पऱ्यांचे पेय 

डॉ. मंदार नि. दातार
बुधवार, 21 मार्च 2018

टेस्टी गोष्टी    डॉ. मंदार नि. दातार    एंटरटेनमेंट    

कॉफी आपल्या सगळ्यांचे अत्यंत आवडते पेय आहे. प्यायल्यानंतर एकदम तरतरी आणणारे; पण कॉफीचा इतिहास जाणून घेणे कॉफीइतकेच उत्साहवर्धक आहे. 

कॉफीचा मूळ प्रदेश इथिओपिया आणि येमेन आहे. इथिओपियातल्या एका अरब मेंढपाळाला कॉफीच्या झुडुपाचा प्रथम शोध लागला, असे मानतात. या झुडुपाची पाने खाल्ल्याने त्याच्या शेळ्या अधिक तरतरीत होत असत. हे लक्षात आल्यावर त्याने मग स्वतःही या झाडाची पाने व बिया खाल्ल्या, अन्‌ मग लोकांना खायला दिल्या. त्याने शोधलेल्या या वनस्पतीमुळे लोक इतके खूष झाले, की त्यांनी त्याला थेट संतपदच दिले. पुढे लोक बिया भाजून त्याचे पेय करू लागले. 

बाराव्या शतकातील अरब साहित्यात कॉफीचा उल्लेख आहे. इथिओपियामधून कॉफी सौदी अरेबियात गेली व तिथे तिची लागवड सुरू झाली. ही लागवड इतकी बंदोबस्तात केली जात असे, की कोणालाही सहजपणे या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळत नसे. मात्र १७२० च्या सुमारास दक्षिण भारतामधील एक मुस्लिम संत बाबा बुदान मक्केला गेले असता त्यांनी कॉफीच्या काही बिया आणून भारतात लावल्या. त्यातल्या काही रुजल्या व भारतात कॉफीचा प्रवेश झाला. भारत ब्रिटिश अमलाखाली आल्यानंतर दक्षिण भारतात कॉफीची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. 

तुम्ही कधी कॉफीचे झुडूप पहिले आहे का? संधी मिळेल तर नक्की पाहा. कॉफीला सुंदर, पांढरी, सुवासिक फुले येतात. फुले इतकी सुवासिक असतात, की आधीच्या वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञांनी कॉफीला मोगऱ्याच्या कुळात ठेवले होते. बिया रुजल्यानंतर कॉफीचे रोप सात वर्षांत फुले द्यायला सुरवात करते. फळे पक्व झाल्यावर लाल होतात, मग बियांभोवतीचा गर काढून या बिया वाळवल्या किंवा पाण्यात भिजवल्या जातात व त्यांची पूड केली जाते. पूर्वी थेट पाण्यात बिया उकळून कॉफी करत असत. नंतर भारतात त्यात साखर, दूध, जायफळ वगैरे घालून कॉफी बनवली जाऊ लागली. कॉफीच्या कॉफिया अराबिका या जातींसोबत इतरही काही जाती कॉफी मिळवण्यासाठी वापरतात. 

जाता जाता कॉफीच्या नावाविषयी थोडे... कॉफी हे नाव आले आहे काफ या पर्वतावरून! हा पर्वत काल्पनिक आहे. उर्दू - फारसी साहित्यात काफ म्हणजे जगाच्या कडेने व्यापून राहिलेला एक पर्वत होय. या पर्वतावर फक्त सुंदर पऱ्या राहतात. मग झाले की नाही कॉफी हे या पऱ्यांचे पेय?

संबंधित बातम्या