टी पार्टी 

डॉ. मंदार नि. दातार 
बुधवार, 21 मार्च 2018

टेस्टी गोष्टी

बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, चहा आहे मूळचा चीनमधील. चहाला जगभर जी नावे वापरली जातात ती ‘चा’ आणि ‘टी’ या दोन चिनी शब्दांपासूनच तयार झालेली आहेत. अगदी दोन हजार वर्षांपासून चीनमध्ये चहा लावला जात होता. पूर्वी म्हणे चीनमध्ये चहाच्या पानाची भाजीसुद्धा केली जात असे; तर कधीकधी तो भाताबरोबर उकडून खाल्लाही जात असे. 

अनेक शतकांपूर्वी चीनच्या राजासाठी पाणी उकळताना त्यात चुकून चहाची पाने पडली अन ते पाणी राजाला खूप आवडले. तेव्हापासून चहा हे पेय सर्वत्र आवडीने प्यायले जाऊ लागले. नवव्या शतकात एका धर्मगुरूने चहाचे झाड जपानमध्ये नेले आणि मग जपान्यांनी चहाला आपलेसे केले. पूर्वी युरोपात चहा चीनमधून निर्यात होत असे. पहिला चहा जेव्हा एका युरोपियन दांपत्याला पाठवला गेला तेव्हा ती पूड कशी वापरायची तेच त्यांना ठाऊक नव्हते. तेव्हा त्यांनी म्हणे तो चहा पाण्यात घालून उकळला, वरचे काळे पाणी फेकून दिले आणि राहिलेला चोथा पावाला लावून खाल्ला. नंतर मात्र युरोपात चहा पिण्याची प्रथा प्रचलित झाली. चौदाव्या शतकादरम्यान चीनमधून निर्यात होत असलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या रेशीम, चिनी मातीची भांडी आणि चहा! 

चहामुळेच चीनने जागतिक व्यापारात दबदबा निर्माण केला होता. मात्र १८३० च्या अफूच्या युद्धामुळे ही निर्यात थांबली आणि मग ब्रिटिश लोकांनी भारतात त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करायला सुरवात केली. पण आसाममध्ये त्या आधीच चहाची एक रानटी जात जंगलात वाढत असे. चहाच्या झुडपाची वरची दोन तीन पाने तोडून, त्यावर अनेक प्रक्रिया करून मग चहा आपल्यापर्यंत पोचतो. जगात सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारे चहाचे पेय तयार करतात. आपल्याकडे दूध - साखर घालून, तिबेटमध्ये लोणी - लिंबाचा रस घालून, तर काही ठिकाणी नुसताच पाण्यात उकळून चहा केला जातो. सध्या चीन व भारताबरोबर श्रीलंका, जपान, इंडोनेशिया या देशांमध्ये चहांचे मळे आहेत. भारतातील आसामचा अन दार्जिलिंगचा चहा खूप प्रसिद्ध आहे. गेल्या काही दशकांमध्ये दक्षिण भारतात चहाची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली आहे. चहामुळे इतिहासात बरीच स्थित्यंतरे झाली आहेत. तुम्ही तुमच्या आईबाबांकडून ‘बॉस्टन टी पार्टी’ म्हणजे काय आहे हे एकदा समजावून घ्या.. हो तेही चहा पिताना, कारण चहापेक्षा जगात एकच गोष्ट जास्त प्यायली जाते ती आहे... पाणी.

संबंधित बातम्या