लोकप्रिय अननस 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 3 मे 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास.... 

मित्रांनो, बाजारात मिळणाऱ्या फळांपैकी तुमच्या सर्वाधिक आवडत्या फळात अननस नक्की असेल. निदान आवडत्या ज्युसमध्ये तरी अननस खात्रीने असेल. 

अननस आहे मूळचे दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलचे फळ. कोलंबसाने त्याच्या पहिल्या अमेरिका सफरीनंतर अजून दोन सफरी केल्या. १४९३ मध्ये कोलंबस जेव्हा त्याच्या दुसऱ्या सफरीकरता दक्षिण अमेरिकेत गेला, तेव्हा त्याने पहिल्यांदा अननस पाहिला. दक्षिण अमेरिकेतल्या तेपी इंडियन जमातीचे लोक या फळाला ‘नाना’ असे म्हणत. ब्राझीलमध्ये बोलीभाषेत या ‘नाना’शी सारखेपणा असणारे अननस हे नाव रूढ झाले. हा अननस जेव्हा युरोपात पोचला तेव्हा त्याला जे नाव पडले ते एकदम गमतीदार होते. युरोपसारख्या थंड प्रदेशात पाइन नावाचा सूचीपर्णी वृक्ष आढळतो. या वृक्षांच्या कोन किंवा शंकूप्रमाणं अननसाचा आकार असल्यामुळं त्याला ‘पाइनॅपल’ हे नाव पडलं. इंग्लंडमध्ये ‘ॲपल’ हा प्रत्यय जोडून अनेक फळांना नावं दिली आहेत. उदा. कस्टर्ड ॲपल, वूड ॲपल, रोज ॲपल, स्टार ॲपल वगैरे. तसंच याचं नाव ‘पाइन ॲपल’ होय. 
लेडन या गावी इंग्लंडमधला पहिला अननस लावला गेला व त्याचं पहिलं फळ दुसऱ्या चार्ल्सला खाण्यासाठी देण्यात आलं होतं. पोर्तुगीजांच्या गोव्यातील शासनाच्या काळात अननस भारतात आला आणि आपल्या मराठीत आपण थेट दक्षिण अमेरिकेतील अननस हे नाव स्वीकारलं. गोव्यात अननस मोठ्या प्रमाणावर लावला जात असे, असे उल्लेख आहेत. केरळमध्ये जेव्हा अननस लावण्यासाठी नेला, तेव्हा त्याचं नाव पडलं पोरथू चक्का. या मल्याळम नावाचा अर्थ पोर्तुगीज फणस. अननसाच्या फळाचं फणसाशी असलेल्या साधर्म्यामुळं हे नाव पडलं असा तर्क सहज लावता येतो. 

पुढं भारतातून अननस चीनमध्ये गेला. इथल्या स्थानिक लोकांना आवडल्यामुळं अननस अत्यंत कमी काळात भारतभर आणि पुढं आशियाभर पसरला. त्यामुळं इथं भेटीसाठी आलेल्या काही युरोपियन प्रवाशांनी तो इथलाच आहे की काय अशी शंका उपस्थित केली. जहांगीरच्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख आहे, तर अकबराच्या आईन-ए-अकबरी या ग्रंथात अननसाच्या एका फळाची किंमत १० आंब्यांएवढी आहे असा संदर्भ आहे. वनस्पतिशास्त्रदृष्ट्या अननसाचं फळ इतर फळांसारखं एका फुलापासून तयार झालेलं नसून फुलोऱ्यावर येणाऱ्या अनेक फुलांचं स्वतंत्र फळ न होता ती चिकटून एकच मोठं फळ होतं. केरळमध्ये तुम्ही कधी फिरायला गेलात तर अननसाच्या मोठ्या बागा जरूर पाहा.

संबंधित बातम्या