खिळ्यासारखी लवंग 

डॉ. मंदार नि. दातार, आघारकर संशोधन संस्था, पुणे
शुक्रवार, 9 मार्च 2018

‘टेस्टी’ गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपण जगाचा इतिहास बदलणारी मसाल्याच्या पदार्थांची काही उदाहरणे पहिली. अगदी थोडी पण अत्यंत महत्त्वाची! भारत, इंडोनेशिया, श्रीलंका यांसारख्या ठिकाणी मिळणारे मसाले युरोपियन लोकांच्या रोजच्या आहारात अन्‌ औषधांत महत्त्वाचे होते. या साऱ्या मसाल्यांचा व्यापार तेव्हा अरबी व्यापाऱ्यांच्या ताब्यात होता. हा व्यापार आपल्या ताब्यात यावा म्हणून युरोपियन लोकांनी हे प्रदेश शोधण्यासाठी दर्यावर्दी पाठवले आणि पुढे अनेक देशांच्या नशिबात गुलामगिरी आली. याच मसाल्याच्या पदार्थांच्या मिरी, दालचिनी, जायफळ यांच्याच मालिकेमध्ये आज आपण समजावून घेऊ लवंग या वनस्पतीबद्दल! 

लवंग आपल्या अगदीच परिचयाची, पण तिच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. लवंगेचे उपयोग जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढाच तिचा इतिहासही रंजक आहे. इंडोनेशियामधील टर्नाटे आणि आसपासची बेटे हा लवंगेचा मूळ प्रदेश. मात्र जायफळासारखी लवंग काही थोड्या बेटांवर मर्यादित नसून अनेक छोट्या बेटांवर पसरलेली होती. युरोपियन लोकांपैकी पोर्तुगीज सर्वांत पहिल्यांदा या बेटावर पोचले. त्या काळात तेथील छोट्या छोट्या बेटांवरच्या सल्तनतींमध्ये सारख्या लढाया होत असत. पोर्तुगीज या बेटावर पोचले तेव्हा त्याच्याकडून शस्त्रे खरेदी करता येतील म्हणून या सल्तनतींच्या सुलतानांना आनंद झाला. त्यांना एकमेकांत लढवत ठेवून पोर्तुगीजांनी काही काळ लवंगेच्या व्यापारात आपला वरचष्मा ठेवला. पण सुलतानांचा प्रभावही कमी झाला नाही. सतराव्या शतकात टर्नाटे हे इंडोनेशियातील सर्वाधिक श्रीमंत बंदर होते. टर्नाटेमधील गॅमालामा पर्वताच्या पायथ्याशी लवंगेची विस्तीर्ण जंगले आहेत. मात्र युरोपियन लोकांच्या कित्येक शतके आधीच भारतात लवंग माहिती होती. चरक ऋषींनी लिहिलेल्या आयुर्वेदामध्ये मानाचे स्थान असलेल्या सुमारे अडीच हजार वर्षे जुन्या चरक संहितेत लवंगेचे उल्लेख आहेत. लवंगेसाठी इंग्रजीत क्‍लोव्ह हा शब्द वापरला जातो. हा क्‍लोव्ह शब्द आला आहे लॅटिन भाषेतील क्‍लॅव्हस या शब्दावरून! क्‍लॅव्हस म्हणजे खिळा. लवंग एखाद्या खिळ्यासारखी दिसते असा याचा अर्थ होय. 

लवंगेचा वृक्ष सदाहरित असून आपण जी लवंग खातो त्या या वृक्षाच्या वाळलेल्या कळ्या असतात. लवंगेची कळी सुरवातीस हिरवी असते, हळूहळू तिचा रंग लाल झाला की मग या कळ्या तोडतात. लवंगेची फुले दिसायला जांभळाच्या फुलांसारखीच असतात. तुम्हीही लवंग कधीतरी जवळून नीट पाहा, तुम्हाला कधीकधी या कळीतल्या पाकळ्या आणि पुंकेसरही दिसू शकतील. सध्या इंडोनेशियाबरोबर भारत, मादागास्कर, श्रीलंका येथे लवंगेची लागवड करतात. खाद्यपदार्थांबरोबर लवंगेचा औषधांतही मोठ्या प्रमाणात वापर होतो.

संबंधित बातम्या