कोर्टाची पायरी चढणारा टोमॅटो 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

‘टेस्टी’ गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणातील इतका महत्त्वाचा घटक आहे, की तो दीड-दोनशे वर्षांपूर्वी भारतातील लोकांना माहितीही नव्हता असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही. टोमॅटोचे मूळ स्थान आहे दक्षिण अमेरिकेतील पेरू-एक्वाडोर-बोलिव्हिया हा भाग. तिथून तो मेक्‍सिकोत आणला गेला व मेक्‍सिकोतून सोळाव्या शतकात युरोपात आला. तुम्ही एकदा जगाचा नकाशा डोळ्याखालून घाला म्हणजे हा सगळा प्रवास तुम्हाला कुठून कसा झाला ते लक्षात येईल. 

टोमॅटोच्या लाल रंगामुळे ही वनस्पती विषारी असावी असा युरोपियन लोकांचा समज झाला अन्‌ त्यामुळे सुरवातीला टोमॅटो खाण्याला मोठा विरोध होता. पण हळूहळू त्याच्या चवीच्या प्रेमात पडून केवळ युरोपियन लोकांनीच नाही, तर अमेरिकन लोकांनीही त्याला स्वीकारले. टोमॅटोसंदर्भात अमेरिकेत लढला गेलेला एक गमतीशीर खटला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेच्या सरकारने आयात होणाऱ्या भाजीपाल्यांवर कर लावला. हा कर फळांसाठी लागू नव्हता. तेव्हा कर वाचावा म्हणून टोमॅटो आयात करणाऱ्या कंपन्यांनी त्याला फळ म्हणून मान्यता द्यावी यासाठी कोर्टात धाव घेतली. मात्र टोमॅटो फळांसारखा डेझर्ट म्हणून जेवणाच्या शेवटी खाल्ला जात नसल्याने कोर्टाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला. सध्या भारतात लसूण हा मसाला आहे की भाजी यावरून जो वाद सुरू आहे, तो तुम्ही वर्तमान पत्रात वाचतच असाल; त्यासारखाच हा मामला! 

भारतात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड विसाव्या शतकाच्या सुरवातीला सुरू झाली. टोमॅटो भारतात येण्याआधीच आपल्याकडे वांगी खाल्ली जात असत, त्यामुळे वांग्यासारख्याच दिसणाऱ्या झाडाच्या या फळाला अगदी सुरवातीस मराठीत वेलवांगी, तर हिंदीत विलायती बैंगन अशी नावे पडली. तुम्ही काही जुनी पुस्तके आणि शब्दकोश पाहिले तर वेलवांगी हा शब्द त्यात वापरलेला दिसेल. गोव्यात टोमॅटोला मांसासारखा दिसणारा, म्हणून मांसफळ असे नाव पडले. शाकाहारी लोक त्या काळात टोमॅटोकडे ढुंकूनही बघत नसत. जर शाकाहारी माणसाच्या घरात भाजी विकायला न्यायची असेल, तर भाजीवाल्याला पाटीतून टोमॅटो वेगळे काढून घराबाहेर ठेवावे लागत असत. अजूनही कोकणात कुठेकुठे नैवेद्याच्या पानात टोमॅटोची कोशिंबीर वाढत नाहीत. तुम्ही हॉटेलात गेलात आणि टोमॅटो सूप हा पदार्थ मांसाहारी पदार्थांत दिसला तर दचकून जाऊ नका. हॉटेलवाल्याची ती चूक असेल किंवा कदाचित टोमॅटोच्या इतिहासाचा त्याचा भरपूर अभ्यासही असेल!

संबंधित बातम्या