सुपीक चंद्रकोरीचा प्रदेश 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 21 जून 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपण गेल्या काही आठवड्यांमध्ये कोलंबसानंतर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमधून आपल्याकडे आलेल्या काही वनस्पती पहिल्या. आता आपण कालखंडाच्या बाबतीत थोडे मागे जाऊ, खरेतर बरेच मागे... मानवाच्या विस्ताराच्या इतिहासात त्याच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रदेशांमधून माणसाला खाद्य म्हणून अनेक गोष्टी मिळाल्या. या सगळ्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा होता सुपीक चंद्रकोरीचा प्रदेश किंवा फरटाइल क्रिसेंट. 

आताच्या सीरिया, जॉर्डन या प्रदेशांमध्ये तुर्कस्तानपासून इराणपर्यंत हा प्रदेश एके काळी विस्तारलेला होता. तुम्ही जगाचा नकाशा पाहा म्हणजे हा प्रदेश नेमका कोठे होता, हे तुमच्या लक्षात येईल. हा सुपीक चंद्रकोरीचा प्रदेश नावाप्रमाणेच सुपीक होता. कारण इथे वाहणाऱ्या नाईल, टायग्रीस आणि युफ्रेटीस नावाच्या नद्या! तसेच या प्रदेशातील वेगवेगळ्या भागात असलेल्या असमान उंचीमुळे येथील वनस्पतींमध्ये नैसर्गिकरीत्या विविधता निर्माण झाली. एका अर्थाने आफ्रिका आणि आशिया खंडामधील पूल असल्याने या दोनही प्रदेशातील जैवविविधता इथे वाढू शकत होती. या उपलब्ध जैवविविधतेमधूनच माणसाने अनेक रानटी वनस्पती सुरवातीस खाद्य म्हणून वापरायला आणि नंतर शेतामध्ये लावायला सुरुवात केली. गहू, बार्ली, जवस, हरभरा, मुळा, मसूर, वाटाणा यासारखी पिके याच चंद्रकोरीच्या प्रदेशांत उगम पावली आणि शेतीच्या माध्यमातून माणसाच्या जीवनात महत्त्वाची झाली. 

सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशातच माणसाने गाय, शेळी, डुक्कर, घोडा यासारखे प्राणी माणसाळवले आणि ते शेतीसाठीही वापरले. काच व चाक यासारखे अत्यंत महत्त्वाचे शोध इथेच लागले असे मानतात. शेतीमुळे जास्त होणाऱ्या अन्नोत्पादनामुळे कलाकौशल्यांना चालना मिळाल्यामुळे मानवी संस्कृती खऱ्या अर्थाने पहिल्यांदा इथेच बहरली. पुढे हवामानातील बदलामुळे आणि या भागातील पाणी आणि इतर स्रोतांच्या अतिरिक्त वापरामुळे इथल्या परिस्थितीत अनेक बदल झाले आणि माणसाला सुपीक चंद्रकोरीचा हा प्रदेश सोडून जगभर पसरावे लागले. पण माणसाने इथून जाताना आपल्याबरोबर इथल्या अनेक खाद्य वनस्पती सर्वत्र नेल्या. पुढे अमेरिकेच्या शोधानंतर त्या तिथेही पोचल्या. कोलंबस पोचण्यापूर्वी अमेरिकेत ना गहू होता ना गाय होती. 

याच सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशातील वनस्पती आणि मध्य पूर्वेत इतरत्र उगम पावलेल्या आणि आपल्या आहारात महत्त्वाच्या असणाऱ्या इतर काही वनस्पतींच्या विषयी पुढच्या भागापासून आपण माहिती घेऊ. तोपर्यंत जगाचा नकाशा घेऊन त्यातून हा सुपीक चंद्रकोरीचा प्रदेश शोधून काढा.

Tags

संबंधित बातम्या