अंजीर-मध्यपूर्व ते पुणे 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, आपण मागच्या भागात ज्याविषयी वाचले तो पिस्ता जसा मध्य पूर्वेतला तसेच त्याचा सुक्‍या मेव्यातील आणखी एक भाऊ अंजीरसुद्धा मध्यपूर्वेतलेच आहे. अंजिराचे अनेक वनस्पतीशास्त्रीय भाऊबंद भारतात आहेत. पिंपळ, उंबर, वड हे त्यापैकीच, पण वन्य अवस्थेत वाढणारे अंजीर आपल्या भारतात नाहीत. 

अंजिराचा मूळ प्रदेश इराण, इराक, अफगाणिस्तान आणि त्याभोवतालचे देश आहेत. अंजीर माणसाच्या खाण्यात कधी आले याविषयी नेमकी माहिती उपलब्ध नसली, तरी ते माणसाच्या अत्यंत प्राचीन अन्नापैकी आहे याविषयी कोणाचे दुमत नाही. मध्य पूर्वेबरोबरच ग्रीसमध्ये अंजीर इतके विस्तारलेले होते, की ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या लिखाणात अंजीर लागवडीविषयक टिपणे आहेत. भारतात अंजीर नेमके कधी आले याविषयी मात्र थोडी मतांतरे आहेत. चंद्रगुप्ताचा पुत्र आणि सम्राट अशोकाचा पिता असलेल्या बिंदुसार याने अंजिरे चाखलेली होती. त्यामुळेच त्याने अंजिराचे रोप भारतात पाठवण्याविषयी ग्रीस देशाची पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याच्या कारकिर्दीत अंजिराची रोपे भारतात आली नाहीत, किंबहुना बिंदुसारनंतर काही शतके भारतात अंजीर नसावेच कारण आपल्या मध्ययुगीन साहित्यात अंजिराचे स्पष्ट उल्लेख नाहीत. 

भारतातला त्यापुढचा अंजिराचा उल्लेख थेट पुण्यातून आहे. एल्फिन्स्टन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने पेशव्यांशी पुण्यातच झालेल्या युद्धापूर्वी काही सॅंडविच आणि अंजीर खाल्ले होते असे लिखित उल्लेख आहेत. हे युद्ध ‘खडकीचे युद्ध’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. याच एल्फिन्स्टनने पुढे भारतात बऱ्याच सुधारणा आणल्या. मात्र अंजीर जरी भारतात त्या आधी नव्हते, तरी उंबराची फळे आपल्याकडे खाल्ली जात असत. त्यामुळे एकसारखीच फळे असल्याने आधीच्या ग्रंथांत, चित्रांत आणि शिल्पांत अंजीर आहे की उंबर हे ठरवणे थोडे अवघड आहे. एक मात्र खरे, की उंबराशी साधर्म्य असल्यामुळे अंजीर भारतात लवकर लोकप्रिय झाले. 

इंग्रजीत अंजिराला कॉमन फिग असे नाव आहे. त्याचे वड, पिंपळ, उंबरासोबत वनस्पतीशास्त्रीय प्रजातीनाम फायकस हे आहे. फायकस हे नावही फिग या नावावरूनच आले आहे. सध्या अंजीर जगभर लावले जाते. महाराष्ट्रात पुणे परिसरातील अंजीर लोकप्रिय आहे, तर भारतात पंजाबमधील! अंजीर जरी सगळीकडे फळ म्हणून विकले जात असले तरी आपण जे अंजीर पाहतो ते एक फळ नसून फळांचा समूह असतो, या फळातच आधी फुले विकसित झालेली असतात. पिकलेली फळे खाण्यासोबत जिरे वाळवून खाल्ली जातात तसेच त्याचे मुरंबेही करतात. अंजिराच्या फळाच्या रंगावरून अंजिरी रंग मराठीत आला आहे.

संबंधित बातम्या