सोन्याच्या मोलाची मिरी

डॉ. मंदार नि. दातार, आघारकर संशोधन संस्था, पुणे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

‘टेस्टी’ गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, मिरी तुम्हाला खात्रीनं माहिती असेल. आपण मागच्या आठवड्यात पाहिलं की मिरचीनं मिरीची जागा कशी घेतली. पण मिरची येण्याआधी भारतात खाद्यपदार्थांना चव आणण्यासाठी मिरीच वापरली जात असे. काळ्या मिरीला युरोपात इतकी मागणी असे, की एक किलो सोन्याच्या बदल्यात एक किलो मिरी विकली जात असे. त्यामुळे मिरीला मसाल्यांची राणी, काळे सोने अशी विविध विशेषणे लाभली होती. मसाल्याबरोबरच औषध म्हणूनही मिरीचा युरोपात वापर होत असे. अगदी प्राचीन काळापासून भारतातून मिरीची निर्यात होत असे. हा सारा व्यापार अरब व्यापाऱ्यांच्या ताब्यात होता. या व्यापाऱ्यांनी युरोपात मिरीविषयी अनेक काल्पनिक कथा पसरवल्या होत्या. तुम्हाला वाचायला आवडेल एखादी? मग ही पाहा.. 

मिरीची मोठमोठी जंगले असतात अन्‌ त्यांची राखण करायला भयानक असे उडणारे साप असतात. मिरी मिळवायची असेल तर या जंगलांना आग लावावी लागते मग आगीच्या भीतीने ते साप निघून जातात. पण ते परत यायच्या आत या झाडांवरून मिरी काढावी लागते. पण या आग लावण्यामुळे मिरी काळी होते.. अशा काही सुरस कथा होत्या. या कथांमधून हा सगळा व्यापार आपल्या ताब्यात राहावा म्हणून अरब लोकांचे प्रयत्न दिसतात. पण पुढे मिरीची मागणी इतकी वाढली, की युरोपीय लोकांनी समुद्रामार्गे भारतात येणाऱ्या जलमार्गाचा पत्ता मिळावा म्हणून दर्यावर्दी पाठवायला सुरवात केली. याच प्रयत्नांत निघालेला कोलंबस चुकून अमेरिकेला जाऊन पोचला. पण १४९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप ला वळसा घालून वास्को द गामा भारतात आला अन्‌ हा व्यापार नंतर पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात आला. 

मिरी भारतात केरळमध्ये जास्त वाढते. केरळचा वायनाड भाग मिरीचे माहेरघर आहे. मिरीचा वेल दमट हवामानात वाढतो; पांगारा, शेवगा, नारळ, सुपारी यांसारख्या वृक्षांच्या आधाराने! मिरीला पानांच्या बेचक्‍यातून येणाऱ्या मंजिरीवर वर गोल हिरवी फळे येतात. ही फळे वाळवली, की काळी होतात. हिरवी फळे पाण्यात बुडवून त्यांची वरची साल काढून मग वाळवली की पांढरी मिरी मिळते. काळी मिरी पांढऱ्या मिरीपेक्षा जास्त तिखट असते. मिरीचा वापर पूर्वी चलन म्हणूनही केला जात असे. चिरीमिरी देणे हा वाक्‍प्रचार तुम्ही ऐकला असेल ना? हा वाक्‍प्रचार या वापरातूनच आपल्या भाषेत आला असणार. सध्या भारताबरोबर मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांतही मिरीची लागवड केली जाते.

Tags

संबंधित बातम्या