तिळा तिळा दार उघड 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

टेस्टी गोष्टी    
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, तुमची आई स्वयंपाक करताना शेंगदाणा किंवा शेंगदाण्याचा कूट कशाकशात घालते ते एकदा विचारून बघा आणि आता कल्पना करून बघा शेंगदाणा नसेलच तर? 

खरेतर भारतीय जेवणामध्ये शेंगदाणा आला गेल्या दोन तीन दशकात! त्याआधी आपल्या जेवणात काय होतं? कशाची जागा घेतली शेंगदाण्यानं? तर तो होता तीळ. तीळ तुम्हाला माहिती असेल तिळगुळामुळं. तीळ भारतीयांच्या जेवणात अगदी प्राचीन काळापासून होता. त्यामुळं तीळ हा जगातील सर्वाधिक प्राचीन तेलाच्या स्रोतांपैकी मानला गेला आहे. किंबहुना तीळ शब्दाचा उगम तैल म्हणजे तेल या शब्दावरूनच आहे. हरप्पामधील सिंधू संस्कृतीत ख्रिस्तपूर्व २२५० व १७५० मध्ये तीळ वापरला जात असल्याचा पुरावा आहे. हा पुरातत्त्वशास्त्रीय पुरावा आहे; तिळाच्या तेलाचा वापर केल्या गेलेल्या दिव्याचा तसेच जळून कोळसा होऊन टिकलेल्या तिळाच्या बियांचा! अनेक खाद्यपदार्थांत घालण्यासाठी तेलासोबतच तीळ वापरतात. अगदी पूर्वीच्या काळी धार्मिकदृष्ट्या मोलाची मानल्या गेलेल्या नवधान्यात तीळ आहे. आजही भारतभर सर्वत्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये तीळापासून तयार केलेले वेगवेगळे पौष्टिक चवदार पदार्थ खाल्ले जातात. 

एखादी वनस्पती एखाद्या प्रदेशातली मूळची आहे की नाही हे बघायचा एक मार्ग आहे.. त्या वनस्पतीचे रानावनात वाढणारे वन्य भाऊबंध शोधणं. या तर्कानुसार तीळ खात्रीनं भारतीय आहे. महाराष्ट्रातल्या वनांमध्येही तिळाच्या अनेक रानटी जाती आहेत. पण तशा त्या आफ्रिकेतही आहेत आणि मध्यपूर्वेतही आहेत. तिळाचं अरबी भाषेतलं नाव आहे सीम. तुम्हाला अलिबाबाची गोष्ट आठवते का? या गोष्टीमध्ये गुहा उघडायचा मंत्र होता ‘खुल जा सिमासिम..’ याचा मराठी अनुवाद होताना ‘तिळा तिळा दार उघड’ हा मंत्र आला. आता लागला ना हा संदर्भ? 

तिळाचं झाड सुमारे एक मीटरपर्यंत वाढतं. या झाडावर असणाऱ्या पानांच्या बेचक्‍यामधून बरेचदा पिवळी, पण कधीकधी गुलाबी रंगाची सुंदर फुलं येतात. या फुलांच्या खालच्या पाकळीवर जांभळ्या रंगाचा मोठा ठिपका असतो. या सुंदर रंगामुळं आकर्षित झालेल्या कीटकांमार्फत तिळाचं परागीभवन होतं. परागीभवनानंतर फुलांच्या जागी बोंडं येतात. या बोंडांमध्ये तिळाच्या बिया असतात. या बिया म्हणजे आपण खातो तो तीळ होय. तिळात अनेक उत्तमोत्तम पोषक घटक असल्यानं तुम्ही अगदी आवर्जून तिळाचे पदार्थ खा, पण एकट्यानं नव्हे.. कारण एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो, असं म्हणतात. 

संबंधित बातम्या