जमिनीतल्या शेंगांचा मूग 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 24 मे 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मि रोजच्या आहारात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला शेंगदाणा आजच्या आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. पण शेंगदाणा भारतीय नाही हे तुम्हाला माहीत आहे का? आपण सध्या कोलंबसाच्या अमेरिका शोधानंतर झालेल्या देवाणघेवाणीतून आपल्याकडं आलेल्या खाद्य वनस्पतींविषयी जाणून घेत आहोत. त्यातीलच एक आहे शेंगदाणा. 

एखादी वनस्पती आपली आहे की नाही हे जाणून घ्यायचा एक अप्रत्यक्ष मार्ग असतो तो म्हणजे त्या वनस्पतीला इथं मिळालेलं नाव! ही नावं बरेचदा जुन्या - इथं आधीच असलेल्या या नवीन वनस्पतीसारख्या दुसऱ्या वनस्पतींच्या नावावरून तयार झालेली असतात. मुगाशी साधर्म्य असणारे - शेंगदाण्याचे ‘भुईमूग’ हे नाव याच प्रकारचे आहे. गेल्या दोन शतकात शेंगदाण्यानं आपल्या आहारात हळूहळू तिळाची जागा घेतली आहे. १८५० च्या सुमारास भारतात फक्त एक हजार हेक्‍टरवर लावलेला शेंगदाणा आज भारताच्या महत्त्वाच्या पिकांपैकी एक आहे. शेंगदाणा आपल्या जेवणात अनेक प्रकारे वापरला जातो. शेंगदाण्याचे कूट हे भाज्यांमध्ये घालायचे मुख्य पदार्थ आहे.. आणि शेंगदाण्याचं तेल विसरून कसं चालेल? शेंगदाण्याच्या शेंगा भरडून तेल काढलं जातं व राहिलेल्या भागातून जी पेंड मिळते ती जनावरांना अन्न म्हणून दिली जाते. तुम्हाला सगळ्यांना अत्यंत आवडणारी लोणावळ्याची चिक्की सुरवातीला शेंगदाण्यापासूनच केली जात असे, आणि आजही इतर अनेक पदार्थांबरोबर त्यात शेंगदाणाही असतोच. 

शेंगदाण्याचे किती उपयोग असतील? पाच, दहा, वीस? नाही. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या अमेरिकन वनस्पती तज्ज्ञानं शेंगदाण्याच्या नवनवीन उपयोगांवर संशोधन करून शेंगदाण्याचे तब्बल तीनशेहून अधिक उपयोग शोधून काढले होते. 

या खाण्याच्या पदार्थांच्या यादीमुळं पण एक प्रश्‍न बाजूलाच राहिला. शेंगदाण्याचा मूळ प्रदेश कोणता? तर त्याचं अर्धं उत्तर आपल्याला मिळालंच आहे. शेंगदाणा मूळचा दक्षिण अमेरिकेतील! तिथल्या स्थानिक लोकांच्या आहारात तो अनेक शतकं होता, इतका आधीपासून की ख्रिस्तपूर्व तीन हजार ते दोन हजार वर्षं जुन्या असलेल्या पेरू देशातील एका कबरीमध्ये शेंगदाण्याचे अवशेष सापडले आहेत. तर पेरूमध्येच उत्खननात एक पुरातन फुलदाणी सापडली आहे, जी शेंगदाण्याच्या शेंगेच्या आकाराची असून त्यावर शेंगेसारखीच नक्षी काढलेली आहे. शेंगदाण्याचं शेत तुम्ही पाहिलं आहे कधी? आपल्या खायच्या वनस्पतींपैकी शेंगदाणा एकमेव शेंग असेल, जी जमिनीत येते. त्यामुळंच ज्या मराठी माणसानं पहिल्यांदाच हे नवल पहिलं असेल त्यानं या वनस्पतीला किती योग्य नाव दिलं! जमिनीतला मूग - भुईमूग!

संबंधित बातम्या