चिनी नसलेली दालचिनी 

डॉ. मंदार नि. दातार, आघारकर संशोधन संस्था, पुणे
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

‘टेस्टी’ गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, मागच्या आठवड्यात आपण मिरीविषयी वाचलं ते आठवतंय? मिरीप्रमाणेच दालचिनी भारतातील प्राचीन व्यापारात खूप महत्त्वाची होती. भारतातून दालचिनीची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. अरब व्यापाऱ्यांच्या हातातच हाही व्यापार होता. त्यांनी युरोपभर पसरवलेल्या मिरीसारख्याच दालचिनीच्या अनेक सुरस कथा होत्या. एका कथेप्रमाणे दालचिनीचे झाड फक्त काही ठराविक पक्ष्यांनाच माहिती असते. हे पक्षी जंगलातून दालचिनीची साल आणून आपल्या घरट्यात ठेवतात. लोकांना पोचता येणार नाही अशा उंच कड्यांवर या पक्ष्यांची घरटी असतात. या कड्यांखाली राहणारे लोक ही घरट्यातली दालचिनी मिळवण्यासाठी एक युक्ती करतात. ते एखाद्या प्राण्याला मारून त्यांच्या मांसाचे मोठमोठे तुकडे या कड्यांखाली ठेवतात. काय होत असेल पुढे काही कल्पना? तर पक्षी हे तुकडे अन्न म्हणून घरट्यात घेऊन जातात. मात्र या मांसाच्या वजनाने त्यांची घरटी तुटतात व त्यातली दालचिनी खाली पडते व नंतर लोक ती गोळा करतात. आपण युरोपात दालचिनी इतकी महाग विकतो त्याचे कारण ती मिळवायला किती कष्ट पडतात हेच त्यांना या कथांमधून लोकांपर्यंत पोचवायचे असेल. 

ही दालचिनी किती महाग असेल, तुम्हाला काही कल्पना? तर म्हणे सोळाव्या शतकात एक पोते दालचिनीच्या बदल्यात इंग्लंडमध्ये एक मोठे प्रशस्त घर विकत घेता येत असे. पण वास्को द गामाच्या भारतातील आगमनानंतर युरोपियन लोकांना खरे काय ते समजले. आपण खातो ती दालचिनी म्हणजे झाडाची साल असते. दालचिनीचे झाड असते सुमारे दहा मीटर उंचीचे. पावसाळ्यानंतर या झाडाच्या खोडावर उभ्या चरे पाडून दालचिनीची साल काढतात. या साली मोळ्या बांधून एकत्रित ठेवतात. एक दोन दिवसात साल आंबते अन मग तिचा बाहेरचा थर निघून येतो. मग ती सुकवून बाजारात विकण्यासाठी पाठवली जाते. भारताबरोबरच श्रीलंकेतही दालचिनीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. श्रीलंकेतील दालचिनी भारतापेक्षा जास्त चांगली मानली जाते. खाद्यपदार्थांत, शीतपेयांमध्ये, बेकरीच्या पदार्थांत तसेच औषधांमध्ये दालचिनीचा वापर केला जातो. 

दालचिनीच्याच कुळातील एक वृक्ष म्हणजे तमालपत्र. या तमालपत्राच्या पानांचा वापर मसाल्यात केला जातो. 

दालचिनी नावाविषयीसुद्धा एक गमतीदार कथा आहे. काही अभ्यासकांच्या मते, दालचिनी आपल्याकडे - विशेषतः उत्तर भारतात चीनमधून निर्यात होऊन येत असावी. त्यामुळे तिचे हिंदी अन संस्कृतमधले नाव दालचिनी आहे. पण मुळात चीनमध्ये दालचिनी श्रीलंकेतूनच जात असावी. आहे की नाही गमतीदार? आता मात्र चीनमध्ये बरेच ठिकाणी दालचिनी लावली जात आहे.

संबंधित बातम्या