रामायणात नसलेले सीताफळ
टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....
आपल्या लोकजीवनावर रामायण आणि महाभारत यांचा चांगलाच पगडा आहे. आपल्या कथांमध्ये, साहित्यात रामायण - महाभारताचे अनेक संदर्भ आहेत. किंबहुना एखाद्या नीटशा माहीत नसलेल्या गोष्टींचा संबंध महाभारत किंवा रामायणाशी अगदी सहजपणे जोडला जातो. आपल्याला सर्वत्र अशी उदाहरणे दिसतात. पण खाद्य वनस्पतीचा असा संदर्भ जोडलेले एखादे उदाहरण तुम्हाला आठवतेय का? बरोबर, सीताफळ आणि रामफळ.
सीताफळ मूळचे दक्षिण अमेरिकेतले, तेथून ते मेक्सिकोत गेले. कोलंबसनंतरच्या देवाणघेवाणीत ते युरोपात आणि नंतर पोर्तुगीज लोकांच्या मार्फत भारतात आले. हे फळ आपल्याकडे आले तेव्हा त्यांच्या शीत गुणधर्मामुळे त्याचे नाव पडले शीतफळ व नंतर त्याचा अपभ्रंश होऊन शिताफळ, त्याचे पुढे सीताफळ झाले. यानंतर त्यासारख्याच दिसणाऱ्या वेस्ट इंडीजमधून नंतर भारतात आलेल्या एका फळाला आपण नाव दिले रामफळ! सीताफळाला बंगालीत ‘आते’ असे म्हणतात. ‘आते’ हे नाव मूळ पोर्तुगीज आहे. मागच्या भागांत आपण अशी अनेक उदाहरणे पहिली, की आपल्या मराठीत आपण पोर्तुगीज किंवा थेट दक्षिण अमेरिकन नावे स्वीकारली होती. पण रामायणाच्या प्रभावामुळेच आपण ‘आते’ विसरून सीताफळ हेच नाव रूढ होऊ दिले.
खरे तर सीताफळ एक अखंड फळ नसून फळांचा समूह असतो. सीताफळ आणि रामफळ या दोन्ही फळांचे ज्या शास्त्रीय गटात वर्गीकरण करतात त्या गटाचे नाव आहे ॲनोना. ॲनोना गटातील आणखीही काही फळे आपल्या बाजारात मिळू लागली आहेत. त्यांना आपण लक्ष्मण फळ, हनुमान फळ अशी नावे दिली आहेत. याच कुळातील आंबट चवीचे मामफळही आता कुठेकुठे लावत आहेत. पांढऱ्या गराची सीताफळे तर सर्वत्र मिळतातच; पण सीताफळाच्या काही वाणांमध्ये चक्क सोनेरी तर काहीत जांभळा गर असतो. सीताफळाच्या अवीट गोडीमुळे सीताफळाला इंग्रजीत शुगर ॲपल किंवा कस्टर्ड ॲपल अशी नावे आहेत. अमीर उमराव लोकांच्या अन्नात समावेश असल्याने फारसीमध्ये त्याला शरीफा असे नाव आहे. फळ गोड आणि चवदार असले, तरी सीताफळाच्या बिया काहीशा कडवट असतात व त्या कीटकनाशक म्हणून वापरतात.
सीताफळासारखे दिसणारे एक फळ अजिंठा लेण्यांमधील कोरीव कामामध्ये दिसते. त्यामुळे काही अभ्यासकांनी सीताफळ भारतात आधीपासूनच होते असा तर्क बांधला. पण आता लेण्यांमधील फळ हे कदंब किंवा छोटा फणस असावा असे मानण्यात येते. आपण मात्र या सगळ्या वादात न पडता सीताफळाच्या येणाऱ्या हंगामात त्याच्या गोडीचा आस्वाद घ्यायला तयार राहू.