प्राचीन संस्कृतीचे अन्न

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 27 जुलै 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपल्याकडे ज्या गोष्टींना पौष्टिक म्हणून मानतात त्यात खजूर आणि खारीक यांना फार वरचे स्थान आहे. तुम्हालाही आईबाबांनी लहानपणी बरेचदा खजूर, खारीक खायला घातली असेल. पण खजूर आणि खारीक यांमध्ये नेमका फरक काय असा विचार कधी केलाय तुम्ही? खरेतर खारीक म्हणजे वाळवलेला खजूरच आहे. मात्र एका विशिष्ट जातीचाच खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. इराण, इराक, सौदी अरेबिया, ओमान, तुर्कमेनिस्तान हे प्रदेश खजुराचे मूळस्थान आहेत. 

सर्वमान्य युगाच्या तब्बल चार हजार वर्षे आधीपासून खारीक आणि खजूर माणसाच्या अन्नात आहेत. खजुराचे फोईनिक्‍स हे वनस्पतीशास्त्रीय नावही त्याच्या प्राचीनतेला आधार देते. सुपीक चंद्रकोरीच्या पश्‍चिमेकडे सर्वमान्य युगाच्या तब्बल अडीच हजार वर्षांपासून नांदत असलेल्या एका संस्कृतीचे नाव फोईनिसिया होते. या संस्कृतीच्या नावावरूनच फोईनिक्‍स हे शास्त्रीय नाव तयार झाले आहे. अर्थात फोईनिसिया याचा मूळ अर्थ जांभळा रंग असा आहे. रोममध्ये युद्धानंतरच्या विजयी मिरवणुकांमध्ये खजुराच्या झावळ्या घेतलेले लोक सर्वांत पुढे असत, यावरूनही खजुराचे महत्त्व लक्षात येते. 

खजूर पाम गटातील वृक्ष असून तो बराच उंच असतो. इतका उंच की ‘आसमानसे गिरे और खजूरमे अटके’ अशी एक म्हणच आहे. खोडाच्या टोकाशी पानांच्या झावळ्या असतात. खजुरामध्ये नर आणि मादी झाडे वेगवेगळी असतात. पानांच्या बेचक्‍यात फुलोरे व नंतर फळे येतात. ही फळे जमा करून एका विशिष्ट प्रक्रियेने खारकेसाठी वाळवली जातात. मध्यपूर्वेच्या प्रदेशात खजुराच्या वृक्षांची अनेक नवनवी वाणेही विकसित केली आहेत. याच मध्यपूर्वेतून खजूर भारतात आला आणि सिंधू संस्कृतीचाही अन्नाचा महत्त्वाचा घटक बनला. जगभरात अनेक गोड पक्वान्नांमध्ये, वेगवेगळ्या पाककृतींमध्ये खजुराचा वापर केला जातो. खजुराला संस्कृत तसेच हिंदीत खर्जुरी तर इंग्रजीत डेट असे म्हणतात. 

खजूर हा मूळचा भारतीय नाही पण खजुराचा भाऊबंध असणारी एक जात आपल्याकडच्या जंगलांमध्ये आहे, तिचे नाव शिंदी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जागोजागी नीरा नावाच्या पेयाच्या ज्या टपऱ्या असतात ती नीरा आपल्याला शिंदी या झाडापासूनच मिळते. झाडाच्या टोकाशी असलेल्या पानांच्या झावळ्यामधला एक भाग स्वच्छ करून तेथे इंग्रजी व्ही आकाराची खाच करून या खाचेतून स्तवरा रस झाडाला टांगलेल्या एका मडक्‍यात जमा केला जातो. हा रस म्हणजेच नीरा होय. निरेपासून गूळही तयार करतात. बंगालमध्ये हा गूळ अजूनही प्रसिद्ध आहे. संक्रांतीच्या सुमारास तेथे या खजुराचा गूळ घालून तयार केलेले रसगुल्ले आवडीने खाल्ले जातात.

संबंधित बातम्या