तिखटजाळ मिरची 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

टेस्टी गोष्टी
मिरचीचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपल्या मराठीत ‘कानामागून आली अन तिखट झाली’ अशी एक म्हण आहे ते तुम्हाला माहीत आहे का? कधी तरी या म्हणीचा अर्थ नेमका काय आहे असा विचार केलाय का? नाही, मग मी सांगतो, तुमचा या संदर्भातला एक तर्क मात्र बरोबर आहे, ही म्हण एका तिखटपणा देणाऱ्या वनस्पतीविषयीच आहे. ही आहे मिरची संदर्भात! 

मिरची ही आपल्या आहारातील एक महत्त्वाची वनस्पती आहे, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. मिरची भारतात वापरात येण्यापूर्वी भारतात पदार्थाला तिखटपणा आणण्यासाठी मिरी, मोहरीचा वापर होत असे. पण मिरची भारतात आली आणि तिखटपणासाठी सर्रास मिरचीचा वापर सुरू झाला अन्‌ मिरी, मोहरी मागे पडल्या. त्यामुळे ‘कानामागून आली अन तिखट झाली’ ही म्हण आपल्याकडे रूढ झाली. मिरची हे नावही ‘मिरी’वरून आले आहे. भारतातल्या बहुतांश भाषांमधील मिरचीची नावे मिरी या शब्दावरूनच आली आहेत, अपवाद आहे बंगाली. बंगालीत मिरचीला लंका म्हणतात, हे नावही बहुधा ‘लवंग’वरून आले असावे किंवा श्रीलंकेहून मिरचीची निर्यात कलकत्त्याला होत असे त्यामुळे आले असावे. मिरचीचे इंग्रजी नाव चिली, मात्र जिथे मिरची उगम पावली त्या मेक्‍सिकोच्या दक्षिणेकडे असणाऱ्या चिली या देशावरूनच आले असावे असे मानतात. आईन इ अकबरी या १५९० या वर्षी अकबराचा वजीर असलेल्या अबुल फझल याने लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथात त्या काळातील अनेक खाद्य वनस्पतींचे, पाककृतींचे उल्लेख आहेत. पण त्यात मिरचीचा उल्लेख नाही. यावरून मिरची त्या काळात भारतात नव्हती असा तर्क सहज लावता येतो. मिरचीचा मूळ प्रदेश आहे उष्ण कटिबंधीय अमेरिका. बटाट्याप्रमाणेच स्पेनच्या दर्यावर्दी लोकांनी मिरची युरोपात नेली आणि तिचा प्रसार सर्वत्र झाला. आता जगभरात उष्ण कटिबंधाबरोबरच युरोपातही मिरचीची लागवड करतात. 

पोर्तुगीजांनी मिरची भारतात प्रथम गोव्यात आणली व तिथे तिची मोठ्या प्रमाणात लागवड केली. काही जुन्या मराठी पुस्तकात मिरचीचा उल्लेख गोवई मिरची असा आहे. गोव्यानंतर ती भारतात सर्वत्र लावली गेली. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्हा मिरचीसाठी जसा प्रसिद्ध आहे, तसाच तिखटजाळ खाणाऱ्या लोकांसाठीही. गुंटूर येथे मिरची संशोधन केंद्रही आहे. मिरचीच्या काश्‍मिरी, देग मिरची, ज्वाला, संकेश्‍वरी, दोंडाईचा या जाती प्रसिद्ध आहेत. जगभरात मिरचीचा उपयोग तिखटपणापेक्षाही स्वाद आणण्यासाठी (फ्लेवरिंग एजंट) जास्त प्रमाणात केला जातो. आपण खातो ती ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची ही मिरचीचीच जवळची नातलग आहे.

संबंधित बातम्या