रडवणारा कांदा 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, अशी कोणती खाद्य वनस्पती आहे तिच्या वापराशिवाय अनेक खाद्यपदार्थ, अनेक पाककृती पूर्ण होऊच शकत नाहीत? काही सुचतेय का? अजून एक प्रश्‍न.. कदाचित आता सुरू झालेल्या चातुर्मासात तुमचे आजीआजोबा कोणती वनस्पती खात नाहीत? बरोबर कांदा! 

अनेक पदार्थांना चव देणारी कांदा आणि लसूण ही आपल्या जेवणातली जोडगोळी प्रसिद्ध आहे. कांद्याशिवाय तर आपल्याला जेवणाची कल्पनाच करता येणार नाही. माणसाच्या अन्न इतिहासातील अगदी जुना, आपल्या आहारात स्थिरावलेला पण तरीही काही विशिष्ट वेळी आपण त्याला दूर ठेवतो असा कांदा मूळचा अफगाणिस्तानचा आहे. कांद्याचे रानटी भाऊबंद आपल्याकडे लडाखमध्येही मिळतात; मात्र ते खाल्ले जात नाहीत. इजिप्तमध्ये सर्वमान्य युगापूर्वी तब्बल २८०० वर्षे कांदा ज्ञात आहे. ‘ममी’मध्ये इजिप्शियन लोक कांदा वापरत असत. ममी म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इजिप्तमधील लोक त्या मृत शरीराला रसायने आणि मसाल्यांनी युक्त अशा शवपेटीमध्ये ठेवायचे. ममीत वापरलेल्या मसाल्यांमध्ये कांद्याचा वापर केला जात असे. भारतामध्ये मात्र कांदा प्रथमपासूनच परकीयांचे अन्न म्हणूनच गणला गेला. त्यामुळे काही प्रसंगी कांदा खाणे निषिद्ध मानले गेले. मात्र इथे त्याचा अडीच हजार वर्षांपूर्वीही औषधात वापर होत होता असे काही लिखाणांमध्ये उल्लेख आहेत. 

भारतात सातव्या शतकात आलेल्या ह्युएन-त्सांग नावाच्या चिनी विद्वानाने खाण्यातल्या निर्बंधाविषयी लिहून ठेवलेले आहे. मात्र इतके सगळे निर्बंध असूनही संस्कृतमधील हा पलांडू मात्र आपल्या जेवणात हरतऱ्हेने भाग घेत असे. अकबराच्या ऐन-ए-अकबरी ग्रंथात कांद्याच्या कित्येक पाककृतींचे उल्लेख आहेत. आपल्याकडे अजूनही पाककृती शाकाहारी असो की मांसाहारी, फोडणीमध्ये मोहरी पाठोपाठ कांदा पडतोच. नाशिकजवळचे लासलगाव हे भारतातील कांद्याच्या व्यापाराचे मोठे केंद्र आहे. भारतभरात वेगवेगळ्या प्रदेशात विविध जातींचे कांदे खाल्ले जातात. मणिपूर, मेघालयात छोट्या कांद्यांची एक चिनी जात वापरली जाते, तर तमिळनाडूमध्ये सांबरात एका जातीचा अख्खा कांदा घातला जातो. 

कांदा हसवतो तसा रडवतोही. एका विशिष्ट रसायनामुळे कांदा चिरला की आपल्या डोळ्याला पाणी येते. मात्र तरीही जगभरात कांद्याचे गुण गायले जातात. कांद्याच्या पोषकतत्त्वावर आणि औषधी गुणांवर खूप विश्‍वास असलेल्या एका अमेरिकन सैन्य अधिकाऱ्याने, जनरल ग्रांटने ‘भरपूर कांदे सोबत दिल्याशिवाय सैन्य युद्धावर जाणारच नाही,’ असे अधिकाऱ्यांना बजावले होते म्हणे. तुम्हीसुद्धा ‘फोडणीत कांदा असल्याशिवाय मी काही एक खाणार नाही’ असे आईला फारतर म्हणू शकता.

Tags

संबंधित बातम्या