पिवळाजर्द जर्दाळू 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 19 जुलै 2018

बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....
 

मित्रांनो, वनस्पतींनी वर्षानुवर्षे माणसाला अनेक उपयुक्त खाद्य-गोष्टी दिल्या आहेत, त्यापैकी महत्त्वाची आहेत फळे! काही आहेत मधुर, रसाळ, तर काही सुकी, पाण्याचा फारसा अंश नसलेली, खूप काळ साठवता येतील अशी. सुक्‍या मेव्यातली फळे याच दुसऱ्या प्रकारची आहेत. मेवा शब्दाचा पर्शियन अर्थच मुळी फळ असा आहे. सुकामेवा म्हटले, की तुमच्या डोळ्यासमोर काय येते? काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, चारोळ्या, खारीक, खजूर, मनुका.. बरोबर? हे सारे सुक्‍या मेव्याचे घटक आहेत. पण यातला एक राहिला, तो म्हणजे फारसा परिचित नसलेला जर्दाळू. 

अर्मेनिया हा जर्दाळूचा मूळ उगमप्रदेश आहे. पण भारतात हिमालयात अन चीनमध्ये जर्दाळूची सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी लागवड केली जात होती. ह्युएन-त्सांग या भारतभेटीसाठी आलेल्या चिनी विद्वानाने भारतात काश्‍मीरमध्ये जर्दाळू लावला जातो असे लिहून ठेवले आहे. जर्दाळू फळ देणारा वृक्ष मध्यम आकाराचा असतो. जर्दाळूचे फळ ओले आणि सुकवलेले, दोन्ही प्रकारे खाल्ले जाते. सम्राट अलेक्‍झांडरने जर्दाळूचे फळ प्रथमतः ग्रीसमध्ये नेले. त्यानंतर मग या फळाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर युरोपमध्ये झाला. जर्दाळू हे आपल्याकडचे नाव, झर्द-आलू म्हणजे पिवळे गोल फळ या पर्शियन नावावरून आले आहे. आपण अजूनही गडद पिवळ्या रंगाला पिवळाजर्द असे म्हणतोही. जर्दाळूला इंग्रजीत ॲप्रिकॉट असे नाव आहे. जगभरात अनेक पदार्थांमध्ये, पेयांमध्ये जर्दाळूचा वापर केला जातो. 

जर्दाळूचे अनेक औषधीही उपयोग आहेत. जर्दाळूच्या वनस्पतीशास्त्रीय कुळामध्ये चेरी, बदाम, पिच, आलूबुखारा आहे. यातला आलूबुखारा आपल्याकडेही काही ठिकाणी बाजारात मिळतो. आलू शब्दाचा अरेबिक भाषेत कोणतेही गोल फळ किंवा गोल वस्तू असा अर्थ आहे. बुखारा याचा बुखार म्हणजे तापाशी काही संबंध नाही. मध्य पूर्वेतील उझबेकिस्तान देशातील एका व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या शहराचे नाव बुखारा आहे. या प्रदेशातच या फळाचा मोठा व्यापार होत असल्याने आपल्याकडे या फळाचे आलूबुखारा हे नाव आले. आलूबुखाराची फळे लाल, पिवळ्या व कधीकधी गडद हिरव्या रंगाची असतात. आलूबुखारा जर्दाळूपेक्षा जास्त दिवस आंबट राहातो. याची साल फळाच्या गरापेक्षा जास्त आंबट असते. यामुळे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आंबटपणा आणण्यासाठी आलूबुखारा घातला जातो. खारवलेले आलूबुखारा जगात अनेक ठिकाणी आवडीने खाल्ले जातात. आलूबुखाराची चटणी, मुरंबेही प्रसिद्ध आहेत. आलूबुखाराला इंग्रजीत प्लम म्हणतात. तर असे हे जर्दाळू आणि आलूबुखारा. ज्या मित्रांनी ही दोन्ही फळे अजून खाल्ली नाहीत त्यांनी ती एकदातरी आणून खाऊन बघायला हवीत.

संबंधित बातम्या