सूर्यप्रेमी सूर्यफूल 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 5 एप्रिल 2018

टेस्टी गोष्टी  
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, सूर्यफूल तुम्ही पाहिले आहे का? अगदी नसेलच, तर सूर्यफुलाच्या तेलात बनलेले अनेक चविष्ट पदार्थ नक्कीच खाल्ले असतील. मात्र सूर्यफुलाला त्याचे हे नाव का पडले आहे याचा विचार केलाय? तुमचा एक तर्क बरोबर आहे. ह्याच्या सूर्यासारखा गडद केशरी रंगामुळे व गोलाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले असणार. हे बरोबर आहे, पण दुसरेही एक कारण आहे. 
ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते म्हणून हे नाव! तुमच्या बागेत किंवा कुंडीत सूर्यफूल लावून तुम्हाला हे पाहायला आवडेल? सूर्यफुलाची साऱ्याच भाषेतली नावे सूर्याशी संबंधितच आहेत. हिंदीतले सूरजमुखी, इंग्रजीतले सनफ्लॉवर, एवढेच काय तर त्याचे शास्त्रीय नाव ‘हेलीॲनथस’मधील ‘हेली’ म्हणजे सूर्य. तुम्हाला हेलियम हा वायू माहीत आहे, दोघांचा संदर्भ एकच. 

सूर्यफूल मूळचे आहे अमेरिका खंडातील मेक्‍सिकोचे. पण मूळचे सूर्यफूल हे आताच्या फुलापेक्षा आकाराने दहापट लहान होते अन एका झाडावर आजच्याप्रमाणे एक फूल न येता अनेक फुले येत असत. मूळच्या स्थानिक मेक्‍सिकन लोकांनी त्याची पहिल्यांदा लागवड केली. ही सूर्यफुले ते लोक अन्न म्हणून, रंग म्हणून अन घराच्या सुशोभीकरणासाठी वापरत असत. आपल्याला माहिती असलेले मोठे सूर्यफूल ही रशियन लोकांची देणगी आहे. रशियातील उद्यानविद्या शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून ही मोठी सूर्यफुले विकसित केली. त्यांनी हे सारे का केले याची कारण खूप गमतीदार आहे. त्या काळात ख्रिस्ती लोकांच्या उपासादरम्यान तेल खाण्यावर तेथील चर्चने काही काळ मज्जाव केला होता. पण सूर्यफुलाच्या तेलावर काहीच निर्बंध नव्हते. त्यामुळे सूर्यफुलाची मागणी वाढू लागली अन मग त्याची मोठ्या फुलांची जास्ती बिया देणारी वाणे विकसित करण्यात आली. सूर्यफूल अन सूर्यफुलाच्या कुळातील वनस्पतींच्या बाबतीत एक वेगळेपण आहे. ही सारी फुले नसून अनेक फुलांपासून बनलेले फुलोरे आहेत. त्यातील कडेची असतात किरण फुले आणि मधली थाळीफुले. 

आपल्याकडे सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. इतर गोड्या तेलांपेक्षा हे किमतीने स्वस्त असते. जगातील सर्वांत मोठ्या सूर्यफुलाचा आकार काय असेल अंदाज आहे? तब्बल दोन फूट.. आणि झाडाची उंची, तर जर्मनीतले एक सूर्यफुलाचे रोप तीस फूट उंच वाढले होते.

संबंधित बातम्या