लाल सोने - केशर 

डॉ. मंदार नि. दातार
मंगळवार, 20 मार्च 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....
 

मित्रांनो, केशरी रंग हा नेमका कशापासून आला आहे, माहिती आहे का? तर तो आला आहे केशरापासून! आपल्या रोजच्या जेवणात वापरली जात नाही, पण सणावाराचे, समारंभासाठीचे जेवण ज्या वनस्पतीशिवाय अपुरे आहे ती वनस्पती म्हणजे केशर होय. केशर अत्यंत बहुमूल्य आहे. केशराला पूर्वीच्या काळी लाल सोने म्हटले जात असे एवढे त्याचे मोल होते. 

जगज्जेता सिकंदर किंवा अलेक्‍झांडर त्याच्या शाम्पूमध्ये केशर वापरत असे; तर क्‍लिओपात्रा केशराच्या पाण्यात अंघोळ करत असे. पण सर्वसामान्य माणसाला केशर खायला मिळणे तसे दुर्लभच होते. आजही जगातला सर्वांत महागडा ‘स्पाइस’ केशर आहे. केशराचा मूळ प्रदेश ग्रीस असावा असे अभ्यासक मानतात. पण भारतात, काश्‍मीरमध्ये त्याच्या उत्पत्तीविषयी, केशराचा शोध कसा लागला याविषयी एक मनोरंजक कथा लोकप्रिय आहे. काश्‍मीरमधल्या पाम्पुर गावात दृष्टी गेलेल्या एका सत्पुरुषाला स्वप्नात एका वनस्पतीचा दृष्टांत झाला. ही वनस्पती वापरून त्याला आपली दृष्टी परत मिळवता येईल, असा तो दृष्टांत होता. ही स्वप्नातली वनस्पती म्हणजे केशर. केशराविषयी इतरही अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. थंड, पण कोरड्या हवामानात केशर वाढते. केशराच्या वनस्पतीला जमिनीत बारीक गड्डे असतात. या गड्ड्यांना जमिनीलगत पातीसारखी पाने येतात. पानांच्या मधून निळसर जांभळ्या रंगाची फुले अवतरतात. या फुलांच्या मध्ये असणारे भगव्या रंगाचे स्त्रीकेशर म्हणजे आपण वापरतो ते केशर होय. 

एक किलो केशर मिळवण्यासाठी किती फुले लागत असतील काही अंदाज? तर्क करून बघा. हजार, दहा हजार.. अगदीच चूक. एक किलो उत्कृष्ट दर्जाच्या केशरासाठी तब्बल तीन लाख फुले लागतात. केशराची वेचणी करताना खूप काळजी घ्यावी लागते. स्त्रीकेसर गोळा केल्यानंतर विकण्याआधी ते वाळवावे लागतात. आफ्रिका खंडाच्या वायव्य टोकाशी वसलेला मोरक्को नावाचा देश केशर उत्पादनात आघाडीवर आहे. मोरक्कोच्या वाळवंटी मुलुखात ओॲसिसमध्ये केशराच्या बागा आहेत. सध्या मोरक्कोबरोबरच भारतामधील काश्‍मीरमध्ये, इराण, इटली, स्पेन, फ्रान्स या देशांमध्येही केशराची लागवड केली जाते. या सर्वांमध्ये स्पेनचे केशर सर्वोत्कृष्ट मानले जाते. स्पेनमध्ये तर कमीतकमी वेळात जास्तीत जास्त केशर वेचण्याची एक स्पर्धाही घेतली जाते. कमी वेळात सर्वाधिक केशर वेचणाऱ्याला मोठी बक्षिसे मिळतात. 

जाता जाता अजून एक गंमत. सिंहाच्या त्वचेचा रंग म्हणे केशरासारखा असल्याने सिंहाचे एक नाव ‘केसरी’ आहे.

संबंधित बातम्या