सर्वमान्य मका

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 17 मे 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, हॉटेलात जाऊन चायनीज खायची इच्छा झाली तर आपल्या मनात पहिला पदार्थ कुठला येतो? सूप! तेही स्वीट कॉर्न सूप!  चायनीज रेस्टॉरंटच्या मेनू कार्डमध्ये अगदी पहिले स्थान मिळवणारे हे मक्‍याचे सूप चीनमध्ये कित्येक शतकांपूर्वीपासून केले जात असेल असे तुम्हाला वाटते ना? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. चीनमध्ये अगदी गेल्या एक-दोन शतकांमध्येच हा मका आला आहे. विश्‍वास नाही बसत? तर ही मक्‍याची गोष्ट वाचा. 

मका मूळचा मेक्‍सिकोचा आहे. गेल्या दहा हजार वर्षांत मेक्‍सिकोच्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करून आज आहे तो मका विकसित केला आहे. मेक्‍सिकोमधील तेहूकान या प्रदेशात गुहांमध्ये सर्वसंमत काळापूर्वी किंवा ख्रिस्त जन्मापूर्वी सहा हजार ते चार हजार वर्ष जुने मक्‍याचे अवशेष सापडले आहेत. मका हे एक प्रकारचे गवत आहे. खरे तर आपण खातो ती सारी धान्ये गवतेच आहेत. मात्र मक्‍यामध्ये इतर गवतांसारखी नर आणि मादी फुले एकाच ठिकाणी नसतात. आज आपण जो मका खातो त्याचे कणीस बरेच मोठे असते. मात्र पूर्वीच्या काळातील मक्‍याचे कणीस फक्त दोन सेंटीमीटर लांब एवढेच होते. आपण बेबी कॉर्न खातो त्यापेक्षाही लहान! शेतकऱ्यांनी दरवर्षी येणाऱ्या पिकांमधून जास्तीत जास्त लांब कणीस येणाऱ्या मक्‍याचे दाणे वेगळे करून ते दाणे परत पुढच्या वर्षी पेरून, अन असे काही हजार वर्षं परत परत करून हे बदल घडवून आणले आहेत. 

मक्‍याची वन्य अवस्थेत वाढणारी टेओसिंटे नावाची जात अजूनही मेक्‍सिकोमधील जंगलांमध्ये वाढते. कोलंबस अमेरिकेला पोचायच्या आधी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचे मुख्य अन्न मका हेच होते. युरोपात मका प्रथम स्पॅनिश लोकांनी अमेरिकेतून १४९४ च्या सुमारास नेला. त्यानंतर काही वर्षांत त्याचा युरोपात प्रसार झाला. भारतात एकतर तो पोर्तुगीज लोकांनी सोळाव्या शतकाच्या आरंभी आणला किंवा त्याहीपूर्वी अरब-आफ्रिकनांच्या मार्फत तो इकडं आला असावा असे मानतात. 

आज जगामध्ये लागवडीखालील प्रदेशानुसार मक्‍यानं गहू आणि तांदूळ या महत्त्वाच्या पिकांनाही मागं टाकलं आहे. अर्थात या मक्‍यामध्ये जनावरांना खायला घालायचा मकाही आहे. आपल्याला माहिती असलेला मक्‍याचा उपयोग हा खाण्यासाठी आहे. पण त्याहीपेक्षा मक्‍याचे अनेक उपयोग आहेत अगदी धागे, गोंद, रंगापासून ते कृत्रिम रबर, रेग्जीन तयार करण्यापर्यंत! आता तुम्ही जेव्हा कॉर्न सूप प्याल किंवा कॉर्न पॅटिस खाल तेव्हा मक्‍याची ही गोष्ट तुमच्या आईबाबा किंवा ताईदादाला जरूर सांगा.

संबंधित बातम्या