आपले लाडके कलिंगड
टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....
मित्रांनो, सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशाच्या जवळपास उगम पावलेल्या अनेक खाद्य वनस्पती आपल्या आहारात आहेत. त्यापैकी एक आपले सगळ्यांचे आवडते फळ म्हणजे कलिंगड होय. केवळ तुमचे माझे नव्हे, तर तुम्ही सध्या बघत असलेल्या फुटबॉलचे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांचेही! तुम्हाला माहिती आहे का, की कॅनडातील एका फुटबॉल क्लबचे समर्थक प्रेक्षक आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी कलिंगड कोरून तयार केलेले हेल्मेट वापरतात? आहे ना गमतीदार.
पण हे कलिंगड मूळचे ना कॅनडाचे आहे ना भारताचे! कलिंगडाचा उगम आफ्रिका खंडातील ईशान्य टोकाला असलेल्या लीबिया, इजिप्त, सुदान, इथिओपिया या देशांमधला आहे. नाईल नदीच्या तीरावर कलिंगड उत्क्रांत झाले असे मानतात. इजिप्तच्या राजघराण्यांमध्ये कलिंगड अत्यंत प्रिय होते. तिथल्या काही जुन्या चित्रांमध्येही कलिंगड चितारलेले आहे. वन्य अवस्थेत त्याचे काही कडू चवीचे वाणही अजून या प्रदेशात वाढत आहेत. आफ्रिकेतून सातव्या शतकात कलिंगड भारतात आले व पुढे दहाव्या शतकाच्या अखेरीस ते चीनमध्ये पोचले. चीनमधूनच त्याचा जगभर प्रसार झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. मात्र त्याचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्येच होते.
कलिंगडाला इंग्रजीत वॉटरमेलन असे नाव आहे. कलिंगड हे नाव कलिंग या संस्कृत नावावरून आले आहे. त्याला आपल्याकडे कधीकधी टरबूज असेही म्हणतात. कलिंगडाचा वेल जमिनीलगत वाढणारा असतो. भारतात मोकळ्या जमिनीवर किंवा नदीकाठाच्या वाळवंटात कलिंगड लावतात. आपल्याकडे कधीकधी ते उसाच्या शेतात, तर आफ्रिकेत मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून लावतात. एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान जपानी शास्त्रज्ञांनी कलिंगडाची बिया नसलेली सीडलेस जात पहिल्यांदा तयार केली. तेव्हापासून सीडलेस जाती जास्त लोकप्रिय आहेत. कलिंगडात पाण्याचे जास्त प्रमाण तसेच अ व क जीवनसत्त्वे असल्याने उन्हाळ्यात कलिंगड खाणे प्रकृतीला चांगले असते.
कलिंगडाच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी शुगर बेबी ही आपल्याकडे बाजारात मिळणारी महत्त्वाची जात आहे. जपानमध्ये एका जातीची कलिंगडे फळ लहान असतानाच काचेच्या पेटीत बंदिस्त करून चक्क चौकोनी (घनाकृती) आकाराची कलिंगडे मिळवतात. कलिंगडाला विविध देशात सांस्कृतिक महत्त्वसुद्धा आहे. व्हिएतनाममध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कलिंगडाच्या बिया खाल्ल्या जातात, तर त्याच्या सालीचे लोणचेही घातले जाते. कलिंगडाच्याच प्रजातीमधले खरबूज किंवा मस्क मेलन नावाचे फळही अत्यंत लोकप्रिय आहे.