प्रिय टीनएजर... 

डॉ. वैशाली देशमुख 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.

प्रिय टीनएजर, 
इतके दिवस या स्तंभातून आईबाबांशी बोलत होते, आज मात्र तुझ्याशी थेट संवाद साधायचं ठरवलं. माझ्या कामाच्या निमित्तानं तुझ्यासारख्या अनेक मुला-मुलींशी माझी गाठ पडते, तेव्हा अनेक विचार येतात. कधी मनात रेंगाळत असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, थोडेफार प्रश्न नव्यानं उभे राहतात. काही पूर्वग्रह धुतले जाऊन मन स्वच्छ होतं. मनात गोंधळ तर खूप असतो तुझ्या, त्यामुळं तुझ्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे हे कळतंय, त्याचबरोबर ते किती अवघड आहे याचाही अंदाज येतोय. म्हणून हा पत्रप्रपंच. 

तुमच्या आईवडिलांशी आम्ही जेव्हा कार्यशाळांत बोलतो, तेव्हा सगळ्यात आधी काय करतो माहितेय? डोळे मिटून त्यांच्या किशोरवयाची सफर करून येतो. मोठं होण्याच्या नादात आम्ही आमच्या वयाचा तो जादुई टप्पा पार विसरून गेलेलो असतो. त्यावेळची धम्माल, आवडीनिवडी, राग-लोभ, ती हुरहूर, उत्सुकता, उत्साह आणि भीती, अनिश्चितता यातलं काही आठवत नसतं. पण विस्मरणात गेल्यासारखं वाटलं तरी मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात ते सगळं जपून ठेवलेलं असतं. डोळे मिटले की झरझर आठवतं. चेहऱ्यावरचे भाव बदलतात. इथंच आमचं निम्मं काम होऊन जातं. तुम्ही जसे आहात, ते का आणि कसे, याची थोडीफार कल्पना आरशात पाहिल्यासारखी त्यांना स्पष्ट व्हायला लागते. 

तुमच्यासमोरची आव्हानं काही कमी नाहीत याची कल्पना आहे आम्हाला, त्यातली काही उत्साहवर्धक आहेत तर काही घाबरवून सोडणारी. सगळ्यात मोठं आव्हान आहे वेग. नवनवीन शोध म्हणू नका, फॅशन म्हणू नका की अभ्यासक्रम, सतत बदल होत असतात. अगदी तुमचं स्टेटससुद्धा २४ तासांनी आपोआप जातं. कुठल्याही प्रवेशपरीक्षेला जागा कमी आणि उमेदवार फार अशी स्थिती असते. मार्क्सचे कट-ऑफ्स काहीच्या काहीच वाढलेत. त्याचबरोबर जागतिकीकरणामुळं सगळी दुनिया तुमचं स्वागत करतेय. बोटाच्या टोकावर जग आलंय. कॉम्प्युटर्स, इंटरनेट यांनी तुमचं आयुष्य एकशे ऐंशी अंशातून फिरलंय.. आणि त्यामुळंच आईबाबांच्या आणि तुमच्या बालपणात जमीन-अस्मानाचा फरक पडलाय. तुमचे खेळ, वेळापत्रक, विरंगुळ्याचे प्रकार, इतकंच नव्हे तर मैत्री, प्रेम हेही खूप वेगळं आहे. या सगळ्याचा अर्थ काय लावायचा, हे जे घडतंय ते चांगलं की वाईट याबाबत तुमच्या आधीची पिढी काहीशी संभ्रमात पडलीये. वैद्यकक्षेत्रात जेव्हा कुठलंही नवीन औषध किंवा लस येते, तेव्हा त्याचा काटेकोर अभ्यास केला जातो, सुरक्षितता तपासली जाते; आधी प्रयोगशाळेत, मग प्राण्यांवर आणि शेवटी मानवी स्वयंसेवकांवर. पुरेसा काळ गेल्यावर आणि पुरेसा अनुभव गाठी जमा झाल्यावर मगच प्रत्यक्ष पेशंट्सवर त्याचा वापर केला जातो. त्या प्रक्रियेनुसार जायचं म्हटलं तर तुमची ही आधुनिक जीवनशैली, त्यातलं गॅजेट्सचं महत्त्वाचं स्थान हे सगळं खूप नवीन आहे. त्याचे तात्पुरते आणि दूरगामी परिणाम काय होणार याची कुणालाच कल्पना नाही. या परिणामांची चिंता फक्त आईबाबांनाच नव्हे तर वैज्ञानिकांना, डॉक्टर्सना आणि शिक्षणतज्ज्ञांनाही पडली आहे. आभासी जगातला हा वेळ तुमचे खऱ्या आयुष्यातले जिवंत क्षण हिरावून घेतोय की काय? पुढची पिढी अधिकाधिक स्वकेंद्रित होतेय की काय? आणि त्यामुळंच मानसिक आजार वाढीला लागलेत की काय? नात्यांसकट सगळंच फार उथळ, तकलुपी होत चाललंय की काय? 

पण जरी असा सगळा जमाना बदलत असला, तरी मूळ नैसर्गिक घटनाबदल आईबाबांमध्ये जसे घडले तसेच मुलांमधेही घडतायत, त्यांच्यात युगं लोटली तरी फरक पडलेला नाही. अजूनही आईबाबा मुलांवर तितकंच निःस्पृह प्रेम करतात. प्रत्येकाचा जनुकीय नकाशा किंवा जेनेटिक मॅप ठरवल्याप्रमाणे गोष्टी अमलात आणतो. त्यानुसार वेळ झाली की शरीरात, जननसंस्थेत बदल व्हायला सुरुवात होते. बालिश मेंदू परिपक्व होत जातो, जबाबदारी घ्यायला लागतो. भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटायला लागतं. मोठ्या लोकांनी आपल्यावर आता जरा विश्वास टाकावा, आमचे निर्णय आम्हाला घेऊ द्यावेत, सल्ले देणं बंद करावं असं काय काय मनात यायला लागतं. भावना अनावर होतात, चिडचिड होते. कधी फटकन बोलल्याचा नंतर पश्चात्ताप होतो. 

अनेक अभ्यासांमधून सिद्ध झालंय, की तुमच्या वयासारखाच तुमचा मेंदू विकासाच्या एका अडनिड्या टप्प्यावर पोचलाय. शिवाय हा विकास प्रत्येकाच्या बाबतीत निरनिराळा आणि बदलता, गतिमान आहे. या वयात एखाद्या घटनेकडं तुम्ही अगदी सरळपणे बघता. त्यातल्या खाचाखोचा, कारणमीमांसा, परिणाम हे तुमच्या नजरेच्या, विचारांच्या टप्प्यात येत नाहीत. मुलं आणि पालक यांचा वयोगट वेगळा, ध्येयं वेगळी, आव्हानं निराळी आणि प्राधान्यक्रम निराळा. तुमच्याकडं असतं कुतूहल, उत्सुकता, धाडस, ताकद आणि एक प्रकारची बेफिकिरी. तर पालकांच्या पोतडीत असतात अनुभव, संयम, शहाणपण, अधिकार आणि आर्थिक नाड्या! साहजिकच एकाच प्रसंगाला तुम्हा दोघांच्या प्रतिक्रिया दोन टोकांच्या असू शकतात. समजा एका मुलीला एका मुलानं रात्री कॉफी प्यायला बोलावलं. आई-बाबा बहुधा नकार देतील. ते आधी त्यातल्या संभाव्य धोक्यांवर लक्ष केंद्रित करतील. त्यांचा निर्णय तिला पटेल का? बहुधा नाहीच. तिला नक्कीच वाटणार, की ते सुतावरून स्वर्ग गाठतायत. परिणामी ती चडफडत गप्प बसेल किंवा आईबाबांचा निर्णय धुडकावून लावेल. बरं, त्याचे जे काही परिणाम होतील ते योग्य प्रकारे हाताळणं तिच्या मेंदूच्या क्षमतेबाहेर असेल. तिथं तिला त्यांची मदत लागेल, पण तेव्हाही त्यांचे निर्णय पटतीलच असं नाही. खरं तर एकदम टोकाची भूमिका न घेता मधला मार्ग काढण्याचा दोघांनी प्रयत्न करायला हवा, पण बहुधा असं होत नाही. उलट अशा प्रसंगांमधून अविश्वास आणि कटुत्वाची पेरणी होत राहते. 
 

या सगळ्या गोंधळात भर म्हणून तुमच्या मेंदूत निरनिराळ्या विचारांची सरमिसळ चालली आहे. ‘मी कोण. माझं काम काय, माझ्या जन्माला येण्याचा उद्देश काय, माझं नक्की स्थान काय?’ असे काही अगदी मूलभूत प्रश्न तुम्हाला पडतायत. नियम आणि कायदे पाळण्याच्या बाबतीत तुम्ही नाखूष असता. हा तुमचा दोष नव्हे, ही मानवी प्रवृत्ती आहे. पण मेंदूतले बदल अतिशय गतिमान आणि व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे हे कायदे आणि नियम तुमच्या बाबतीत बनवणं म्हणजे आव्हानच! सोळा वर्षांची दहा मुलं-मुली घेतली तर त्यांच्या आकलनात; भावनांवर, विचारांवर ताबा ठेवण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेत-कुवतीत जमीन-अस्मानाचा फरक असतो. मग वयाची सीमारेषा कशी ठरवायची? नियम न पाळावेसे वाटण्याला आणखी एक कारण असतं. काही वेळा कुठलीही गोष्ट करण्याच्या परिणामांची, दुष्परिणामांची कल्पना तुम्हाला नसते.. आणि काही वेळा असते पण आपल्याला यातलं काही होणार नाही अशी उगाचच खात्री असते. ‘स्कूटर कोण कोण चालवतं?’ या प्रश्नाला हायस्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांपैकी जवळ जवळ निम्म्या मुलांचे हात वर जातात. अठरा वर्षांच्या खाली लायसन्स मिळत नाही, लायसन्सशिवाय गाडी चालवणं हा गुन्हा आहे, पकडले गेलो तर आईबाबांना शिक्षा होईल, हे सगळं त्यांना माहीत असतं, पण वळत नसतं. सध्या चालू असलेला कोरोना विषाणूचा उद्रेक पाहा. ‘सामाजिक विलगीकरण करा’ असा कानीकपाळी उद्‍घोष होत असूनही अनेक तरुणांना अजूनही वाटतंय की त्यांना काही होणार नाही. त्या नादात बंधनं धुडकावून लावली जातात. ऑस्ट्रेलियाच्या बोंडी बीचवरची गर्दी, न्यूझीलंडमधल्या युनिव्हर्सिटीमधला विद्यार्थ्यांचा जमाव, अमेरिकेतल्या कोरोना पार्ट्या आणि आपल्या आजूबाजूची कोपऱ्या-कोपऱ्यावर रेंगाळत असणारी तरुणाई याची साक्ष देते. 

हे असं सगळं तुम्हाला होतंय म्हणजे काळजी करण्यासारखं कारण नाही. तुम्ही पौगंडावस्थेच्या प्रक्रियेतून जात आहात इतकंच. मघाशी आपण उल्लेख केला तसा तुमच्या आयुष्यातला खरंच एक जादुई कालखंड चालू आहे. तुम्ही समाजाचा स्वतंत्र अन जबाबदार घटक होताय. फक्त स्वतःचीच नव्हे तर तुमच्यावर अवलंबून असलेल्या इतरांचीही काळजी घेण्याची क्षमता विकसित करताय. नव्या कल्पनांना, नव्या आव्हानांना तुम्ही बेधडकपणे भिडू शकताय. अडथळ्यांची चिंता न करता उज्ज्वल भविष्याची स्वप्नं बघताय. आत्यंतिक स्पर्धा असली तरी त्याबरोबरच तुमच्यासाठी कितीतरी नवीन मार्ग खुले झालेत. करिअरबाबत पूर्वीइतकी ताठरता राहिलेली नाही. उपजीविकेचे कितीतरी नवनवीन व्यवसाय करून बघायची तुमची आणि करू द्यायची पालकांची, तयारी आहे. एका शाखेत शिक्षण घेतलं तरी त्याचा इतर शाखांत/व्यवसायांत प्रभावीपणे वापर करता येतो याची कल्पना आल्यामुळे नोकरी-व्यवसायाचे रूळ सहजपणे बदलले जातायत. नकोशा कामात आयुष्यभर अडकून राहायची भीती कमी झालीय. अनंत शक्यता तुमच्यासमोर पायघड्या पसरून उभ्या आहेत. 

हे लक्षात ठेवूया की जग अनेक प्रकारच्या व्यक्तींनी, घटनांनी, अनुभवांनी बनलंय. बऱ्यासोबत बुरे अनुभव येणार, भल्या माणसांप्रमाणेच वाईट माणसांशीही गाठ पडणार. हवंहवंसं प्रेम जसं मनाला उभारी देणार तशीच नकाराची, ब्रेक-अपची नकोशी देणगीही स्वीकारावी लागणार. आशेच्या चमकदार उन्हासारखे कधीतरी निराशेचे, दुःखाचे काळे ढगही दाटून येणार. यशाच्या गोडव्याबरोबर अपयशाचे, पराभवाचे कडूझार घोट गिळायला लागणार. पण तुम्हाला माहितेय, अशा नकारात्मक घटनांचं महत्त्व फार मोठं असतं. आपल्या मेंदूला, विचारांना कणखर करायला त्या फार उपयोगी पडतात. शिवाय त्या तात्पुरत्या, क्षणिक असतात हे विसरायचं नाही. नकारात्मकतेच्या गर्तेत गुंतून पडायचं नाही. पुढं जात राहायचं, जरूर वाटेल तिथं मदत मागायला संकोचायचं नाही. त्यात कोणताही कमीपणा नाही.. आणि तुम्ही ते नक्की कराल. सध्याच्या विचित्र, अभूतपूर्व परिस्थितीला तुम्ही ज्या धीरानं आणि सहजतेनं सामोरे जाताय त्यावरून याची खात्री वाटतेय. तुमचं आणि पर्यायानं मानवजातीचं भविष्य आश्वासक आणि आशादायक होण्यासाठी ही समंजस हाताळणी नक्कीच उपयोगाला येईल.

संबंधित बातम्या