रसदार डाळिंब 

डॉ. मंदार नि. दातार
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, तुमच्या आवडत्या फळात डाळिंब खात्रीने असेल. कारण त्याची चव न आवडणारे फारसे लोक नाहीत. डाळिंब केवळ सध्याच्या काळात लोकप्रिय आहे असे नाही तर मानव खात असलेल्या सर्वाधिक जुन्या फळांपैकी डाळिंब एक आहे. या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते. म्हणजे आपण सध्या ज्याविषयी वाचत आहोत त्या सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशाजवळच! मध्यपूर्वेतील जुन्या साहित्यात तर डाळिंबाचे उल्लेख आहेतच पण भारतात आणि युरोपातही आहेत. युरोपातील सर्वश्रेष्ठ कवी मानल्या गेलेल्या ‘होमर’च्या ओडीसी ग्रंथांत डाळिंबाचा उल्लेख आहे. 

ग्रीक व रोमन लोकांना डाळिंबाच्या फळाचे खाद्य गुण आणि सालीचे औषधी उपयोग माहिती होते. पण त्याही पूर्वी असीरियन व इजिप्शियन लोकांनी निर्माण केलेल्या शिल्पांवर आणि कोरीव कामावर डाळिंबाची चित्रे आहेत. फ्रान्समधील बरगंडी प्रांतात अत्यंत जुन्या काळातील अश्‍मीभूत झालेली डाळिंबाची फळे सापडली आहेत. 

मध्यपूर्वेशी असलेल्या भौगोलिक जवळिकीमुळे डाळिंब खूप पूर्वीच भारतात आले. सिंधू संस्कृतीचे अवशेष असलेल्या हडप्पा या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे चार हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी सापडली आहेत, त्यातील काहींचा आकार डाळिंबावरून प्रेरित आहे असा अभ्यासकांचा तर्क आहे. पुढे महाभारत, चरक संहिता, दक्षिण भारतातील तमीळ संगम साहित्य या सर्वांत डाळिंबाचे उल्लेख आहेत. 

डाळिंबाला संस्कृतमध्ये ‘दाडिम’ म्हणतात. दाडीम हे नावही कदाचित मध्य पूर्वेत वापरात असावे. इंग्रजीत डाळिंबाचे नाव पोमग्रॅनेट आहे. पोम म्हणजे फळ आणि ग्रॅनेट किंवा ग्रॅनाइट म्हणजे दगड. डाळिंबाच्या दगडी भासणाऱ्या फळावरून हे नाव आले आहे. डाळिंबाच्या इंग्रजी नावाशी साधर्म्य असलेले त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनेटम आहे. ग्रॅनेटमचा अजून एक अर्थ भरपूर दाणे असलेले फळ होय. मराठीतले डाळिंब हे ‘दाडीम’चाच अपभ्रंश आहे. हिंदीमधले डाळिंबाचे अनार हे नाव पर्शियन भाषेतून जसेच्या तसे आले आहे. पर्शियात डाळिंबाचे फूल इतके सुंदर मानले जाते की सुंदर स्त्रीला डाळिंबाच्या कळीची - अनारकलीची उपमा देतात. 

भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरड्या प्रदेशात डाळिंबे चांगली वाढतात. उत्तर भारतात डाळिंबाचे वाळवलेले दाणे अन्नाला आंबटपणा आणण्यासाठी वापरतात. त्यांना अनारदाना असे म्हणतात. ग्रीक पुराणात डाळिंबाशी संबंधित अनेक कथा आहेत. ज्यू लोकांच्या एका पुराणकथेनुसार डाळिंबाच्या फळावर असणाऱ्या कॅलिक्‍स किंवा निदलपंजाच्या रचनेतूनच राजा राणींच्या मुकुटांची कल्पना सुचली आहे.

संबंधित बातम्या