दिसणं आणि असणं

डॉ. वैशाली देशमुख 
सोमवार, 6 जुलै 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे पुण्यातल्या अठराशे मुलांवर केलेल्या संशोधनाचा भाग म्हणून आठवी-नववीच्या मुलांची आम्ही एक चाचणी घेतली. विषय होता ‘शरीरप्रतिमा’ किंवा बॉडी इमेज. भारतात यावर फारसा अभ्यास झालेला नाहीये कारण हे काही तरी पाश्‍चिमात्य फॅड आहे असं मानलं जात असे. पण या अभ्यासातून दिसून आलं, की भारतीय किशोरांनाही ही समस्या भेडसावतेय; फक्त मुलींनाच नव्हे तर मुलांनाही. इतक्या लहान वयात आपण दिसतो कसे याला का बरं इतकं महत्त्व देत असतील मुलं?

खरं तर आपलं शरीर म्हणजे फक्त प्रदर्शनीय वस्तू नसते. ते हालचाल करत असतं, वाढत असतं, श्वास घेत असतं, स्पर्श करत असतं, नाकानं गंध हुंगत असतं, खाद्यपदार्थ चाखत असतं, बदलत असतं. कुठल्याही काँप्युटरला जमणार नाही अशी क्लिष्ट आज्ञावली त्यात भरलेली असते आणि त्याची बिनबोभाट, बिनचूक अंमलबजावणी होत असते. असंख्य गुंतागुंतीच्या, समन्वित क्रिया त्यात घडत असतात... पण शरीर म्हटल्यावर यातलं काही आठवतच नाही. आठवतं ते फक्त त्याचं दिसणं!

या विषयातला संशोधकांचा रस गेल्या तीन एक दशकांतला. अतिवजनाचं, बदलत्या जीवनशैलीचं, खाण्याबाबतच्या विकृतींचं आणि या साऱ्याच्या होणाऱ्या परिणामांविषयीचं भान जसजसं यायला लागलं, तसतशी याबाबत जागृती होऊ लागली. आपल्या शरीराचा आकार, माप, रंग, पोत आणि भाग यांकडं बघण्याची आपली दृष्टी, त्याबद्दलचे विचार, भावना आणि त्याबाबतच्या कृती अशा सगळ्या गोष्टींचा शरीरप्रतिमेमध्ये अंतर्भाव होतो. ती सतत बदलती, वाहती असते. वयोमानानुसार, बाह्य परिणामांनुसार आणि परिमाणांनुसार त्यात बदल होतो. शरीरप्रतिमेला अनेक घटक जबाबदार असतात. घरातलं वातावरण, शारीरिक व्यंग, दोस्तमंडळींच्या कल्पना, समाजमाध्यमं, सांस्कृतिक पार्श्वभूमी वगैरे. याव्यतिरिक्त ‘वयात येणं’ हाही एक महत्त्वाचा घटक असतो. वयात येताना संप्रेरकांच्या प्रभावामुळं शरीराच्या बाह्य आकारात लक्षणीय बदल होतात. उंची आणि वजन भराभर वाढतं. चेहऱ्याची ठेवण बदलते, त्याचा निरागसपणा जाऊन चेहरा प्रौढ, परिपक्व दिसू लागतो. मुलींच्या शरीरातलं मेदाचं प्रमाण वाढतं. त्यांची कंबर रुंद होते. स्तन-पेशींची वाढ होते. मुलांच्या शरीरातले स्नायू अधिक मजबूत आणि पिळदार होतात आणि त्यांचे खांदे रुंदावतात. चेहऱ्यावर दाढीमिशा, पिंपल्स यायला लागतात. अंगावर, छातीवर केस येतात. बाह्य जननेंद्रियांचा आकार वाढतो. या साऱ्यामुळं शरीराच्या ठेवणीत बदल होतो, त्याची ढब बदलते. हे शरीर मुला-मुलींसाठी अनोळखी असतं. बरं, हे बदल हळूहळू झाले तर फारसे लक्षातही येणार नाहीत. पण अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत एका लहान मुलाचं रूपांतर प्रौढ स्त्री किंवा पुरुषात होत असल्यामुळं त्यांचा वेग जाणवण्याइतका असणारच. शरीराच्या एका अवस्थेशी जुळवून घेतात ना घेतात, तोच ते पुन्हा बदललेलं असतं; त्यामुळं शरीराविषयी एक अवघडलेपण असतं, नाखुशी असते.

संप्रेरकांच्या प्रभावामुळं आणि मेंदूच्या वाढीच्या विशिष्ट टप्प्यामुळं मुलं-मुली एकमेकांकडं आकृष्ट व्हायला लागतात. निसर्गाची त्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीनं ही तयारी असते. कुणाविषयीही आकर्षण वाटण्याचा पहिला मुद्दा असतो बाह्यस्वरूप. अंगभूत गुण, वर्तणूक, बुद्धिमत्ता, कला, चातुर्य या सगळ्या गोष्टी नात्यात येतात त्या नंतर... आणि म्हणून या वयात इतरांच्या दृष्टीतून आपण कसं दिसतो याला खूप महत्त्व दिलं जातं. ‘पुरे कर तुझं ते आरशात बघणं, फुटेल आता तो आरसा!’ अशी वाक्यं ऐकलेली तुमच्यातल्या बऱ्याच जणांना आठवत असतील.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माध्यमांमधल्या प्रतिमांचा मारा! यात दाखवल्या गेलेल्या अवास्तव शरीरप्रतिमांचं अनुकरण करणं म्हणजे विस्तवाशी खेळ केल्यासारखं असतं. विशेषतः किशोरवयीन मुला-मुलींमध्ये यामुळं गैरसमज निर्माण होतात. आपण त्या प्रतिमांसारखं दिसायला हवं, मगच आपण यशस्वी आणि आनंदी होऊ असं त्यांना वाटू लागतं. शिवाय या जाहिरातींमुळं आणि सौंदर्यविषयक सल्ल्यांमुळं असा समज होतो, की प्रयत्नांती प्रत्येकाला असं दिसणं शक्य आहे, फक्त योग्य सौंदर्यप्रसाधनं वापरण्याची खोटी! अर्थात असं काही होत नाही. मग आपल्यातच काहीतरी कमतरता आहे असं वाटायला लागतं. त्यातूनच नकारात्मक स्व-प्रतिमेचा जन्म होतो. या अशा नकारात्मक विचारांचे परिणाम फार भयानक होतात. उदा. अॅनोरेक्सिया, बुलिमिया सारखे खाण्याचे आजार, न्यूनगंड, नैराश्य, वजन कमी करण्यासाठी केलेले अघोरी उपाय, लठ्ठपणा, भावनिक चढउतार आणि शैक्षणिक अधोगती. शिवाय ज्या मुला-मुलींना आपल्या दिसण्याविषयी गंड असतो, ते रोमँटिक नात्यात पडायला अति-उत्सुक असतात, भोळेपणानं त्यात पटकन फसूही शकतात. आपणही कुणाला तरी आवडतो हे यातून सिद्ध करता येईल असं त्यांना वाटतं.

अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की टीव्ही, काँप्युटर, सोशल मीडिया, इंटरनेट यांच्यासमोर घालवण्यात आलेला वेळ जितका अधिक, तितकं नकारात्मक शरीरप्रतिमा तयार होण्याचं प्रमाण अधिक! अॅनी बेकर यांनी फिजी देशात १९९५ मध्ये टीव्ही येण्याआधी आणि तो आल्यानंतर तीन वर्षांनी काही मुलींकडून शरीरप्रतिमेवर एक प्रश्नावली भरून घेतली. त्यात शरीराकडं बघण्याच्या दृष्टिकोनात, आहाराच्या सवयींमध्ये आणि वजनविषयक कल्पनांमध्ये कमालीचा फरक झालेला आढळला. असेच निष्कर्ष म्युझिक व्हिडिओज बघणाऱ्यांमध्येही आढळून आलेत. सेल्फी आणि सोशल मीडिया यांमुळं तर आपली खरी-खोटी प्रतिमा आकर्षकपणे लोकांसमोर मांडणं आवश्यक वाटायला लागलंय मुलांना.

मुलांमध्ये माध्यमांबरोबरच पारंपरिक पुरुषप्रतिमेचा आणि पुरुषत्वाच्या वृथा कल्पनांचा पगडा असतो. त्यासाठी बॉडी बिल्डिंग करावंसं वाटतं, व्यायाम-आहार यांवर काटेकोरपणे ध्यान दिलं जातं. बघायला गेलं तर तसं करणं काही वाईट नव्हे, उलट स्नायू आणि हाडं मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहे. पण ते जर फक्त मर्दपणाच्या कल्पनांनी केलेलं असेल तर मात्र ते विकृतीकडं झुकू शकतं. अशा विचारसरणीचे परिणाम फक्त शरीरावरच नव्हे, तर वर्तणुकीवर आणि भावनांवरही होतात. मुलांची बौद्धिक वाढ खुरटते, ती असहिष्णू होतात, त्यांच्या प्रतिक्रिया अधिक उग्र, अधिक हिंसक होण्याची शक्यता वाढते. शिवाय ते सिक्स पॅक्स, ते गोटीबंद दंड मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागते, जो संयम लागतो; त्याचा पत्ताच नसतो. मग फटाफट चमत्कार दाखवणाऱ्या पावडरी आणि पूरक पदार्थांचा वापर करण्याचा शॉर्टकट हवाहवासा वाटणार नाही तर काय! त्यांच्या साईड इफेक्ट्सकडं सोईस्कर डोळेझाक केली जाते. शहरांमधल्या मोक्याच्या जागांवर टिच्चून उभी राहिलेली शक्तिवर्धक पावडरींचा पुरवठा करणारी दुकानं पाहून थक्क व्हायला होतं आणि त्यांच्या डोळे पांढरे करणाऱ्या किमती ऐकून झीट येते.

अनेकदा जाता येता सहजपणे मुलांना त्यांच्या दिसण्यावरून वेगवेगळी विशेषणं आणि संबोधनं सर्रास वापरली जातात. कितीतरी घरांमध्ये मुलांना/मुलींना अशी हिणवणारी टोपणनावं असतात. खरं तर एखाद्याला वजनावरून, दिसण्यावरून चिडवणं त्या व्यक्तीसाठी खूप वेदनादायी असू शकतं. मोठं होऊन, घरातून बाहेर पडल्यावरही मुलं ते विसरू शकत नाहीत, त्या जखमा आयुष्यभर मनात वागवतात. न्यूनगंडाच्या न पेलवणाऱ्या ओझ्याखाली दबून जातात. मानसिक आजारांना, नैराश्याला तोंड देतात. नकारात्मक विचारांनी खचून जातात. त्यावर अघोरी उपाय करायला जातात. त्याचा परिणाम मग मैत्रीवर, नात्यांवर, शैक्षणिक कामगिरीवर, करिअरवर होतो. प्रत्येकाला स्त्री-पुरुष, गोरा-काळा, उंच-बुटकी, सुंदर-कुरूप अशा मोजमापांनी वर्णण्याआधी केवळ एक व्यक्ती म्हणून का नाही पाहता येत आपल्याला? एखाद्याची विनोदबुद्धी, एखाद्याची समयसूचकता, कुणाची मदत करण्याची वृत्ती किंवा टापटीप; अशा गोष्टींपेक्षाही दिसण्याविषयीची टिप्पणी आधी का बरं केली जाते? एखाद्या बास्केटबॉल खेळणाऱ्या मुलीची ताकद तिच्या शारीरिक चपळाईत असते. पण स्तुती करताना याचा उल्लेख न करता ‘वॉव, काय क्युट दिसतेस तू खेळताना!’ किंवा ‘काय मस्त लांबलचक पाय आहेत गं तुझे! लकी आहेस, पायघोळ गाऊन्स भारी दिसतील तुला!’ म्हटलं तर शरीराच्या अवयवांच्या कामापेक्षा त्यांच्या दिसण्याला अनावश्यक महत्त्व दिलं जातं. सौंदर्याच्या कल्पना लहानपणापासून आपल्या मनावर बिंबलेल्या असतात. आपण त्याच पुढच्या पानावर नेतो आणि हे दुष्टचक्र सुरू राहतं. ‘ए, तू नथ नको घालूस, नाक बघ आधी तुझं!’ ‘त्याला नका रे काही सांगू, त्या टिंग्याला काय कळणार?’ ‘सोहम, तू उंच आहेस, तू राजा हो नाटकात.’ ‘आई गं, नेमकी वाढदिवसाच्या दिवशीच ही मोठी पिंपल यायची होती तुला!’ ‘ती गोरी आहे ना, तिला काहीही शोभतं.’ ‘आपण तुझ्यासाठी छान उंच नवरा शोधू हं!’ ‘अगं अगं, उन्हात नको जाऊस, काळी पडशील.’

कधीकधी पालक अगदी थेट काही बोलले नाहीत, तरी सूक्ष्म इशारे काफी असतात. उदा. तुमची एखादी मैत्रीण वाटेत भेटते आणि तुम्ही उत्स्फूर्तपणे म्हणता, ‘अगं केवढी बारीक झालीयस! मस्त दिसतेयस.’ अशा छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम साठत जातो आणि मुलं हळूहळू आपल्या आणि इतरांच्या शरीराकडं वेगळ्या दृष्टीनं पाहू लागतात. आपण कसे आहोत याबाबतीतलं हे त्यांचं स्वत:चं आकलन किंवा समज असल्यामुळं प्रत्यक्षातल्या असण्याचा आणि वाटण्याचा तसा अर्थाअर्थी संबंध नसतो. त्यामुळं त्यांचं म्हणणं खोडून काढलेलं त्यांना पटत नाही.

शरीरप्रतिमेवर असलेला माध्यमांचा पगडा बघता मध्यमसाक्षरतेची आज कधी नव्हे इतकी गरज भासू लागलीय आणि त्यासाठी आवश्यक आहे संवाद! हा संवाद अनेक आघाड्यांवर, अनेक प्रसंगांत आणि अनेक वेळा करावा लागणं ओघानं आलंच. त्याचे विषय अनेक असू शकतात- माध्यमांतल्या प्रतिमांमागची वस्तुस्थिती, खऱ्या-खोट्याची शाहानिशा, प्रत्येकाचं युनिक असणं, इतरांशी तुलना न करणं, चराचरातली विविधता, लिंगभाव, पूर्वग्रह. शिवाय वयात येताना होणाऱ्या बदलांविषयी, त्यांच्या तफावतींविषयी माहिती देणं; मुलांचा आत्मसन्मान जागवणं; स्वत:च्या कौशल्यांबद्दलचा आत्मविश्वास वाढवणं; छंद, खेळ आणि व्यायामासारख्या उत्पादक कृतींमध्ये त्यांना गुंतवणं अशा अनेक गोष्टी त्यांना शरीरप्रतिमेच्या खोट्या कल्पनांपासून दूर ठेवतात.

एका साबणाच्या जाहिरातीत म्हटलंय, की खऱ्या सौंदर्याविषयी आपल्या मुलांशी बोला, माध्यमांनी डोक्यात काही भरवून देण्याआधी बोला. एकदा का मुलांच्या डोक्यात शरीराबाबतच्या विकृत कल्पना घट्ट पाय रोवून बसल्या, की मग त्या धुऊन काढणं फार कठीण असतं. आपण कसं दिसावं अन कसं असावं याचा चोहोबाजूंनी जो मारा सुरू असतो, त्यावर उपाय म्हणून ‘बॉडी पॉझिटीव्हीटी’ किंवा सकारात्मक शरीरप्रतिमेची चळवळ सुरू झाली. म्हणजे आपल्या शरीराविषयी लाज वाटून न घेता ते जसं आहे तसा त्याचा स्वीकार करायचा. हे करणं आवश्यक आहेच पण त्याचबरोबर समाजाच्या सौंदर्याच्या ताठर चमत्कारिक धारणा बदलायचाही बरोबरीनं प्रयत्न करायला हवा. वैयक्तिकरीत्या आपणही या दिशेनं पावलं उचलू शकतो. उदा. नकळत असे संदेश आपल्याकडून जात नाहीयेत ना हे पाहूया. जेवणाच्या टेबलवर आपण काय बोलतो याकडं जाणीवपूर्वक लक्ष देऊया. योग्य आहार आणि व्यायाम आपण चांगलं दिसण्यासाठी नव्हे, तर फिट राहण्यासाठी करतो हे मुलांपर्यंत पोचवूया. स्वत:च्या दिसण्यापेक्षा स्वतःमधल्या कौशल्यांचा अभिमान बाळगूया आणि हीच गोष्ट इतरांच्या बाबतीतही, त्यांच्या अनुपस्थितीतसुद्धा (म्हणजे गॉसिप न करता) अमलात आणूया.

बाह्यसौंदर्याविषयीचे आपले विचार, भावना आणि वर्तन यात सकारात्मक बदल करणं म्हणजेच सकारात्मक शरीरप्रतिमा. दिसणं आणि असणं यातला फरक आपल्या मुलांपर्यंत पोचला, तर त्यांना प्रभावी, समाधानी आणि उत्पादक जीवन जगायला नक्की मदत होईल.

संबंधित बातम्या