क्‍लिओपात्राचा आवडता वेलदोडा 

 डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 16 मार्च 2018

टेस्टी गोष्टी 

बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, श्रीखंडाला, मसाला चहाला, खिरीला, बासुंदीला खरा स्वाद कशामुळे येतो? तुमच्यापैकी बहुतांश जण बरोबर उत्तर देतील, वेलदोड्यामुळे! वेलदोडा हा आपल्या रोजच्या आहारातला खूपच महत्त्वाचा घटक आहे. वेलदोड्याचा मूळ प्रांत आहे भारतातला सह्याद्रीचा दक्षिण भाग, म्हणजे तेथे या वनस्पतीचा उदय झाला. भारतात सुमारे अडीच हजार वर्षे तरी वेलदोडा आहारामध्ये वापरला जात असावा. दोन हजार वर्षांपेक्षाही प्राचीन चरक संहितेमध्ये वेलदोड्याचा उल्लेख आहे. गव्हाची कणीक, दूध, तूप, साखर आणि वेलदोडा वापरून संयाव नावाचा पदार्थ त्या काळात शिजवला जात असे. तेव्हापासून भारतातून वेलदोड्याची निर्यात होत असे. ग्रीक लोक दात स्वच्छ ठेवण्यासाठी वेलदोडा वापरत तर रोमन लोक त्याचा वापर अत्तरामध्ये करत. इजिप्तची राणी क्‍लिओपात्राबद्दल तुम्ही काही ऐकले आहे का?.. तिला वेलदोडा इतका आवडत असे, की तिच्या महालात नेहमी वेलदोड्यापासून केलेल्या अत्तराचा सुगंध दरवळत ठेवला जात असे. 

वेलदोड्याला वेलची, इलायची अशी नावे आहेत. संस्कृत नाव आहे एला. केरळमध्ये एलामलय नावाचा डोंगरच आहे. एलामलय म्हणजे वेलदोड्यांचा डोंगर. वेलदोड्याचे झाड कर्दळीसारखे असते. त्याला जमिनीत कंद असतात व ते वाढते दोन ते तीन मीटर. जमिनीजवळच याला फुलोरे येतात. या फुलोऱ्यावर आधी जांभळ्या रंगाची फुले आणि नंतर फळे येतात. ही फळे नीट गोळा करणे म्हणजे कौशल्याचे काम असते. ही फळे बाजारात विकण्यापूर्वी चांगली वाळवावी लागतात. बंगाल, ओरिसा या राज्यांमध्ये वेलदोड्याच्याच कुळातील बडी इलायची नावाची वनस्पती लावली जाते. तुम्ही हॉटेलात पुलाव किंवा बिर्याणी खाताना त्यात हा मोठा वेलदोडा घातलेला सापडेल. भारतातून  होणाऱ्या निर्यातीत वेलदोड्याबरोबर ही बडी इलायचीसुद्धा असे. खाद्यपदार्थांत त्याचा वापर आहेच; पण आपल्याकडे फळांपासून केलेल्या पानक नावाच्या पेयांमध्येही वेलदोडा घालत असत. चहात वेलदोडा घालायची पद्धत भारतातच काश्‍मीरमध्ये सुरू झाली. पेशव्यांच्या काळात प्रसिद्ध असलेल्या ‘कुलपी पान’ या एकावेळी दहा - बारा विड्याची पाने वापरून केलेल्या पानात वेलदोडा घालत असत. सध्या भारताबरोबरच नेपाळ, मेक्‍सिको तसेच मध्य अमेरिकेतल्या ग्वाटमाला नावाच्या देशात वेलदोड्याची लागवड केली जाते. ग्वाटमाला भारतापाठोपाठ वेलदोड्याचे उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. व्हॅनिला आणि केशर यांच्यापाठोपाठ वेलदोडा हा जगातील तिसरा सर्वांत महाग पुरवणी म्हणून वापरला जाणारा अन्नघटक आहे.

संबंधित बातम्या