कोलंबसाचे देणे 

डॉ. मंदार नि. दातार    
गुरुवार, 26 एप्रिल 2018

टेस्टी गोष्टी 
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....    
 

मित्रांनो, आपण फेब्रुवारी महिन्यात मिरी, लवंग, जायफळ आणि दालचिनी या आपल्या जेवणात चव आणणाऱ्या काही वनस्पतींच्या गमतीजमती जाणून घेतल्या. या साऱ्या वनस्पतींमध्ये एक साम्य होते, ते म्हणजे हे सारे मसाले पूर्वेकडून विशेषतः भारतातून युरोपात निर्यात केले जात असत. या साऱ्या मसाल्यांचा उपयोग युरोपातले लोक त्यांच्या जेवणाला चव आणण्यासाठी, औषध म्हणून आणि मांस टिकवण्यासाठी करत असत. हा सारा व्यापार अरब व्यापाऱ्यांच्या द्वारे होत असे. 

भारतातून युरोपात जाणाऱ्या या व्यापारी मार्गावरचं महत्त्वाचं शहर होतं कॉनस्टॅन्टिनोपल किंवा आत्ताचं इस्तंबूल! तुर्कस्तानच्या लोकांनी हे शहर जिंकल्यानंतर युरोपीयांचा आशिया खंडाशी व्यापाराचा हा मार्ग बंद झाला. त्यामुळं हा मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार परत सुरू करण्यासाठी काही नवीन मार्ग शोधण्याची आवश्‍यकता निर्माण झाली. त्यावेळी पृथ्वी गोल आहे ही गोष्ट सर्वमान्य झाली होती. तेव्हा पूर्वेकडच्या भारतात पोचायचं असेल, तर जहाजानं पश्‍चिमेकडं जात राहिलं तर भारतात नक्की पोचू असा अंदाज बांधून ख्रिस्तोफर कोलंबस हा दर्यावर्दी सागरी मार्गानं निघाला. पण तो भारतात न पोचता उत्तर अमेरिकेत पोचला. मात्र आपण भारतातच पोचलो आहोत, अशी कोलंबसाची ठाम समजूत होती. 

पुढं काही वर्षांनंतर कोलंबसाच्याच मार्गानं प्रवास करून गेलेल्या अमेरिगो व्हेस्पुसी या खलाशाला अमेरिकेत पोचल्यावर हा देश भारत नाही याची जाणीव झाली. भारतात पोचलेल्या आधीच्या प्रवाशांनी भारतातले लोक शेती करतात असं लिहून ठेवलं होतं. त्यावरून हा शेती नसलेला खंड भारत नाही, असा अमेरिगोनं तर्क बांधला. या अमेरिगोवरूनच या नवीन खंडाचं नाव अमेरिका असं पडलं. मात्र कोलंबसाच्या अमेरिकेला पोचण्यामुळंच या नवीन खंडाची माहिती जुन्या जगाला झाली. कोलंबसानंतर जुनं जग आणि माहीत झालेलं हे नवं जग यांच्यात अनेक खाद्य वनस्पतींची देवघेव झाली. याला कोलंबियन एक्‍स्चेंज किंवा कोलंबसनंतरची देवाणघेवाण असं म्हणतात. 

अमेरिकेतून आपल्याकडं आलेल्या, अन कोलंबसाआधी युरोप आणि आशियाला माहिती नसलेल्या अनेक वनस्पती आहेत. यात आहेत बटाटा, टोमॅटो, मका, मिरची, अननस, व्हॅनिला, कोको, पेरू, शेंगदाणे, रताळी, भोपळा आणि इतर काही वनस्पती. गेल्या काही आठवड्यांत आपण काहींचा परिचय करून घेतला आहे. तर काहींचा येत्या काही आठवड्यांत करून घेऊ. मात्र एक आठवणीत ठेवा, यातल्या काही वनस्पतींपासून केलेले पदार्थ खाणार असाल तर कोलंबसला धन्यवाद द्यायला विसरू नका.

संबंधित बातम्या