काजू ः विलायती आंबा?

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 11 मे 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....
 

मित्रांनो, सुक्‍यामेव्यामध्ये सर्वांत आवडता असतो काजू. अननस, कोको, बटाटा, टोमॅटो, पपई यांच्यासारखा काजूही दक्षिण अमेरिकेतील, म्हणजे कोलंबसाने शोध लावलेल्या नव्या जगातील आहे. काजूचा वृक्ष मूळचा ब्राझीलचा; पोर्तुगीज लोकांनी तो प्रथम भारतात गोव्यात आणला. या झाडाचे पोर्तुगीज भाषेतले नाव काजू, त्यावरूनच त्याचे इंग्रजी नाव ‘कॅशु’ तयार झाले. पण पोर्तुगीज भाषेतले त्याचे नाव ब्राझिलमधल्या तेपी जमातीत वापरल्या गेलेल्या अकाजू नावावरून आहे. पोर्तुगालमधून थेट गोव्यात व लगेच महाराष्ट्रात काजू आल्याने आपण त्याचे पोर्तुगीज नाव मराठीत जसेच्या तसे स्वीकारले. काजू भारतातूनच मग पुढं जगभरात बऱ्याच ठिकाणी पोचला. आपल्याकडं कोकणात, गोव्यात काजूचे वृक्ष लावले जातात. काजू मिळवण्याच्या प्रक्रियेत झाडावरून पडलेले काजू प्रथम गोळा केले जातात. ते स्वच्छ पाण्यात धुऊन चार दिवस उन्हात सुकवतात. नंतर बिया पाण्यात उकळून घेतात, सावलीत वाळवतात व मशिनद्वारे फोडल्या जातात व मिळालेले काजू बाजारात विकायला पाठवतात. 

काजूची इतर भाषेतली नावं गमतीदार आहेत. काजूची बी ही फळाच्या बाहेरील भागात, त्याच्या खाली असते यावरून त्याचं शास्त्रीय नाव ‘ॲनाकार्डियम’ आहे. ॲना म्हणजे नाही आणि कार्डियम म्हणजे हृदय. तुम्ही कार्डियाक सर्जन, कार्डियॉलॉजी हे शब्द ऐकले असतील. त्यात कार्डियम हा शब्द हृदय याच अर्थानं वापरतात. तर हृदय नसलेलं फळ म्हणजे काजू. काजूची बी फळात किंवा त्याच्या बोंडात मधोमध नसते, तर बाहेर असते हे याचं तात्पर्य. तमीळमध्ये काजूला ‘मुंडिरी’ म्हणतात. याचा अर्थ फळाच्या आधी किंवा बाहेर येणारी बी. केरळमध्ये काजूचं नाव ‘परंगी मांगा’ आहे. परंगी म्हणजे फिरंगी किंवा परदेशी आणि मांगा म्हणजे आंबा. म्हणजे काजू झाला विलायती आंबा. कन्नडमधील काजूचं ‘गोडांबी’ हे नावही आंब्याशी त्याचं जवळचं नातं सांगणारं आहे. वनस्पतिशास्त्रज्ञही आंबा आणि काजूला एकाच कुळात ठेवतात. 

काजूच्या वरचं बोंड जॅम तयार करण्यासाठी वापरतात. काजू नुसते किंवा खारवून खाल्ले जातात तसेच मिठायांमध्ये, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापरले जातात. काजू बर्फी, काजू कतली ही मिष्टान्नं तुम्हाला एकदम आवडत असतील ना? आणि हल्ली सर्वत्र मिळणारा काजूकंद? आपल्याकडं सणावाराला केल्या जाणाऱ्या शिरा, मसालेभात, शाही पुलाव, या पदार्थांना काजूमुळं केवढी चव येते, आणि हॉटेलात मिळणारी काजूकरी? केरळमध्ये तर मोड आलेले काजूही आवडीनं खातात आणि कोकणात ओल्या काजूची उसळ! काजूचा मूळ प्रदेश असलेल्या ब्राझीलपेक्षाही दुपटीनं उत्पादन आपण आता भारतात करतो. तर असा हा काजू, आपला नसूनही आता किती आपला झालाय.

संबंधित बातम्या