हराभरा हरभरा 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 5 जुलै 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशात उगम पावलेला गहू आपल्याकडे येऊन आपलाच झाला, तशीच या प्रदेशात जेथे आता तुर्कस्तान आहे तेथे उगम पावलेली आपल्या आहारातील आणखी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे हरभरा होय. हरभऱ्याला हिंदीमध्ये चना, तर संस्कृत मध्ये चनका असे नाव आहे. तमीळमध्ये हरभऱ्याला कडलई म्हणतात. या शब्दाचा अर्थ आहे समुद्रकिनारी वाढणारा. हरभरा तमिळनाडूमध्ये पहिल्यांदा समुद्रकिनारी लावला गेला त्यावरून हे नाव आले असेल असा तर्क सहज लावता येतो. इंग्रजीत हरभऱ्याला चीक पी किंवा बंगाल ग्रॅम असे म्हणतात. इंग्रजांनी हरभऱ्याची बंगालमध्ये असलेली मोठी लागवड पहिली आणि हे नाव दिले. 

हरभरा माणसाच्या अन्नात खूप पूर्वीपासून आहे. सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशातून माणसाची पांगापांग झाल्यावर भारतात आलेल्या लोकांनी आपल्याबरोबर हरभरा इथे आणला व तो सर्वत्र लागवडीखाली आला. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती दाखवणाऱ्या कालीबागन नावाच्या शहरामध्ये शेती विकसित झाली होती त्या काळचे हरभऱ्याचे अवशेष सापडले आहेत. हे कालीबागन राजस्थानमध्ये सध्याच्या बिकानेरजवळ होते. भारतात विकसित झालेला अन आपल्या सध्याच्या वापरात असलेला हरभरा छोटा आणि सुरकुत्या असणारा आहे. तर मध्य पूर्वेकडे विकसित झालेला हरभरा आकाराने मोठा आहे. या मोठ्या हरभऱ्याला काबुली चना असे मध्य पूर्वेतील काबूल प्रदेशावरून दिलेले नाव आपल्याकडे रूढ आहे. या मोठ्या हरभऱ्याचे छोले तुम्ही आवडीने खात असाल. जगाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे पासष्ट टक्के उत्पादन भारतात होते. भारतात तर हरभरा खाल्ला जातोच; पण तो ज्या ज्या परदेशात गेला त्या त्या लोकांनी हरभऱ्याला आपलेसे केले आहे. जेवणात तर सोडाच, तर पेयांमध्येही! पहिल्या महायुद्धात जर्मनीमध्ये कॉफीच्या पावडरची कमतरता निर्माण झाली होती तेव्हा त्याऐवजी लोकांनी भाजलेल्या हरभऱ्याची पूड कॉफी म्हणून वापरली होती असे उल्लेख आहेत. 

हरभरा आपल्या अन्नात अनेक वर्षांपासून असल्याने त्याच्या डाळीपासून केलेल्या पिठाच्या अगणित पाककृती जेवणात आहेत. हुरड्याबरोबर हरभऱ्याचे टहाळे भाजून खाल्ले जाते त्याला हावळा असे म्हणतात. हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजीही खाल्ली जाते. हरभरा असलेल्या पदार्थांशिवाय आठवडा काय एखादा दिवसही काढणे आपल्याला अवघड आहे. तर असे आहे हे हरभरा पुराण, सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशातून आपल्या अन्नात बस्तान बसेपर्यंतचे! हरभऱ्याची ही माहिती तुम्ही तुमच्या ताईदादाला सांगितली आणि त्यांनी तुमचे कौतुक केले, तर लगेच ‘हरभऱ्याच्या झाडावर’ मात्र चढून बसू नका.

संबंधित बातम्या