न्यूटनचे सफरचंद 

डॉ. मंदार नि. दातार
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

टेस्टी गोष्टी
बटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....

मित्रांनो, ‘ॲपल अ डे, कीप्स डॉक्‍टर अवे’ या उक्तीमुळे लोकप्रिय झालेले सफरचंद आपल्याकडे सर्वकाळ आणि सहज मिळणारे फळ आहे. किंबहुना तुमच्यापैकी बहुतेकांच्या आवडत्या फळात सफरचंद अगदी खात्रीने असेल. मूळ थंड प्रदेशात वाढणारे हे फळ फळांच्या जागतिक व्यापारात सर्वांत आघाडीवर आहे. 

मध्य आशिया हे सफरचंदाचे उगमस्थान होय. कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये सध्या असलेल्या डोंगराळ भागात सफरचंद उगम पावले. हिमालयात भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या काही भागात ते ‘वन्य’ असावे असे काही अभ्यासकांचे मत आहे. मानवाने हजारो वर्षे प्रयत्नपूर्वक निवड करून चांगल्या दर्जाची सफरचंदे पुढे आणली. मध्य आशियामधूनच ती युरोपात आणि आशियाच्या बाकीच्या भागात पोचली. युरोपमध्ये सफरचंद खूप आधी पोचल्यामुळे तिथल्या अनेक संस्कृतींमध्ये त्याला मानाचे स्थान होते. होमर, प्लीनी यांच्या साहित्यात अनेकदा सफरचंदाचे उल्लेख येतात तर अनेक ग्रीक  लोककथांमध्येही सफरचंद स्थान मिळवून आहे. 

युरोपात मोठ्या प्रमाणावर विस्तार, लागवड झाल्यावर पुढे सतराव्या शतकात सफरचंद अमेरिकेत पोचले. त्यानंतर उत्तर अमेरिकेत त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू झाली. भारतात काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशात सफरचंदाची लागवड आहे. ही लागवड गेली अनेक शतके केली जात आहे. एव्हरेस्ट, तिबेट या विषयावर विपुल लेखन करणाऱ्या व ब्रिटिश सैन्यात अधिकारी असणाऱ्या फ्रॅंसिस यंगहसबंडने काही रानटी सफरचंदाच्या जाती हिमालयात भाजी म्हणून खाल्ल्या जातात असा उल्लेख केला आहे. आम्री आणि तरेहली नावाच्या स्थानिक जातींची सफरचंदे काश्‍मिरात खाल्ली जातात. मात्र गेल्या काही वर्षांत उत्तमोत्तम फळे देणाऱ्या सफरचंदाची अनेक वाणे व नवनव्या जाती विकसित केली गेली आहेत. चरक ऋषींनी वर्णन केलेले सिंचीतीकफल म्हणजे सफरचंद असावे असे काही अभ्यासक मानतात, यावरूनच भारतात खूप आधीपासून हे फळ असावे असा तर्क लावता येतो. 

ॲपल म्हणजेच ‘मूळ फळ’ अशी युरोपात इतकी धारणा होती, की नंतर आलेल्या पाईनॲपल, कस्टर्ड ॲपल, वूड ॲपल, रोज ॲपल या फळांना सफरचंदावरूनच नावे दिली गेली आहेत. सफरचंदाला हिंदीत सेब असे नाव आहे. हे नाव मूळ पर्शियन आहे. मध्य पूर्वेत सफरचंद जनमानसात इतके रुजले आहे, की जेव्हा बटाटा तिथे पहिल्यांदा नेला गेला तेव्हा त्याला जमिनीखालचे सफरचंद किंवा सेब-ए-जमीन हे नाव पडले. या फळाने मानवाच्या इतिहासात अन्न म्हणून क्रांतीच केली; पण आपले विज्ञान पुढे न्यायला सफरचंदानेच मदत केली आहे. आठवते ना, वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटनला सफरचंदाच्या झाडाखालीच तो गुरुत्वाकर्षणाचा प्रसिद्ध सिद्धांत सुचला होता.

संबंधित बातम्या