क क करडईचा 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

तुमच्या नेहमीच्या जेवणातील पालेभाज्यांची एक यादी करून बघा.. पालक, मेथी, चाकवत, आळू, लाल माठ, तांदुळजा.. या यादीत तुम्हाला करडई आठवतेय का? आठवत नसेल तर आपल्या खाद्यइतिहासातली अस्सल भारतीय असलेली एक महत्त्वाची वनस्पती तुम्ही चुकवत आहात. इतकी महत्त्वाची, की माणसाने लागवडीखाली आणलेल्या पहिल्या काही वनस्पतींपैकी एक आहे करडई! 

तुमच्या वरच्या यादीतल्या वनस्पती केवळ भाज्याच आहेत; पण करडईच्या कोवळ्या पानांच्या भाजीसोबतच बियांपासून मिळणाऱ्या खाद्यतेलाचाही उपयोग जगभर केला जातो. या तेलाला पिवळटपणा येत नाही, त्यामुळे वार्निश तयार करण्यासाठीही करडई तेल वापरतात. करडई नुसती आपल्याला पाने आणि तेल देऊन थांबत नाही, तर करडईच्या फुलापासून उत्तम दर्जाचा रंगही मिळतो. हा रंग पूर्वी जेव्हा रंगासाठी फारसे चांगले पर्याय उपलब्ध नव्हते तेव्हा फारच महत्त्वाचा होता. पानांच्या बेचक्‍यातून येणाऱ्या फुलोऱ्यावर करडईला पिवळी, भगवी, तांबडी अशी वेगवेगळ्या रंगांची फुले येतात. या फुलांपासून लाल व पिवळा असे दोन प्रकारचे रंग मिळवतात. पूर्वी कपडे तसेच खेळणी रंगविण्यासाठी या रंगाचा वापर केला जात असे. 

करडईचे शास्त्रीय नाव कारथॅमस आहे. हा शब्द क्वार्टम या अरेबिक शब्दावरून आला आहे. क्वार्टमचा अर्थ आहे रंग देणे. संस्कृतमध्ये करडईला कुसुंब म्हणतात. मराठीतही कुसुंब म्हणजे करडईचे फूल होय. तिचे सध्याचे प्रचलित करडई हे नाव आपल्यावर असलेल्या गुजराथी भाषेच्या प्रभावाचे उदाहरण आहे. तर या करडईच्या रंगाने रंगवलेल्या कुसुंबी साड्या महाराष्ट्रात एके काळी खूप लोकप्रिय होत्या. तुमच्या आजीला विचारून बघा, त्यांच्या काळातील कुसुंबी साड्यांचा डौल! काही जुन्या

गाण्यांमध्ये या कुसुंबी रंगाच्या साड्यांचा उल्लेख आहे. 
करडईला इंग्रजीत सॅफफ्लॉवर असे नाव आहे. हा सॅफफ्लॉवर शब्द सॅफरन म्हणजे केशरावरून आला आहे. करडईच्या फुलापासून मिळालेला रंग महागड्या केशराला पर्याय म्हणून वापरला जात असे. त्यामुळेच करडईला आफ्रिकन केशर असे एक नाव मिळाले आहे. जगभर करडई खाद्यपदार्थांत आपले बस्तान बसवून आहेच, पण तिचा शोभिवंत वनस्पती म्हणून उपयोगाचा पैलूही महत्त्वाचा आहे. तब्बल साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील ममींच्या गळ्यातल्या हारात करडईची फुले आहेत, तर त्या ममींची वस्त्रे करडईच्या फुलापासून मिळणाऱ्या रंगात रंगवली आहेत. आता करडईचे महत्त्व लक्षात आले ना? मग आता या आठवड्यात आईला सांगून करडईच्या भाजीचा बेत आखायला हरकत नाही.

संबंधित बातम्या