाटेतले अडथळे लीलया पार करणारी, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वत:चा पूर्णपणे स्वीकार केलेली व्यक्ती बहुधा इतरांवर प्रभाव पडू शकते. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतरांना प्रोत्साहन देणारं असतं. त्यांच्यात चांगलं संभाषण कौशल्य असतं आणि स्वत:च्या मतांशी, विषयाशी ते बऱ्यापैकी प्रामाणिक असतात. आपल्या चुकांची,कमतरतांची त्यांना जाणीव असते. यातले काही लोक असे असतात, की जे सार्वत्रिकरीत्या, जाहीरपणे आदर्श म्हणून मानले जातात. सेलिब्रिटीज,  म्युझिशियन्स,  लेखक,  राजकीय नेते,  उद्योजक,  खेळाडू,  आर्मी जवान, संशोधक  अशा अनेकांचा यात समावेश असतो. शिवाजी महाराजांसारखे रोल मॉडेल्स तर फक्त सार्वजनिकच नव्हे तर कालातीत आहेत.  पेज थ्री सेलेब्रिटीजचं आजकाल खूप पेव फुटलंय. ते असतात आकर्षक, माध्यमांमध्ये सतत दृश्यमान. ग्लॅमर,  साईझ झिरोची क्रेझ अशा बहुधा नकारात्मक परिणाम करणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडून येतात. बहुतेक वेळा हे प्रभाव वरवरचे आणि अल्पकालीन असतात. पण किशोरवयासारख्या संवेदनशील वयात हा अल्पकालीन प्रभावही हाहाकार माजवायला पुरेसा असतो. अर्थात रोल मॉडेल म्हणजे मार्ग दाखवणारा, हात धरून शिष्याला त्यावरून चालवत नेणारा गुरू नव्हे. तो एखाद्याच्या मनात असतो. प्रभाव पाडण्याचा कुठलाही उघड उघड प्रयत्न न करता एखाद्या व्यक्तीवर ज्याचा दूरस्थ परिणाम होतो तो रोल मॉडेल. 

रोल मॉडेल्स कायम ‘काय करावं’ हे सांगणारेच असतात असं नाही. ‘काय करू नये’ हे शिकण्यासाठीसुद्धा मुलं एखाद्या व्यक्तीकडं पाहू शकतात. उदा. एखाद्या मुलीला वजन कमी करायचं असेल, तर काय ‘करायचं’ यासाठी ती एखाद्या अभिनेत्रीला फॉलो करेल आणि आहारात भाज्या-फळं यांसारख्या पोषक पदार्थांचा वापर वाढवण्यासारख्या उपयुक्त गोष्टी करते. काय ‘करायचं नाही’ यासाठी एखाद्या वजन जास्त असलेल्या व्यक्तीला फॉलो करेल आणि तळकट पदार्थ, जंक फूड, व्यायामाचा अभाव अशा ती व्यक्ती करत असलेल्या चुकीच्या गोष्टी टाळेल. दारुड्या वडिलांच्या दोन मुलांची गोष्ट आपल्याला माहितेय. त्यातल्या एकानं वडिलांसारखं वागायचं नाही असं ठरवलं, त्यांना एक नकारात्मक रोल मॉडेल म्हणून स्वीकारलं आणि आयुष्यात यशस्वी झाला. पण त्याच गोष्टीतल्या दुसऱ्यानं मात्र वडिलांच्या वैगुण्यांकडं लक्ष एकवटलं आणि तो त्यांच्यासारखा व्यसनी आणि कफल्लक झाला. रोल मॉडेलकडून कोण काय घेईल आणि त्याचा कसा वापर करेल, हे असं फार व्यक्तिसापेक्ष असतं. नेमकी हीच भीती असते आपल्याला, मुलांनी बरोब्बर नको त्या गोष्टी उचलण्याची! अनेकदा अशा गोष्टी मुलांना खेचून घेतात. याबाबतीत हिंदी चित्रपटांनी फार महत्त्वाची कामगिरी (?) बजावली आहे. प्रेम, नाती, मूल्यसंस्था, छेडछाड अशा अनेक गोष्टींच्या चुकीच्या, साचेबद्ध कल्पना तयार करून त्या सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांनी इतक्या घट्टपणे रुजवल्या की बस. 

दुर्दैवानं एकदा का एखाद्याला सार्वजनिक ‘रोल मॉडेल’ म्हणून मखरात बसवलं, की चाहते त्याला देवत्व बहाल करायला तयारच असतात. मग त्यांच्याकडून चांगुलपणाची अवास्तव अपेक्षा केली जाते.. आणि काही कारणानं त्याला ठेच बसली तर त्यांच्या अनुयायांचा भ्रमनिरास होतो. कधी एखाद्या प्रसिद्ध खेळाडूचं किंवा एखाद्या लोकप्रिय गायकाचं खासगी आयुष्यात पाऊल घसरतं आणि मोठाच हलकल्लोळ माजतो. लान्स आर्मस्ट्रॉंगची ‘इट्स नॉट अबाऊट द बाईक’ ही आत्मकथा आठवतेय? ती वाचून माझ्यासारखे अनेक जण अगदी भारावून गेले होते. कित्येकांनी त्याच्या धडपडीतून प्रेरणा घेतली होती. काही वर्षांनी जेव्हा त्यानं उत्तेजक ड्रग्ज घेतल्याची आणि फसवणूक केल्याची कबुली दिली तेव्हा सगळ्यांनाच फार वाईट वाटलं होतं. सात्त्विक संतापही आला होता. चांगलं वागण्याच्या अशा दबावामुळं प्रसिद्ध व्यक्ती बऱ्याचदा नाखूश असतात या भूमिकेसाठी. १९९३ मध्ये चार्ल्स बर्कले नावाच्या प्रसिद्ध बास्केटबॉलपटूनं नाइके कंपनीची जाहिरात केली होती, ‘I am not a role model!’ अशी. त्याचं म्हणणं असं होतं, ‘बास्केटमध्ये मला बॉल चांगला टाकता येतो याचा अर्थ असा नव्हे की मी तुमच्या मुलांना शहाणं करून सोडण्याची जबाबदारी घ्यावी. मला खेळण्यासाठी पैसे मिळतात, यासाठी नाही.’ त्यावर अनेक उलट सुलट मत-मतांतरं मांडण्यात आली. व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला तर चार्ल्सचं म्हणणं चुकीचं नव्हतं. एका प्रकारच्या कौशल्यात पारंगत झाला याचा अर्थ तो लगेच परिपूर्ण झाला असं कसं होईल? शेवटी तोही एक माणूस आहे. पण सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणून याकडं पाहिलं तर मात्र या प्रसिद्ध व्यक्तींना ही जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. अशा खेळाडू किंवा सेलिब्रिटींचा समाजावर, विशेषतः किशोरवयीन मुलांवर जबरदस्त परिणाम होतो. दीपिका पदुकोण जेव्हा तिच्या नैराश्याच्या आजाराविषयी जाहीरपणे बोलली तेव्हा त्याचा स्वीकार कितीतरी पटींनी वाढला हे आपण नुकतंच अनुभवलं. 

पण नवलाची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा किशोरवयीन मुलांचे ‘रोल मॉडेल्स’ हे इतके काही दूर, अप्राप्य नसतात. ते असतात त्यांच्या आजूबाजूला वावरणारी तुमच्या-आमच्यासारखी मातीच्या पायांची माणसं!  बहुतेक वेळा मुलं ओळखीतले,  परिचयाचे,  जवळचे लोक यासाठी निवडतात. ज्याच्यामुळं प्रेरणा मिळते,  उत्साह येतो, मार्ग दिसतो अशी कुणीही व्यक्ती यात असू शकते;  अगदी एखादा शेजारी, प्रवासात भेटलेली व्यक्ती,  एखादा शाळेत आलेला वक्ता, पाठयपुस्तकातला लेखक... पण सर्वांत महत्त्वाचा प्रभाव पडलेला दिसतो पालकांचा. ‘आदर्श’ व्हायचं की नाही असा पर्याय पालकांना नसतो. ते असतातच मुलांचे आदर्श; परफेक्ट असतात म्हणून नव्हे, तर ते सतत आजूबाजूला वावरत असतात,  मुलांच्या डोळ्यांसमोर असतात आणि मुलांबरोबर सर्वाधिक वेळ घालवत असतात म्हणून नक्कीच! शाब्दिक देवघेवीतून, देहबोलीतून, प्रतिक्रियांमधून काही ना काही संदेश त्यांच्याकडून मुलांकडं जात असतात आणि मुलं ते जाणते-अजाणतेपणे ग्रहण करत असतात. उदा. आपण जेव्हा म्हणतो, ‘ही मुलगी तिच्या वडिलांसारखीच तिरसट आहे.’ तेव्हा त्यात थोड्याफार जनुकीय प्रभावापलीकडं जाऊन रोजच्या रोज वडिलांच्या वागण्याचं केलेलं अवलोकन आणि पुनरावृत्ती असते. ‘नीटनेटकेपणाच्या बाबतीत हा अगदी आईवर गेलाय’ असं विधान करताना त्यातला आईच्या रोजच्या सवयींच्या अनुकरणाचा वाटा कबूल करायला हवा. किशोरवयात  मित्रांचा प्रभाव  तर फार महत्त्वाचा! पण एकुणात असं दिसून आलंय, की हा परिणाम बहुतकरून फक्त तात्पुरत्या आणि वरवरच्या गोष्टींवर होतो (कपडे, खाणं-पिणं,  गप्पा,  म्युझिक), पण मूल्यसंस्था,  शैक्षणिक भविष्य  वगैरेंवर फारसा होत नाही. मित्र आणि पालकांव्यतिरिक्त आजी-आजोबा,   नातेवाईक, शिक्षक, प्रशिक्षक यांचा मोठा वाटा असतो. आपल्यातल्या अनेकांना अजूनही शाळेतले काही शिक्षक आठवत असतील. 

एका बारावीत शिकणाऱ्या माझ्या पेशंटनं माझ्या ज्ञानात मोलाची भर घातली. तो म्हणाला, ‘कायम फक्त एकच एक ‘रोल मॉडेल’ असेल असं नाही. निरनिराळ्या क्वालिटीजसाठी निरनिराळे लोक असू शकतात. बऱ्याचदा ही नावं बदलत राहतात. मी आठवीत होतो तेव्हा क्रिकेटसाठी धोनी माझा ‘आयडॉल’ होता. पण माझं दिव्य अक्षर मात्र आमच्या नाडकर्णी मॅडमचा सुंदर अक्षरातला फळा बघून सुधारलं आणि शर्टची मस्त घडी घालायला मी माझ्या आजोबांचं पाहून शिकलो. आता माझे ‘रोल मॉडेल्स’ वेगळे आहेत. आता मी क्रिकेट बघतच नाही. मला फिजिक्समध्ये प्रचंड इंटरेस्ट आलाय. मी हल्ली रिचर्ड फाइनमनची पुस्तकं वेड्यासारखी वाचून काढतो. आधी फक्त इंग्लिश गाणी ऐकायचो. आताचा माझा रुममेट गझल्स ऐकत असतो सारखा. तर आता शांत, हळू गाणी ऐकायलाही मला आवडायला लागलंय.’ मला अगदी पटलं त्याचं. तसंही कुणीच अगदी हुबेहूब दुसऱ्या व्यक्तीसारखं होऊ शकत नाही. मग त्या त्या व्यक्तीमधल्या फक्त हव्या त्याच क्वालिटीज घ्यायला काय हरकत आहे? तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं गाणं आवडतं नं? मग त्या क्षेत्रात त्या व्यक्तीला फॉलो करा. एखाद्या खेळाडूचं त्याच्या खेळातल्या कौशल्यांसाठी अनुकरण करा. त्याऐवजी ते घेतात म्हणून ड्रग्ज घ्यायचे किंवा त्यांच्यासारखी बेफिकीर जीवनशैली अंगीकारायची किंवा ते घालतात म्हणून चित्रविचित्र कपडे घालायचे इतपतच त्यांचा प्रभाव असेल तर त्यांना ‘रोल मॉडेल्स’ म्हणायचं का? हा प्रश्नच आहे. 

जहाजांना वाट दाखवायला जसे दीपस्तंभ मार्गदर्शक ठरतात (किंवा आजच्या गूगलच्या जमान्यात जीपीएस म्हणूया), तशी आजोबांनी उल्लेखलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वं दिशादर्शक नक्कीच ठरतात. ‘कोणत्याही परिस्थितीतून वर येता येतं, कमतरतांवर अशीही मात करता येते, ध्येय गाठण्याचे हेही मार्ग असू शकतात, हे करणं अशक्य नाही’ असे आश्वासक विचार हे आदर्शच तर देतात आपल्याला. असे आदर्श पुरवण्याची सामूहिक जबाबदारी समाज म्हणून आपल्या सर्वांचीच आहे आणि दैनंदिन जीवनात निकटच्या व्यक्ती मार्ग दाखवतात. शाळेत स्कूटरवर सोडायला चाललेल्या बाबांच्या हेल्मेट वापराकडं, सिग्नल तोडण्याकडं आणि वनवेमधून उलटं जाण्याकडं बारकाईनं लक्ष असतं मुलाचं. घरी कामाच्या मावशींनी दांडी मारली की आईची त्यावरची प्रतिक्रिया टिपत असतात ते. एकमेकांशी भांडण झालं तर आईबाबा ते कसं मिटवतात आणि एकमेकांवरचं प्रेम कसं दाखवतात हेही ते पाहत असतात. एखाद्या घरातले पालक नेहमी कुचाळक्या, चहाड्या करत असतील, इतरांबद्दल कंड्या पिकवत असतील, तर लोकांवर गैरवाजवी टीका करणं स्वीकारार्ह आहे, असा मुलांचा ग्रह होऊ शकेल. म्हणजे प्रेम, आदर, नात्याचं पावित्र्य, आर्थिक नियोजन, नियमपालन, मूल्यसंस्था, सामाजिक वर्तणूक, निरोगी आणि स्वस्थ जीवनशैली, तंत्रज्ञानाचा वापर, ठामपणे ‘नाही’ म्हणण्याची कला अशा कितीतरी महत्त्वाच्या बाबींचे आदर्श रोजच्या रोज समोर दिसणाऱ्या घरातल्या व्यक्तीच असणार. म्हणूनच पालक, शिक्षक, प्रशिक्षक, नातेवाईक यांच्यावर हे अदृश्य दडपण असतं, असायला हवं. याचा अर्थ कधीच, काहीच चुका करायच्या नाहीत असं नाही, त्या होणार आहेतच. पण चूक झाली हे लक्षात येणं, ती कबूल करण्याचं धारिष्ट्य असणं आणि त्यावरून बोध घेता येणं या जमेच्या बाजू समजतात मुलं. 

म्हणूनच म्हटलं जातं, ‘मुलं तुमचं ऐकत नाहीत याची काळजी करू नका, ती सतत तुमचं निरीक्षण करतायत याचं भान ठेवा!’

संबंधित बातम्या