प्रेमाच्या गावा जावे?  (उत्तरार्ध)

डॉ वैशाली देशमुख 
सोमवार, 14 डिसेंबर 2020

आजकालची मुलं
सर्व स्तरांतील टीनएनर्जना अनेक प्रश्‍न भेडसावत असतात. प्रत्येकाचे प्रश्‍न निराळे. ते काय असतात? त्यांना उत्तरं असतात का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? जाणून घेऊया.
डॉ. वैशाली देशमुख

सुनीताची आज घालमेल चालू होती. नुकत्याच कॉलेजमध्ये जायला लागलेल्या लेकीचा, मनवाचा, फोन तिनं सहज घेतला तर त्यात तिला तिच्या एका मुलाबरोबरच्या चॅट्स दिसल्या. ‘आपली लेक एवढी मोठी झाली? आत्ता कुठे शाळेतून कॉलेजला जायला लागली आहे, आणि एवढ्यात हे असं? कोण कुठला मुलगा आहे कोण जाणे. काहीतरी गुंड, व्यसनी असला तर? अशा मुलांकडे मुली फार लवकर आकर्षित होतात म्हणे. काय बरं करावं? त्याच्या घरच्यांना भेटावं का? नाहीतर आपण आपलं मनवाला सरळ सांगून टाकू, की बंद कर हे सगळं. पण ती ऐकेल का? आणि तिनं नाही म्हटलं आणि त्यानं डूख धरून ठेवला तर?’ विचार कर-करून सुनीताचं डोकं भंजाळून गेलं. कधी एकदा संध्याकाळी तिचा बाबा घरी येतोय आणि त्याला हे सगळं सांगतेय असं तिला झालं.

एखाद्या लोहचुंबकाकडे आकर्षिलं जावं तशी किशोरवयात आणि तारुण्यात मुलं प्रेमाकडे खेचली जातात, त्यात वाहवत जातात आणि स्वत:ला रोखायला असमर्थ ठरतात. या वयात प्रेमात पडणं काहीसं अपरिहार्य आणि निसर्गसुलभही असतं. मूलभूत भावना जरी बदललेली नसली तरी काळानुसार हे प्रेम दर्शवण्याच्या, टिकवण्याच्या आणि निभावण्याच्या पद्धतींमध्ये बदल होत गेलेले आपण पाहतो आहोत. पालक म्हणून ही भावना कशी हाताळावी, त्याकडे दुर्लक्ष करावं की त्याला प्रोत्साहन द्यावं की त्याला विरोध करावा? दुर्लक्ष केलं तर एक प्रकारे त्याला मान्यता दिली असा समज नाही का होणार? बरं विरोधाचा फारसा काही उपयोग होत नाही हेही आपण जाणून असतो. 

पौगंडावस्थेतल्या मुलांच्या आरोग्यावर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी अर्थातच यावर बराच काथ्याकूट केलाय, कारण हा विषयच इतका व्यापून टाकणारा आहे. किशोरवयीन मुलं वरवर एखादी समस्या घेऊन येतात - शैक्षणिक अधोगती, नैराश्य, वर्तणूक समस्या, एकलकोंडेपणा, अगदी व्यसनसुद्धा. पण अनेकदा त्यापाठीमागे आकर्षण, प्रेम, ब्रेक-अप असं काही असल्याचं दिसून येतं. ही भावना अत्यंत तीव्र असते आणि मुलांना ती हाताळणं फार आव्हानात्मक वाटू शकतं. यावर मोकळेपणी बोलणं होत नाही, अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात. त्यामुळे गैरसमज होतात.

घरी यावर जे उपाय केले जातात ते ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशा प्रकारचे. ब्लेम गेम खेळला जातो, आरोप-प्रत्यारोप केले जातात. टोकाची बंधनं घातली जातात. मोबाईल काढून घेतला जातो. उठता-बसता हाच विषय चघळला जातो. सतत संशयानं पाहिलं जातं. घरातलं वातावरण अगदी बिघडून जातं. त्या मुलाला किंवा मुलीला घरातले सगळे लोक शत्रू आहेत, आपल्या  

विरुद्ध आहेत असं वाटायला लागतं. परिणामी ते अधिकच त्या व्यक्तीकडे ओढले जातात. कारण या सर्व प्रकारात गोड बोलणारी, आधार देणारी ती एकमेव व्यक्ती असते. स्वातंत्र्यावर बंधनं घातल्यामुळे मनात बंडखोर विचार येतात, मनातून आईवडिलांचा राग भरून राहतो. सणकी विचार असल्यामुळे तिरीमिरीत काहीतरी चुकीचे, नंतर पश्चात्ताप होईल असे, निर्णय घेतले जातात. याची काही उदाहरणं म्हणजे घरातून पळून जाणं किंवा अठरा वर्षं पूर्ण झाल्या-झाल्या लग्न करून टाकणं. 

प्रेमाविषयीच्या संकल्पना स्पष्ट करणं ही एक प्रक्रिया आहे. त्याविषयीच्या आपल्या मनातल्या कुशंकांचे अडथळ्यांचे डोंगर पार करणं काही सोपं नाही. पण या विषयाची स्पष्टता येणं हे महत्त्वाचंही आहेच. माध्यमांमधल्या आणि इतरत्र दाखवल्या जाणाऱ्या (मग ते व्हॅलेंटाइन डेज सारखे दिवस असोत, नात्यांच्या वाढदिवसाची प्रदर्शनं असोत की सुजवटलेले लग्नसमारंभ असोत) प्रेमाच्या उग्र स्वरूपावर उतारा आपल्यालाच काढावा लागणार. ‘प्रेम-मैत्री-आकर्षण’ हा किशोरांबरोबरच्या कार्यशाळांमधला एक अत्यावश्यक विषय असतो. त्यात जाणीव होते ती म्हणजे या सगळ्यांमधल्या सीमारेषा किती पुसट आहेत याची. आपल्याला नक्की काय वाटतंय याविषयी मुलं फार गोंधळलेली असतात. फार दूरवरचे, लग्नाबिग्नाचे विचार काही त्यांच्या डोक्यात नसतात, तात्पुरत्या आनंदाची मात्र भूल असते. पण अठरा वर्षांखाली केलेले शरीरसंबंध कायद्यानुसार गुन्हा असतो याची कल्पना किती मुलांना असते? बरं, त्यांनी या पायरीपर्यंत जाऊ नये असं पालक म्हणून आपल्याला कितीही वाटत असलं तरी त्यांना सुरक्षित शरीरसंबंधांविषयी माहिती द्यायला हवी याविषयी तज्ज्ञांचं एकमत आहे. 

एका कार्यशाळेत एका मुलीनं मला सांगितलं की त्यांच्या ग्रुपमध्ये एकमेकींसाठी बॉयफ्रेंड निवडायची पद्धत आहे. मनात नसलं तरी मित्रमैत्रिणी इतका दबाव टाकतात की बस. मग ते कुणाचं तरी नाव सुचवतात, त्याचा फोन नंबर मिळवून देतात किंवा अगदी दूताचं, निरोप्याचं काम करायचीही त्यांची तयारी असते. एखादा कुणी अशा नात्यात नसेल तर तो किंवा ती पुरेशी आकर्षक नाही, कुणाला हवीशी वाटत नाही असा समज करून घेण्यात येतो. याचा अर्थ असा की मुलांना दोस्तांच्या दबावाला तोंड देणं, प्रभावीपणे नकार देणं, योग्य संवाद करता येणं याचाही परिपाठ द्यायला हवा. डिजिटल प्रेमाचा उदय झालेला असल्यामुळे डिजिटल साक्षरता फार महत्त्वाची झाली आहे. प्रेमाच्या आभासी अवतारात वाहून जाणं असो की भाबडेपणानं टाकलेल्या प्रतिमांचा गैरवापर आणि विकृतीकरण असो, यापासून सावधगिरी कशी बाळगायची हे एक अत्यावश्यक कौशल्य आहे आजच्या जगात. समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर, डिजिटल सुरक्षा आणि कायदे, त्याचे फायदे-तोटे हे विषय बोलायला हवेत. नशेत केल्या गेलेल्या डेट-रेप सारख्या लैंगिक अपघातांविषयी जागृती हवी. नकार स्वीकारायला, इतकंच नव्हे तर त्या नकाराचा आदर करायला प्रवृत्त करायला हवं. आणि हो, ब्रेक-अपला कणखरपणे सामोरं जाणं, त्यातून योग्य तो बोध घेणं आणि लक्ष्यावरून नजर ढळू न देणं कसं जमवायचं याची उजळणी करायला हवी.   

मग मनवाच्या आईबाबांनी काय केलं? एकतर त्या चॅटस वाचल्यावर सुनितानं ताबडतोब काही प्रतिक्रिया द्यायचं टाळलं. आपण अतिशय भावनातिरेकानं काहीतरी चुकीचं बोलून जाऊ याची तिला खात्री होती. काही वेळ जाऊ दिल्यावर आपोआपच मनातला भावनांचा खवळलेला दर्या शांत झाला. दोघांनी एकमेकांशी चर्चा केल्यावर, आपल्याला वाटत होती तेवढी काही ‘अतिभयंकर’ परिस्थिती आहे असं नाही, अशा विचारानं मन थोडं शांतावलं. विचार करायला वेळ घेणं आणि दुसऱ्याचं मत जाणून घेणं, या दोन गोष्टींची त्यांना परिस्थिती शांतपणे हाताळायला मदत झाली. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका मैत्रिणीशी सुनीता बोलली. त्यानुसार काही उदाहरणांच्या, बातम्यांच्या सहाय्यानं आकर्षण, प्रेम याविषयी कधी मनवासमोर आपापसात, कधी थेट तिच्याशी अधूनमधून चर्चा करायला सुरुवात केली. यात प्रेमात आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींचा, म्हणजे एकमेकांविषयी आदर, इतरांच्या मतांचा आदर, संमतीचं महत्त्व, निरोगी आणि रोगट प्रेम यातला फरक यांचा समावेश होता. आपल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहायला, खेळ-छंद चालू ठेवायला त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. अधूनमधून मनवावरचा विश्वास, तिची योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांचाही ते उल्लेख करत असत. तिला त्यामुळे आपल्या जबाबदारीची जाणीव होत राहिली. या सगळ्या भानगडीत स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी कणखरपणाबरोबरच पुरेशा लवचिकतेची गरज ते अधोरेखित करत गेले. सोशल मीडियावरच्या आपल्या एखाद्या मेसेजचा, फोटोचा कसा गैरवापर होऊ शकतो, तो टाळण्यासाठी काय काळजी घेता येईल यावर एकदा चर्चा झाली. आपल्या मुलीनं नात्यात कुठल्या सीमारेषा पाळाव्यात याविषयी आईबाबा म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत, हेही स्पष्ट केलं. उदा. एकाकी, निर्जन स्थळी दोघांनीच जाणं सुरक्षित नाही, म्हणून ते टाळलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे, घरात आपण सतत फक्त आणि फक्त याच विषयावर बोलत नाही आहोत ना, यावर काळजीपूर्वक नजर ठेवली. आईबाबा आपल्यासोबत आहेत, काही प्रॉब्लेम आला तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो याबाबतीत मनवा आश्वस्त झाली. काही दिवसांनी तो मुलगा तिच्या मैत्रिणीलाही असेच मेसेजेस पाठवतो असं लक्षात आल्यावर तिनं त्याच्याशी चॅट करणं बंदच  करून टाकलं.   

प्रेमात पडणं हे जरी ठरवून होत नसलं तरी त्यापुढची त्याची अभिव्यक्ती तर ठरवूनच केलेली असते ना? त्याचा परीघ, त्याच्या लक्ष्मणरेषा, संकेत आणि नियम मानवनिर्मित आहेत. या नैसर्गिक ऊर्मीला निरोगीपणे हाताळायचं  प्रशिक्षण देता येईल मुलांना. त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती, चांगले-वाईट परिणाम अशा गोष्टींची जाणीव करून देता येईलच की आपल्याला. हे परिणाम सक्षमपणे हाताळण्याची क्षमता काही पूर्णपणे आनुवंशिक नसते, ती शिकवता येईल. खेळ, छंद, ध्येय या तितकाच आनंद देणाऱ्या समांतर गोष्टींची ओळख आणि संधी उपलब्ध करून देता येईल. संवादाचे पूल बांधत राहून, सजगपणे, प्रेमाने आणि नात्यांचा आदर राखून निभावलेली पालकभूमिका ही पालक आणि मुलं, दोघांसाठीही नक्कीच उपयोगाची ठरेल!

संबंधित बातम्या